नवीन लेखन...

प्राचीन चॉकलेट

चॉकलेट किंवा त्याचा कच्चा माल असणाऱ्या कोकोचेउगमस्थान कोणते, हा एक कुतूहलाचा विषय आहे. कारण, हा विषय फक्त चॉकलेट या पदार्थाशी निगडित नसून तो मानवाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीशीही संबंधित आहे. त्यामुळे पुरातत्त्वशास्त्रज्ञांना अधिकाधिक जुन्या चॉकलेटचा किंवा कोकोच्या वापराचा शोध घेण्यात मोठे स्वारस्य आहे. याच संशोधनातून मिळालेली ही माहिती…


काही पदार्थांनी आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये प्रवेश केला आणि तिचा ते अविभाज्य घटक बनले. अशा पदार्थांपैकी एक म्हणजे चॉकलेट. चॉकलेट आवडत नाही अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. अगदी दोन वर्षांच्या मुलापासून ते ऐंशी वर्षांच्या म्हाता-यांना सर्वांना ते आवडते. कुकी, बिस्किटे, पेस्ट्री अशा पदार्थांसाठी तर चॉकलेट वापरले जातेच, पण व्हॅनिला आइस्क्रीमवर चॉकलेट सिरप अगदी आवडीने घेतले जाते आणि थंडीमध्ये हॉट चॉकलेट किंवा कोको पिण्याची मजा काही और असते. हे चॉकलेट प्रथम कुठे निर्माण केले गेले हा एक कुतूहलाचा प्रश्न आहे. अलीकडे केल्या गेलेल्या संशोधनातून मिळालेल्या माहितीने, आतापर्यंतच्या या बाबतीतल्या समजुतीला छेद गेला आहे.

आतापर्यंतच्या माहितीनुसार कोको हे पेय, तसेच चॉकलेट प्रथम तीन हजार वर्षांपूर्वी मेक्सिको, मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतील लोकांना माहीत झाले होते. थिओब्रोमा काकाव नावाच्या झाडांच्या फळांमधील बियांपासून ते बनवले जाते. कोकोचे हे फळ साधारण तीस सेंटिमीटर लांब आणि दहा सेंटिमीटर रुंद असते. फळावर उभ्या रेषांच्या स्वरूपातले उंचसखल भाग असतात. पिकले की हे फळ गर्द केशरी रंगाचे होते. फळांच्या आत पांढरा गर असतो व त्या गराच्या आत कोकोच्या बिया असतात. या गराची चव सौम्य असते आणि त्याला चॉकलेटचा स्वाद असतो. हा गर खाल्लाही जातो. गरामधून कोकोच्या बिया बाहेर काढल्या जातात आणि आंबवण्यासाठी त्या सात दिवस तशाच ठेवल्या जातात. मग त्या बिया भाजून त्यांची साले काढतात आणि त्या बियांपासून कोको व चॉकलेट बनवण्याची प्रक्रिया सुरू होते. कोको हे पेय कोकोच्या बियांच्या भुकटीपासून तयार केले जाते. पूर्ण पिकलेल्या फळाच्या बियांमध्ये अल्कलॉइड गटातले थिओब्रोमिन हे कडवट चवीचे रसायन मोठ्या प्रमाणात आढळते. हे रसायन किचिंतसे उत्तेजक आहे. मात्र, कोकोच्या पेयातील उत्तेजकपणा हा या थिओब्रोमिनमुळे नसून त्यातील कॅफिनमुळे असतो.

चॉकलेटची निर्मिती प्राचीन काळापासून होत आली आहे. चॉकलेटचे महत्त्व सांगणारे पुरावे इ.स. नंतर चवथ्या ते नवव्या शतकात होऊन गेलेल्या माया संस्कृतीतील, तसेच इ.स. नंतर चौदाव्या ते सोळाव्या शतकात होऊन गेलेल्या अॅझटेक संस्कृतीतील लिखाणात पूर्वीच आढळले आहेत. अॅझटेक, माया, तसेच त्यापूर्वीच्या विविध संस्कृतींत वापरल्या गेलेल्या चॉकलेटच्या अवशेषांचाही शोध कालांतराने लागला आहे. तीन दशकांपूर्वी केल्या गेलेल्या एका उत्खननात मध्य अमेरिकेतील ग्वाटेमाला या देशातील रिओ अझुल येथे इ.स.नंतर पाचव्या शतकातली भांडी मिळाली. माया संस्कृतीच्या काळातल्या या भांड्यांपैकी काही भांड्यांत चॉकलेटचे अंश आढळले. सुमारे दोन दशकांपूर्वी मध्य अमेरिकेतीलच बेझाइल या देशातील कोल्हा येथे केलेल्या एका उत्खननात इ. स. पूर्व सहाव्या शतकातील, कोकोचे अंश असलेली भांडी सापडली.

एका दशकापूर्वी मध्य अमेरिकेतीलच हॉन्डूरस या देशातील प्युओर्तो एस्कोंदिदा येथे इ.स. पूर्व १०००च्या जवळपासच्या काळातील चॉकलेटचे अंश मिळाले आहेत. या शोधानंतर अल्प काळातच मेक्सिकोच्या, आखाताच्या बाजूकडील किनाऱ्यावर असणाऱ्या वेराक्रुझ येथील ओल्मेक या ठिकाणी केलेल्या उत्खननात, इ.स.पूर्व १७५० सालच्या भांड्यात कोकोच्या बियांपासून बनवलेल्या पेयांचे अवशेष मिळाले. ओल्मेक संस्कृतीची सुरुवात इ.स.पूर्व १३००च्या सुमारास झाली. म्हणजे हे अवशेष ओल्मेकपूर्व काळातले आहेत. याबरोबरच, मेक्सिकोच्याच प्रशांत महासागराच्या बाजूकडील किनाऱ्यावर असणाऱ्या चियापास येथील मोकाया या ठिकाणच्या उत्खननात सापडलेल्या, इ.स.पूर्व १९०० इतक्या, म्हणजे सुमारे चार हजार वर्षे जुन्या काळातल्या भांड्यातही कोकोयुक्त पेयाचे अवशेष सापडले आहेत.

प्राचीन काळात मध्य अमेरिकेत सापडलेल्या या व इतर अवशेषांवरून हे स्पष्ट दिसून येते, की मध्य अमेरिकेतील, ओल्मेकपूर्व काळापासून ते अगदी अॅझटेक संस्कृतीपर्यंतच्या सर्व प्राचीन संस्कृतींचा, कोकोयुक्त पदार्थ हा एक महत्त्वाचा भागच होता. जुन्या लिखाणावरून असे आढळते, की मध्य अमेरिकेतील विविध संस्कृतींतील लोक धार्मिक कार्यक्रमांत, तसेच समारंभात कोकोयुक्त पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर करीत होते. कोको आणि चॉकलेटवरील हे सर्व संशोधन चॉकलेटचे मूळ हे मध्य अमेरिकेत असल्याचे दर्शवत होते.

इतक्या पुराव्यांमुळे अनेक संशोधकांना कोकोचा उगम मध्य अमेरिकेत झाल्याचे वाटत होते. तरीही जुन्या काळातील चॉकलेटच्या वापराचे पुरावे शोधणाऱ्या, अमेरिकेतील बर्कले कॅलिफोर्निया विद्यापीठातल्या रोझमेरी जॉयससारख्या संशोधकांना शंका होत्याच… कोकोला याहीपूर्वीचा इतिहास असावा का? कोकोचा उगम नक्की मध्य अमेरिकेतच झाला होता की आणखी कुठे? थिओब्रोमा काकाव या वृक्षाचे अनेक जनुकीय भाऊबंद दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉनच्या पावसाळी जंगलाच्या वरच्या भागात मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे पूर्वीच सिद्ध झाले होते. मग काकावच्या झाडांचे उगमस्थान हे दक्षिण अमेरिकेत असावे का? कोकोच्या जन्माबद्दल अशा अनेक शंका व्यक्त केल्या गेल्या होत्या.

कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठात संशोधन करणाऱ्या मायकेल ब्लेक यांना या पुढचा प्रश्न पडला होता. काकावचे मूळ जर दक्षिण अमेरिकेत असले, तर तिथेच कोकोचा वापर प्रथम का सुरू झाला नाही? मायकेल ब्लेक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अलीकडील काही वर्षे, दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोरमधील सांता अॅना- ला फ्लोरिडा या गावी उत्खनन चालू होते. पश्चिम अॅमेझॉनमध्ये ५,५०० वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या मायो-चिन्चिपे संस्कृतीचे अवशेष असलेले हे गाव आहे. या उत्खननात मायकेल ब्लेक यांना काही वैशिष्ट्यपूर्ण भांडी सापडली. ही भांडी त्यांना मध्य अमेरिकत सापडलेल्या, कोकोच्या फळापासून पेय बनवण्यासाठी वापरलेल्या भांड्यांसारखी वाटली. साहजिकच, त्यांनी या भांड्यांतील अवशेषांचे विश्लेषण करायचे ठरवले.

या भांड्यांत कोकोचा वापर केला गेला आहे का, हे तपासण्यासाठी त्यांनी तीन वेगवेगळ्या पद्धती वापरल्या. पहिल्या पद्धतीत त्यांनी भांड्यांतले करपलेले पदार्थ खरवडून काढले आणि त्यांचे रासायनिक विश्लेषण केले. तेव्हा त्यांना सापडलेल्या या भांड्यांपैकी सहा भांड्यांत पिष्टमय पदार्थाचे कण आढळले. या कणांचा आकार असा होता, की जो फक्त कोकोच्या बियांमधल्या पिष्टमय कणांमध्ये आढळतो. विश्लेषणाच्या दुसऱ्या पद्धतीत, त्यांना पंचवीस सिरॅमिकच्या आणि एकवीस दगडी भांड्यांमध्ये कोकोचे वैशिष्ट्य असणारे थिओब्रोमिन हे रसायन सापडले. तिसऱ्या पद्धतीत त्यांनी या अवशेषांच्या डीएनएचे विश्लेषण केले. या अवशेषातील जिनोमचे अनुक्रम हे कोकोच्या झाडांच्या डीएनएतील अनुक्रमाबरोबर जुळले. याबरोबरच मायकेल ब्लेक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रेडिओकार्बन डेटिंगद्वारे या भाड्यांचे वयही शोधून काढले. ही भांडी २,१०० वर्षे ते ५,३०० वर्षे या दरम्यानच्या वेगवेगळ्या काळांतली असल्याचे त्यांना आढळले. यांतला ५,३०० वर्षे हा काळ खूपच जुना होता इ.स.पूर्व ३,३०० वर्षांच्या आसपासचा!

हा शोधनिबंध ऑक्टोबर (२०१८) महिन्यातील ‘नेचर इकॉलॉजी आणि इव्हॉल्यूशन’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाला आहे. या संशोधनातील निष्कर्षांमुळे सांता अॅना- ला फ्लोरिडा येथे वास्तव्याला असलेले, प्राचीन काळचे लोक कोकोचा नियमित वापर करीत होते हे सिद्ध झाले आणि कोकोच्या वापराचा हा सगळ्यांत जुना पुरावा ठरला. मायकेल ब्लेक यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. रोझमेरी जॉयस यांचीही शंका खरी ठरली. तरीही रोझमेरी जॉयस यांच्या मनात एक प्रश्न होताच, की इक्वेडोरमधील त्या काळच्या लोकांनी कोकोच्या झाडांची मुद्दाम लागवड केली होती, की ते लोक तिथल्या कोकोच्या जंगली झाडांची फळे आणून ती कोको बनवण्यासाठी वापरीत?

कोकोच्या मुद्दाम केलेल्या लागवडीची सुरुवात मध्य अमेरिकेतून झाली असण्याची शक्यता अनेक संशोधकांनी वर्तवली आहे. अमेरिकेतील मायामी येथील युनिव्हर्सल जेनेटिक सोल्युशन्स या आस्थापनातील कृषी अभियंता जुआन कार्लोस मोटामेयर एरिआस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. हा शोधनिबंध त्यांनी केलेल्या, प्राचीन काळातील कोकोच्या जनुकीय अभ्यासावर आधारलेला आहे. त्यांनी मध्य अमेरिकेत ३,६०० वर्षांपूर्वीच्या जुन्या काळात कोकोची मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याचे मत व्यक्त केले आहे. मायकेल ब्लेक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मते, सांता अॅना – ला फ्लोरिडा येथील लोकांनीही कोकोच्या झाडांची लागवड केली असावी. कारण, इथल्या भांड्यांत सापडलेले कोकोचे अवशेष हे हजारो वर्षांतील वेगवेगळ्या काळांतले आहेत. म्हणजे, बऱ्याच काळापासून कोकोचा वापर इथे नक्कीच होतो आहे. दीर्घकाळ चालू असलेला हा कोकोचा वापर, तिथे कोकोची लागवड होत असल्याचे सुचवतो. दक्षिण अमेरिकेतील सांता अॅना-ला फ्लोरिडा येथे लागवडीखालील कोकोची आणि त्याबरोबरच जंगली कोकोची झाडेही असल्याने, या दीर्घ काळानंतर लागवडीखालील कोकोच्या झाडांतील जनुकीय खुणा कदाचित कालानुरूप पुसल्या गेल्या असाव्यात. मध्य अमेरिकेत मात्र जंगली कोको आढळत नसून फक्त लागवडीखालील कोको आढळतो. त्यामुळे तिथल्या, लागवडीखालील कोकोच्या जनुकीय खुणा टिकून राहिल्या असाव्यात.

ही कोकोची झाडे, दक्षिण अमेरिकेतून उत्तरेकडच्या मध्य अमेरिकेतील, हजारो किलोमीटर दूरच्या देशांत कशी पोहोचली हे एक मोठे गूढ आहे. मात्र, दक्षिण अमेरिकेतील जुन्या संस्कृतींचा नंतरच्या काळात होऊन गेलेल्या, मध्य अमेरिकेतील संस्कृतींवर मोठा प्रभाव पडला असण्याचे पुरावे सापडले आहेत. सांता अॅना- ला फ्लोरिडा येथे सापडलेली भांडी व मध्य अमेरिकेत सापडलेली भांडी, यांमधले साम्यही हीच बाब दर्शवते. त्यामुळे, दक्षिण अमेरिका व मध्य अमेरिका यांच्या दरम्यान त्या काळातही सततचा संपर्क असावा. मात्र, कोकोच्या बियांचे गुणधर्म दीर्घ स्थलांतरादरम्यान टिकून राहत नाहीत. त्यामुळे मायकेल ब्लेक यांनी आणखी एक शक्यता व्यक्त केली आहे. ती म्हणजे – “प्रशांत महासागरातून होड्यांद्वारे तर या कोकोच्या बिया पाठवल्या गेल्या नसाव्यात!”

मध्य व दक्षिण अमेरिकेतील विविध संस्कृतींतील महत्त्वाचा दुवा असणारा हा पदार्थ सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात स्पेनमध्ये पोहोचला असावा. हा पदार्थ स्पेनमध्ये कसा पोहोचला, याबद्दल विविध शक्यता सांगितल्या जातात. यांतली एक शक्यता अमेरिकेला पोहोचलेल्या कोलंबसाशी संबंधित आहे. आपल्या १५०२ सालच्या, चवथ्या अमेरिका वारीत कोलंबसाने मध्य अमेरिकेला भेट दिली. त्या वेळीच तिथल्या कोकोच्या बिया कोलंबसाने स्पेनमध्ये नेल्या असाव्यात. दुसऱ्या एका शक्यतेनुसार मेक्सिकोचा अॅझटेक राजा मोंटेझुमा (दुसरा) याने अॅझटेक साम्राज्यावर कब्जा मिळवणाऱ्या स्पेनच्या हर्नन कोर्टेस याला १५१९ साली कोकोयुक्त पेय पिण्यास दिले व त्याद्वारे स्पेनला कोकोची ओळख झाली. या संदर्भात आणखी एक शक्यताही व्यक्त केली जाते. ग्वाटेमालातील माया राजा केकची हा १५४४ साली स्पेनच्या सम्राट फिलिपला भेटण्यास गेला असता, त्याने सम्राटाला कोकोची भेट दिली असावी. यांतील कोणती शक्यता खरी आहे हे ज्ञात नसले, तरी चॉकलेट घेऊन व्हेराक्रूझहून पहिले जहाज स्पेनला रवाना झाले असावे ते मात्र १५८५ सालानंतरच.

स्पेनने कोकोच्या बियांची आयात सुरू केल्याच्या सुमारासच, मध्य अमेरिकेत पोहोचलेल्या इटली आणि फ्रान्सच्या दर्यावर्द्यानीही आपापल्या देशांत कोकोच्या बिया व चॉकलेट न्यायला सुरुवात केली. त्यानंतर अल्प काळातच चॉकलेटचा अवघ्या युरोपभर प्रसार झाला. फक्त एकच गोष्ट घडली… या कडवट, परंतु चविष्ट पेयाला गोडी येण्यासाठी युरोपीय देशांत त्यात साखर घातली गेली! अमेरिकेत हा पदार्थ सतराव्या शतकाच्या मध्यावर स्पेनद्वारेच पोहोचला असावा. आज हेच चॉकलेट जगभर पोहोचले आहे. मात्र गंमत म्हणजे, अवघ्या जगभर पोहोचलेल्या या चॉकलेटचा मूळ पदार्थ कोको हा जरी दक्षिण अमेरिकेत जन्माला आला असला, तरी आज जगातील कोकोच्या एकूण उत्पादनाच्या दोन-तृतीयांश उत्पादन हे आफ्रिकेतील देशांत होते!

 — वर्षा जोशी

मराठी विज्ञान परिषदेच्या पत्रिका या मासिकातून साभार 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..