नवीन लेखन...

किल्ले पद्मगड

Padmagad Fort

मालवणच्या सागरात दिमाखाने उभा असलेला सिंधुदुर्ग हा सागरी दुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या दुर्गामधला अजोड दुर्ग आहे. मालवणचे भूषण ठरलेला आणि पर्यटकांसाठी पर्वणी ठरलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यामुळेच या जिल्ह्याचे नामकरण सिंधुदुर्ग असे करण्यात आले. मालवण मधून पर्यटकांसाठी होडय़ाची सोय उत्तम केलेली असल्यामुळे सिंधुदुर्गला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात.

सिंधुदुर्गाचे महत्त्वाचे भौगोलिक स्थान ओळखून शिवरायांनी याच्या संरक्षणासाठी मालवणच्या सागरतीरावर तीन दुर्गांची निर्मिती केली. ते म्हणजे पद्मगड, राजकोट, आणि सर्जेकोट हे होय.

सिंधुदुर्ग आणि पद्मगड समोरासमोर आहेत. किनार्‍यावरुन सिंधुदुर्गाकडे पाहील्यास डावीकडे पद्मगड तर उजव्या किनार्‍याच्या भूशीरावर राजकोट आहे. सर्जेकोट ४ कि.मी. अंतरावर आहे.

पद्मगडाला चालत जाता येते. त्यासाठी सागराला ओहोटी असावी लागते. भरती-ओहोटेचे वेळापत्रक पाहून आपण पद्मगडाकडे चालू लागावे.

पद्मगडाकडे जाताना किनार्‍यावर दांडगेश्वराचे मंदिर लागते. या मंदिराच्या समोर सिंधुदुर्गाकडे सागरात शिरलेली वाळूची पुळण दिसते. मागे त्सुनामी (सुनामी) आली होती त्यावेळी येथील मधल्या भागातील सर्व पुळणच वाहून गेली होती. त्यामुळे या भागात मोठय़ाप्रमाणात खोलगट भाग तयार झाला होता. तेव्हा ओहोटीच्या वेळी सुद्धा पुरुषभरापेक्षा जादा उंचीचे पाणी असायचे. त्यावेळी एखाद्या होडीनेय पद्मगडाकडे जावे लागायचे.

गेल्या काही वर्षामधे पुन्हा साठल्यामुळे ओहोटीच्या वेळी कमरे एवढय़ा पाण्यातून जाता येते. या नैसर्गिक अडचणीमुळे आणि पद्मगडाची माहिती नसल्यामुळे पर्यटक, इकडे फिरकत नाहीत.

मालवणच्या धक्क्यापासून पद्मगडापर्यंत येण्यासाठी साधारण अर्धा तास लागतो. रचिव दगडांनी पद्मगडाची तटबंदी उभारलेली आहे. याचा दाखला बरोबर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दरवाजासमोरच आहे. किल्ल्याच्या लहानशा दरवाजातून आत गेल्यावर वेताळ मंदिर आहे. मालवणच्या कोळी बांधवांचे श्रद्धास्थान असल्याने त्यांची नित्यनियमाने ये जा चालू असते त्यामुळे वेताळाची नियमित पुजाअर्चाही होत असते. त्यांनी तटावर अनेक भगवे झेंडेही उभे केलेले दिसतात. येथिल तटबंदीवरुन मालवणच्या किनार्‍याचे सुरेख दर्शन घडते. सिंधुदुर्गची प्रचंड तटबंदीही चांगलीच नजरेत भरते. किल्ल्यामधे एक कोरडी पडलेली विहीर आहे.

पद्मगडाच्या तटबंदी आणि येथिल झुडुपांमधे कावळ्याची मोठी वसाहत असल्याने कावळ्यांची मोठी फौज सतत कावकाव करीत आपला पिच्छा पुरवत असते.

पद्मगडाचा उपयोग शिवकाळामधे गलबतांच्या दुरुस्तीसाठी केला जायचा. त्यासाठी भरती ओहोटीच्या वेळा साधून या खडकाळ बेटावरील धक्क्यावर गलबते आणली जात असत. या गोदीत दुरुस्त झालेली अथवा नव्याने बांधलेली मध्यम आकाराची गलबते भरतीच्या वेळी बाहेर काढून खुल्या सागरात दाखल होत असत.

या शिवकालीन गोदीचे काहीसे अवशेष दिसतात. ते पाहून पुन्हा चालत दांडगेश्वराच्या मंदिराकडे निघावे. पुन्हा तसेच पुढे गेल्यावर मोरयाचा धोंडा लागतो. त्याच्या भोवती उभे केलेले भगवे झेंडे आपले लक्ष दूरुनच वेधून घेतात. या घौडय़ावर गणेश, चंद्र, सूर्य, शिवलिंग, नदी व पादुका आजही दिसतात. सिंधुदुर्गाची निर्मिती करण्यापूर्वी शिवरायांनी येथेच यथासांग पुजा केली होती.

शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर पाहून आणि पद्मगडाची भेटीच्या आठवणी घेवून पुन्हा मालवणच्या धक्क्याकडे चालू लागावे.

— प्रमोद मांडे
‘महान्यूज’ च्या सौजन्याने

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..