नवीन लेखन...

‘ब…..’

माझ्या गावांत आणि आमच्या बोली भाषेत आईला फक्त ‘ ब ‘ म्हणून हाक मारतात. मी माझ्या आईला जरी आई म्हणत असलो तरी माझ्या सगळ्या काकूंना ब या नावानेच हाक मारतो.

खरं म्हणजे आमच्या आगरी संस्कृती मध्ये आजही गावोगावी एकत्र कुटुंब पद्धती आहे. मला एकूण चार काका असल्याने आणि एका काकाला दोन बायका असल्याने मला पाच ब होत्या. चार काकांपैकी एकही काका आता हयात नाही. पाच ब पैकी सगळ्यात मोठ्या काकांची दुसरी बायको सगळ्यात पहिले कॅन्सर ने दगावली. तिच्या मागे काही वर्षांत सगळ्यात मोठ्या काकांची पहिली बायको स्मृतिभ्रंश आणि आजारपण यामुळे दगावली. सगळ्यात मोठे काका आमच्या शेतावरच्या घरातच राहायचे त्यांच्या दोन बायकांपैकी एकीला एकदा मुलगी झाली होती पण ती लहान असतानाच वारली त्यानंतर मोठ्या काकांना एकही मुलबाळ झाले नाही. शेतावर गेलो की शेतावरच्या दोन्हीही ब माझे खूप लाड करायच्या. चुलीवर बनवलेल्या कढईतली सुकी मासळी आणि खापरीवरच्या गरमा गरम भाकरी जे काही असेल ते खाऊ घालायच्या. त्यांनी दिलेले खाल्ले की त्यांना खूप आनंद व्हायचा. तीन नंबर च्या काका वेगळ्या घरात राहायचे, त्यांचे आणि बाबांचे भांडण असल्याने त्यांच्या कडे येणे जाणे नसायचे. पण त्या घराजवळून जाताना तिथली ब हाक मारून बोलावून घ्यायची घरात नेऊन दूध भाकरी खायला द्यायची पण मला दुध भाकरी आवडत नसल्याने मग गुळाचा खडा खायला देऊन चेहऱ्यावरून मायेने हात फिरवायची. शेतावर किंवा रस्त्यावर दिसली की मला बघून मायेने हसायची, घरातल्या भांडणामुळे लांबून लांबून का होईना पण जीव लावायची. मी बारावीत असताना त्या ब ला एक मांजर चावली होती पण नंतर असं लक्षात आले की त्या मांजरीला पिसाळलेला कुत्रा चावला होता त्यामुळे रेबीज मुळे तिला दुर्दैवी मृत्यू आला.

आमच्या गावातल्या जुन्या घरात दोन मजले आहेत वरचा पूर्ण मजला लाकडी फळ्यांचा आणि त्या फळ्यांवर शेणाने सारवलेला. वरच्या मजल्यावर राहणाऱ्या काकाला तो असेपर्यंत आम्ही वरचा बाबा आणि त्या काकूला वरची ब अशी हाक अजूनही मारतो. खाली आमच्यासह माझ्या जन्मपूर्वीच वारलेल्या काकाची बायको आणि तिचा मोठा मुलगा एका खोलीत राहायचे. त्या चुलत्याच्या जुळ्या मुलांपैकी एका मुलाचे नावं स्वप्नील असल्याने त्याला सगळे सपन्या बोलायचे. त्यामुळे खाली आमच्या सोबतच राहणाऱ्या काकूला खालची ब बोलण्या ऐवजी सपन्याची ब बोलले जाते. वर जायला आणि खाली पाठीमागे पडवीत जायला आम्हा तिघा कुटुंबाना एक सामायिक खोली होती. सगळे सण,उत्सव, लग्न आणि सुखदुःखाची सगळी कार्ये आजही त्याच खोलीत एकत्रपणे साजरी केली जातात.

वरच्या ब चे नावं कृष्णा बाई तर सपन्याच्या ब चे नावं गंगुबाई. एकाच घरात ह्या दोन्हीही ब आणि माझी आई अशा तिघी जावा एकत्र राहायच्या. दोन्हीही ब एकमेकींशी दिवसभर कुठल्याही कारणावरून भांड भांड भांडायच्या मग माझ्या आईला एकमेकींची गाऱ्हाणी सांगायच्या. रात्री एकदा जेवणाची वेळ झाली की मग दिवसभरातली भांडणं विसरून एकमेकींना तू जेवली का असं विचारून गप्पा मारायला लागायच्या.

दोघीही आईपेक्षा वयाने कितीतरी मोठ्या आहेत आणि एकमेकींशी भांड भांड भांडतात पण अजूनही कधी माझ्या आईशी एकदाही भांडल्या नाहीत की लहान जाउ म्हणून कधी खेकसल्या नाहीत.माझी आई ग्रॅज्यूएट असूनसुद्धा दोघी ब नी तिला सांभाळून घेतलं. घरातल्या चालीरीती शिकवल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्या शिक्षणाचा हेवा किंवा दुःस्वास करण्यापेक्षा तिचा आदर केला आणि मान दिला.

आमची वरची ब तर कोणाला नावं ठेवण्यात किंवा कोणाची नक्कल करण्यात कोणाला ऐकायची नाही, वेगवेगळे शब्दप्रयोग आणि म्हणी वापरून एखादयाची पूर्ण जिरवून टाकते. त्यामानाने सपन्याची ब जरा शांत आहे आणि तेवढीच भोळी सुद्धा आहे. दोघीही जणी पूर्णपणे निरक्षर आहेत. लिहिता वाचता बिलकुल येत नाही तरीसुद्धा माझी वरची ब जवळपास संपूर्ण भारत फिरून आलीय. मुंबईत मेट्रो सुरु झाली नव्हती पण ती गावातल्या ग्रुपसोबत दिल्लीला गेली असताना वरच्या बाबाला घेऊन मेट्रोची सफर करून आली होती. वयाची पंच्याहत्तरी ओलांडून गेल्यावर घरात कोणाला न सांगता तिने विमान प्रवासाची हौस भागवून घेतली. फिरायला निघाल्यावर वय, शिक्षण किंवा भाषा काही कामाच्या नसतात हे आमच्या वरच्या ब कडे बघून शिकायला मिळालं. आमच्या वरच्या ब ला ती लहान असताना एका डोळ्याला अपघात झाला होता. तेव्हापासून तिला फक्त एकाच डोळ्याने दिसतं. आमचा वरचा बाबा खूप दारू प्यायचा आणि जुगार खेळायचा पण ब ला एकच डोळा असून सुद्धा त्याने तिच्याशी लग्न केलं म्हणून की काय आमची वरची ब त्याची खूप काळजी घ्यायची. त्याला दारूला आणि जुगाराला पैसे पुरवायला स्वतः शेतात राब राब राबायची पण कोणाकडे कधी उसने पैसे नाही मागायची. सपन्याची ब सुद्धा अजूनही शेतात काम करते. वयाची पंच्याहत्तरी ओलांडली तरीही चुलीला लागणारी लाकडांची मोळी डोक्यावर घेऊन शेतावरून घरी जातात आणि अजूनही सुना नसल्या की चुलीवर भाकरी भाजतात. आम्ही लहान असताना आम्हाला कोणाची नजर लागू नये भाकर तुकडा ओवाळून नजर काढणाऱ्या ब आता आमच्या पोरांची पण नजर उतरवतात.

लहान बाळ बोलायला लागल्यावर आई,मम्मा, मॉम असे कठीण शब्द उच्चारण्या ऐवजी ब ब करत असावेत म्हणून बाळाच्या तोंडातुन निघणारा पहिला शब्द ब हा आईचा असावा.

त्यांची आमच्यावर असलेली माया आणि जीव आता आमच्या मुलांवर पण लावताना दिसतात. आम्ही शेतावर नवीन घर बांधून राहायला आलो पण अजूनही आमच्या ब आणि त्यांची माया आहे तशीच आहे. त्यांना आम्ही दोन दिवसात दिसलो नाही तर त्या शोधत येतात नाहीतर आम्हीतरी त्यांना शोधत जातो. माझ्या सगळ्या ब नी लहान असताना मला कडेवर घेऊन खाऊ घातलंय, नाचवलंय आणि खेळवलंय पण आजपर्यंत कधी रागावलंय किंवा ओरडलंय असं कधीच झाले नाही.

आमच्या ब शिकलेल्या नाहीत अडाणी आहेत पण त्यांनी दिलेले संस्कार कुठल्याही शाळेत मिळाले नसते. आमच्या अजूनही खमक्या असलेल्या ब ना ‘ ब ‘ या एका शब्दातच हाक मारल्याने माया ममता आणि वात्सल्य भरभरून प्राप्त होते.

© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B. E. (Mech ), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 184 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..