मिठाई

बागेत झाडांना पाणी सोडुन, बंगल्याची झाडझुड करुन सखा पार दमुन गेला होता. सकाळापासुन पोटात अन्नाचा कण नव्हता. काय खाणार होता तो. रात्री त्यानी , त्याच्या लहान भावानी व बहिणीनी मिळुन एक भाकरी खाल्ली होती. आजी तर उपाशीच होती. सख्यानीच तीला दोन घास खायला लावले. आजीच्या डोळ्यात आलेल पाणी सख्याला आठवत होत.
सकाळी तो नेहेमीच लवकर घरातून बाहेर पडायचा. शेठ्च्या बंगल्यात काम मिळाल होत. जेवाय खायला मिळायच. शिळपाक उरलेल जे काही असेल ते निमुट खायची त्याला सवयच लागलेली होती.
सकाळाच काम झाल्यावर त्याला कालच्या दोन इड्ल्या खायला दिल्या त्या घेऊन तो जिन्याजवळ बसला. हीच त्याची रोजची खायची जागा. त्याला सुद्धा हीच जागा आवडायची. समोर एक कृष्णाची मुर्ती होती. त्याच्या गळ्यात मोत्यांची माळ फ़ार छान दिसत होती. त्या हासणार्‍या कृष्णाकडे बघितल की सख्याला फ़ार बर वाटायच. शेठ रोज या मुर्तीला नमस्कार करायचे आणि प्रार्थना करायचे “देवा आज फ़ायदा होऊ दे, खुप पैसे मिळु दे” मग रोज देवाला मिठाईचा निवेद्य दाखवायचे, घरातल्या सर्वांना प्रसाद देउन मग आपल्या बंगल्यात व बागेत एक फ़ेरफ़टका मारुन कचेरीत जायचे.
सखा शेठकडे कामाला लागला तेव्हा ७ वर्षांचा होता. नुकतेच आई-वडिल वारले होते आणि आजी या तीन मुलांना सांभाळत होती. मेटाकुटिला आली होती ती. सख्याला तीनी शेठकडे कामाला लावल. आणि आता तो दोन वर्ष हे काम करत होता. सकाळी ७ ला बंगल्यात यायच आणि संध्याकाळी दिवेलावणीला घरी जायच.
सख्यानी इडली खाल्ली तोच त्याला शेठची खणखणीत हाक ऎकु आली. “सख्या” बापरे सख्या नखशिखांत शहारला.

शेठ खुप चिडलेत हे नक्कीच. लगेच उठुन सख्या दिवाणाखान्याच्या दिशेनी धावला. शेठ तांबडे लाल झाले होते. दोन ढेंगांमधे तेसख्याजवळ पोहोचले व त्यांनी एक जोरात त्याच्या कानफ़टात मारली. सख्या हेलपाटलाच आणि खाली पडला. शेठनी एक सणसणित लाथ त्याच्या पाठीत घातली आणि बाहेर गेले. फ़ार चिडले होते शेठ.

झाल अस होत की, त्यांच्या एका मित्रानी त्यांना अजमेरहुन सुंदर सुरई पाठवली होती. ती फ़ुटली होती. शेठची ती अत्यंत आवडती सुरई होती. त्यांनी रागानीच मोलकरणीला विचारल “कोणी फ़ोडली ही सुरई? ” ती म्हणाली की बहुतेक सख्यानी फ़ोडली असेल तोच साफ़सफ़ाई करतो बंगल्याची”.
आता शेठचा राग लगेच शांत होणार नव्हता. ते सरळ बगीच्यात गेले. गुलाबाच्या ताटव्याकडे बघितल्यावर त्यांना जरा बर वाटल. ते तसेच पुढे गेले आणि त्यांना कोणाच्या तरी रडण्याचा आवाज आला. त्यांनी बघितल तर त्यांचा मुलगा ललित रडत होता. त्यांनी मुलाला जवळ घेतल. मुलगा खुपच घाबरला होता. बापाला पाहुन तो आणखिनच रडायला लागला. शेठच्या लगेच लक्षात आला प्रकार, त्यांनी मुलाला जवळ घेतल व विचारल “तुझ्या हातुन फ़ुटली का सुरई ” त्यानी हो म्हणल्यावर शेठ म्हणाले “अरे मग रडतोस कशासाठी ? आपण त्या अंकलला दूसरी तशीच पाठवायला सांगू. मी त्यांना आजच फ़ोन करतो” शेठ परत बंगल्यात आले. जिनापाशी सखा रडत उभा होता. शेठनी खिशात हात घातला एक ५० रु. ची नोट काठली व ती सख्याच्या हातात देत म्हणाले “जा मी तुला माफ़ केलेय. हे पैसे घे आणि घरी जा या पैशाची मिठाई खा.”
सखा रडत रडत घरी आला. त्याचा गाल पार सुजला होता. पाठ ठणकत होती.
त्याचा अवतार बघुन आजी घाबरली. तीनी सख्याला जवळ घेतल व काय झाल विचारल. त्यानी शेठनी त्याला कस उगाचच मारल हे सांगीतल.
आजी कळवळ्ली. म्हणाली चल आत्ताच शेठला विचारु का मारलत. तीनी सख्याला जवळ घेतल. सख्याला हातात काय आहे विचारल. त्यानी मुठ उघडुन दाखवली, हातातले ५० रु. आजीकडे दिले व शेठनी “जा मी तुला माफ़ केलेय. हे पैसे घे आणि घरी जा या पैशाची मिठाई खा.” अस सांगीतल्याच सांगीतल. आजीला सुजलेला सख्याचा गाल दिसत होता, उपाशी दुसरी दोन नातवंड दिसत होती. आज घरात खायला काहीच नव्हत. आणखीन दोन दिवस उपाशी राहाव लागणार होत. तीनी ते पैसे देवासमोर ठेवले. सख्याला जवळ घेतल त्याच्या दुखर्‍या गालावरुन हळुवार हात फ़िरवत म्हणाली “सख्या, अरे ते मोठे लोक आहेत. आपण फ़ार लहान आहोत. शेठेनी मारल तर काय होतय ?तेच आपले अन्नदाते आहेत.”
— अजिंक्य प्रधान


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..