नवीन लेखन...

निरुपण

आपल्याला आयुष्यभर विश्वात, आसमंतात, अवकाशात असलेल्या सजीव..निर्जीव प्राणीमात्र आणि अणु _रेणू यांच्या मुलभूत घटकांबद्दल सारं सारं काही जाणून घेण्याची जिज्ञासा असते..नव्हे या साऱ्या ज्ञानाचा ठेवा जास्तीत जास्त आणि सर्वात पहिले आपल्याला मिळण्यासाठी प्रत्येकाची चढा ओढ चालू असते..माणसाची हि जिज्ञासा माणसाच्या युगानुयुगे चालेलेल्या प्रवासात मैलाचे दगड होऊन माणसाचे जीवन अधिक सुखकर होण्यासाठी दिशादर्शक बनून अजरामर झाल्याचे आपल्याला इतिहासातील प्रत्येक पानावरील नोंदीत आढळून येते. या साऱ्या प्रवासात मानवजातीने युगानुयुगे ओलांडलेले तथाकथित प्रगतीचे टप्पे ऐहिक सुखाचे भोग सुखकर जरूर करून गेलेत..पण आज मागे वळून पाहताना प्रत्येक मिळविलेल्या ऐहिक सुखाच्या बदल्यात मोजलेली अगिणीत किंमत तर क्लेशदायक आहेच पण खरं दु:ख याचं कि माणसाला आपण काय काय गमावलं याची ना खबर आहे ना खंत..माणसाच्या सामाजिक परिवर्तनाची झालेली स्थिन्त्यतरे यांचा अभ्यास व विश्लेषण करू पाहता जे जे काही कमावले त्याच्या मोबदल्यात काय काय हरवले याचा तौलनिक लेखाजोखा नजरेसमोर आल्यावर मन विषण्ण होऊन जाते ..आपण सारेच माणसाच्या प्रगतीच्या संदर्भ चुकलेल्या प्रमेयांना कवटाळून हिशोबाच्या आकडेमोडीत संवेदनाना पार हद्दपार करून माणूस म्हणून जन्मलेल्या जीवाला एका यंत्राच्या साच्यात गुरफटून जगत आहोत.आपण जगणाऱ्या आयुष्याला प्रमाण मानून उलटणाऱ्या दिवसावर आपली कशी मोहोर उमटली या मिथ्या जल्लोषात झोपी जातो नि पुन्हा उद्याच्या दिवसाला आपली कमीज शेजाऱ्यापेक्षा कशी उजळ दिसावी म्हणून युद्धाचे सारे निती_नियम धाब्यावर बसवून तिन्हीसांजेनंतर कमरेखाली वार करावयाचा नेमका मोका साधून आपल्यातल्या माणुसकीची एक एक वस्त्रे उतरवून नागडे होत असतो..
माणसाच्या माणूस म्हणून ओळख असणाऱ्या पंचेंद्रियांपासून आपण स्वत:च स्वत:ला पारखे करून घेतले आहे..आणि त्याउपर माणूस म्हणून जन्मतःच लाभलेल्या कवचकुंडलांची…भावना..संवेदना..विचार..आदर..कृपाळूपणा..क्षमाशीलता..कनवाळूपणा..दयाशीलता..सहचारीता..त्याग..सबुरी.. कृतज्ञता यांची तर आपण माती केली आहे..आपल्याला नैसर्गिक न्यायाने ज्या ज्या गोष्टींची सहजतेने अनुभूती यावयास हवी ती आपणास आता येत नाही..अवतीभवती पहुडलेल्या निसर्गातील रोज नव्याने उलगडणाऱ्या अलगुज अद्भुतरम्य घटनांना मग ती झुंजमुंज असो कि ..रात्रीच्या कळ्यांचे फुलात झालेले रुपांतर..चिमण्यांची चिवचिव..कड्याकपारीतून दिडदा दिडदा नाचणारे अवखळ पाणी..लतावेलींच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या वाऱ्याची सुरावट..मध्यान्हीच्या सूर्याच्या पायथ्यांशी आपल्याच लांबत चाललेल्या सावल्यांचे मिटणे..नि पुन्हा त्याच सूर्याला वाकुल्या दाखवत सावल्यांचे लांबणे ..नि लांबलेल्या सावल्यांच्या पतंगाचा दोर कापताना सांजावलेल्या सूर्याचे समाधिस्थ होणे..मग कातरवेळी आपल्या उघड्या डोळ्यासमोर फेर धरून नाचणाऱ्या कधी जाणूनबुजून तर कधी अजाणतेपणी आपणच केलेल्या वारांची भुते..अगतिक स्पर्शाच्या ओटीत बहिरेपणा टाकताना आपल्यातल्या माणसाची आपण केलेली निघृण हत्या ..ओठातून अलबत निसटलेल्या शीळेच्या इतिहासजमा झालेल्या शुष्क नोंदी..उचंबळून येताना गहिवरलेल्या काळजाचा पापण्यातून पाझरलेला सांगावा..गाण्याच्या शब्दाला कुर्निसात करता करता कुठल्यातरी समेच्या समागमात न्हाहता रोमांच…पहिल्या चुंबनातील देवाणघेवाणीच्या निशब्द पर्वाची आवर्तनामागून उठणारी आवर्तने..भिजल्या मिठीच्या छातीवर रिते होणे..जीवाभावाचं कुणीतरी असण्याचा टेंभा मिरविताना प्रत्यक्ष इंद्रालाही वाकुल्या दाखविणे..पावसाच्या पहिल्या सरीत भिजणाऱ्या कवितांची दरवर्षी नव्याने निघणाऱ्या सुधारीत आवृत्ती..उष्टावलेल्या चिंचा गाभुळताना निरागस मैत्रीचे मंतरलेले दिवस..रुसव्या फुगव्यांना दवबिंदूचे आयुष्य बहाल करताना साजरे केलेले राजेपण..मुद्दामहून डाव हारताना जिंकलेल्या नात्याची मांदियाळी..स्वत:च्या हृदयामधील परमेश्वरी अंशाच्या अस्तित्वावर गाढा विश्वास ठेऊन प्रस्तावनेच्या वा समीक्षकाच्या चौकटीच्या सीमा रेषा झुगारून प्रवाहित असणारी आपल्या आयुष्याची प्रकाशित झाली नसली तरी असणारी Best Seller कादंबरी ..पुन्हा पुन्हा ढासळत असताना पुन्हा पुन्हा बांधीत गेलेले वाळूतील किल्ले..भरती_ ओहोटीच्या लाटांवर स्वार होऊन हेलकावणाऱ्या गलबताच्या शिडातील वाऱ्याच्या दिशा बदलणारा पाठीवरला हात..शाळेच्या पाटीवर रेघोट्यात बंदिस्त केलेला पिकासो…बंद मुठीतील नेमक्या मधल्या बोटाचा शोध लागल्यानंतर आपला झालेला कोलंबस ..म्हातारीच्या पाठीवर बसून गगन भराऱ्या मारण्यासाठी केलेला जीवाचा आटापिटा..गोणपाटाची खोळीला डोईवर घेऊन उभ्या पावसात हुंदडलेला शाळेचा रस्ता…कंदिलाच्या वातीवर बापाचा नि काचेवर आईचा फिरलेला सुरकुतलेला हात..गुरुजींनी कान पिळताना दुसऱ्या हाताने बेंबीचा घेतलेला पिळा..सणासुदीलाच वा पाहुण्यांच्या पंक्तीनंतर ताटाच्या सजावटीस येणारा कोरभर भात..सारवलेल्या अंगणात चंद्राच्या candle light मध्ये साजऱ्या झालेल्या अंगती_पंगती..दूर गावी असणाऱ्या लेकराच्या हाताचा स्पर्श असणाऱ्या पत्राला डोळे भरून पहाण्यासाठी उजाडल्यापासून पोष्ट्मनासाठी डोळ्यातील आतुर_पायघड्या..विश्वासाने माथा टेकण्यासाठी खांदा असल्याने चारचौघांत न अडविलेले हुंदके..नि कोणत्याही पांढरपेशी लाजेपोटी त्या अश्रूंच्या न अडविलेल्या वाटा ..शिमग्याच्या सणाला कान फाटेपर्यंत उलट्या हातानी मारलेल्या बोंबा…शहाणपणा न आल्यामुळे त्या वयात भाबडेपणाने केलेल्या अगचोर हट्टाच्या आस्मानी मागण्या…अबोला सोडण्यासाठी तह करताना आधी कुणी नाव घ्यावयाचे त्यासाठी मध्यस्थांच्या झालेल्या शिखर बैठकी ..मांडवातल्या लग्नात रंगलेले मानपानाचे जुगाड नि कसेही करून कार्य सिद्धीस न्यायच्या इऱ्याने पेटलेल्या सोयऱ्यांच्या धावपळीकडे कावरलेल्या नजरेने पाहत असलेले भेदरलेले नवरा_नवरी…कुणाच्या सुनेला लागलेल्या महिन्याच्या नेमक्या खबरीपासून बारश्यापर्यंत, झेंगाटातल्या भेटीतील तपशिलाच्या बारकाव्याच्या , नि आता कुठल्या म्हातारा_म्हातारीचं खरं नाही म्हणून समद्या भावकीला ताटकळत ठेवणारे पुलंचे गावोगावी भेटणारे नारायण…मातकटल्या जांभळाना न धुताच गिळतानाचे रंग दाखविताना फाकविलेल्या जिभा..कुठल्याही अग्रीम निवेदनाची वाट न पाहता सुख_दुखाच्या कार्यक्रमास हातचे सोडून धावत आलेली भावकी नि भावकीबाहेरील देखील मंडळी …आठवणीना पुन्हा पुन्हा लुचताना रंगलेल्या शिळोप्याच्या गप्पा…मध्यरात्रीपर्यंत रंगलेल्या पत्त्यांच्या डावास तोंडी लावलेले मुरब्बी राजकारण्यांचे फसलेले आडाखे..येणाऱ्या पाहुण्याच्या सरबराईत उठून दिसावे म्हणून छोट्यांपासून मोठ्यापर्यंत लागलेली अहमिका…उगाळून उगाळून पारायणे झालेली पण पत्त्यावर न पोहोचलेली प्रेमपत्रे..आषाढाच्या पहिल्या दिवशी कालिदासाच्या नि श्रावणभर न आवतन देता आलेल्या बालकवींच्या दारावरल्या हाका..ग्रीष्माच्या उन्हातही तांबूस बहरलेल्या गुलमोहराच्या माथ्यावर विसावलेले निरभ्र आभाळ…माळावरल्या गवतफुलाशी केलेले हितगुज…आगीनगाडीच्या डब्यांची श्वास रोखून केलेली मोजदाद…बोगद्यातून बाहेर पडताना मिटलेले डोळे उघडून घेतलेला मोकळा श्वास..माहेरच्या खुशालीची कावळ्याकडे केलेली विचारपूस..काळ्या _ पांढऱ्या बोलपटातून आयुष्यातील उन्हे आणि सावल्यांचे उलगडणारे इंद्रधनुष्य ..मोठा राबता असणाऱ्या कुटुंबातील एकमेकाचा सहवास आणि त्यापोटी लागलेला लळा..सारा गावच गरीब..नि गरिबीपोटी एकमेकाच्या देवाण_ घेवाणीतून साकारलेले ऋणानुबंध..प्रभातच्या शेजारीतून प्रतिबिंबित झालेला सामाजिक सलोखा..ययाती..मृत्युंजय या आख्यायिकांच्या पारायणात वाट्यास आलेली मोजकी पाने..काही काही गाणी जणू आपल्याला डोळ्यासमोर ठेऊनच लिहीली याचा वेळोवेळी झालेला आत्मसाक्षात्कार..नि थोर गायकांना आपल्या आवाजात गाण्यासाठी आपण काढलेले फर्मान..चांदण्याला उशाशी घेऊन रातीच्या अंधाराला पांघरून जागविलेल्या कुणा कुणाच्या राती..चिऊताईच्या घरट्याला लावलेल्या मेणाच्या दारावर दर पावसाळ्यात दिलेल्या भेटी..गावच्या जत्रेत विकत घ्यावयाच्या राहून गेलेल्या वस्तू..नि आज विकत घ्यायची ऐपत असताना बोट सोडून गेलेले ते वय..सारवलेल्या मातीच्या भिंती नि तुळवीवर खडूने लिहलेले “ अतिथी देवो भव: ”….. मध्यरात्रीचे दोन प्रहर वगळता सताड उघडे असणारे घराचे दरवाजे..आयुष्यभर छाती फुटेपर्यंत धावाधाव केल्यानंतर शर्यंत जिंकल्याचा आभास गोड मानून हाती आलेल्या बक्षिसाच्या कपात डोकावून पाहताना,गमावलेल्या कातरवेळांच्या हुंदक्यांचे हताश उसासे कानी पडतात.. सरलेल्या आयुष्यात जगलेले दिवस मोजू पाहताना हाता पायाची बोटे वाकुल्या दाखवू लागतात..सारीपाट जरी आपला होता..सोंगट्या जरी आपल्या होत्या नि डाव टाकणारे हातही आपलेच होते, तरीसुद्धा पडलेले दान आपल्या बाजूचे नव्हते हे जेव्हा कळू लागते ..उमजू लागते तेव्हा आपणच आपल्या नाळेचे कापलेले दोर तहात हरलेल्या योध्याप्रमाणे खाली मान घालून उभे असतात..आपण शेवटचे कधी रडलो हे आठवणीच्या आठवांच्या क्षितिजापार गेले आहे..
……………………त्या सगळ्या जादुगिरीला पाठमोरे होऊन आपल्या सर्वांची कुठला अश्वमेध यज्ञ जिंकण्यासाठी चढाओढ लागली आहे याची आपल्याला कुठलीही खबर नाही.आपण या सृष्टीतील निसर्गाचा हिस्सा असून निसर्गाचे सारे नियम आपल्याला लागू असून त्याला कुणालाही अपवाद होता येत नाही हेच आपण उमजून घेत नाही..इथल्या प्रत्येक जीवाचा इथल्या येण्याचा एक विशिष्ठ हेतू आहे नि त्या सगळ्या मांडणीस आपण स्वीकारून आपलं जगणं साजरं होण्यासाठी सज्ज असलं पाहिजे…तुकारामांनी म्हटल्यानुसार शेवटचा दिस गोड व्हावा या एकाच मागणीसाठी नि तो कौल मिळण्यासाठी वेळोवेळी आपण छोट्या मोठ्या लढाया ..त्यातील कमीपणा स्वीकारून करावे लागलेले तह..या सगळ्या पलीकडे जाऊन हात उंचावून आयुष्याला मिठी मारायला शिकलं पाहिजे..सगळ्यांना आयुष्य जगताना मोठं होता येत नाही हे प्रमाण मान्य करून देखील आपण आयुष्यात येवढंच सांभाळायचं कि आपण आपल्या नजरेतून कधी उतरायचं नाही..सगळ्या प्रमादांना उ:शाप आहेत परंतु आपल्या नजरेतून उतरल्यानंतर आयुष्यभर शेवटचा श्वास घेईपर्यंत गुन्ह्यांना उ:शाप नसतो…असते मग अशा लोकांच्या भाळी अश्वत्थाम्याच्या चिरंजीव जखमेचे अधिराज्य …नि एकदाच लाभलेल्या मनुष्य जन्माचं सार्थकी न लागल्याचं न उमजलेलं सत्य….नि निरुपणाच्या ओळीतला दुरावलेला आपलाच चेहरा …

………………….रजनीकान्त

Avatar
About रजनीकान्त महादेव शेंबडे 11 Articles
रजनीकान्त महादेव शेंबडे..वास्तव्य कराड…अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून महावितरण इस्लाम्पूर विभागीय कार्यालयात कार्यरत.. लेखन कविता…ललित…स्फुट ..
Contact: Facebook

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..