सीकेपी तितुका मेळवावा

सध्या जातीजातीत द्वेषाची भावना खूप वाढत चालली आहे. महाराष्ट्रात जवळपास सगळ्याच जातीत थोर संत जन्माला आले. जाती गाडून मानवतेकडे जाण्याचा मार्ग या सर्व संतांनी दाखविला. दुर्दैवाने त्याच महाराष्ट्रातील कोनाकोपऱ्यातील जाती शोधून त्यांना एकमेकांविरुद्ध  झुंजविण्याचे राजकारण सुरु आहे. अशा वेळी दुसऱ्या जातीबद्दल काही चांगले लिहिण्याचे मी धाडस करतो आहे. ही जात म्हणजे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ! म्हणजेच सीकेपी समाज !!
पूर्वी  शाळा – कॉलेज – ऑफिस अशा सर्व ठिकाणी माझ्या मित्रपरिवारात अनेक सीकेपी होते. त्यांची त्यावेळची स्थिती, त्यांचा समाज, त्यांचे वागणे, त्यांच्या समाजात  होत गेलेले बदल इत्यादी गोष्टींबद्दल, मला आजवर काय दिसले यावर काही लिहिण्याचा हा माझा प्रयत्न आहे. मला फारसे अभ्यासपूर्ण वगैरे काही लिहायचे नाही पण काही संदर्भ मात्र रंजक आहेत. कोण हे सीकेपी ?
पुराणकालीन सहस्रार्जुनाचा वंशज चंद्रसेन राजाच्या कुळापासून आणि काश्मीर पासून कर्नाटकातील बिदरपर्यंत सीकेपी व्याप्ती आहे. पण त्यापेक्षा आपण जरा वेगळ्या खिडकीतून डोकावून पाहू. ही मंडळी स्वतःचा उल्लेख आणि ओळख सीकेपी अशीच करून देतात म्हणून मी त्यांचा प्रत्येक ठिकाणी सीकेपी, सीकेप्यांची, सीकेप्यांना  असाच उल्लेख करतो आहे. सरस्वती नदीकाठचे सारस्वत ब्राह्मण स्थलांतर करून गोव्यात आल्यावर अट्टल मस्त्याहारी झाले पण सीकेपी क्षत्रिय प्रभावामुळे पक्के मांसाहारीच  आहेत. पूर्वापार त्यांना वेदाध्ययनाचा अधिकार आहे. कार्ल्याची एकविरा देवी ही अनेकांची कुलस्वामिनी !  त्यांची २६ गोत्रे असून अनेक व्यवहार हे ब्राह्मणी वळणाचे होते.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीपासून सीकेपी समाज हा जास्त  ठळकपणे पुढे असलेला आढळतो.
त्यांचे अनेक गुण हे ब्राह्मणांशी मिळतेजुळते असल्याने, ब्राह्मण जातीशी तुलना अपरिहार्य ठरते. बहुतांशी गोरा रंग, बुद्धिमत्ता, व्यासंगी वृत्ती, विपरीत परिस्थितीशी झगडून वर येण्याची तयारी असे  अनेक गुण आढळतात. त्यांची बरीचशी आडनावे, पोशाख आणि राहणीही ब्राह्मणी असल्याने महाराष्ट्रातील बहुतांश समाज त्यांना ब्राह्मणच समजतो. कै. राम गणेश गडकरी यांचा पुतळा फोडण्याचे ( आणि फोडणाऱ्याला ५ लाख इनाम देण्याचे ) हेच कारण असावे. शिवकालामध्ये दोन सीकेपी, शामजी कुलकर्णी तसेच बाजीप्रभू देशपांडे यांचा पुत्र पिलाजी या दोघांना  मोगलांनी पकडून  त्यांचे सक्तीने बाटवून धर्मांतर केले. पण ते त्यांच्या कैदेतून निसटल्यावर तत्कालीन ब्राह्मण धर्माधिकारी पंडितराव याने त्यांचे शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले. त्यांना सीकेपी समाजाने पुन्हा मानाने स्वीकारले. यामध्ये जसा शिवाजी महाराजांचा आपल्या धर्माबद्दल प्रागतिक दृष्टिकोन दिसतो तसाच सीकेपी समाजाने त्यांना स्वीकारण्यामध्येही या समाजाचा मोठेपणा दिसतो.
सीकेपी कसा होता, आजचा  कसा आहे ? …. स्वभावाने जास्तच मोकळा आणि बडबड्या. पटकन कुणाशीही जमवून घेणारा. पक्का मांसाहारी. विशिष्ट आहार पद्धतीमुळे पूर्वी जाडा आणि स्थूलदेही सीकेपी दुर्मिळच होता. काल परवापर्यंत अनेक सीकेपी घरांमध्ये गोकुळ भरलेले असायचे. माझ्या अनेक मित्रांना ५/५,६/६ भावंडे होती. घरात कमावता एकच.. मग ओढाताण.. मग रोजचे मासे कुठले ? पण मग एक दिवस घरात धार्मिक विधी असल्याच्या श्रद्धेने सर्व लगबग सुरु होत असे. खास सीकेपी खाद्यसंस्कार करून मांसाहारी पदार्थ तयार होई. अगदी मोठ्या जाम्यानिम्यासह कौटुंबिक मांसाहार विधी संपन्न  व्हायचा. अशा या सीकेपी खाद्यसंस्कृतीवर तर एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल. आपल्या घरातील ओढग्रस्तीची मुलांना लवकरच कल्पना यायची. मग मुलगा मॅट्रिक झाल्या झाल्या नोकरी बघायचा आणि मुली स्वयं वर ( अनेकदा आंतरजातीय ) निवडायच्या. त्यावेळी त्याला पळून जाणे वगैरे म्हणायचे तर काहीजण म्हणायचे ” तिला आईबापांचीच पळून जायला फूस ” ! पण बहुतेकवेळा त्या मुलींची निवड चुकत नसे. आपल्यापेक्षा लहान भावंडांची लग्ने  उरकता उरकता मोठा भाऊ किंवा बहीण स्वतःच आयुष्यभर अविवाहित राहिलेले मी पाहिले आहेत.
सीकेपी कुटुंबातील सर्वांचे कपडे अगदी साधे असत पण राहणीमध्ये टापटीप दिसत असे. घरात एकतरी भाईसाहेब किंवा नानासाहेब असायचेच ! अनेकांमध्ये थोड्या बढाया किंवा फुशारक्या मारण्याचा गुण होता. पण खरं सांगू का ?…. अशा फुशारक्या ह्या निर्विष आणि कुणाचे नुकसान करणाऱ्या नव्हत्या. पण मजा येत असे.  कुणी नावाजलेल्या बड्या सिकेप्याचे नाव निघाले की  माझे २ / ३ सीकेपी मित्र तरी, तो माझ्या लांबच्या आत्याचा पुतण्या, माझ्या चुलत काकांचा मेहुणा अशी नाती सांगत असत. बोलण्यात फुशारकी असली तरी घरातील आर्थिक परिसथिती पाहून कुटुंबप्रमुख किंवा मोठा मुलगा नोकरीचे तास संपल्यावर, कुठे टायपिंगची कामे करून दे, कुठे शिकवण्या कर, हिशेबाच्या वह्या लिहून दे अशी जादा मेहनत करून कुटुंबाची आर्थिक घडी सांभाळत असत.
हा समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीमध्ये  प्रशासनामध्ये अनेक पदे भूषवित होता.त्यामुळे अनेक सीकेपी आडनावे ही थेट प्रशासनाशी नाते दाखविणारी आहेत. उदा. राजे, प्रधान, अधिकारी, गडकरी, गडणीस, कारखानीस, खासनीस, हजरनीस, देशमुख, देशपांडे, चिटणीस, टिपणीस, सबनीस, पोतनीस, इत्यादी. तर  देशपांडे, देशमुख, बेंद्रे, फणसे, वैद्य, कुलकर्णी  ही आडनावे ब्राह्मणांमध्येही असल्याने या मंडळींना अनेकदा ब्राह्मणच समजले जाते. चौबळ, चित्रे, दुर्वे, कर्णिक,गुप्ते, भिसे, दिघे,सुळे, ताम्हाणे ही आडनावे जरा जास्तच पॉप्युलर ! महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे शेवटी “कर” असलेली आडनावे सरसकट आढळतात पण सीकेपी समाजात अशी आडनावे त्यामानाने कमी आहेत. शृंगारपुरे, मथुरे, नागले, नाचणे, शिकारखाने अशी कांही अगदी वेगळी आडनावे सीकेपी समाजात आहेत.
हा समाज खूप मोठा नसूनही या समाजाचा एक तरी माणूस, अनेक क्षेत्रात सर्वोच्च पदावर पोचलेला आढळतो. अगदी सहज आणि उदाहरण म्हणून काही क्षेत्रे आणि अशा काही प्रमुख व्यक्तींची नावे आपण पाहूया–
छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनानी — बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, बाळाजी आवजी चिटणीस, खंडो बल्लाळ चिटणीस.    मराठी साहित्यिक राम गणेश गडकरी, कवी अनिल म्हणजे आत्माराम रावजी देशपांडे, मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा कुसुमावती देशपांडे.   अर्थशास्त्रज्ञ  चिंतामणराव देशमुख.  १९१२ मधील मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश महादेव भास्कर चौबळ.  राजकारणी  दत्ता ताम्हाणे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे.  माजी लष्कर प्रमुख अरुणकुमार वैद्य. हवाईदल प्रमुख अनिल टिपणीस.  मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील सुमती गुप्ते, शोभना समर्थ, नूतन, तनुजा, नलिनी जयवंत, स्नेहप्रभा प्रधान.  विविध २०० प्रकारचे वैज्ञानिक शोध लावणारे आणि ४० पेटंट्स नावावर असलेले आणि ज्यांना भारताचे एडिसन म्हटले जाते ते शास्त्रज्ञ शंकर आबाजी भिसे.  संगीतातील फक्त एकच नाव घेतले पुरे आहे ते म्हणजे श्रीनिवास खळे.  क्रिकेटपटू  बाळू गुप्ते – सुभाष गुप्ते – नरेन ताम्हाणे. १९६५ च्या युद्धात अवघ्या २३ व्या वर्षी शाहिद झालेला लेफ्टनंट दिलीप गुप्ते, पत्रकार माधव गडकरी, आणखी कितीतरी….
अवघ्या दोन पिढ्यांमध्ये हा समाज पूर्ण बदलतो आहे. उच्च शिक्षण, इतरांना भाषणे न देता स्वतः अंगिकारलेला  पुरोगामी दृष्टिकोन, आक्रसलेली कुटुंबसदस्य संख्या, मेहनत करण्याची वृत्ती अशा अनेक गोष्टींमुळे समाजाची सर्वांगीण प्रगती होते आहे. पण त्यामुळे एक विपरीत गोष्ट घडते आहे. खरेतर हे सर्वच पुढारलेल्या समाजात घडते आहे.  हा सीकेपी समाज वेगाने अल्पसंख्य होतो आहे. ५/५, ६/६ भावंडे असलेल्या कुटुंबात २ किंवा एकच  पुरे ( अगदी फक्त मुलीच असल्या तरीही ) असे झाले आहे. उच्च शिक्षण घेऊन पुढची पिढी विदेशात स्थलांतर करीत आहे.  सीकेपी आळी / वस्ती, सीकेपी सभागृहे ओस पडत चालली  आहेत. सीकेपी फूड फेस्टिवल, लग्न कार्य, एखाद्या सामाजिक कार्यक्रमात / संमेलनातच सीकेपी भेटतात. बहुसंख्य मराठी माणसांना या सीकेपी समाजाची माहितीच नाही. काय करायचे ?
जाऊद्या ….. एक मात्र खरे की मी आणि माझे सीकेपी मित्र एकमेकांना फोन करतो,  भेटतो… मजा येते.
आपण, विशेषतः सीकेपी मित्रांनी आपल्या प्रतिक्रिया मला जरूर पाठवाव्यात.
( सर्व छायाचित्रे विकीपिडीया आणि गुगल माहितीजालाच्या सौजन्याने )
 
( हा लेख शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावा ).
— मकरंद करंदीकर. 
makarandsk@gmail.com
Avatar
About मकरंद करंदीकर 42 Articles
मकरंद शांताराम करंदीकर यांनी बँक ऑफ इंडियातून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या अनेक छंदांना पूर्णपणे वाहून घेतले. गेली सुमारे ५० वर्षे ते दिव्यांचा - विशेषत: भारतीय दिव्यांचा संग्रह करीत आहे. त्यांच्याकडील हा संग्रह भारतातील दिव्यांचा सर्वात मोठा संग्रह आहे. या विक्रमासाठी त्यांचे नाव २ वर्षे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आणि एकदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले आहे. याचबरोबर भांडी, बैठे खेळ, पत्ते, जुनी प्रसाधने, लेखन साहित्य असे इतर अनेक छंद त्यांनी जोपासले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…