नवीन लेखन...

पद्य आणि मृत्युविचार : भाग – ३/११

आतां आपण, विविध भाषांमधील, मृत्युविचार express करणार्‍या काव्यावर ज़रा नजर टाकूं या.   ‘जो न देखे रवि । सो देखे कवि ।’ अशी उक्ती आहे. त्यामुळें, हें पाहणें interesting ठरेल की कवींच्या नजरेतून मरण कसें दिसतें.

*

संस्कृत पद्य :

‘आर्ष-संस्कृत’ या तिच्या रूपासह, संस्कृत ही भाषा वैदिक कालापासून अस्तित्वात आहे. वैदिक काळापासून ते १८व्या-१९व्या शतकापर्यंत जवळजवळ सर्व संस्कृत लेखन पद्यातच होत असे ( अपवाद अल्प आहेत, जसें की, कांहीं वैदिककालीन  ग्रंथ ; ‘चंपू’  ज्यात गद्य-पद्य दोन्हीं असे; वगैरे). इतक्या पुरातन भाषेतील, विविध विषयांवरील साहित्यात मुत्यूचे उल्लेख  असणारच, आणि तसे ते आहेतही.

रामायण व महाभारत ही संस्कृतमधील महाकाव्यें आहेत. रामायणाचे रचयिते वाल्मीकी यांना ‘आदिकवी’ म्हणून संबोधलें जातें. एका निषादानें आपल्या बाणानें क्रौंचवध केला, आणि तें दृश्य पाहून वाल्मीकींच्या मुखातून ‘मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः । यत्क्रौंचमिथुनादेकम् अवधीः काममोहितम् ॥’ अशाप्रकारच्या काव्यपंक्ती उमटल्या. म्हणजे पहा, आदिकाव्याचाच मुळी संबध मृत्यूशी आहे. खुद्द रामायणात, श्रवण (श्रावण) , दशरथ, जटायु, बाली, रावण अशा अनेकांच्या मृत्यूचे  उल्लेख  आहेत. महाभारतात  कुरुक्षेत्र-युद्ध ही अति-महत्वाची घटना आहे, आणि युद्धाच्या संदर्भात अनेकांच्या  मृत्यूचे वर्णन येतें, जसें की घटोत्कच, अभिमन्यु, दोणाचार्य, भीष्म पितामह, दु:शासन, दुर्योधन, वगैरे. महाभारतातील लोकप्रिय व नित्यनेमानें वाचला जाणारा भाग आहे  ‘भगवद्.गीता’. त्यातील एक श्लोकांश पहा – अर्जुनाला युद्धप्रवृत्त करतांना,भगवान श्रीकृष्ण म्हणतात : ‘ हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं…’ .  वीरासाठी अटळ अशी गोष्ट आहे  ‘मरण’ , आणि त्याचा परिणाम काय होईल याचा उल्लेख श्रीकृष्णानें येथें केलेला  आहे. गीतेमधील आणखी एका श्लोकाचा अंश पहा – ‘संभवामि युगे युगे’. ‘पुन्हां पुन्हां अवतार घेणें’ याचा संबंध पुनर्जन्माशी आहे, आणि पुनर्जन्माचा संबंध अर्थातच मरणाशी आहे.

अनेक संस्कृत सुभाषितांमध्ये मृत्यूचे प्रत्यक्षाप्रत्यक्ष उल्लेख येतात. उदा. ‘राजद्वारे स्मशानेच यस्तिष्ठति स बांधव: ।’. स्मशानाचा उल्लेख म्हणजेच मृत्यूचा उल्लेख.  अन्य एका सुभाषितामध्ये ‘चिता’ व ‘चिंता’ यांची तुलना केलेली आहे.  पहा –

चिता चिंतासम ह्युक्ता बिंदुमात्र विशेषत: ।

सजीवं दहते चिंता निर्जीवं दहते चिता ।

चिता व चिंता या दोन शब्दांमध्ये फरक फक्त अनुस्वाराचा आहे.  चिता निर्जीव माणसाला  जाळते, तर चिंता ही त्याला जिवंतपणीच अनेकदा जाळत रहाते. चितेवर निर्जीव शरीराचें जळणें म्हणजे अर्थातच मृत्यूचा उल्लेख आहे.

ही आणखी कांहीं सुभाषितें पहा –

वासांसि जीर्णानि यथा विहाय अन्यानि गृह्णाति नरो ऽ पराणि

तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही ।

जसा माणूस जुने कपडे टाकून दुसरे नवीन कपडे घेतो ( धारण करतो ) , तसा आत्मा जुनी शरीरें टाकून नव्या शरीरात प्रवेश करतो.

अशनं मे वसनं मे जाया मे बन्धुवर्गो मे

इति ‘मे मे’ कुर्वाणं कालवृको हन्ति पुरुषाजम् ।

‘अन्न माझें, वस्त्र माझें, पत्नी माझी, नातेवाईक माझे’, असें ‘माझें माझें’ ( ‘मे मे’ )  करणार्‍या माणूसरूपी अजाला (बोकडाला)  काळरूपी लांडगा ठार करतो .

अनेकांनी लहानपणीं औषध घेतांना, खास करून कडू-औषध घेतांना, पुढील श्लोक म्हटला असेल –

‘औषधो जान्हवीतोयं, वैद्यो नारायणो हरि: ।’

याचा वरवरचा अर्थ सरळ आहे की, ‘ हें औषध गंगाजलच आहे , [ म्हणजे, गंगाजलाप्रमाणें परिणामकारक आहे ; कारण गंगाजल खात्रीपूर्वक पापक्षालन करते, निश्चितपणें स्वर्गप्राप्ती करविते, (अशी जनमान्यता आहे) ] , व माझा वैद्य तर प्रत्यक्ष नारायण आहे (म्हणजेच, मी ईशकृपेनें निश्चितपणें बरा होणारच)’ . मात्र यामागचा दडलेला अर्थ लहानपणीं आपल्याला माहीत नसतो. या श्लोकातला आणखीही जो अर्थ आहे तो असा : आपल्याला माहीतच आहे की मृत्युसमयीं गंगाजल मुखात घालतात. म्हणजेच, या श्लोकातील गंगाजलाचा उल्लेख आणि ‘आतां (केवळ)  देव(च)  वैद्य आहे  (म्हणजेच, आतां बरें होणें फक्त देवाच्या हातात आहे)’ असा उल्लेख , अशा प्रकारें हें सुभाषित मरणाला अप्रत्यक्षपणें स्पर्श करतें.

‘मनुस्मृती’ हा एक महत्वाचा ग्रंथ आहे. ( कृपया हें ध्यानात घ्यावें की, अर्थातच, येथें त्या ग्रंथाच्या, तत्कालीन किंवा सद्यकालीन सामाजिक योग्यायोग्यतेची चर्चा अभिप्रेत नाहीं. आपण येथें केवळ साहित्यिक दृष्टीतून पहातो आहोत, आधुनिक काळच्या सामाजिक दृष्टिकोनातून नव्हे ). या ग्रंथातील एक श्लोक पहा –

‘एक एव सुहृद्धर्मो निधनेऽप्यनुयाति य: ।

शरीरेण समं नाशं सर्वमन्यद् हि गच्छति ।’

लक्षात घ्या की, हा ‘धर्म’  म्हणजे ‘रिलिजन’ नव्हे, तर ‘नीति’, ‘कर्तव्य’ असा याचा अर्थ आहे, जसें की देहधर्म, राजधर्म, शेजारधर्म, मानवधर्म, इत्यादी. तर, या श्लोकाचा अर्थ असा आहे की, ‘धर्म हाच खरा मित्र आहे , तोच एकटा मृत्यूनंतरही आपल्याबरोबर (संगतीनें) येतो ; इतर सारेंच शरीरासह इथेंच नष्ट होतें.’ (संदर्भ : ‘मनुस्मृती आहे तरी काय’ , लेखक – वा. ना. उत्पात). या श्लोकात मृत्यूचा प्रत्यक्ष उल्लेख आहे. महाभारतातही, यक्षाला दिलेल्या उत्तरात युधिष्ठिरानेंही हेंच म्हटलेलें आहे. मनुस्मृतीमध्ये ‘दंड’ (शिक्षा, सज़ा) या संदर्भात अनेकदा मृत्युदंडाचा उल्लेख येतो. (संदर्भ – ‘मनुस्मृति : सरल भाषा में मनुस्मृति-सार’ , ले. – प्रो. डॉ. राजाराम गुप्ता ) . उदा. ‘वधदण्डम् अत:परम् ।’ . खिसेकापूच्या गुन्ह्याबद्दल सांगियलेलें आहे की,  ‘… तृतीये वधम् अर्हति’ म्हणजे, ‘हाच गुन्हा तिसर्‍या वेळी करणारा ( खिसेकापू ) मृत्युदंडाला पात्र होतो’.  याच ग्रंथातील दंडनीतीबद्दलचा आणखी एक श्लोक पहा –

‘गुरुं वा बालवृद्धौ वा ब्राह्मणं बहुश्रुतम्  ।

आततायिन मायान्तं हन्यादेवा विचारयन् ।’

याचा अर्थ असा की, ‘जर गुरू, बालक, वृद्ध माणूस, किंवा विद्वान ब्राह्मण सुद्धा आततायी असला, व बिनाअपराध मारायला आला, तर निस्संकोचपणें त्याची हत्या करायला हवी.’

अनेक संस्कृत स्रोत्रांमध्ये, प्रार्थनांमध्ये, नाटकांमध्ये मृत्यूचे उल्लेख येतात. पण, आपण वर जी थोडीशी उदाहरणें पाहिली ती पुरेशी आहेत.

*

— सुभाष स. नाईक

Subhash S. Naik

 

 

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..