नवीन लेखन...

पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर

 

डॉ. जयंत विष्णू नारळीकर त्यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. गणिताचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला. त्याचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणित तज्ञ होते. वाराणशी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागाचे ते प्रमुख होते. डॉ. जयंत नारळीकरांचं संस्कृतवरही प्रभुत्व आहे. तो वारसा त्यांना त्यांच्या आईकडून मिळाला. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. डॉ. नारळीकर एक जगद्विख्यात शास्त्रज्ञ तर आहेतच पण ते उत्तम साहित्यिकही आहेत. कारण खगोल शास्त्रात महान संशोधन करण्याबरोबरच त्यांनी मराठी-हिंदी साहित्यांत विज्ञान साहित्याची मोलाची भर टाकली आहे. डॉ. नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणशी येथे झाले. १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी प्राप्त केली. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रीज विद्यापीठात गेले. तेथे त्यांना ‘ बी.ए. एम.ए. ‘ ही पदवी मिळाली त्याचप्रमाणे ‘ पी.एचडी. ‘ देखील मिळाली. त्यांना रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल आणि इतर अनेक बक्षिसे मिळाली. त्यांनी सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ सर फ्रेड हॉईल यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एचडी. केली. सर फ्रेड हॉईल डॉ. नारळीकरांच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झाले. त्यामुळे १९६६ जेव्हा हॉईड यांनी केंब्रीज येथे `इन्स्टिटय़ूट ऑफ थिऑरॉटीकल ऍस्ट्रॉनॉमी’ नावाची जी स्वत:ची संस्था सुरू केली, त्यात डॉ. नारळीकरांचाही महत्त्वाचा वाटा होता.

डॉ. नारळीकरांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर १९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिराव राजवाडे यांच्याशी झाला. डॉ. मंगला नारळीकर यादेखील गणित तज्ञ आहेत. १९६६ ते १९७२पर्यंत ते या संस्थेशी निगडीत होते. सर हॉईल आणि डॉ. नारळीकर यांनी खगोल शास्त्रात एकत्र संशोधन केले.. गुरुत्वाकर्षणावर त्या दोघांनी मिळून संशोधन करून जो सिद्धांत मांडला, तो ` हॉईल-नारळीकर सिद्धांत ‘ या नावाने खगोलशास्त्रात प्रसिद्ध आहे. अर्ल्बर्ट आईन्स्टाईनच्या साक्षेपतेच्या सिद्धांताशी साधर्म्य साधणारा असा हा सिद्धांत आहे. हा सिद्धांत असे सांगतो की, वस्तूमधील कणाचे अंतर्गत वस्तुमान हे त्या वस्तूतील सर्व कणांच्या एकत्रित कार्याची परिणती असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवल्यानंतर भारतातील खगोल शास्त्रातील संशोधनाला आणि लोकप्रियतेला गती देण्यासाठी १९७२ साली ते भारतात परत आले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून पद स्वीकारले. कालांतराने १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्त झाली. त्यांच्या महान कार्याची दखल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली. त्यामुळे त्यांना अनेक मान-सन्मान प्राप्त झाले. १९६५ साली त्यांना पद्मभूषण तर २००४ साली पद्मविभूषणने सन्मानीत करण्यात आले. शिवाय डॉ. भटनागर स्मृती पारितोषिक, एम.पी. बिरला सन्मान आणि फ्रेंच ऍस्ट्रॉलॉजिकल सोसायटीचा पिक्स ज्यूल्स जेन्सनसारखे सन्मानही त्यांना प्राप्त झाले. लंडनच्या रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे ते सहाधिकारी आहेत, तर इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी आणि थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेस चे ते अधिछात्र आहेत. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीच्या इंदिरा गांधी पारितोषिकानेही त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे. वैज्ञानिक विषयांत साहित्यिक लिखाण करून विज्ञानाचा प्रसार करण्यासाठीही त्यांना १९९६ साली युनेस्कोने कलिंग पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला आहे.

डॉ. जयंत नारळीकर हे वैज्ञानिक तर आहेतच परंतु मराठी साहित्यात त्यांनी मोलाची भर टाकली आहे. त्याची जेव्हा पहिली ‘ प्रेषित ‘ नावाची कादंबरी प्रसिद्ध झाले तेव्हा ती वाचताना मला काही गोष्टीची माहिती करून घ्यायची होती तेव्हा माझा डॉ. जयंत नारळीकर यांच्याशी पत्रव्यवहार झाला होता त्यातील त्याच्या हस्ताक्षरातील दोन पत्रे आजही माझ्याकडे आहेत.

डॉक्टर जयंत नारळीकर यांनी अ कॉस्मिक ऍडव्हेन्चर , सेव्हन वंडर्स ऑफ कॉसमॉस , अंतराळाळतील भस्मासुर , गणित आणि विज्ञान युगयागांची जुगलबंदी , प्रेषित , व्हायरस , यक्षांची देणगी, अंतराळ आणि विज्ञान , आकाशाशी जडले नाते , अंतराळातील स्फोट , नभात हसरे तारे , विज्ञानाची गरुडझेप , वामन परत न आला , कृष्णमेघ ( अनुवाद ) विज्ञानगंगेची अवखळ वळणे , अभयारण्य , सृष्टीविज्ञान गाथा ची अनेक पुस्तके , टाईम मशीनची किमया अशी अनेक पुस्तके लिहून साहित्यात मोलाची भर टाकली आहे. डॉ. जयंत नारळीकर यांचे ‘ चार नगरांतले माझे विश्व ‘ हे आत्मचरित्रही प्रकाशित झालेले आहे.

आजही पुण्यातील ‘आयुका’ च्या माध्यमाने ते संशोधन कार्यात मग्न आहेत.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 426 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..