नवीन लेखन...

परीस…

भीती नावाच्या प्रकाराची मनुष्याला अगदी लहान वयातच ओळख होत असते.” झोप लवकर, बागुलबुवा येईल बघ. “इथपासून सुरू झालेला आपल्यातील भितीचा प्रवास अगदी शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजेच मृत्यूशय्येवर पडल्यावर होणाऱ्या विलक्षण थररकापापर्यंत सुरूच असतो. भितीची कारणं वेगवेगळी असतील… प्रतिक्रिया सुद्धा वेगवेगळ्या असतील परंतु कोणतीही व्यक्ती घ्या कशाची ना कशाची भिती तिला सदैव सतावत असतेच.. लहानपणी मला अशीच बुरुजावरच्या घुबडाची फार भीती वाटायची… आमचं घर म्हणजे फार मोठा बुरुजाचा वाडा होता.. त्याच्या प्रत्येक बुरुजावर घुबडाचे कायम वास्तव्य असायचे. संध्याकाळ झाली की सारे पक्षी आपापल्या घरट्याकडे परतायचे…आमची सुद्धा खेळून खेळून घरी परतायची वेळ तीच असायची. मी पळत पळत घराकडे निघतांना बुरुजाकडे जायच्या पायऱ्या म्हणजे आम्ही त्याला ‘चोप’ म्हणायचो.अर्थात उतरत्या दगडी पाय-याचा रस्ता, या चोपंवर पाऊल ठेवलं की एकदम डोळ्यासमोर एक घुबड बसलेले दिसायचे मग पुढे जायची हिंमत व्हायची नाही. वाट बघायची कोणी मोठा माणूस वाड्यात जाणारा येईल का ? म्हणजे त्यांच्या सोबत जाता येईल. खरं तर एक लहानसा खडा फेकून हाणला तरी ते घुबड उडून जाईल पण तसे करणे शक्य नव्हते कारण त्या बाबतीत अशी एक दंतकथा होती की या घुबडांना जर का खडा मारला तर ते घुबड अलगद खडा झेलते अन् समुद्रात नेऊन टाकते मग जसा जसा खडा विरघळत जाईल.. तसे तसे आपण सुद्धा विरघळून जातो… या कथेचा एवढा प्रभाव होता की कधीच आम्ही घुबडाला खडा फेकून मारू शकलो नाही..

जागच्या जागेवर गरकन फिरणारे… लुकलुकणारे त्याचे भेसूर डोळे, टवकारलेले कान,पंखांची केलेली फडफड काही केल्या माझ्या डोळ्यासमोरून जायची नाही. मध्यरात्री केव्हातरी घुssघुss  असा घुबडाचा आवाज ऐकू यायचा.. मग तर अधिकच भिती वाटायची. तोंडावर पांघरून घेतलं तरी घुबड सारखं दिसत राहायचं. खरंतर नंतर मोठे झाल्यावर कळलं की घुबड काही देशात शुभशकून मानले जाते..घुबड हे तर ज्ञानाचे प्रतिक आहे. परंतु आपल्याकडे मात्र घुबडाला अशुभ मानतात.घुबड म्हणजे कुरुप आणि अजागळ पक्षी .. आमच्या लहानपणी आमच्या मित्रांचा सगळा वाचिक व्यवहार घुबड हा शब्द घेऊनच चालायचा. ‘घुबडा सारखं काय टकमक बघतोस ?’ ..’घुबडासारखं तोंड करायला काय झालं..?’ ‘घुबड्या तोंडाच्या…?’ अन् मुलगी किंवा भांडकुदळ बाई असेल तर ‘ती घुबडी..’ असे घुबडा बद्दलचे वाक्य उच्चारतांना त्या घुबडाची भिती तेवढी कायम होती. खेळता-खेळता आम्ही घुबडाचं एक गाणं म्हणत असू .. घुबड घुमतं, पैसा मागतं पैसा कशाला?…असं ते बरंच लांबलचक गाणं होतं.

काही लोक सांगायचे की आपली अंडी उबवण्यासाठी घुबड सातासमुद्रा पलीकडून परीस आणतात. हा परिस लोखंडाला लावला तर त्याचं सोनं होतं. आमच्या वाड्यात बसल्यानंतर चर्चा निघायच्या आमचे एक चुलत आजोबा नेहमी तवा किंवा लोखंडी वस्तू घुबड बसायचं तिथं नेऊन ठेवायचे. परिस आणला तर तो लोखंडी वस्तूला लागेल व ती सोन्याची होईल. या आशेवर वाट बघायचे.. .. परंतु कधीच त्यांच्या लोखंडाला परीस लागला नाही. यावरून असा निष्कर्ष ते काढत असायचे की घुबड आपल्या परिसाला खूप जपते, चुकूनही लोखंडाच्या जवळ अंडी ठेवत नाही. अशा चर्चा आमच्या कानावर पडायच्या अन मनात यायचे चुकून कधीतरी आपल्याला हा परिस सापडेल काय..? मग आपण साऱ्याच लोखंडी वस्तू सोन्याच्या करून टाकू बालबुद्धीला वाटत असणारे हे विचार हळूहळू वास्तवाचा शोध घेत गेले..अन् कळून चुकलं की ‘परीस’ नावाची अशी कोणतीच वस्तू जगात नसते… पण एक मात्र खरं की सतत चांगलं काम, प्रेमाने बोलणं,सत्य वागणं,अभ्यास, वाचन,चिंतन,गुरुचा सहवास,ज्ञानकणाची जिज्ञासा..यासारखे किती तरी परीस‌च होते जे पुढील आयुष्यात भेटत गेले ..कसे स्पर्शत गेले नकळत कळलं सुद्धा नाही..?स्वतःच्याच आयुष्याचं सोनं कसं होत गेलं तेही समजलं नाही ? घुबडाबाबतचे ते विचार आजही आठवतात…पण प्रत्यक्षात आज घुबडंच दिसत नाहीत..अन् भिती तर केंव्हाच पळून गेली आहे..दूर. बुरुजाचा वाडा ही तसा शाबूत राहिला नाही…फक्त मनावर काही परीस राहून गेले.तेच परीस मी जपत राहतो…जीवापाड.अजून ही असेच नवनवीन परीस भेटत राहतात… नकळतपणे. तेव्हा आयुष्याच सोनं होऊन जातं…‌

— संतोष सेलूकर.
परभणी
७७०९५१५११०.

Avatar
About डॉ.संतोष सेलूकर 25 Articles
प्राथमिक शिक्षक जि.प.परभणी येथे कार्यरत असून दूरचे गाव हा कविता संग्रह प्रकाशित आहे.अनेक ठिकाणी कविसंमेलने व साहित्यसमेलनात सहभाग. सातत्याने १९९५ पासून कविता व ललितलेख लेखन विविध काव्यलेखन स्पर्धेत पारितोषिक प्राप्त.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..