नवीन लेखन...

‘राहून गेले….वाहून गेले….’

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये डॉ. प्रदिप कर्णिक यांनी लिहिलेला हा लेख


तुमच्या आयुष्यात राहून गेलेल्या, ज्या तुम्हाला करायच्या होत्या, पण होऊ शकल्या नाहीत, अशा विषयावर आमच्या दिवाळी अंकासाठी एक लेख लिहून द्यावा, असा श्री. नालेसाहेबांचा फोन आला. ते विषयाचा अधिक विस्तार करीत होते आणि मी त्याचवेळेला विषयाला मनात प्रारंभही केला. म्हटले, अरे वा, अगदीच सोपा विषय आहे. लिहून टाकू. त्यात काय अवघड आहे. मी होकार दिला. नंतर त्यावर विचार करायला लागलो तसा मी गोंधळून गेलो. मला वाटला होता तितका हा साधा, सरळ, सोपा विषय नाही. आपण आयुष्यात काही करतो त्याचे श्रेय आपण कोणाला द्यायचे? स्वत:ला, नशिबाला, देवाला, दैवाला की तो एक घडत जाणाऱ्या घटनांचा अपघात असतो? काही करायचे असते, ते होतेच असेही मग त्याचे अपश्रेय कोणाचे? प्रत्येक गोष्टीतल्या त्या केंद्रस्थानी असणारा ‘मी’ जर लक्षात घेतला तर श्रेय-अपश्रेयाची जबाबादारीही माझीच असली पाहिले. पण प्रामाणिकपणे ‘मी’तसे मानतो का? की अपश्रेयांचा दोष कुणावर तरी किंवा परिस्थितीवर तरी ढकलून हा ‘मी’ मोठा होतो. इतरांचे माहीत नाही पण माझा ‘मी’चा लेखाजोखा एकदा मांडायलाच हवा. शिवाय आता ‘त्या’ वयातही मी आलेलो असल्याने सिंहावलोकन करायला हरकत नाही.

माणसाला जन्माला आल्यापासून मरेपर्यंत काही ना काहीतरी करायचेच असते. संकल्प विचारांचा फेऱ्यातून कुणाचीच सुटका नसते. कुणी ती करूनही घेत नाही. अगदी आईवडिलांच्या हाती नाड्या असतानाही कोणत्या शाखेचे शिक्षण घ्यायचे, याच शाखेचे का घ्यायचे, जे घेतले ते आपल्या आवडीचे होते का, अशा असंख्य गुंत्यांतून व्यक्तीचा प्रवास सुरू होतो तो अगदी स्वत:च्या पायावर उभे राहिल्यावरही इकडे जाऊ की तिकडे जाऊ, हे करू की ते करू, अमके केले तर काय होईल, तमके केले तर काय फायदा, इत्यादी असंख्य ‘जर तर’ नी आयुष्य परीक्षाच घेत असते, त्यात एखादा नेम यशस्वी होतो एखादा होत नाही. पण माणसाला तिथेच थांबता येत नाही, तो थांबूही शकत नाही, काळ त्याला पुढेच लोटत राहतो. नवनव्या दिवसात नवनवे समोर येते. मागचे मागेच पडते.

मी जन्माला आलो ते बरी देहयष्टी घेऊन, चांगले घर, कुटुंब, आईवडील, खूप नसली तरी किमान एक बरी समज असा ऐवज घेऊन जन्माला आलो. या घराऐवजी टाटा-बिर्ला वगैरे घरात जन्माला यायला हवे होते असे मुळीच वाटले नाही, पण रस्त्यावर ज्यांचे आयुष्य जाते, त्या एखाद्या कुटुंबात जन्माला आलो असतो तर काय झाले असते? मी माझ्यातल्या ‘मी’ ला सांभाळू शकलो नसतो हे अगदी उघड आहे.

जन्माला मी आलो ते काय बरोबर घेऊन? खास असे काहीच सांगता येत नाही. लहानपणापासून मला ‘लेखक’ व्हावे असे वाटत होते, हा एक विचार सोडला तर बाकी ना गुण, ना कला, ना बुद्धी, ना देखणेपण. त्यामुळे गायन, वाचन, अभिनय, चित्र-शिल्पकला इत्यादी इत्यादी असंख्य कला दालनात काही करायचे राहून गेले, असा प्रश्नच निर्माण झाला नाही.

शिक्षणातली गती बेताचीच असल्याने त्यात काही भव्य-दिव्य करण्याचा प्रश्नच नव्हता. फक्त एक बाब अगदी खोलवर होती ती म्हणजे मला ‘मराठी भाषे’ विषयी अतोनात गोडी होती. त्यामुळे बी.ए. ला मराठी विषय घ्यावा असे मनाने घेतले आणि त्यात काहीच भवितव्य नाही (म्हणजे नोकरी मिळवण्याचे) असे अनेकांनी सुचवूनही मी ‘मराठी’ हाच विषय घेतला. पण त्यामुळे शिक्षण घेताना काही करायचे राहून गेले. नको तो विषय मी घेतला असे झाले नाही. पास होत गेलो नि पुढे पुढे सरकलो इतकेच. मात्र आवडीचा विषय अभ्यासाला आल्याने अभ्यासात रमून गेलो. तो अगदी आजपर्यंत.

शिक्षण पूर्ण करणे मग नोकरी असाप्रकारही घडला नाही. छोट्या छोट्या नोकऱ्या करत करत पुढे पुढे सरकत गेलो नि माझ्या आवडीची नोकरी मिळवण्यासाठीचे शिक्षणही जमा करीत गेलो. जी क्षेत्रे नको होती ती टाकून दिली, जी हवी होती त्यावरच लक्ष केंद्रित केले. चरितार्थासाठी नोकरी तर हवीच होती, पण ती मला माझ्या आवडीला पुरक ठरेल अशी हवी होती, ती मी शोधत होतो. अर्थात माझी आवड ‘लेखन’ म्हणून ‘वाचन’ आणि लेखन मराठी भाषेतले म्हणून अर्थातच मराठी विषय. त्यामुळे अनंत मर्यादा होत्या. यासाठी मला तीन पर्याय माहीत होते. एक प्राध्यापकी; दोन पत्रकारिता; तीन ग्रंथालय क्षेत्र. पैकी प्राध्यापकीचा विचार मला सोडून द्यावा लागला तो केवळ सरकारी नियमांचा विचार करूनच. मात्र मी वृत्ती, प्रवृत्ती आणि गुण असतांनाही प्राध्यापक होता आले नाही, याची खंत मात्र शेवटपर्यंत राहिली. प्राध्यापकी तरी का तर ती नोकरी करता करता लेखन सेवेला वेळ .उत्तम मिळाला असता आणि मी तो सार्थकीही लावला असता असा मला आजही विश्वास आहे. पण काही असो मी प्राध्यापक काही होऊ शकलो नाही.

दुसरे क्षेत्र होते पत्रकारितेचे. मला सुदैवाने इंडियन एक्स्प्रेस ग्रुपच्या ‘चित्ररंग’ या सिने साप्ताहिकात नोकरी मिळाली, पण मन सिनेक्षेत्रात रमेच ना. मी तिथून बाहेर पडलो.

नंतर अनेक वर्ष मुक्त पत्रकारितेच्या माध्यमातून लेखनही केले, पण नोकरी निमित्त पत्रकारितेत राहिलो नाही. मात्र याची मला खंत नाही, दुःख तर अजिबात नाही. मग नोकरीसाठी उरले होते ते एकच क्षेत्र. ‘ग्रंथालयशास्त्र’. ते मी पक्के करत गेलो. त्याच क्षेत्रात नोकरी मिळाली ती अत्यंत प्रेमाने, रंगून जाऊन, इमानेइतबारे ३४ वर्षे करून निवृत्त झालो. इतर कोणत्याही नोकरीच्या भानगडीत मी पडलो नाही. बँक, विमा, म्युनिसिपालटी वगैरे वगैरे माझ्या दृष्टीने माझ्यासाठी नव्हतेच, त्यामुळे तिथे प्रयत्न वगैरे करायचा प्रश्नच नव्हता. त्याचा पश्चाताप वगैरे अजिबात नाही. उलट बरेच वाटते.

नोकरीही अशी होती की त्यात प्रमोशन वगैरे काहीच नव्हते. ‘ग्रंथपाल’ हेच एकमेव त्या विभागाचे शेवटचे नि सर्वात वरचे पद होते. तेच मी अनुभवत होतो.

भव्य ग्रंथालयात जावे असे वाटले नाही असे नाही उदा. विद्यापीठात. अंगी गुण होते, माझ्या हितचिंतकांना ही तसे वाटत होते. (उदा. डॉ. अरुण टिकेकर, डॉ. श. रा. गणपुले इत्यादी अनेक) पण विद्यापीठ पातळीवर मी जाऊ शकलो नाही, त्याची त्या क्षणी फार खंत, खेद वाटला, पण आज तसे अजिबात वाटला नाही. बरेच वाटते.

ठाण्यातील एका महाविद्यालयात येण्यासाठी मी थोडी धडपड केली पण त्या प्रयत्नाला माझ्या मित्रांनी, सहकाऱ्यांनी मोडता घातला. मी तिथे जाण्याचा विचार इतक्याचसाठी केला होता की त्यामुळे माझ्या प्रवासाचा वेळ नि त्रास वाचेल व तो वाचलेला वेळ मी लेखन-वाचनासाठी वापरू शकेन. त्यामुळे त्याची खंत मला आजही आहे. प्रवासात जाणारा वेळ, त्रास, श्रम जर माझे वाचले असते तर मी अधिक चांगले लेखन करू शकलो असतो, वाचन करू शकलो असतो.

कोणत्याही महाविद्यालयाचे प्राचार्य पद मिळू शकेल अशी शैक्षणिक पात्रता असल्याने मला काही ठिकाणी येण्याची आमंत्रणे झाली ही, परंतु प्राचार्य होणे हे आपले कधीच इप्सित नव्हते, त्यामुळे त्याचा प्रश्नच नव्हता.

माझे स्नेही डॉ. अरुण टिकेकर नेहमी मला सांगत की, आपण ज्या क्षेत्रात असतो, त्यातील सर्वात वरचे पद आपण मिळवायचे असते, आणि म्हणूनच मी विद्यापीठाचा ग्रंथपाल व्हायला हवे असे त्यांना वाटत असे. दुसरा त्यांनी मला आग्रह केला तो माझी नोकरी सोडून लोकसत्तेत येण्याचा, पण तोही मी मनावर घेतला नाही. त्याचीही मला खंत नाही.

मी बी.ए. झाल्यानंतर मराठी संशोधन मंडळात प्रा. रमेश तेंडुलकरांचा साहाय्यक म्हणून काम केले. मला अत्यंत आवडलेली ती संस्था. जिच्या प्रेमात मी आजही आहे. तिथल्या संशोधनपर कार्याने माझ्या वाङ्मयीन पाटीवर श्रीगणेशा लिहिला. ती संस्था मी नोकरी निमित्त सोडली तरी त्या संस्थेचा ऋणानुबंध कधीच मला पुसता आला नाही. दैव योगाने मी या संस्थेत केवळ एक साधा संशोधक सहाय्यक होतो. तिथेच २०११ मध्ये माझ्यावर संचालक पदाची जबाबदारी टाकण्यात आली. आणि एका अर्थाने डॉ. टिकेकरांचा विचार पुराच झाला म्हणायचा.

३४ वर्षाच्या नोकरीत असताना एक इच्छा मात्र माझ्या मनात कायम होती आणि ती मात्र अगदी तशीच राहून गेली. मला २० वर्षानंतर वा २८ वर्षानंतर व्हीआरएस घेऊन पूर्णवेळ लेखन संशोधन वाचन करायचे होते. ते माझे स्वप्न कधीच पुरे झाले नाही. त्याची मला आजही खंत आहे, खेद नाही. जर मला अशी मोकळीक मिळाली असती तर चार बरी कामे झाली असंही मला आजही रास्त विश्वास वाटतो आणि हीच बाब मला खणून काढायची आहे.

घरदार, मुलबाळं, पैसाआडका, यामध्ये जे काही मिळालं आहे ते यशस्वी होण्यात अनेकांचा वाटा आहे. त्याचे श्रेय मी एकट्याने . घेण्यात आणि माझ्या मी पणाचा टेंभा मिरवण्यात काहीच हशील नाही. पण ते काही आज आहे, ते असे असेल असा किंचितही अंदाज धडपडीच्या काळात नव्हता, त्यामुळे त्याचं अप्रुप इतकंच!

शैक्षणिक पात्रता मिळवण्यात मला थोडे कष्ट पडले नाही असे नाही. छोट्या नोकऱ्या करीत करीत मी एकेक पदव्या घेतल्या, अगदी ग्रंथालयशास्त्रातली पी.एच.डी. ही पदवीही प्राप्त केली, त्यामुळे एक प्रकारचे समाधान आहे. साहित्यशास्त्रातली पी.एच.डी. करायची खरे तर ही प्रथम इच्छा होती, ती कधीच पुरी करता आली नाही याची मात्र मनात हुरहुर आहेच. ती शेवटपर्यंत राहील.

माझ्या इच्छा, आकांक्षा, स्वप्ने, ध्येय, सारे काही एकाच केंद्राभोवती एकवटलेल्या आहेत. ते केंद्र म्हणजे माझे लेखन प्रेम. आणि लेखन म्हणून वाचन. तिथे मात्र माझ्या स्वप्नांना, अपेक्षांना कधी हेलकावे बसले तर कधी काही गोष्टी तडीस गेल्या. काही पूर्ण झाल्याच नाहीत तर कधी गर्भावस्थेतच मेल्या.

वाचनाबाबतीत हे खूपच वेळा झाले. आवड म्हणून आणि व्यवसाय म्हणूनही मी अनेक पुस्तकांच्या संपर्कात आलो. काही एका ओढीने वाचीत गेलो त्यामुळेही अनेक पुस्तकांचे दाखले जमत गेले. लेखनाच्या निमित्ताने शोध घेत गेलो नि विविध प्रकारचे पुरक साहित्य सापडत गेले. ज्या ज्या वेळी जितकी गरज होती तितके वाचन करून श्रम निभावले गेले असले तरी मन जमवलेल्या शोध नोंदीत अडकून पडे. अर्थात त्यांचा वेध-शोध घेऊन वाचन करण्याची सवड मिळेपर्यंत दुसरीच लेखन जबाबदारी अंगावर येऊन पडे नि मनाचा शोध तळघरात सारून मन नव्या शोध मोहीमेत पुढे पुढे जात राहिले. मागे मात्र वाचून काढायच्या यादीचा साठा साठत गेला. अशी असंख्य पुस्तक/ लेख/ अंक/ वाचायचे राहून गेलेत. त्यांची खूप लाजही वाटते नि मन अस्वस्थही होते.

सोसासोसाने विकत घेऊन ठेवलेली पुस्तके, ‘वाचू पुढे मागे’ म्हणून जमवत गेलेले ग्रंथ, कात्रणे, याद्या, विशेषांक पुढे कधी तरी हताश अवस्थेत कुठल्या तरी ग्रंथालयाला देऊन टाकायचे नि संग्रह करण्याच्या ऋणातून मुक्त व्हायचे; पण त्यावेळेची खंत! त्या खंत वाटण्याचे काय? हळहळ, सुस्कारे! त्याने मनाची बोच कशी कमी होणार!

शिस्तबद्ध वाचनाच्या योजना कितीआखल्या नि किती वाहून गेल्या. धकाधकीच्या काळात रोजचे वर्तमानपत्रही निसटून जायचे तिथे शिस्तबद्ध, आखणीपूर्वक वाचनाचे भाव, सारेच बुडते मनसुबे, आठवण व्हायची तेव्हा मन ढवळून निघायचे, पण पुन्हा पाणी शांत.

दृष्टी बरी होती तेव्हा वेळ नव्हता नि आता वेळ आहे तर दृष्टी अधू आहे. हे एक उत्तर झाले; परंतु वाचनाची दिशाच बदलून गेली.  ज्या पुस्तकांची मनावर मोहनी होती ती उडूनच गेली. हा मनाचा विकास की अधोगती? पण झाले खरे! आता संतसाहित्याने भुरळ घातली आहे. बाकी हळूहळू निसटून चालले आहे. का! माहीत नाही. निसटून गेलेल्या वाळूचे दुःख नाही. बोटात फटी असल्यावर मूठ रितीच होणार.

लेखनाच्या बाबतीत अनेक वर्षे खंत उरी बाळगून होतो. लेखन प्रवास सुरु झाला तेव्हा कविता, नाटक या प्रकारांनी वेड लावले तरी त्या प्रकारात लेखन करण्याचे धाडस झाले नाही. ते फार नंतर झाले. चक्कं ५ नाटके लिहिली. १ कादंबरी लिहून ठेवली आहे.

लेखन प्रवास मात्र वर्तमानपत्राच्या सहचर्याने सुरु झाला नि २५-३० वर्षे मी तो जोपासला. त्याची पुस्तकेही झाली. त्या त्या वेळी कौतुकाची थापही मिळाली, पण स्फुट लेखनावर मन खूष नव्हते. हातून काही तरी भव्यदिव्य, मोठे, प्रकल्पसदृश्य कार्य व्हावे, कोशवाङ्मय या सारखे कार्य नावावर असावे असे फार वाटायचे.

मराठी वाङ्मयाच्या इतिहासाने मनाला किती तरी वर्षे भुरळ घातली होती. मराठी वाङ्मयाचा इतिहास हा प्रामुख्याने ग्रंथांचाच केवळ इतिहास आहे. नियतकालिकात विखरून पडलेल्या साहित्याचा समावेश मराठी वाङ्मयाच्या इतिहासात फार अभावाने झाला आहे. स्फुट काव्य, कथा लेखन करणाऱ्या कवी, कथाकारांचा समावेश इतिहासात झालेला दिसत नाही. वाङ्मयाच्या क्षेत्रात घडणाऱ्या घटना, घडामोडी, चळवळी, वाद-विवाद, कार्यक्रम यांचा समावेश करणे तर दूरची बात. व्यासपीठावरून वाहून गेलेले मराठी वाङ्मय, उदा. चर्चासत्रे, व्याख्याने, व्याख्यानमाला, कीर्तन, प्रवचने इत्यादी अनेक – खूप दिसत होते. ते गोळा करावे इतिहासाचार्य राजवाड्यांसारखे मराठी वाङ्मयाची साधने गोळा करावीत, उदा. लेखकांची परिष्करणाच्या प्रती, मुलाखती, फोटो, टिपणे, डायऱ्या, पत्रे, महाराष्ट्रभर गोळा करत हिंडणे, असेही फार वाटे. याची मात्र उरात कायम सल असेल. पूर्ण वेळेचे हे काम किंबहुना संस्थात्मक पातळीवर करावयाचे हे काम, जमले नाही हेच खरे. किमान भाषांतरित साहित्याचा इतिहास, नियतकालिकातील वाङ्मयाचा इतिहास, किमान ‘माणूस – मनोहर – दिनांक – साधने’ चा इतिहास, सत्यकथेचा इतिहास तरी हातून पूर्ण व्हायला हवा होता याची रुखरुख नक्कीच राहील.

माणूस मोठा होतो म्हणजे काय? विचार, बुद्धी, समज वाटते का? की हळूहळू ‘राहून जाते वाहून जाते’ आणि उरी बाळगलेली स्वप्ने सुटतात. काय होते? सांडून जाणाऱ्या गोष्टी, ज्या पुन्हा वेचता येत नाहीत, नि मग आपण त्या सोडूनच देतो, याला मोठे होणे म्हणायचे की मन मोठे करून स्वप्ने विसरायची याला मोठे होणे म्हणायचे!

मरणाचा क्षण अनिश्चित असल्याने माणसाचे मन शेवटच्या क्षणापर्यंत संकल्प-विकल्पाच्या फेऱ्यात अडकते. संकल्प करणे ही माणसाच्या मनाची गरजच असावी. स्वप्ने बाळगल्याशिवाय माणसाला जगताच येत नाही, पण स्वप्ने प्रत्यक्षात उतरवावीही लागतात, त्यासाठी खस्ता सोसाव्याही लागतात, कष्ट उपसावे लागतात, तिथेच सारे बारगळते, मग दोष देणे तेवढे राहते. दोष देत खंतावत जगण्यापेक्षा सोडून देता यायला हवे हेच खरे.

आतापर्यंतचे मनसुबे मी सहज सोडून देऊ शकलोय नि आता श्रीसंत तुकोबा-ज्ञानोबांच्या भजनी लागलोय, मात्र इथे एकच स्वप्न आहे संतसाहित्य किमान वाचून व्हावे. डोळ्यामुळे वाचन गती मंद आहे. काहीही भव्यदिव्य करायचेच नाही. सुचवूनही घ्यायचे नाही. फक्त वाचायचे आहे. जमेल तेवढा संतांशी त्यांच्याच भाषेच्या साहाय्याने संवाद करत पुढे जायचे आहे. इतके झाले तरी आयुष्य सार्थकी लागले म्हणायचे!

आधीचे जे होते ते, ‘राहून गेले… वाहून गेले’… असेच होते.

डॉ. प्रदिप कर्णिक

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..