नवीन लेखन...

राजभाषेचे दिवस

गेले काही दिवस रस्त्यारस्त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लावलेली मोठमोठी होर्डिंग बघतो आहे. गुढीपाडव्याचा मनसेचा मेळावा शिवाजी पार्कला होणार आहे आणि त्याचं आमंत्रण देणार्‍या या होर्डिंग्सवर राजभाषेची आठवण करुन दिलेली आहे.

लवकरच महाराष्ट्र दिवस येत आहे. मोठा गाजावाजा करत तो साजरा होईल. दर वर्षी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी जागतिक मराठी दिवस पाळला जातो. तोसुद्धा थाटामाटात पार पडतो. कार्यक्रम होतात, घोषणा होतात आणि काही दिवसातच विसरल्याही जातात.

एकेकाळी महाराष्ट्र दिनाला काय गडबड असायची. काहीतरी सण आहे याची जाणीव व्हायची. मात्र गेली काही वर्षे लोक कशा पध्दतीने तो साजरा करतात ते कांही समजत नाही. माझ्या परिसरात तरी कसलाच उत्सव किंवा उत्साह मला कधी दिसला नाही.

मराठीसाठी किंवा एकूणच कोणत्याही मातृभाषेसाठी अशा वेगळ्या दिवसाची गरज तरी कां भासावी हा सुध्दा एक प्रश्न आहे. खरंतर महाराष्ट्रात प्रत्येक दिवस मराठीचाच असायला पाहिजे. पण या बाबतचे एकूणच औदासिन्य बघितले तर कांही लोक मराठी भाषेच्या भविष्याबद्दल जी चिंता व्यक्त करत असतात ती खरी वाटू लागते.

सन १९२२ मध्ये कवी माधव ज्यूलियन यांनी “मराठी असे आमुची मायबोली” या सुप्रसिध्द कवितेत “जरी आज ही राजभाषा नसे”अशी तत्कालिन परिस्थितीनुसार वेगळ्या प्रकारची खंत व्यक्त केली होती. त्याच कवितेत “नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे” अशी आशा व्यक्त केली होती.

त्या काळच्या मानाने आज मराठीला खूपच चांगले दिवस आले आहेत, तरीही त्याबद्दल असंतुष्ट असलेल्या लोकांचे वेगळ्या प्रकारचे गार्‍हाणे गाणे चालले आहे. एका पत्रलेखकाने माधव ज्यूलियनांची क्षमा मागून “मराठी असो आमुची मायबोली, तरीही खरी राजभाषा नसे। नसे आज ऐश्वर्य या माउलीला, भविष्यात ना शष्प आशा दिसे।।” अशा शब्दात आपल्या वेदना व्यक्त केल्या होत्या.

आज एकूणच मराठी भाषेच्या शुद्धलेखन आणि व्याकरणाबाबत मोठी चर्चा सुरु आहे. नव्या पिढीच्या नव्या संवादमाध्यमांमधली मराठी अशुद्ध आहे अशी ओरड तर नेहमीच ऐकायला मिळते. मोबाईल, व्हॉटसअॅप वगैरेमध्ये मराठी शब्दांचा आणि वाक्यांचही पदोपदी खून होतो असेही म्हटले जाते. काही प्रमानात हे खरे असले तरीही त्याला दुसरी बाजूही आहेच.

आपल्या जीवनशैलीत नियमितपणे होत असलेल्या बदलांमुळे कांही परभाषी शब्द रोजच्या वापरात येतातच. इंग्रजीतही असे अनेक परभाषी शब्द दरवर्षी येत असतात. खरेतर त्यामुळे आपली भाषा अधिक समृध्द होते, ती भ्रष्ट किंवा नष्ट होत नाही. संत ज्ञानेश्वरांच्या काळातली मराठी बोलीभाषा संत तुकारामाच्या काळात नव्हती आणि संत तुकारामांनी वापरलेली भाषा आजकाल प्रचलित असलेल्या व्याकरणाला धरून नाही. काळाबरोबर असे बदल होत जातातच.

माधव ज्यूलियनांची संपूर्ण कविता खाली दिली आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ५६ वर्षांनी तरी त्यातील काही अपेक्षा पूर्ण होतील अशी आसा करुया !!

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे ।
नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे ।।

जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी ।
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी ।।

जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी ।
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता थोरवी; ।।।

असूं दूर पेशावरीं, उत्तरीं वा असूं दक्षिणीं दूर तंजावरीं, ।
मराठी असे आमुची मायबोली, अहो ज्ञानदेवीच देखा खरी ।।

मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं ।
पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं।।

हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी ।
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं ।।

हिच्या लक्तरांची असे लाज आम्हा, नका फक्त पाहू हिच्या लक्तरां ।
प्रभावी हिचे रूप चापल्य देखा पडावी फिकी ज्यापुढे अप्सरा ।।

न घालू जरी वाङ्‌मयातील उंची हिरे मोतियांचे हिला दगिने ।
’मराठी असे आमुची मायबोली’, वृथा ही बढाई सुकार्याविणें ।।

मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यात ही खंगली ।
हिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं ।।

तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्नें नियोजूं तयांना हिच्या मंडणी ।
नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी ।।

— निनाद अरविंद प्रधान

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 96 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..