नवीन लेखन...

नाटककार आणि ज्येष्ठ रंगकर्मी वामन तावडे

 

जन्म. २९ ऑक्टोबर १९५० रोजी चेंबूरमध्ये लेबर कॅम्प येथे.

एका सामान्य घरात जन्मलेल्या तावडेंचे बालपण हे चेंबूरमध्येच गेले. त्यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण सरकारी शाळेमध्ये आणि त्यानंतरचे शिक्षण चेंबूर हायस्कूलमध्ये झाले. चेंबूर परिसरात त्यावेळेस अनेक मनोरंजनाचे खेळ जसे की, कोकणातून ‘नमन’ हे खेळ येत असत. त्याची ओढ त्यांना लहानपणापासून होती. हीच अभिरुची त्यांना रंगमंचाकडे घेऊन गेली.

हायस्कूलमध्ये असताना तावडेंनी छोट्या-छोट्या एकांकिका,नाटुकल्यांसाठी बॅकस्टेजचा अनुभव घेतला. पु. ल. देशपांडे यांची बहीण मीरा दाभोलकर यांच्या यशोमंदिर या नाट्यसंस्थेसाठी वामन तावडे यांनी बॅकस्टेज केले. येथेच योगायोगाने त्यांच्या नाट्यलेखनाला सुरुवात झाली. त्यावेळी त्यांच्यावर अण्णाभाऊ साठे यांच्या ‘फकिरा’ नाटकाचा प्रभाव होता. त्यासारखेच ‘आशीर्वाद’ नावाचे नाटक त्यांनी लिहिले. त्या नाटकाचा मुहूर्तही केला. परंतु, स्वतःच्या नाटकाचे आत्मपरीक्षण करून त्यांनी लिहिलेले नाटक फाडून टाकले. यामध्ये त्यांची चिकित्सक आणि आत्मपरीक्षक वृत्ती त्यांना पुढे खूप उपयोगी पडली. ‘स्टॅण्डर्ड अल्कली’ या कंपनीमध्ये ते नोकरी करत होते.परंतु नंतर तेथून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.

१९६९ साली म्युन्सिपल नाट्यस्पर्धेत ‘सुतक’ नावाची एकांकिका त्यांनी लिहिली. या स्पर्धेतत्यांच्या लिखाणाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. त्यानंतर वामन तावडे यांनी ‘छिन्न’ हे दोन अंकी नाटक लिहिले. हे नाटक सदाशिव अमरापूरकर यांच्या वाचनात आले आणि त्यांनी ते स्पर्धेसाठी घेतले. या नाटकाचा प्रवास पुढे वामन तावडे यांच्या नाट्यलेखनातील कारकिर्दीला पुढे घेऊन गेला. वामन तावडे यांच्या ‘छिन्न’ या नाटकाने अनेक पारितोषिके मिळवली. १९७८ मध्ये नाशिक केंद्रातून हे नाटक पहिले आले. पुढे हे नाटक आयएनटीने करण्याचे ठरवले आणि व्यावसायिक रंगभूमीवर प्रवास चालू झाला. त्याकाळी स्मिता पाटील हे नाव हिंदी चित्रपट सृष्टीत गाजत होते. तरीही वेळ देऊन त्यांनी हे नाटक स्वीकारले. या नाटकामध्ये सदाशिव अमरापूरकर, स्मिता पाटील, सुशील गोलतकर, आशालता, दिलीप कुलकर्णी यांनी अभिनय केला. पुढे या नाटकाचे १०० प्रयोग झाले, तर गुजरातीमध्ये याचे ५०० प्रयोग झाले. वास्तववादी विषय आणि त्याची मांडणी यामुळे प्रेक्षकांची नस पकडण्यात त्यांना यश मिळाले. पुढे तावडे यांनी कामगारांच्या आयुष्यावर आधारित पहिली एकांकिका लिहिली. ‘दी कन्स्ट्रक्शन’ या नाटकाने अनेक एकांकिका स्पर्धेत पारितोषिके मिळवली. ही एकांकिका पुढे हिंदी, गुजराती, कानडी भाषांमध्ये सादर झाली. अश्विनी एकबोटे यांनी अभिनय केलेल्या ‘चौकोन’ या वेगळ्या विषयावरील नाटकाचे लेखनदेखील वामन तावडेंनी केले आहे. या नाटकानेही प्रेक्षक तसेच परीक्षकांची मने जिंकली. पुढे त्यांनी ‘मी घोडा हुसेनच्या चित्रातला’ आणि ‘पीदी’ या एकांकिका लिहिल्या.

‘रायाची रापी’ ही वामन तावडेंनी लिहिलेली एकांकिका त्याकाळी खूप गाजली. या एकांकिकेला दूरदर्शनचा पुरस्कारदेखील मिळाला. त्यांनी ‘आक्रंदन,’ ‘इमला,’ ‘यमुना,’ ‘अआइ,’ ‘चौकोन,’ ‘माऊली,’ ‘तुम्ही आम्ही,’ ‘जिप्सी,’ ‘नादखुळ्या,’ ‘वंदे मातरम’ या एकांकिका लिहिल्या. या सर्व एकांकिकांना राज्य शासनाची पारितोषिके मिळाली होती.

याशिवाय त्यांनी महेंद्र तेरेदेसाईंबरोबर ‘लक्ष्मण झुला’ नावाची टेलिफिल्मदेखील केली. वामन तावडे यांनी सातत्याने वेगवेगळे विषय घेऊन त्यातून सामाजिक प्रश्न मांडले. त्यांची नाटके मानवी नातेसंबंधामधील लैंगिकतेचा भाग याभोवतीही गुंफलेली होती. ते गंभीर प्रकृतीचे नाटककार होते. कामगारवर्गामधून पुढे आल्याने त्यांना या वर्गातील प्रश्नांची जाणीव होती.

वामन तावडे यांचे ७ जून २०१९ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4163 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..