पैलं …जे आसन ते

आज रूममदि कोणत्याई साईडला बसलं तरी ब्रूसली मझ्याचकड बगलाल्यासारकं वाट्लालतं. आधीच मला आलेलं टेंगशन अन फोटोतल्या ब्रूसलीच्या चेहऱ्यावरचं टेंगशन मिळून सगळ्या रूममधी डब्लिंग टेंगशन झाल्त. निस्त टेंगशन टाकून रूम धुतल्यावनी वाट्लालतं माज डोकं पार शॉट झाल्त त्या वंगळझ्यार वासानं. जोर चेपलालता तरी उठलो प्यान्ट अडकिवली लालशर्ट घातला मग मज्या लक्ष्यात आलं झाली झोम्बा झोम्बी अन फाटलाच तर … नवा कशाला, महिनाइ झालनी घिऊन. म्हणून मग मी लालशर्ट अंगातून काढला अन जुन्ना पांडरा घातला. ग्वागलचा एक कान मोडलाय माज्या तरिपन उगूच किशाला अडकिवला, मोडकी साईड मधी झाकून. आजुनबी छाती निस्ती ठक ठक ठक करलालति, डोकं बत्त्यात घालून कुटलाल्यासारखं वाट्लालतं एक्दम हुलकी आल्यासारखं झालं म्हणून रूमची खिडकी उघडली. रात्री नळ सुटला व्हता बाबाचं पाईप घेऊन चेतक धु, कन्हेरीला पाणी दे चाल्लेलं. आई करतीय पण त्येन्ला सोतानं केल्याशिवाय चैन कुठं पडतीय. मी नजर फिरवीत कॅप्टनकड पाहिलं बरं वाटलं हिम्मत के साथ उभी होती. मी खिडकीला उभ्याउभ्याच पोटाखाली चोरखिश्यावर हाथ ठिवून अंदाज घेतला. बंद वस्तर्याचा तो निबरपणा माझ्या छातीला हिम्मत दिवलाल्यासारखं वाटलं. मी मागे वळलो पुन्हा तो वंगळझ्यार टेंगशनचा वास, ब्रूस लीच्या चेहऱ्यावरचं टेंगशन. आज इंतेहान कि रात उपरवाले सब तेरे हाथ, मी पुन्हा एकदा मारुतीस्तोत्र म्हणलं.

आज कालेजातंच दंड्या बोलला मला “पश्या आब हय तुझी बारी आज हानेगी तुझको दुनिया सारी”. ऐकिल्याबर्बर पोटात खळखळल्यासारखं झालं पर एक्या साईडनी लै भारी बी वाटलं. म्हणलं आपली बी झंगड-पंगड होणार इतके दिवस पाहिलेला ब्रूस ली कामाला येणार. लगलगी कॅप्टन मारीत चौकात गेलो येक्या बिरादरच्या टपरीवर कारभाऱ्याचा संत्या उभाच होता. तेला म्याटर सांगिटला, ऐकीणं झाल्यावर तोंडातली इब्राहिम थुकून संत्या बोलला “कितीबी येवूदि बगु आपण”. लय धाराय संत्या, लयच टेच्यात बोलतोय, घाबरीत म्हणून नाही कुणाला. त्याचा भाऊ अन सुजय मुंडकर दोस्त, त्यामुळं चौकात चलतीय तेचि. संत्या असला म्हणजे शेफ वाटतंय. मी उगुचंच मान वळवीत इकडं तिकडं बघटीलं संत्याचं नमस्कार-चमत्कार चल्लालतं तेयला लय जण ‘वो कारभारी ये कारभारी’ करत्यात ते बघटीलं. वाडोळ बघुनबी मज्याकड कुणी बघना गेल्यावर कटाळून टपरीला लावलेल्या माळीतली गितांजली फाडली. येक्याच्या डोळ्याला डोळा देत दाताच्या सुळ्यावर धरून तिला खोलली अन तोंडात धरली तर इचीमाय वार्रा…उडाली भुकटी अन सगळे डोळे लाल लाल झाले पाण्यानं. निस्ता वंगळा ठसका लागलता जोरानं तवा पाण्याचा तांब्या देत एक्या हागला “जमना ते करनी बे बाम्ना.” मी डोळे पुशीत बोललो “आईघाल तुजी” गितांजलीचा राग तेच्यावर, गुटखा असो की पोरगी खानार एक राग निगणार दुसऱ्यावर.
येक्याला मझ्या शिवीचा झ्याट फरक पडलानी तो बोलला ” तू दिवनि बे शिव्या, आपल्याला शोभल तसं बोलावं”. मी रागरागं दोनाची नोट काढली तेच्या गल्ल्यात हिबाळली अन उडूनच कॅप्टनवर बसलो.

कारभाऱ्यानं निस्ता हाथ केला, नाहीतरी आता त्या भटाच्या नमीच्या टूशनचा टाइम होता तो मज्याकडे थोडीच बघणार. माझी जळफळ बगुन का कायकी पर येक्या हसला…आपण एकटेच आहो ज्यानं ‘खात्यात लिव्ह बे’ असं तेला कवाच म्हनीतनी तरीबी आपण टपरीवर थांबलो की या कडू येक्याचं पोट दुखणार. अरे आम्हाला उपदेश करणार आमचा बाप कमी पडलाय का? मनून आता तू सुरु. एक्या जाता जाता म्हणला ‘त्या शील्याच्या वाटला का जाऊलालायीस बे बाम्ना तुमच्यासारख्यानी लाग्नी असल्याच्या नादाला” झालं पुन्हा पुन्हा खजाळीच्चा मला उगुचंच ‘शरीफ साईडहिरो’ करण्यावर.

तस्साच वाऱ्याला चिरीत मी शाळेवर आलो, ग्राउंडवर आज्या आलताच. माझी कॅप्टन स्टँडला लावली प्यांट काढून तिच्यावर लटकवली शर्ट लटकिवला अन अन व्हीआयपीवरच ग्राऊंडला ४ फेऱ्या मारून आलो. घाम व्ह्यायला जारी झाला छाती वर आली थोडी निब्बर झालती सनी देवलसारखी, भारी वाटलं. मग २०चा एक अशे पाच राउंड डिप्स मारले अन उठता उठता हटकून खाली जिमीनवर पाहिलं. फक्त थोडथोडा घाम छाती टेकलालति तिथं लागलता आजून काई घामानं माझी संपूर्ण आकृती हुईना गेल्ती जिमीनीवर…करिन मी लवकरच. लगेच बाजूच्या बारपाशी जाऊन पाच पाचनं बार मारले पंचवीस. घड्याळात बगटीलं बरोबर साट मिनिट. निस्ता घामेघाम. खोंडयाचा सत्याचं बी चालू होतं तो चारशे मारतोय… आपण बी ठरवलंय चार महिन्यात तेच्या बरोबरीने जोर काढायचे… तीन आठवड्यात इतके आलोय कमी हाय का ?
कॅप्टनवरचा शर्ट उचलता उचलता हाथ वाकवून बेंडकुळी फुगवून बगटीली मजमलाच टरारल्यासारखी वाट्लालती. दुरनच आज्याला दाखिवली तेला तितकी नाही वाटली. कायाय त्यानं बघजी बघ्जीपस्तोर थोडी डाऊन झालती, होतय असं. उद्या दाखवीन तेला… मग शाळेच्या नव्या खोल्याच्या बेसमेंटवर बसत बसत बॉडीकड बघत बघत मगआमरीचा विषय निघाला. काय बोलली काय नाही सगळं निघालं. आज्याला कालची गोष्ट सांगितली,काल कसं तिनं मला फोन केलता मग मी पाऊस होता तरी तिला शकुरकडून तिने भरलेल्या गान्याची कॅशेट न्यून दिल्ती…भिजत.सगळं सगळं बायजावर सांगितलं, सांगताना उगूच मला गुदगुल्या हुलालत्या पोटातल्या पोटात.
आज्या मनला “तिचं हाय …पक्कं हाय” चोद्दीचा कायबी बोलतोय. मी म्हणलं “तसलं काय नाही बे आज्या, मज्या साईडनं तर नाहीच, बहिणीचं लग्न झाल्या अदोगर आपला काहीच तसला इचार न्हाई”
तो बोलला “तुझ्या नसंन पर तिच्या हाय तुला बोलतीय हसू हसू… वर्गात तुझ्याकडं खुले आम बगतीय आजून काय सबूत फाहिजे”आज्या वाडोळ असलंच काही पांचट बोलूलालता जे खरं वाटना गेलतं पर लय बरं वाट्लालतं.

आमरीता, आमच्या ताईला तिनं वळखित असल्यानं स्वतःहुन मला बोलूलालति. आमच्या कालेजात तिनं सर्वात भारी दिसायची. तिनंच कालेजात एक दोनदा जीन प्यांट घालीत होती दिसायला एक्दम आमरीता सिंग, हासनंइ तसलंच. तिच्यावर तोंडचिरचा शीलवान मरत होता. शाळत असल्यापासूनची ती त्याची ल्हवर…शिंगल शीटर बरका. अन तेला वाटलं तिनं मला लाईन देतीय, तेन इकडून तिकडून पत्ता काढला त्यातपण तेला असं कळलं की तिनं मला लाईन देतीय, झालं. मला मारणार त्यानं डिक्लेर केलं. आपल्याकडं शिवलं म्हणलं की धरलं म्हन्तेत ते असं. आय्क्चुअल मध्ये तसं नाही बरका आमचं काही… पण उगुच नाहीच म्हणून मला माझी लाईन तोडायची नव्हती. अन का बाबा सक्खी असताना कुणाला मानाची बहीण का करा. आता पेटणार दिसूचलालतं. मी म्हणलं हिरो व्हायचा पैला मौका का सोडा.

मग काय कमरेला सायकलची चैन, चोरखिश्यात वस्तरा सगळं चोख. ब्रूस लीचे पिच्चर बघबघू तयारी सुरुच होती. कटास, पंचिंग प्र्याक्टीस जोरात एक्दम. ब्रूस ली एक्या दिवसाला ५००० पंचची प्र्याक्टीस करतोता म्हण. गेल्या सोमवारीच कारभाऱ्याकडून नांचाकु मागून आनलता रोज रात्री घुमवायची प्र्याक्टीस बी जोरात सुरु होती. घुमिवताना जरा दमानंच घिवलालतो. इचीमाय लयच वंगळझ्यार लागतोय हो नांचाकु.पाठीला खवायचा मग बाहीर काढायचा पुन्हा खवायचा सगळं जोरात.
आज ‘तो’ अन वाघमाऱ्याचा दिप्या येणार कळालतं. पुन्हा एकदा मारुती स्तोत्र म्हणलं जोडीला येतंय म्हणून गायत्री मंत्रयी म्हणला. लढाई के दिन खाडा ‘ये दोस्ती’ भळीत घालून संत्या अचवल्याला गेल्ता. आज्या ला म्हणलं ये आज रूमवर झोपायला तर मार खायला इना म्हणला. थोडक्यात आज वक्त बाका होता… उपरवाले …या अली …जो बोले सो ..जय हिंद.

अन झाली दारावर टकटक. बाबा आतून म्हणले कोणाय? घरात तमाशा कशाला म्हणून मी चटमन्या दरवाजा उघडून बाहेर जात म्हटलं ” नोट्स न्यायला क्लासमेंट आलेत”

बाहेर आलो. कॅप्टन काढली. ते तिघ होते मी एकटा. माझी फाटलती पण ठरविल्त “आज मरेंगे पर किसीको मानलेली बहीण नही करेंगे.”

तिघइ हिंगनावणी तोंड करून बगलालते…“आईची ** कारभाऱ्याच्या मोठमोठी बाते अन भीक मांगके खाते” त्येन्ला बघून सर्व्यात आदी राग जर कुणाचा आला असल तर कारभाऱ्याचा. रात्री नवाचा टाइम असंन कॅप्टनच्या मागे पुढे सायकली लावून शिल्या अन तेचे दोस्त मला आता जळकोट रोडनं राम नगरच्या पुलाकडे निवलालते. गल्लीला निस्ता लोकायच्या दारा म्होरल्या लाईटीचा उजेड, लाईटाचे खंबे फकस्त कुत्र्याला पाय वर करायसाठी. मलाही लै दाटून आल्यासारखं वाट्लाल्त अन का कुणास ठाव पण आज कॅप्टन खड्ड्यानं जास्तीच डुचमुळलालती. रस्त्यानं जाताळा निस्ता मारत्या पायंडलीचा अन घासत्या टायरीचा मसन्या आवाज युलालता. कुणीच काई बोलना गेल्त. वादळापूर्वीची शांतता असलीच राह्तीय जून. मायच्यान मला लै म्हणजे लै भिऊ वाट्लालतं… जर जाता जाता शिल्यानं थांबून निस्त मागे वळून जरी बघितलं असतं का प्यान्ट वल्ली होती आपली. किशात वस्तरा होता…पाठीला नांचाकु व्हता …आत्ताच घरी, रात्रीचं ताक पिवणी पिवणी म्हणलं तरी २ ग्लास पीलते तरी मज मला आता गळा कोरडा कोरडा लागलालता.

पूल जसं जवळ आला तसं पेटल्यासारखा पायंडल मारीत शिल्या पुडी गेला अन झटदिश्या त्याची यम टी बी वळवून मज्या कॅप्टनसमोर थांबिवली. मला अंदाज होतांच पिच्चरमधी बुलेट रहातीय सायकलीनं तसलं कुठे जमाय गेलंय मी ब्रेक दाबला अन हळू हळू सायकलवरून उतरलो. शिल्या रागानं माझ्याकडे आला अन डायरेक कॉलरला हाथ घातला. “कॉलर” मला आज कळलं आपल्याकडे कॉलरला इतका डिमांड का दिला जातोय …बस. खाली दाटूलालेला फोर्स उफाळून डोक्यात गेला अन मी आरडलो “ कॉलर सोडून बोलायचं काय ” मलाच नं विचारता आलेल्या त्या जोरदार आवाजाने शिल्या अन तेचे ते आंडवे, रंजीत सुधीर सकपकले. शिल्याची कॉलरवरची पकड नकर हलकी झालेली मला जाणीवली . “नाही सोडलं तर काय करशीन” शील्या गुरकावला.
आत्तापरेंत काही नं बोलता, अंगाला जरा बी नं शिवता पोळलालेला त्याचा राग, त्याचं वट्ट आता माझा कॉलर पकडून पिसाळून बोलताना देखील निवलाल्यासारखं वाट्लालतं.
मी एक्दम थंडयानं परत एकदा बोललो ” हाथ काढायचा अन मग बोलायचं”
सगळं तसंच… मग म्हणलं “मारायचं असल तर मारायचं.उगूच शर्टचा खराबा नाही पायजेल”

मजी बॉडी आता कमी हालतीय, आवाजातली कापाकापी छू मंतर झालीय हे मला जाणवूलालतं. मी नकर वाकून खुबा म्हागी पुढी करीत हळूच माझी कॉलर मोकळी केली. थोडं सुटल्यासारखं वाटलं. इतका वेळ पिच्चरमधल्ले गुंडे थोबाड झाकतेत का तसं झाकल्यावनी दिसलालेले तीघान्चे चेहरे आता स्पष्ट दिसूलालते. भुरटेच वाट्लालते. घेरून उभारलते म्हणजे मला तसं वाट्लालतं. कुणीच काई बोलना गेल्त अन हान्नाइ गेल्त. मग मी कॅप्टनला स्टॅन्ड लावलं. अन बसलो कॅरीयरवर. म्हणलं सापनाथ म्हणलं तरी चावणार अन नागनाथ म्हणलं तरी चावणार उगूच भ्या कशाला. हाणायचंच असलं तर हानील बोलायचं तर बोलील. फुल्ल कॉन्फिडन्ट वाढला होता आता मी काढायचं म्हणलं तर वस्तरा काडू शकलो असतो नांचाकु काढू शकलो असतो पण तेचि गरजच वाटना गेल्ती. आता खर्यान समजलं होतं ऐसे खिलोने बाजार में भोत मिलते है आपण असली मर्द आहो. पण गुनानंच बसलो तिघांस एक हे गणित विसरलो नव्हतो अन तसइ उगूच काडी करून समोरच्याला हिरो कशाला करा. आपण आपल्या नजरेत आहो नं आता हिरो बस्स झालं. मी आळीपाळीने शिल्याकडे बघत होतो त्याच्या दोस्तायकडं बघत होतो मधेच एकाकडे बघून विचारलं
“तू मुक्कावारच्या हेम्याचा भाऊ का रे” त्यान नाही म्हणून मुंडी हलवली. मी मग उगच खारीक खोबरं आहे का असं दुसऱ्याला विचारलं त्याने तोटा अन चुना दिला.

असं टांगळ मंगळ चाल्ल एक दोन मिंट. मग काही मिंट काहीच नाही … भयाण शांतता. अंदाज आल्ता कि शिल्याला निस्त मला मारून घाईघाईनं पिच्चर संपवायचा नव्हता. पत्थरफोड प्रेमी वाट्लालता. सुधीर रणजित ठसन दिऊ दीवू कटाळले होते. एकंच टाइपमध्ये सारखंच बघणं पिच्चरमधल्या लोकांना जमतंय तेवढी प्र्याक्टीस हेनला कुठं. मी बघलालतो … शिल्या अन माझ्यात एकट्या एकट्यात फाईट लावली तर मी काही एका बुक्क्यात मेल नसतो. टक्कर दिवून मग हरलो असतो. बाकी दोन साईड गुंडे मोठे होते मझ्यापरिस पण उगं सुपारीच्या बोलीवर सोबत म्हणून आल्यासारखे वाट्लालते. कुणीच काई बोलना गेल्त. मग मी उगं बसल्या बसल्या शिल्याकड बघायला चालू केलं. दुसरं काय करणार होतो.
“तिचं तुझं काय हाय का” शिल्या बोल्ला.
“माझं नाही तिचं तिला इचार” मी.

पुन्हा शांतता. शिलूच्या सायकलवर बदाममधी A लिव्हलतं. त्याच्या उजव्या हातावर सेम A बदामात गोंदविलतं. सायकलवर ब्याग लटकिवली होती मी नीट बगटीली तेच्यावर कुठं काई A दिसाय नाही. खरखरा आशीक वाट्लालता. शिल्याच्या दोस्तायला मी उगच काही बाही बोल्लालतो, ‘मी कारभाऱ्याचा जिगरी आहे चौकातल्या उत्तम राठोडला मी ओळखतोय, सुजय मुंडकर काकाच्या दवाखान्याय कंपौंडर होता’ असल्या माहित्या हटकून त्यांच्या कानावर घातल्या. ‘धार’ बनायचा माझा पैलाच एक्सपेरिएंस व्हता पर इकडच्या तिकडच्या धारकर्याच्या ष्टोर्या काय कमी ऐकील नव्हत्या मीं. एवढ्या वेळात एक पक्कं झाल्त आता हे दोघ काही मला हाथ लावल नसते पण शिल्या आशीक व्हता त्याचा काय भरोसा धरा.

एकाएकी शिल्या उठला सरसर समोर जाऊन दोन्ही हाथ आकाशाकडे वर करत गुरासारखा आरडला “आमरी आमरी”.मी एक्दम चरकलो त्याच्या दोस्तायकडं पाहिलं बहुदा हा प्रकार तेंच्या सवयीचा दिसूलालता, तोंडावरची माशीय उडाय नाही दोघांच्या. शिलू माझ्याकडे वळला, डोळ्यात आता गंगा यमुना दिसूलालत्या. मला बगूनच कसतर झालं. त्यानं गळ्यातल्या शिवलिंगाची चुम्मी घेतली अन माझ्या समोर लावलेल्या त्याच्या यम टी बीच्या कॅरीरवर बसला. आता मला कळालतं ९९.९ % लफड्यात जे होतंय तेच होणाराय ” नो वस्तरा नो नांचाकु नो फाईट”. तरी मला थोडं टेन्शन होतंच सच्या आशीकचा काय भरोसा. शिल्यानं बसल्या जागेवरून पाठीवर झोपत हॅन्डलला अडकवलेली A लिव्हलेलं नसलेली ब्याग काढली पुन्हा सरळ झाला. ब्यागेची चैन खोलता खोलता आपली प्यार कि दास्तान भी बोलू लागला. त्याच्या ब्यागीत सालारजंग मुझीयम होतं… आमरीनं वर्गात कधी फाडून फेकून दिलेले कागद, तिच्या सायकलींचे वॉल, चोरलेले खोडरबर अन तिने कुणालातरी भरून दिलेल्या ऑटोग्राफ बुकचे फाडलेले पानं, तिचा शाळेतला जुना रंग उडालेला ब्लॅक अँड व्हाईट पासपोर्ट फोटो अजून बरंच काही बाही. असल्या ठिगळांनी विणलेली, आमरीने कवाच धुडकावून लावलेल्या आपल्या ‘विफळ प्रेमाची वाकळ’ शिलू मला मोठ्या कळकळीनं दाखवीत होता उफ्फ ये मुहोब्बत.

त्याच्या दोस्तायला त्याच्या या दास्तानीत रसंच दिसत नव्हता. पण आपली पैली बार होती माझ्यासाठी नवं होतं म्हणून मी कान दिऊन ऐकूलालतों. ते दोघं शेवटी कटाळून सुपारी खायला म्हणून कटले. शिलूचं चालू होतं.

मला ‘तो’ आता सारखं सारखंच भावा भावा करुलालता. खूप वेळ बसलो त्याचं ऐकीत. एखाद बारीला श्टाईल म्हणून ठीकाय पण इतकं वाडोळ कॅरेरवर बसल्यानं ढोपराला मुंग्या आल्यावानी हुलालतं.

मग उठलो. कॅप्टनला स्टँडवरून काढलं दोन्ही हाथ हँडलवर धरून बोलत बोलत पुन्हा माज्या घराकडे निघालो. विषय आमरीचाच होता. हा दुश्मन दुश्मन शिल्याला आता दोस्तो से प्यारा झाल्ता. दुरून आता आमच्या घरावरली ऍडव्होकेट प पु देशपांडे घोडचापुलीकर लिहलेली पाटी दिसलालति. आम्ही मग तिथं थांबलो बोलत थोडावेळ. तो पुन्हा एकदा त्याची यमटीबी स्टॅन्डला लावून दोन्ही हाथ वर करून आकाशाकडे वळला. मी चपापलो, म्हनला ** पुन्हा हंबलायचा गल्लीत माझं नाव खराब पण तेचा दिमाग जाग्यावर व्हता सायलेंटमधीच वरच्याशी बोल्ला वापस फिरला यम टी बीचं स्टॅन्ड काढलं अन माहित नाही काय झाल्त पन तो बोल्ला

“भावा तूच कर तिच्याबरा लग्न .. जातभाई हाव नं तुमच्यात जमल. आता कोण मधी आलं तर भाऊ हाय बघून घ्यायला” मला काही समजलंच नाही पन मी हसलो त्याने फिरून यमटीबीवर ढंiग टाकली. जाताना तेचा फक्त आवाज आला माझं पैलं अन आखरी दोस्त तुझंपर कुरबाण. शिल्याची एम टी बी आता दिसना गेल्ती. मी गेट उघडलं. कॅप्टन नीट जागेवर उभी केली. कोनाड्यात हाथ घालून चावी चाचपडली तिने मग गेट लॉक केलं. सवयीनं कुलूप ओढलं खिडकीत हाथ घालून आवाज नं होऊ देता माझ्या रूमची कडी काढली. शर्टाचे बटनं काढता काढता रूमचा दरवजा उघडला आणि मधी येताना एक्या हाताने लाईट लावली. अजूनबी ब्रूसली माझ्याचकडे माझ्याचकड बघूलालता. त्याचा ते टेंगशनवालं तोंड बघून मज मलाच खुदकन्या हासू आलं. आता पाठीत खुपसलेल्या नांचाकु दर्द कर्लालता म्हणून शर्टाबर्बर तेलाहि काडून हिबाळला अन बाजवर बसून इचार करू लागलो इचिमाय ठरवुन गेलतो मेलतर बेहत्तर पन आमरीला मानलेली बहीण करणार नाही म्हणून अन आता खुद्द तिचा जातभाऊ झालतो.

लेखक – श्री. प्रसाद कुमठेकर 

सदर कथा ‘मित्रांगण’ या त्रैमासिकाच्या ऑगस्ट ते नोव्हेंबर या अंकात आणि खास पुरुषांसाठीच्या  ‘मिशी’ या ब्लॉगवर वर पूर्वप्रकाशित

 About प्रसाद कुमठेकर 9 Articles
परिचय पत्र १४ वर्षांपासून टीव्ही, रेडिओ,जाहिरात, चित्रपट क्षेत्रात कार्यरत. Times of India Group(Radio Mirchi),Viacom 18(MTV- Nickelodeon), Sony Pictures Networks India,TV Today (Oye१०४.८ fm), Zee TV इत्यादीसारख्या नामांकित कंपन्यांमधून दिग्दर्शक,निर्माता,लेखक म्हणून काम. “बगळा” :- कादंबरी सप्टेंबर २०१६ मध्ये प्रकाशीत ज्याला साहित्य क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुकाची थाप तसेच • आपटे वाचन मंदिर ‘वि. मा. शेळके (गुरुजी) उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार • कविवर्य नारायण सुर्वे राज्यस्तरीय साहित्य उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार • महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा गुहागर कै प्रमिला आरेकर उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार “बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या” कादंबरी डिसेंबर २०१७ मध्ये प्रकाशीत ज्याला साहित्य क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुकाची थाप लोकसत्ता,महाराष्ट्र टाइम्स यांसारख्या अग्रगण्य वर्तमानपात्रातून विविध विषयावर लेख आणि पोर्टल, नियतकालिकांतून कथा प्रकाशित e-mail Id: prasadkumthekar1@gmail.com

1 Comment on पैलं …जे आसन ते

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सोलापूर घोंगड्या

सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८४५ चौरस किलोमीटर आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या ...

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...

Loading…