नवीन लेखन...

बंध ऑनलाईन मैत्रीचे

Online Friendship

तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलं आहे. प्रत्येक जण एकमेकांशी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप अशा कोणत्यातरी माध्यमातून संपर्कात आहे. मग एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता मागे राहील तर ती तरुणाई कसली ! तरुण पिढीची अनेक नवी नाती याच नव्या सोशल कट्टयांवर खुलतात. हल्लीची तरुणाई सध्या सोशल मीडियाच्या मदतीने नात्यांचं ‘नेटवर्किंग ’ करण्यात जास्त रमलेली दिसते. पण या तरुणांना नाती खरंच किती कळतात हा प्रश्नच आहे.

आजकालच्या तरुणाईचा कुटुंबीयांवर असतो तेवढाच विश्वास फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप फ्रेंड असणा-या मित्रावर किंवा मैत्रिणीवर असतो, तोही अगदी सहजासहजी बसलेला असतो. त्यांची बहुतेक नाती, मग ते मित्र-मैत्रिणीचं असेल किंवा प्रेमातलं, ही सोशल मीडिया पुरस्कृत असतात असं म्हणायला हरकत नाही. कारण प्रत्यक्ष भेटीला वेळ मिळत नसेल तरीही सोशल कट्टयावर फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या अ‍ॅप्लिकेशन्समुळे ही ऑनलाईन नाती घट्ट केली जातात. त्यांची खबरबात घेतली जाते.

नेहमीच न भेटणा-या मित्र-मैत्रिणींना प्रत्यक्ष भेटण्याचं वचन दिलं जातं. पण वेळेअभावी प्रत्येक वेळेला ‘पुन्हा कधीतरी भेटू’चं आश्वासन देऊन नवीन योजना आखल्या जातात. ओढ वाढत जाते. अशा प्रकारे अनेकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचता येतं. सगळ्यांशी कनेक्ट राहता येतं. सकाळी गुड मॉर्निगच्या आणि रात्रीच्या गुड नाईटच्या संदेशाशिवाय तरुणाईचा दिवस उजडतही नाही आणि मावळतही नाही.

फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप, व्हायबर इत्यादी हे सध्या ‘कनेक्ट’ राहण्यासाठीचे युवा पिढीचे आघाडीचे साथीदार. त्यांच्यामुळे मित्र-मैत्रिणींचा सतत संपर्कात राहता येतं, शिवाय ग्रुप असेल तर सर्व बित्तंबातम्या इतरांना पोहोचवता येतात. कॉलेजमधल्या प्रेमीयुगुलांसाठी तर हे एक वरदानच आहे.
पण आजच्या तरुण पिढीला सोशल मीडियाची ही चांगली बाजू किती चांगल्या प्रकारे वापरता येते? ऑनलाईन मैत्रीतले फायदे-तोटे हे सर्वच तरुण-तरुणींना कळतात असं नाही.

सोशल कट्टयामुळे नात्यांमधला गोडवा टिकवताही येतो हे कळणं कधीकधी कठीण व्हावं असेही प्रसंग पाहायला मिळतात. काल एका मैत्रिणीचा फोन आला. ती रडक्या स्वरातच म्हणाली, ‘कामाच्या गडबडीमुळे दिवसभर ऑनलाईन नाही राहता आलं.  याचा वेगळाच अर्थ माझ्या मित्राने काढला, त्याला साधी चौकशीही करावीशी वाटली नाही. त्याने सरळ फोन करून सांगितलं की आता तुझा नि माझा काहीच संबंध नाही. तुला माझ्यासाठी वेळ देता येत नाही तर नात्यामध्ये राहायचं तरी कशाला?’

आजकालचं जग जसं प्रत्येक गोष्टीत ऑनलाईन होत जातंय, तसंच नातं टिकवण्यासाठीही ऑनलाईन व्हावं लागेल की काय हा प्रश्न पडतो? हे असं का घडतं तर, प्रत्यक्ष माणसापेक्षा सोशल मीडियावर किंवा तांत्रिक माध्यमांवर जास्त विश्वास ठेवल्यामुळेच. कोणाशीही संपर्क ठेवायचा तर तरुणांची पहिली पसंती असते ती या सोशल कट्टयालाच. मात्र त्यावर अति विसंबून राहू नये हे कळण्याची समज या वयात नसते.

तंत्रज्ञानाचे फायदे असतात तसे तोटेही असतात. यातूनच निर्माण होतात समज-गैरसमज. आता पाहा ना..व्हॉट्सअ‍ॅपचंच उदाहरण घेऊ. तिथे तर दर आठवडयाला काही ना काही बदल घडत असतात. नियम बदलत असतात. त्यामुळे आपले मेसेजेस कोण वाचतंय, कोणापर्यंत पोहोचलेत, अशी सर्व माहिती मिळत असते.

सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज रिडिंगची निळ्या रंगाची टिक येते याचा अर्थ असा की आपण मेसेज वाचला हे समोरच्याला कळतं. यामुळे झालंय काय तर, आपला संदेश समोरच्यापर्यंत पोहोचलाय हे तर कळतंच; पण तिथून त्वरित कोणताच रिप्लाय नाही आला की समोरच्याच्या मनात आपल्याविषयी आदरच नाही, प्रेमच नाही असा निष्कर्ष काढून आपण मोकळे होतो. यातून अनेक वादविवाद, भांडणे होतात आणि परिणामी नातं कायमचं तुटतं. समोरच्याला समजून घेणं, प्रत्येकाला स्वत:ची स्पेस देणं हेही मैत्रीइतकंच महत्त्वाचं असतं हे तरुण वयाच्या जोशात कळत नाही.

मैत्रीचं नातं कसं टिकवता येईल? त्यासाठी काय करावं? काय नेमकं करू नये? यासंबंधीचेही अनेक संदेश फिरत असतात, परंतु या संदेशांचा वापर फक्त वाचण्यापुरता आणि संदेश दुसरीकडे (फॉरवर्ड)करण्यापलीकडे केलाच जात नाही. नेहमीच्या आयुष्यातही त्या संदेशाप्रमाणे वागता आलं तर नातं डिसकनेक्ट होणारच नाही ना! अणि नातं कनेक्टेड राहावं यासाठी सतत ऑनलाईन राहण्याचीही गरज भासणार नाही.

बी. एससी.च्या शेवटच्या वर्षात अभ्यास करणारा अतुल म्हणतो की, ‘मैत्री काय किंवा कोणतंही नातं काय? एकमेकांविषयी विश्वास असणं महत्त्वाचं असतं. पूर्वीच्या काळी तर साधा फोनही नव्हता. तेव्हा मैत्री टिकत नव्हती का? त्यावेळेस कुठे कोण सारखे ऑनलाईन कनेक्टेड असायचे? मनापासून एखाद्याची आठवण येऊन भेटणं हेच महत्त्वाचं होतं.’

अतुलचं हे म्हणणं १०० टक्के खरं आहे. बी. सी. ए. च्या शेवटच्या वर्षात शिकत असलेली पूजा म्हणते, ‘एकमेकांविषयी खडान् खडा माहिती ठेवायच्या नादात आपण समोरच्याचं स्वत:चं असं काहीतरी वेगळं आयुष्य असू शकेल हे विसरुन जातो. तिच्या किंवा त्याच्याशी सतत कनेक्ट राहताना त्यांचंही काहीतरी स्वतंत्र जगणं असतं हे विसरून कसं चालेल?’ आजकालच्या तरुण-तरुणींसाठी नात्यांचा चेहरा हा सोशल कट्टयापुरताच मर्यादित असतो. सतत कनेक्टेड राहण्याच्या नादात तरुण पिढीला नात्यांचा खरा चेहरा कळणं शक्य होत नाही.

ग्रुपमधल्या एकीने फेसबुकवर तिच्या एका लहानपणीच्या मित्राचा फोटो लाईक केला म्हणून तिच्या प्रियकराने तिला तिचं फेसबुक प्रोफाईलच बंद करायला भाग पाडलं. आता याच्यातून काय निष्पन्न झालं? गमतीची गोष्ट ही की त्यांची ओळखही याच फेसबुकमुळे झालेली. नात्यांमध्ये विश्वास असला की ते जास्त काळ टिकतं, त्यासाठी प्रोफाईल बंद करायची गरज नसते.

व्हॉट्सअ‍ॅपचा लास्ट सिन स्टेट्स बघून प्रेम ठरवणारी आजची तरुण पिढी किती तकलादू नातं बनवण्याचा प्रयत्न करतेय! एकमेकांशी कनेक्ट राहायच्या नादात समोरच्यालाही काहीतरी स्वतंत्र अस्तित्व असतं, जीवन असतं हे पार विसरून जातो. कुठे आहेस? काय करतेस/करतोस? कोणासोबत आहेस? असे फालतू, खासगीपणावर आक्रमण करणारे प्रश्न सर्रास विचारले जातात. तेव्हा विचार येतो हे नातं म्हणजे प्रेमाचे बंध आहेत की बंधनं? अविश्वासाच्या फे-यात एकमेकांना जीव घुसमटून जाईपर्यंत गुंतवायचं की विश्वासानं केलेल्या प्रेमाचा लगाम सैल सोडायचा हे आपलं आपण ठरवायचं. पूर्वीच्या काळी कितीही लांब असले तरी नात्यांमध्ये रुसवे-फुगवे असायचे; पण अविश्वास नसायचा.

‘रोज आठवण न यावी असे होत नाही..रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही. मी तुला विसरणार नाही याला विश्वास म्हणतात.. आणि तुला याची खात्री आहे याला मैत्री म्हणतात.’, हा एक सुंदर संदेश व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या प्रचंड फिरतोय. फक्त वाचण्यापुरता आणि पुढे पाठवण्यापुरता (फॉरवर्ड) याचा वापर करण्यापेक्षा ते समजून घेतलं पाहिजे. तरच आयुष्याची खरी गंमत कळेल. तरुणाईसाठी आजकाल नाती या सोशल नेटवर्किंग साईटवरच जास्त खुलतात आणि अतिरेक झाला की समोरच्याला ब्लॉक करून ती संपतातही.

लास्ट सीन काय किंवा रिडिंग टिक काय, या गोष्टी एकमेकांविषयी असलेलं प्रेम, आपुलकी सिद्ध करू शकत नाही. संभाषण होणं गरजेचं असतं. ते भेटून जास्त उत्तम प्रकारे होतं. सततच्या आभासी संपर्कामुळे समोरच्याविषयीची ओढ कमी होते. म्हणूनच एक दिवस सोशल नेटवर्किंग साईटसाठी उपवास धारण करा.

आवडणा-या नव्या-जुन्या मित्र-मैत्रिणींची आपसुकच आठवण येईल. या ऑफलाईन स्टेटसमुळे संपर्क काही काळ तुटेल; पण मनातून निर्माण झालेली भावना मैत्रीचं नातं घट्ट करेल. मैत्रीच्या नात्यातली आपुलकी आणि जिव्हाळ्याचा खरा अर्थ तेव्हा कळेल. ‘शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण.. सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण.. काढशील आठवण जेव्हा माझी अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.’ ही ओळ नात्यांमधील जिव्हाळ्याचं ख-या अर्थानं वर्णन करते.

— स्नेहा कोलते

Avatar
About स्नेहा कोलते 7 Articles
स्नेहा कोलते या दैनिक प्रहारमध्ये पत्रकार आहेत त्यांना विविध विषयांवर लिहायला आवडते. त्यातही कला, साहित्य आदी विषयांवर लिहीणे पसंत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..