मुलाखत

साठी उलटली तरी माझ्या मित्रांना माझा मामा करण्यातच धन्यता वाटते. मी मुलाखत घ्यायची आणि ती सुध्दा एखाद्या प्रथितयश रागदारी गायकाची! संगीतातल ज्ञान तर सोडाच पण ज्या विषयात मी काठावरही पोहू शकत नाही हे माहीती असुनही मुद्दाम पुण्यातील एका प्रख्यात गवयाची मुलाखत घेण्यासाठी त्यांनी माझी व त्यांची वेळ परस्पर बुक करुन टाकली. माझा नाइलाज झाला; मैत्रीला जागायच ठरवुन मी पण एक दोन अनुभवींशी बोलुन काही प्रश्ण काँपी करुन पाठही केले आणि बरोबर ठेवले. सलवार, कमीज व फर कँप ह्या मुलाखतकाराच्या भाडोत्री आणलेल्या पारंपारीक पेहेरावात ढाकुन मित्रांनी ठरलेल्या वेळेच्या पाच मिनीटे आधीच मला बुवांच्च्या निवासस्थानाच्या लिफ्टपाशी सोडले आणि क्षणार्धात पसार झाले.

मी व्यवस्थीत नाव बघुन बेल वाजवली. दार उघडुन आत घेता घेताच बुवा मला म्हणले अरे वा तुम्ही होय! तुम्हाला मी एक दोन संगीत कार्यक्रमात पाहील्यासारख वाटतय! ओळख दाखवण्यासाठी बुवांनी पेरलेल हे वाक्य मी लगेच ओळखल. मी पण बुवांना विचारल, ” स्टेजवर का प्रेक्षकात?” माझ्या उसळत्या बेमालुम गुगलीने ते गांगरले पण लगेच सावरुन न डगमगता चहापाण्यासाठी सौ ना इशारा करत करत मला बसा म्हणले. ‘घर वेळेवर मिळाल का?’ आणि ‘ तुमच्या फ्लँटच इंटीरीयर छान आहे’ अस औपचारीक बोलण आमच्यात होत असतानाच सौ ही चहाचा ट्रे आमच्या पुढे ठेवत म्हणल्या तुम्हाला या आधी मीही पाहिलय कुठे तरी!! मी मनात विचार केला, दाखवायच्या कार्यक्रमात तर नाही न आणि त्यांना विचारल लग्नाच्या आधी का नंतर? त्या म्हणल्या तुमच्या का माझ्या? मी म्हणल तुमच केंव्हा आणि कुठे झाल? पहिल्याच भेटीत लांबत चाललेल आमच हे संभाषण बुवांना खटकल असाव. आमच संभाषण तोडत मधेच बुवांनी बिस्कीटाची डीश पुढे केली. मी पण वेळीच सावध होउन मुलाखतकाराचा पवित्रा घेतला.

छोट्याश्या कागदावर काँपी करुन आणलेले पाच सहा प्रश्ण पहिल्या फैरीत बुवांकडे फेकुन मी प्रश्णांची ओव्हर पूर्ण केली आणि उत्तराची प्रतिक्षा करत बसलो. उत्तरादाखल बोलताना बुवांनी ‘शुध्द गंधार’चा उल्लेख करताच माझ्या डोळ्यासमोर चक्क अंधार झाला आणि शुध्द हरपतीय अस वाटल. बुवा बोलतच होते. मला कान देउन ऐकण भाग होत. बुवांनी शुध्द गंधार पाठोपाठ ‘रिशभ’ उच्चारताच मला शंका आली माझी वृशभ रास ह्यांना कशी कळली? बुवा तळमळीनी बोलत सुटले होते. बुवांनी ‘जाती’चा उल्लेख करताच आम्ही दोघही एकाच जातीचे असताना बुवा जातीविषयक का बोलतायत मला कळेना. बुवानी ‘निषाध’ वर बोलण चालु करताच माझा एवढ्यात निषेध करण्यासारख मी काय केलय मला कळेना. मी ओशाळलो. सगळच डोक्यावरुन चालल होत. बुवा थांबत नव्हते. बुवांनी सा रे ग म विषयी बोलायला घेताच खा रे वा रे, मतलई वारे एका कानातुन दुसर्या कानात वहायला लागले. मी विचार करु लागलो सारे गम एकट्या माझ्याच का वाटेला आले असतील? माझ्या हळुहळु लक्षात येत होत की, माझे काँपी केलेले सर्व प्रश्न माझ्यावर उलटत होते. बुवा मात्र अतिशय तन्मयतेने बोलत होते जणु काही मला सगळ कळतय.

काँपी केलेल्या प्रश्णात पुढचा मुद्दा होता बुवांच्या घराण्याविषयीचा. मी घराण विचारताच बुवांनी मूळच्या युपीच्या पण मुंबईत स्थायीक झालेल्या तीन मुस्लीम गायकांनी मुंबईत स्थापन केलेल्या घराण्याचा मोठ्या दिमाखाने कानाच्या पाळीला हात लावत आदराने उल्लेख केला. नाव होते “भेंडीबाजार”. मी गांगरुन गेलो. संगीत घराण्यात चक्क फळभाजीचा शिरकाव झाला असेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. बुवा भेंडीबाजार घराण्याच्या अमान हुसेन खाँ वगैरे गायकांची ठळक वैशिष्टे सांगत होते आणि मला अलिकडेच एका लग्नाच्या बुफेतली भेंडी मसाला आठवत होती.

प्रकरण माझ्या हाताबाहेर चालल होत पण बुवांच्या ते गावीच नव्हत. बुवांच्या मनात माझ्या मित्रांनी माझ्या संगीतातील ज्ञानाबद्दल नक्की काय काय आणि किती किती ठासुन भरल होत ह्याची मला कल्पना हळु हळु यायला लागली होती. पण माझी फारच घुसमट होत होती. वेळीच कोंडी फोडण आणि मोकळा श्वास घेण मला अवश्यक होत. शेवटी पळवाट काढण्यासाठी बुवांना मधेच थांबवुन ” मला पुढच्या मुलाखतीला जायला उशीर होतोय; आपण मुलाखतीचा भाग २ पुढच्या आठवड्यात ठेउ या का?” असे विचारलेच. बुवांना ते अनपेक्षित होते. बुवांच अग्रहाच म्हणण होत की भिंपलास आणि झिंझोटी या त्यांच्या मुलांच गाण मी ऐकाव व मुलाखतीत त्यांच्या गाण्याचाही उल्लेख करावा. मला फारच गहिवरुन येत होत.

गाण्यातल ढिम्मही कळत नसताना दोन्ही मुलांच्या गाण्याला मधेमधे समजल्यासारख दाद देण खूप आवघड जात होत. पण शेवटी अर्जंट फोन आल्याच कारण पुढे करत भर महीफिलीतुन काढता पाय घ्यायच ठरवल. विसकटलेला भाड्याचा ड्रेस सरळ करत मी बुवांचा हात हातात घेत उठलो. न विसरता बुवांच्या सौ ना ओळख ठेवा म्हणलो आणि पुन्हा भेटु तेंव्हा भरपूर गप्पा मारु म्हणलो आणि शेवटी कटाक्षाने त्यांना अग्रभागी ठेउन आमचा एक सेल्फीही काढला.

बुवांबरोबार झिंझोटी आणि भिमपलास दोघेही लिफ्टनी खाली सोडायला आले. लिफ्टमधे बुवा पुन्हा संगीताकडे वळले आणि ‘ठहेराव’ बद्दल बोलत राहिले मला वाटल माझ्या पेहेरावाचच कौतुक करतायत.

बोलता बोलता शेवटी बुवांनी प्रश्ण केलाच की इतक्या वेळाच्या मुलाखतीत एकही शब्द लिहुन न घेता तुम्ही माझी मुलाखत प्रेसकडे कशी काय पोहोचवणार? मी वरच्या खिशातल्या मोबाईलकडे बोट दाखवत चोख उत्तर दिल की ” सर्व रेकाँर्ड केलय “.

असो. सुटलो एकदाचा. पण मुलाखतीतुन एक महत्वाचा धडा घेतला की पेस्ट कुठे करायच माहीत नसेल तर उगाच काँपी करायच नाही; आपला पोपट होतो.

— प्रकाश तांबे
8600478883

Avatar
About प्रकाश तांबे 44 Articles
मी प्रकाश तांबे, पुणे. गेले तीन-चार वर्षे मी वर्तमानपत्रे व सोशल मीडीयावर सातत्याने लिहित असतो. जाणकार वाचकांच्या प्रतिक्रीयेने मला नेहमीच स्फूर्ती मिळत असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..