नवीन लेखन...

पावसाचे संदर्भ…

रिमझिम पाऊस चालू असताना झाडांनी आपले कांद्याचे हात पसरून घ्यायला सुरुवात केलेली.. जिकडे तिकडे ओली ओली माती मधूनच वा-याची गार लहर.. अगदी अंगावर शहारे आणणारी… आसपासच्या नदी नाल्यात खळखळ सुरू झालेली.. भिजलेल्या पाखरांचे फांदी आड दडणे.. वाऱ्याच्या लहरीने झाडांचे शहारणे.. या गोष्टी जितक्या सूक्ष्म निरीक्षणातून येतात तितक्याच त्या सुंदर वाटतात.. मी तर अशा गोष्टींनी अगदी भारावून जातो.. पाऊस म्हणजे आभाळाला पडलेले सुंदर स्वप्न..! पाऊस म्हणजे जमिनीवरील स्वर्गाचे दार..! पाऊस म्हणजे माणसाची आशा….! एक भाषा… आभाळाचं गुपित जमिनीला सांगणारी… कित्येक आठवणीतले पाऊस आपण जपून ठेवलेले असतात… -हदयात लहानपणी पावसात भिजून कागदाच्या नावा सोडत राहायच्या… दूर पर्यंत जाणारी नाव पाहताना श्वास आपोआपच रोखला जायचा… मधेच नाव डुबली तर मग मात्र खूप वाईट वाटायचं.. पण लगेच दुसरा कागद…. दुसरी नाव तयार असायची.. असा हा पाऊस जीवनाचं तत्त्वज्ञान प्रत्येक थेंबाथेंबातून सांगत असतो.. आपल्याला… शाळेतून परत येत असताना दप्तर डोक्यावर धरून रोखलेला पाऊस किंवा पावसात खेळतांना शाळेला उशीर झाल्यामुळे मिळालेला मार… अशा कितीतरी गोष्टी आजही अगदी ठळकपणे आठवतात… प्रत्येक वेळी पाऊस नवीन रूपात भेटतो.…म्हणूनच आपल्याला नेहमी तो हवाहवासा वाटतो.

खरं पाहिलं तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर पाऊस म्हणजे एक निव्वळ नैसर्गिक प्रक्रिया ज्याचा कुणाशीही काडीमात्र संबंध नाही… जो कुणाच्या मोहामुळे पडतो किंवा कोणावर रागवून पडत नाही… असेही होत नाही कधी.. अगदी निर्विकार असतो पाऊस. आपण मात्र उगाचच आपले संदर्भ त्याच्याशी जोडत असतो… अर्थात वेगवेगळ्या संदर्भाने बरंच आयुष्य पुढे पुढे ढकलत असतो आपण.. त्यामुळेच जीवनाला एक अर्थ प्राप्त होतो .प्रत्येक गोष्टीकडे आपण जर शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर जीवन अतिशय निरस वाटू लागेल कशालाही अर्थ उरणार नाही, म्हणूनच आपण निसर्गाशी नाते जोडतो..

कधी चंद्राला चांदोमामा म्हणतो तर पावसाला खोट्या पैशाची लालूच दाखवून पडायला सांगतो.. काहीही असो कसलाही संदर्भ न जोडता जगणे फार कठीण होऊन जाते… संदर्भाविना जगणे म्हणजे मरणे होय.वेगवेगळ्या संदर्भांना आपण आयुष्य देऊ केलेले असते. हे सारे संदर्भ एकमेकात गुंतलेले असतात…

एक गोष्ट पावसातली मला स्मरणात अजूनही आहे, तेव्हा मी आठवीत होतो. माझी विज्ञान मंच ची परीक्षा होती. परीक्षा केंद्र गंगाखेड येथे असल्यामुळे पालम होऊन गंगाखेडला बसने जावे लागणार होते. मला एकट्याला प्रवास करणे, परीक्षा केंद्र शोधणे या गोष्टी त्या वयात जमत नसल्यामुळे मी बाबाला माझ्याबरोबर येण्यास सांगितले , दुस-या दिवशी पोळा हा सण असल्यामुळे बाबा म्हणाले,”माझे येणे होत नाही तू एकटा जाऊ शकत नाहीस मग ही परीक्षा राहूदे तेवढी काही महत्त्वाची नाही” मला अतिशय वाईट वाटले.मनातून परीक्षा द्यावी असे खूप वाटत होते. मी अतिशय नाराज होऊन बसलो. काय करावे काही समजत नव्हते, परीक्षा आता देता येत नाही असे समजून मी निवांत राहिलो.. हा विषय माझ्या सातवी शिकलेल्या आईच्या कानावर जाताच… तिने लगेच सांगितले मी तुझ्या बरोबर येते तू परीक्षेची तयारी कर मला अतिशय आनंद झाला… पैसे शाळेतून मिळणार असल्यामुळे नेहमीसारखी पैशाची काळजी नव्हती… परीक्षेचा दिवस उजाडला रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे मी आणि आई सर्व तयारीनिशी निघालो. पालमहून गंगाखेडला जायचे म्हणजे रस्त्यात दोन नद्या आड येतात…जास्त पाऊस असेल तर दोन्ही नद्याच्या पुलावरून पाणी वाहते आणि सर्व वाहतूक बंद होते त्यामुळे मनात थोडी शंका होतीच.. असा विचार करता करता केरवाडीच्या पुलावर गाडी आली.तिथे पाहिले तर पाणी अगदी पुलापर्यंत आले होते परंतु वाहतूक सुरू होती. माझ्या मनात पुढील पूलाबद्दल विचार चक्र सुरु झाले,मग एवढ्या अट्टाहसाने परीक्षेसाठी निघालेल्या माझ्यासारख्या विद्यार्थ्याचे काय होणार…? व्हायचे तेच झाले… तळमळीने माझे डोळे अतिशय केविलवाण्या नजरेने रस्त्याकडे पाहात होते.. काहीवेळातच मरडसगावचा गावचा पूल आला.पूलाकडे पाहिले तर वाहनांची रांग लागलेली.. सर्व वाहतूक इकडची इकडे…तिकडची तिकडे थांबलेली.. पूलावरून पाणी वाहत होते… जे व्हायचे तेच झाले परीक्षा अकरा वाजता असली तरी वेळेपूर्वी किमान अर्धा तास तरी नंबर शोधण्यासाठी परीक्षा केंद्रावर हजर राहणे आवश्यक होते.. नऊ वाजले तरी पुलावरचे पाणी कमी झालेले नव्हते.. मी मनात प्रार्थना करत होतो देवा लवकर पुलावरचे पाणी कमी व्हावे. मला परीक्षेला जाता यावे.. अगोदर निघायला आडचण.. त्यात पुन्हा संकटे.. शेवटी तर असा विचार मनात येत होता की बाबांचे ऐकले असते तर बरे झाले असते.. आता तर आपण धड घरी सुद्धा परत जाऊ शकत नाहीत ..मागच्या पुलावरून पाणी वाहत असणार… मग करणार काय..?गाडीत बसून पुलावरून पाण्याप्रमाणे वाहत जाणाऱ्या माझ्या स्वप्नांकडे पाहत राहिलो…मनात तरी विश्वास होता पाणी उतरेल.. आणि आपल्याला परीक्षेला जाता येईल …बरोबर तसेच झाले पाणी एका तासात उतरले.. पाणी घोट्यापर्यंत पुलावरून जात होते तेव्हाच ड्रायव्हरने गाडी सुरू केली.. असे करत- करत कसेबसे परीक्षेच्या अगोदर केंद्रावर पोहोचलो.. आई मामा कडे गेली.. मी परीक्षा द्यायला बसलो तर डोळ्यासमोर सर्व पाणीच पाणी दिसू लागलं.. परीक्षा होती विज्ञानमंच ची मग मी मन घट्टं केलं … पेपर सोडू लागलो जसं जमलं तसं बरोबर प्रश्न सोडवत गेलो आत्मविश्वास वाढत गेला..चांगला पेपर सोडवला..एका दिवसाच्या पावसाच्या संदर्भाने माझे सर्व विद्यार्थी जीवन व्यापून गेले आहे. मी ती परीक्षा पास झाल्यावर तर प्रचंड आनंद झाला..पालममध्येही मी एकटाच होतो परीक्षा पास होणारा..या परीक्षेमुळे माझा विज्ञान मंचच्या आठवड्याच्या शिबिराला नंबर लागला…शाळेत सर्वत्र माझे कौतुक झाले…शिबिर यशस्वी पूर्ण करून प्रमाणपत्र सर्व शिक्षकांना दाखवले पण मनात एक पाऊस मला नेहमीच भेटत राहिला…वेगवेगळ्या रूपात कधी हसवत राहिला तर कधी रडवत राहिला.. मात्र नेहमी पाऊस आठवत राहिला..

— संतोष सेलूकर परभणी
7709515110

Avatar
About डॉ.संतोष सेलूकर 25 Articles
प्राथमिक शिक्षक जि.प.परभणी येथे कार्यरत असून दूरचे गाव हा कविता संग्रह प्रकाशित आहे.अनेक ठिकाणी कविसंमेलने व साहित्यसमेलनात सहभाग. सातत्याने १९९५ पासून कविता व ललितलेख लेखन विविध काव्यलेखन स्पर्धेत पारितोषिक प्राप्त.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..