‘राणी’ आय मिस यू !

माझ्या लहानपणी घरापेक्षा अंगण मोठे असायचे . शिवाय घरा मागे पण मोकळी जागा असायची . तेथे गुरांचा गोठा आणि त्यात एखादी दुभती म्हैस किंवा गाय असायची . बैल बारदाना शेतात . अंगणात तुळशी वृंदावन त्याचा समोर एकाच दगडात कोरलेले नंदी आणि शिवलिंग असे . अंगणात सकाळी सडा हे नित्यकर्माचा भाग असे . संध्याकाळी कधीतरी नुसते पाणी शिंपडले जाई .तुळशी वृन्दावना समोर रोज तिन्हीसांजेला सांज वात , त्याचा समोर हात जोडून नऊवार साडीतली माझी आई , निरांजनाच्या तांबूस प्रकाशात तिचा उजळलेला चेहरा हे चित्र माझ्या मनावर कायमचे कोरलेले आहे . आम्हा लहानग्यांचा वावर घरा पेक्षा अंगणातच ज्यास्त . घर कश्याला ? तर जेवायला आणि झोपायला !

पूर्वी आंगण मुक्त होती. माणसं सोडाच जनावरांना सुद्धा बंदी नसायची . दुपारच्या उन्हाच्या कहरात चार दोंन कुत्री , बकऱ्या , किंवा एखादी रवंथ करणारी गाय अंगणात ध्यानस्थ बसलेली असायची . हळूहळू अंगणावर बंधने येत गेली . सुरवातीची तारेची कुंपणे ,पुढे पुढे मजबूत भिंतीत रूपांतरित झाली . त्याला भक्कम गेट , दांडग्या कड्या , आणि कुलपे ! या बदलातून माझे हि सध्याचे घर सुटले नाही .!

मनाचा आणि घराच्या अंगणाचा खूप जवळचा सबंध असावा , कारण जसे जसे अंगण बंदिस्त आणि आकसत चाललंय तशी तशी माणसांची मन पण आकसत आहेत . फ्लॅटला तर अंगण नाही ! जागेचा प्रश्न आहेच म्हणा .

एखाद्या तरुणीच्या गालावरची गोड खळी म्हणा ,नाजूक ओठाजवळचा किंवा निमुळत्या हनुवटीवरला तीळ म्हणा , हा तिचा ‘ब्युटी स्पॉट ‘ असतो ,तसे माझ्या घराचे अंगण हा माझ्या घराचा ‘ ब्युटी स्पॉट’ आहे ! जसे सगळीच्या सगळी तरुणी सुंदर असते तसे माझे घर आहे पण ब्युटी स्पॉट तो ब्युटी स्पॉटच ! माझ्या घराचे अंगण छोटेसेच आहे . जेम तें पाच बाय पंचेवीस फूट !अंगणाला शहाबादी दगडाची फरशी आणि कम्पाऊंडवॉलच्या आतल्या कडेनी फुलझाडे लावली होती . मी आणि बायकोने कुठून कुठून — कधी नर्सरीतून , तर कधी दारावर रोपे विक्रीला अलीतर , तर कधी कुणाला मागून फुलांची आणि शोभेची झाडे आणली हाती . बायकोने चार सहा प्रकारचे जास्वंद लावले होते . कोणाच्या तरी झाडाची फांदी आणायची कशीही जमिनीत खुपसायची झालं ! रोज पाणी घालायचं ! तीन लावलेलं एक हि रोप कधीच सुकले नाही !

अनेक लोक लावतात तसे ,पांढरा , पिवळा , केशरी सगळ्या प्रकारचे (गुलाबी सोडून !)गुलाब आम्ही पण लावले होते . सगळ्या झाडात ‘गुलाब ‘ भयंकर हेकट झाड असत ! ते सगळ्यांच्या घरी फुलत नाही ,असा माझा आजवरचा अनुभव आहे ! त्या नर्सरीवाल्याच्या कळकट प्लॅस्टिकच्या पिशवीत वळचणीला पडलेले ,एक फुल आणि एक कळी असलेलं दणकट दिसणार रोप , घरी आणून ऐसी पैस कुंडीत लावलेकी ,चार-दोन दिवसात ते टपोरे फुल मान टाकत ,अन मग चार-दोन दिवसात ते झाड सुद्धा ! एकही गुलाब माझ्या दारी फुलला नाही ! बाकी लोकांच्या दारी मात्र गुलाबाचे ताटवेच्या ताटवे ! बहुदा गुलाब हा फक्त गोऱ्या आणि सुंदर माणसांच्याच अंगणात बहरत असावा .!

आम्ही नातवाच्या सोयीसाठी उन्हाळ्याच्या सुटीत बेंगलोरला जाऊ लागलो ,तसे झाडांचे हाल होऊ लागले . घुशी अंगणाची फरशी खिळखिळी करू लागल्या . कारण आमचा मुक्काम दोन दोन महिने बेंगलोरला असतो . तरी कुंडाचा वेल, जास्वंद , मोगरा टिकाव धरायचे . पावसाची एखादी सर अली कि टवटवीत व्हायचे ! पण एक दोनदा साप निघाला . मग मात्र आम्ही फरशी काढून , अंगणात भर घालून सिमेंट ब्लॉक घालून घेतले . त्याच बरोबर ‘उन्हाळ्यात देखभाल होत नाही ‘ म्हणून सगळी झाडे पण तोडून टाकली . जास्वंदीने आपला खूप ‘पिसारा ‘ फुलवला होता . पिवळे ,लाल ब्लॉक मुळे अंगण मोठे आणि स्वच्छ दिसत असले तरी पण मला मात्र थोडे उदासच वाटत होते . देवळातल्या स्वच्छतेला जी सोज्वळता असते , ती हॉटेल किंवा हॉस्पिटलच्या स्वच्छेतेत नसते ! तसेच काहीसे झाले होते . माझ्या उदासीचे अजून एक कारण होते . जास्वंदी छान वाढली होती . ती तोडताना पाच पन्नास चिमण्याचा थवा उडाला होता . नन्तर दोन दिवस ती पाखर आपला निवारा शोधत आसपास फिरत होती ! मी एका झटक्यात पंचेवीस तीस पाखरांची सावली ,आधार ,आणि काही जणांची घरटी उध्वस्त केली होती !

नव्या अंगणाला मन सरावात असताना एकदा ब्लॉकच्या फटीतून दोन जागी पोपटी पालवी डोकावताना दिसली . एक जागी पूर्वी कुंदाचे व दुसऱ्या जागी मोगऱ्याचे झाड होते ! मग मी पण जाणीवपुर्वक ती पुन्हा फुटलेली माया जपली . सिमेंट ब्लॉकच्या फटींतू त्या पालवीला पाणी घालताना लहान पिल्लाना बाटलीने दूध पाजल्याची भावना व्हायची ! तुम्ही काहीही म्हणा प्रत्येक पुरुषात एक ‘आई ‘ लपलेली असते , तर प्रत्येक बाईत एक ‘बाप ‘असतो ! मुलांना वळण लावते ती आईच ! आणि मुलांचे अति लाड करून पाठीशी घालतो तो ‘बाप’च असतो !

आता कुंदाचे आणि मोगऱ्याचे झाड मोठी झालीत . छान बहरू लागली आहेत . कुंदाची फुल पांढरी शुभ्र आहेत . पांढरे वस्त्र धून निळीच्या पाण्यातनं काढल्यावर जशी निळसर झाक येते तशी निळसर झाक त्या फुलांत आहे . तर मोगरा गाईच्या दुधा सारखा किंचित पिवळा ! कुंदाला हलका मंद सुगधं आहे तर मोगऱ्याला भन्नाट सुवास ! त्याची फुले तोडताना मला खूप अपराधी वाटते . मी ज्यांच्या मुळावर उठलो तीच झाडे मला पुन्हा भरभरून फुले देत आहेत !

बायकोने उदार अंतःकरणाने मला सकाळी अंगण झाडायची परवानगी दिलीय . पण ‘सर्व हक्क प्रकाशका स्वाधीन ‘ प्रमाणे सडा (सडा कसला फक्त पाणी शिंपणे !) टाकण्याचा हक्क स्वतःहा कडे ठेवला आहे . सकाळी साधारण साडेसहा सातच्या दरम्यान मी अंगण झाडायला घेतो . भल्या मोठ्या कॅनवास वर वॉश देताना जसा ब्रश फिरतो तसा माझा झाडू फिरत असतो . झाडून झालेकी मी आणि अंगण फ्रेश झाल्या सारखे वाटतो . मग हलक्या हातात पूजे साठी फुले तोडून घेतो . खरी कसरत होते ती मोगरा तोडताना . दोन कळ्यांच्या मध्ये फुल असते ,ते शेजारच्या कळ्यांना धक्का न लागू देता खुडावे लागते . थोडा धसमुसळे पणा झाला कि निष्पाप कळीचा बळी जातो .

सकाळ नन्तर अंगणाचा आणि माझा संबंध येतो तो रात्री साडेनऊ दहा च्या दरम्यान , गेटला कुलूप लावताना . तेव्हा वातावरण शांत, शीतल आणि सुस्त असते . दारासमोरच्या खांबावरला लाईट सुद्धा जडावलेल्या डोळ्याचा वाटतो ! पण तेव्हा सारा आसमंत एका धुंद गंधाने भारावलेला असतो ! कॉलनीतल्या एका कोपऱ्यावरच्या घराच्या अंगणाबाहेर रातराणीच्या झुडपांचे स्नेहसंमेलन भरलेले (खरे तर बहरलेले !) असते . आणि ते हा गंध उधळून साजरे होत असते ! मी हि गुपचिप त्यात सामील होतो ! कुलूप लावताना मन भरून हा सुगन्ध पिऊन टाकतो !

पण गेल्या चार दोन महिन्या पासून हे,’ रातराणी संमेलन ‘ भरत नाही ! वातावरणात ती गंध धुंदीची नशा नसते ! हल्ली रात्री घेतला कुलूप लावताना चुकल्या सारखे होते ! त्या घराच्या अंगणाला कंपाऊंड वॉल बांधताना पायासाठी बळी गेलेल्या रातराणीचे अवशेष त्यांची कहाणी सांगताहेत ! ती रातराणी सुद्धा माझ्या मोगऱ्या -कुंदा सारखी पुन्हा फुलून यावी असे वाटते ! ‘राणी ‘ आय मिस यू !

— सु र कुलकर्णी 

तुमच्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच Bye

About सुरेश कुलकर्णी 100 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…