नवीन लेखन...

प्रिटोरिया – माझा सर्वोत्तम काळ – भाग १

Standerton इथली खेळी संपली!! ती संपत असताना मला प्रिटोरियामध्ये नवीन नोकरी मिळाली होती पण ती join करण्याआधी, मी भारतात सुटीवर यायचे ठरले. येताना, मनात विचार आला, सुटीवर येत आहे तर महिंद्र कंपनीत “खडा” टाकून बघूया!! नाहीतरी महिनाभर तसा  उद्योग नव्हता. महिंद्रने नुकताच साउथ आफ्रिकेत बिझिनेस सुरु केला होता, तेंव्हा त्यांना माणसांची गरज तर लागणारच, असा हिशेब मांडून एका मित्राच्या ( तो तिथे पूर्वी नोकरीला होता!!) ओळखीने, तिथल्या P.N.Shah या माणसाला भेटायला गेलो.  वास्तविक,हातात नोकरी  असल्याने,तसा जाताना बराच आत्मविश्वास होता. सुदैवाने, लगेच भेट मिळाली. प्राथमिक बोलणी चांगली झाली आणि साउथ आफ्रिकेहून पुढील आठवड्यातच, तिथला C.E.O. विजय नाक्रा आणि C.F.O. हेतल शाह इथे काही कामानिमित्त येणार आहेत, तेंव्हा त्यांच्याशी भेट घेऊन, पुढे ठरवायचे, असे ठरले. P.N.Shah  बरोबर,सचिन आरोलकर म्हणून वरिष्ठ अधिकारी होता आणि त्याच्याबरोबर मला संधान बांधायचे ठरले. पुढील आठवड्यात, महिंद्र कॉर्पोरेट ऑफिसमध्येच माझी मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्येच नोकरी पक्की झाल्याचे ठरले.
अर्थात, भारतातली सुटी आनंदात गेली, तेंव्हा मी प्रिटोरिया शहरातील “लोडीयम” या उपनगरात रहात होतो. हेतलने, मला सांगितले की जसा, साउथ आफ्रिकेत  येशील,तशी त्याला लगेच फोन करायचा. त्याप्रमाणे, जसा सकाळी मी, लोडीयम इथे  पोहोचलो,तशी लगेच त्याला फोन केला.  तोपर्यंत,मी “सेंच्युरीयन” हा भाग पाहिला देखील नव्हता आणि इथे, विशेषत: फ्रीवेवर रस्ता चुकला तर कमीत कमी १० किलोमीटरचा फटका!! त्यामुळे, त्याच्याकडून ऑफिसचा पत्ता व्यवस्थित घेतला आणि निघालो. वास्तविक रात्रभरचे विमान प्रवासाचे जागरण डोळ्यांवर होते तरीही महिंद्रमधील नोकरी, ही बाब मला उल्हसित करीत होती.प्रिटोरियामधील एक अतिशय सुंदर उपनगर म्हणजे सेंच्युरीयन!! क्रिकेटचे प्रसिद्ध स्टेडीयम इथलेच!!
ऑफिसला गेलो त्यावेळी हेतल बाहेर गेला होता. त्याने, श्रीधर म्हणून एक कर्मचारी होता, त्याला भेटायचे, असा निरोप ठेवला होता. श्रीधर देखील, महिंद्र कॉर्पोरेट ऑफिसमधून इथे ट्रान्स्फर झालेला, माझ्यापेक्षा तरुण आणि हसमुख!! वास्तविक, मी पोहोचलो तेंव्हा जेवायची वेळ झाली होती तेंव्हा श्रीधर आणि मी बाहेर जेवायला गेलो. परत आलो, तेव्हढ्यात हेतल आला आणि माझ्या कामाचे स्वरूप नक्की झाले. रात्री परत गाडी घेऊन लोडीयममध्ये, मित्राच्या घरी!! परंतु, आता सेंच्युरीयन इथे नोकरी करायची म्हणजे तिथेच घर शोधणे आवश्यक!!
रोज, साधारणपणे १०० किलोमीटर प्रवास करणे तसे कंटाळवाणे!! सुदैवाने, जिथे ऑफिस होते, तिथेच इको पार्क मध्ये घर मिळाले आणि लगेच shift झालो. साउथ आफ्रिकेत मी बऱ्याच शहरात राहिलो परंतु या Complex सारखी जागा त्यापूर्वी आणि नंतर कधीच मिळाली नाही. सुरक्षा व्यवस्था तर तोंडात बोट घालावी अशा दर्जाची, complex च्या समोर मॉल त्यामुळे खरेदी करायला जास्त लांब जायला नको!! वास्तविक, हा भाग अतिशय सधन लोकांच्या वस्तीचा आहे. त्यामुळे Infrastructure इतके सुरेख की मला भेटायला येणारी व्यक्तीदेखील खुश व्हायची.
Complex चा स्वत:चा क्लब, पोहायचा तलाव, टेनिस कोर्ट (एकाचवेळी ३ सामने होऊ शकतील इतके मोठे) इत्यादी सोयी होत्या. समोरच्या मॉलमध्ये आयरिश पब, इटालियन हॉटेल्स आणि अर्थात Shoprite, Woolworth सारखी प्रचंड दुकाने. अर्थात, इथे मलाच घर घ्यायचे असल्याने, थोडेफार फर्निचर घेणे जरुरीचे होते, तसे लगेच घेतले. आता, ऑफिस आणि घर एकाच गल्लीत असल्याने, मला फारच सोयीचे झाले. Infrastructure वरून आठवण झाली, इथले रस्त्यांचे Planning इतके चोख असते की कॉम्प्लेक्समध्ये गाडी चालवायची तरी ३०, ४० च्या वेगाने नेता येते!! ऑफिसमध्ये, आम्ही भारतातून आलेले ५ जण आणि मी सहावा, वगळता बहुतेक सगळे गोरे!!
त्यातील काहीजण तर आजही माझ्या संपर्कात आहेत, इतके की अधूनमधून आमचे फोनवर बोलणे होते, खासकरून, Natasha, James, Wendi यांच्याशी अजूनही चांगला संपर्क आहे. अर्थात,  नेहमीप्रमाणे,सुरवातीला सगळेच  असतात पण ओळख झाली की मग, मात्र मैत्री चांगली घट्ट होते. विशेषत: मी सेंच्युरीयन इथे नवीन आहे, म्हणून जेम्स मला त्याच्या गाडीतून हिंडवीत असे. मुंबईच्या मानाने प्रिटोरिया तसे लहान शहर आहे परंतु राजधानीचे शहर असल्याने देशात या शहराला राजकीय महत्व अधिक!!
इतकी वर्षे, मी, मकरंद फडकेशी फोनवर बोलत असे परंतु आता तो जोहान्सबर्ग इथे रहात असल्याने, भेटीगाठी होण्याच्या शक्यता वाढल्या आणि पुढे तशा भरपूर झाल्या देखील. तसेच, जोहान्सबर्ग इथे माझा  पुर्विचा मित्र,विनय असल्याने, त्याच्याशी भेटणे देखील व्हायला लागले. मकरंद तर इथे, याच शहरात १९९४ पासून असल्याने, इथला veteran!! Standerton च्या मानाने इथे थंडीचे प्रमाण तसे कमी!! म्हणजे -३,४ इतके नसून १,२ इतके!!  मकरंद गाठीभेटी वाढल्या तशी, त्याच्याबरोबरचे, सुहास ओक,वैभव पोरे, बंटी( शाह) या तरुण मित्रांशी ओळखी झाल्या. पुढे यात  अशोक,राजेश असे थोडे वयस्कर मित्र येउन मिळाले. महिन्यातून  एकदा  भेटायचे,असा आमचा अलिखित झाला.  तसे,कधीकधी १,२ आठवड्यातून देखील भेटायचो, भेटीचे ठिकाण शक्यतो एखादा मॉल, म्हणजे तिथे जेवण-खाणे आणि एखादा सिनेमा!! कधीकधी कुणाच्या घरी देखील भेटीगाठी व्हायच्या.
मी, एक बाब स्पष्टपणे बघितली, म्हणजे आम्ही अंतराने भेटायचो, पण गप्पांचे विषय तसे ठराविक!! राजकारण हमखास, त्यातून इथे आम्हाला NDTV 24, हे Channel बघायला मिळत  असल्याने,भारताच्या बातम्या अद्ययावत कळायच्या. मला तसा राजकारणाचा मुळातून कंटाळा!! त्यामुळे बरेचवेळा मी ऐकण्याची भूमिका बजावत असे!! इथे, तोपर्यंत आणि पुढे मराठी मंडळात सक्रिय सहभागी झालो,परंतु कुणालाही साहित्य,संगीत,वाचन अशा बाबतीत फारसा रस नसायचा त्यामुळे मला नेहमीच “कानकोंडे” व्हायचे. त्यातून, बरेचवेळा ऑफिस आणि “मी किती मोठा” या विषयावर गाडी यायची,आणि मला तर याचा तिटकारा!! माझे म्हणणे असे, आपण दिवसातला बराचसा वेळ ऑफिसमध्ये देतो, मग एकदा ऑफिस सुटल्यावर परत त्याच विषयाचे चर्वितचर्वण कशाला !! पण, हे सगळीकडे  चालत असते, मीच misfit!!
अर्थात, इथे आपल्याला बरीच भारतीय माणसे भेटत आहेत,याचाच खरा आनंद व्हायचा. त्यातून, सुहास ओकला संगीतात चांगली गती होती,पण फारशा गप्पा झाल्या नाहीत कारण आम्ही भेटायचो ते सगळे एकत्र !! इथले मराठी मंडळ मात्र चांगले आहे, अर्थात, अमेरिका/युरपच्या मानाने इथे फारशी मराठी मंडळी नाहीत परंतु जी आहेत, ती एकमेकांना धरून आहेत!! त्यातही एक बाब गमतीची, दर वर्षी मंडळाची कार्यकारिणी ठरवली जायची आणि त्यानुसार कार्यक्रम ठरवले जायचे. प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी होताना, कार्यकारी मंडळाचे सदस्य वगळता, ठराविक मंडळी (च) एकत्र यायची!! म्हणजे, जोहान्सबर्ग इथे जवळपास ३०० कुटुंबे आहेत पण कार्यक्रमाला येणाऱ्यांची संख्या असायची जास्तीतजास्त २० कुटुंबे!! प्रत्येकवेळेस काहीना काहीतरी कारणे ऐकायला ऐकायला मिळायची, काहीजण तर चक्क “टीका” करायचे!!
तरीही, मी, राजीव तेरवाडकर, आदित्य, प्रशांत, विनय कुलकर्णी, मुसळे इत्यादी एकत्र जमत असू!! अर्थात, माझ्या सध्याच्या बातमीनुसार यात अजूनही फारसा फरक नाही. गंमतीचा भाग असा, एकीकडे “आमचे मराठी मंडळ” म्हणून ढोल वाजवायचा परंतु प्रत्यक्ष कार्यक्रमात मात्र, न येण्याची शेकडो कारणे सांगायची!! असे दुटप्पी वागणे, बरेचवेळा मनाचा त्रागा करायचे!! वास्तविक, आमचे कार्यक्रम वर्षाला ५ ते ६ इतकेच असायचे, प्रत्येक कार्यक्रमाची कमीतकमी दोन महिने आधी तयारी व्हायची तरीही आयत्या वेळेस, कार्यक्रमाकडे “पाठ” फिरवायची!!
– अनिल गोविलकर

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..