नवीन लेखन...

भुरळ घालणारा निसर्ग

कॅनडा वैविध्यतेने नटलेला देश. या नव्या जगताने अल्पावधीत प्रगती साधली ती निसर्गाचा वरदहस्त लाभल्यामुळेच ! सुशिक्षित लोक, त्यांची वैज्ञानिकदृष्टी नि नैसर्गिक साधनसंपत्तीची विपुलता यामुळेच हा देश सर्वांगिन क्षेत्रात प्रगत झाला.  उत्तर अमेरिका खंडातील या संपन्न देशात आज पर्यटन करीत होतो. निसर्ग सौंदर्याने मनाला मोहीनी घातली होती. एका बाजुला अटलांटिक व दुसऱ्या बाजूला अथांग पसरलेला पॅसिफीक महासागर, देशांतर्गत नद्यांचे व सरोवरांचे पसरलेले जाळे, हिरव्या गर्द वृक्षानी नटलेली अरण्ये, मनाला भुरळ घालणारी विविध रंगी उद्याने, या साऱ्यांचा मुक़ूटमणी नायगारा …….. सगळ्याच गोष्टी कशा एकापेक्षा एक सुंदर, मनाला वेड लावणाऱ्या !

कॅनडाचे चित्रित केलेलेक्ष संन्याशाप्रमाणे पाने गाळून उभे असलेले वृक्ष, बर्फाच्याच ढिगाऱ्यांतून डोके वर काढून पहाणारी घरे ……… सारे कसे ओल्या वाळवंटासारखेच! अशा परिस्थितीत लोकांचे जीवनमान कसे असेल, या विचारानेच मन कासाविस होई. या वातावरणाला नवखी असलेली माझी कन्या, जावई कसे रहात असतील ? …. ही बेचैनी मनाला सतत सतावित होती. बर्फाळ वातावरणात मानवी जीवन सुसह्य होण्यासाठी केलेल्या मानवनिर्मित उपाययोजनाही मी व्हिडिओत पाहिल्या होत्या. पण मनाची अस्वस्थता कमी होत नव्हती.
गारठून टाकणारा हिवाळा मानवणार नाही, म्हणून कन्येने आम्हाला उन्हाळ्यात बोलाऊन घेतले होते. आम्ही कॅनडात आलो, त्यावेळी मे महिना होता. हिवाळा संपून नुकताच कुठे उन्हाळ्याला सुरवात झाली होती. वृक्ष, वेलीना नवे जीवन प्राप्त होत होते,  नवी पालवी फुटत होती. सृष्टी नवे रूप धारण करीत होती. धरतीवर पसरलेला हिरवा मखमली गालिचा, वृक्ष-वेलींवरील कोवळी नाजूक पाने व विविध रंगी फूले ……. मन मोहीत करीत होती. नव वधूप्रमाणे वस्त्रालंकारात नटलेली सृष्टी आपल्या अनोख्या सौंदर्याने साऱ्यांनाच भुरळ घालीत होती. उन्हाळा असला तरी त्याची दाहकता कुठेच जाणवत नव्हती. वसंतऋतुच जणू आनंदाने खिदळत होता, बहरत होता, साऱ्यांना स्वर्गीय आनंदाची अनुभूती देत होता. या विलोभनीय सौंदर्यांने आमची मने खुलली, प्रसन्न झाली.
कॅनडा विस्ताराने जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश! पण लोकसंख्या तशी विरळच. बहूसंख्य लोक शहरात रहाणारे. छोट्या छोट्या गावांचे सुध्दा सुविधांमुळे शहरीकरण झालेले! दोन गावात सुमारे 50 ते 100 किलोमीटरचे अंतर! पण रस्ते कसे सुंदर, भव्य नि सुस्थितीत! दुतर्फा सुंदर हिरवीगार पसरलेली सृष्टी! त्यामुळे प्रवासाला एक आगळीच मौज वाटायची!

***

असेच एक सृष्टी सौंदर्य आम्ही पहावयास गेलो नि बेभानच झालो. निसर्ग देवतेने केलेल्या सौंदर्याची उधळण मनाला मोहविणारीच होती. स्वर्गीय सौंदर्याचे दर्शन घडविणाऱ्या या ठिकाणाचे नाव होते ट्रुरोचे व्हीक्टोरिया पार्क! हॅलिफॅक्सपासून कारने जायचे तर दीड तासाचा प्रवास! आम्ही तिथे पोहोचलो नि प्रथम दर्शनीच ट्रुरोच्या शिरपेचात गुंफलेला हा मौल्यवान पाचू पाहून थक्क झालो.

दोन्ही बाजूला हिरवेगार उंच कडे नि मध्येच खोल दरी! त्यातून झुळूझुळू वाहत, अवखळपणे उड्या मारत, खिदळत येणारा निर्झर, त्याच्या बाजूनेच नागमोडी वळणे घेत जाणारी पायवाट …….. निसर्गाचा हा अदभूत चमत्कार पहात स्वर्गीय सौंदर्याचा आनंद लुटत चाललेले पर्यटक…… आम्हीही त्यात सामिल झालो! 400 एकर प्रदेशात विस्तारलेला पार्क पाहताना पाय थकले तरी नेत्रांची नि मनाची तहान भागत नव्हती.  अनामिक ओढीने पुढेपुढे जात होतो, निसर्ग सौंदर्याची भुरळ मनाला वेड लावित होती. निसर्गाचे सौंदर्यामृत पिऊन मन बेधुंद होत होते.  अथांग सौंदर्याचा खजिना चारी दिशांना पसरला होता.

पर्वतराजाच्या कटिखांद्यावरून रुळत, कुठे अवखळपणे उड्या घेत, तर कुठे नागमोडी वळणे घेत निर्झर लाडीकपणे खिदळत होता. जेवढे अद्भुत तेवढेच आकर्षक व मनमोहक दृश्य! एका ठिकाणी तर निर्झराने चक्क खाली झेप घेतली नि तितक्याच अलगतपणे पर्वतराजाने त्याला आपल्या ओंजळीत झेलले….. ठेचाळून खाली पडणाऱ्या बाळाला आईने अलगत झेलावे तसेच!

त्यामुळेच ईथे धबधब्यांचे रमणीय दृश्य निर्माण झाले आहे. त्यातून चौफेर उडणाऱ्या तुषारांवर सुर्यकिरण पडून सप्तरंगाची उधळण होत असलेली दिसली नि हे विलोभनिय दृश्य आम्ही पहातच राहिलो. त्यात वेळ केंव्हा निघून गेला, समजलेच नाही. धबधब्याच्या खाली खोलगट भागात पाणी साठल्याने त्याला सुंदर तळ्याचे स्वरुप आले आहे. तळ खडकाळ असल्याने पाणी काचे सारखे स्वच्छ! आरशात दिसावे तसे आमचे प्रतिबिंब पाण्यात स्पष्ट दिसत होते. तळ्यात माशाप्रमाणे तरंगणाऱ्या गोऱ्या, गोमट्या बालकांनी आमचे लक्ष वेधून घेतले. दोन-तीन वर्षांची सुंदर गोजीरवाणी मुले पाण्यात पोहतांना पाहून मौज नि तितकेच कौतुक वाटले. ईतक्या कोवळ्या वयात बाळाना पाण्यात सोडणाऱ्या मातांचा प्रथमदर्शनी राग आला. परतु नंतर त्यांचे नवल वाटले. बाल वयात पोहण्याची कला अवगत व्हावी या उद्देशाबरोबरच, बालपणीच त्यांच्यामध्ये साहसीवृत्ती निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद होता. गोरे लोक दिसायला नाजूक असले तरी खेळात नि युध्दातही इतके पराक्रमी कसे याचे रहस्य मला आता उकलले.

ओढ्याच्या दोन्ही बाजुला उंचच उंच कडे; त्यावरील आकाशाला गवसणी घालणाऱ्या हिरव्यागार वृक्षांनी आमचे लक्ष वेधून घेतले. ना कुठे पक्षांचा किलबिलाट, ना जंगली प्राण्यांचा सुळसुळाट! एखादी खार माणसांच्या भितीने सरसर झाडावर चढतांना दिसे. एखाद-दुसरा कावळा आकाशात उंच घिरट्या घालतांना दिसायचा.  पण त्याची काव-कावही कधी ऐकायला मिळायची नाही. टेकडीच्या पायथ्याशी स्वच्छंदपणे हिरवळीवर बागडणारी हरणांची पाडसं आम्ही पाहिली होती. याशिवाय अन्य कोणत्याच प्राण्याचे आम्हाला दर्शन झाले नाही.

वृक्षांच्या दाटीतूनच वाट काढीत नागमोडी वळणे घेत गेलेल्या कृत्रिम लाकडी जीन्यावरून आम्ही वर,वर जात होतो. खाली खोल दरी व वर वृक्षराजीने नटलेला उंचचउंच कडा……. मनाचा थरकाप व्हायचा. परंतु निसर्गाची अजब किमया पाहून मन भांबाऊन गेले होते. नकळत पावले जीन्यावरून माथ्याच्या दिशेने पुढेपुढे जात होती. निसर्ग सौंदर्याच्या मोहीनीमुळे शारीरिक थकवा जाणवत नव्हता. आकाश निरभ्र होते. डोकीवर सूर्य तळपत होता. परंतु वृक्षांच्या गर्द पानानी तप्त किरणांना रोखून, आमच्यावर शितल सावलीची जणू बरसातच केली होती.

पार्कमधील निसर्ग सौंदर्याचा आनंद लूटत आम्ही होली बायबल हिलवर आलो.  नावाप्रमाणे हे एक पवित्र व ऐतिहासिक ठिकाण! येथे एक विहीर दिसली. विहीर साधीच; पण तिचे नाव होते होली वेलम्हणजे पवित्र विहीर ! नावावरून या मागे कांही ईतिहास असावा हे मी जाणले. आमच्या बाजूलाच प्रवाशांना गाईड माहिती देत होता. कॅनडातील आदिवासी लोक प्राचिन काळी या पवित्र ठिकाणी यायचे, आपल्या मुलांचे बाप्तिस्मा (baptism)  करायचे व त्यांना शुभेच्छा द्यायचे असा काहीसा इतिहास आहे.  मला बाप्तिस्मा शब्द नवीनच होता, त्याच्या विधीची माहितीही नव्हती. त्यामुळे त्याविषयी अधिक जाणून घेण्याची ओढ लागली. गाईडला या विषयी विचारले. त्यावर तो म्हणाला, बाप्तिस्मा हा एक संस्कार आहे. सर्वच ख्रिश्चन संप्रदायात तो सामान्य आहे. कॅथोलिक चर्चमध्ये, कॅथोलिक विश्वात मुलांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांना मूळ पापांपासून मुक्त करण्यासाठी नवजात बालकांना बाप्तिस्मा दिला जातो. … बाप्तिस्मा म्हणजे पापापासून मुक्ती असे ख्रिश्चन संप्रदायात  मानले जाते.  हाच धार्मिक विधी या पवित्र विहिरीवर येऊन पूर्वीपासून केला जात असे. त्यामुळे या विहिरीला होली वेल म्हणून ओळखण्यात येत होते.

गाईडने दिलेल्या माहितीवरून ख्रिश्चन समाजातील हा एक धार्मिक विधी असल्याची मला जाणीव झाली. अर्थात सृष्टीसौंदर्याबरोबर पार्कला ऐतिहासिक, धार्मिक सौंदर्याची जोड लाभल्याने प्रेक्षकांचे हे आकर्षण ठरलेले आहे.
व्हिक्टोरिया पार्कमधील दरी, ओढ्याचे पात्र, दोन्ही बाजूच्या उंच टेकड्या, पठार यावर जीव वैविध्य असल्याचे मी वाचले होते. मात्र पाण्यात तरंगणारे मासे, समुद्रावरून घिरट्या घालणारे समुद्र पक्षी (सी बर्डस्), क्वचितच कावकाव  करणारे कावळे, चिवचिवाट न करणाऱ्या चिमण्या, निर्भीड नि मुक्तपणे फिरणारी हरणाची पाडसे, सरसर झाडावर चढणाऱ्या खारी याशिवाय अन्य प्राणी, पक्षांचे आम्हाला प्रवासात कुठेच दर्शन घडले नाही. येथे पाईन, हेमलॉक या प्रमुख वृक्षांबरोबरच अन्य वृक्षांचे वैविध्य आहे. छायाचित्रकार, पक्षीनिरिक्षक, निसर्गप्रेमी व आमच्यासारख्या सामान्य पर्यटकांना वेड लावणारे निसर्ग सौंदर्य येथे आहे. दरी, डोंगर, नदी, सरोवरे …. त्यांचे रंग, रूप, आकार सारेच कसे मनाला भावणारे!या नैसर्गिक सौंदर्याच्या जोडीलाच पर्यटकांच्या करमणुकीसाठी पार्क व्यवस्थापनाने कांही करमणुकीची साधने उपलब्ध केली आहेत. पार्कच्या प्रवेशद्वारावरच टेनीस कोर्ट, स्वीमिंग पूल, लीग बॉलफिल्ड, क्लब, क्रीडांगण, वाटर स्प्रे पार्क, बॅंडशेल, पिकनिक टेबल …….. साऱ्याच गोष्टी कशा मनाला वेड लावणाऱ्या!  पार्कच्या प्रवेशव्दारवरच मुलांचे मनोवेधक कार्यक्रम सुरू होते. शेजारीच लहान मुलांची मडरेस (चिखलातून धावण्याची स्पर्धा) व त्याच्या बाजूला मोठ्यांची फूटबॉल स्पर्धा सुरू होती. तसा फूटबॉलचा खेळ आम्हाला नवीन नव्हता, परंतु चिमुकल्यांच्या मडरेसने आमचे लक्ष वेधले. पायाखाली चिखल, डोकीवर जाळीसारखे पातळ कापड, त्यावर आयोजकांचा पाण्याचा मारा या साऱ्या दिव्यातून मुलांनी पळत जायचे ….. मोठी कसोटीच होती. त्यात पाच वर्षाखालील पोरं …. त्यांना स्पर्धेच्या अर्थाची अजून उमजही आलेली नसावी, परंतु स्पर्धा जिंकण्याच्या जिद्दिने गुडघाभर चिखलातून ती जीव पणाला लावून धावत होती…. चिखलात तडफडत होती, पडत होती, पण पुन्हा उठून तेवढ्याच ईर्षेने धावत होती. बाजूलाच त्यांचे पालक ओरडून त्यांना प्रोत्साहन देत होते. गोरी-गोमटी, दिसायला नाजूक वाटणारी पोरं…. धावतांना चिखलाने माखली तरी त्याचे त्यांना भान नव्हते … जिंकण्यासाठी ती आपली शक्ती पणाला लावित होती. गोरे, गोमटे, शरीराने नाजूक दिसणारे अमेरिका, युरोपमधील खेळाडू ऑलिंपिक सेपर्धेत पुढे कसे? याचे गुढ मला आता उलघडले. बालपणापासूनच त्यांच्यावर तसे संस्कार करण्यात येतात, त्यांच्यामध्ये ईर्षा, जिद्द निर्माण करण्यात येते, म्हणूनच ती पुढे विविध क्षेत्रात चमकतात. आपले व आपल्या देशाचेही नाव उज्वल करतात. जगात लोकसंख्येत आघाडी घेतलेले आम्ही भारतीय, खेळात सर्वात मागे पडतो. अमेरिका, युरोपच्या गोऱ्या लोकांचा हा आदर्श समोर ठेऊन आमच्या तरूणानीही अशीच जिद्द, देशाभिमान बाळगला तर……. मनात विचार येऊन गेला.

निसर्गाचा चमत्कार नि लोकांमधील कला-कौशल्य पाहून आम्ही स्वत:लाच हरवून गेलो. तेवढ्यात कोणीतरी  म्हणाले,

पोटाबिटाला कांही खाणार की, असेच पहात रहाणार…. ! मी हातातील घड्याळात पाहिले. दुपारचे अडीच वाजून गेले होते. तहान-भूक हरपून आम्ही वेड्यासारखे पहातच होतो. निसर्गाने नि तिथल्या माणसांनीही आमचा चांगलाच विरंगुळा केला होता. मन मारून आम्ही बाहेर पडलो, मोकळ्या मैदानात जागोजागी पिकनिक टेबल व त्याच्या सभोती बसण्यासाठी बाकांची मांडणी केलेली होती. पार्क पाहून आलेले पर्यटक सोबत आनलेला अल्पोपहार घेत होते. आम्हीही एक डायनिंग टेबल गाठला, तेथे बसून अल्पोपहार खाल्ला नि अविस्मरणीय गोष्टी मनात साठवून घरी परतलो.

***

कॅनडामधील पार्क ही निसर्गाची देणगी आहे. कॅनडाने त्यांचे उत्तमरित्या जतन आणि संवर्धन केले आहे. दूरून डोंगर साजरे…. अशी आपल्याकडे म्हण आहे. परंतु येथील पार्क दुरूनच नाही, तर जवळूनही चांगले, मनाला भुरळ घालणारे आहेत. बहूतेक पार्कना समुद्र किनारा भिडल्याने त्यांचे सौंदर्य अधीक खुलून दिसते. या निसर्गदत्त देणगीत  पार्कच्या व्यवस्थापनाने आपल्या कल्पकतेने अधिक भर घातल्याने ते अधिक सुंदर आणि मनोरंजक बनले आहेत. आरोग्यदायी, सुंदर व स्वच्छ वातावरणामुळे येथील पार्क्स लोकांच्या विरंगुळ्याचे, करमणुकीचे माध्यम बनले आहेत. त्यामुळेच देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने या पार्ककडे आकर्षित होताना दिसतात.

हॅलिफॅक्स शेजारील पॉईंट प्लीझंट पार्क, सेंटजॉन येथील रॉकवुड पार्क, आयर्विंग नेचर पार्क, व्हॅंकुव्हर येथील स्टॅनली पार्क, क्वीन एलिझाबेथ पार्क, बेलकेरा पार्क आदी पार्कना मी भेट दिली. प्रत्येक पार्कचे वेगळे असे वैशिष्ट्य आहे. पार्कमुळे कॅनडाच्या  सौंदर्यात आणि समृध्दीतही भर पडली आहे, हेच खरे !

—— (मनोहर) बी. बी. देसाई

बी. बी. देसाई
About बी. बी. देसाई 21 Articles
लेखन : पुनर्वसन कादंबरी, ‘मला भावलेला कॅनडा’ प्रवास वर्णन प्रकाशनाच्या वाटेवर, दैनिक "सकाळ' व "बेळगाव वार्ता'मधून विविध विषयांवर 20 वर्षे लेखन, ज्वाला, जिव्हाळा, अमरदीप दिवाळी अंकातून कथा, लेख व कविता प्रसिद्ध, अमरदीप दिवाळी अंकाचे सात वर्षे संपादक म्हणून कार्य हव्यास : लेखन, वाचन, विविध विषयांवर व्याख्याने, सामाजिक कार्यात सहभाग
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..