नघा प्रकाशनच्या ‘‘मीच एव्हढा शहाणा कसा’’ ह्या पुस्तकातील श्रीकांत बोजेवार ह्यांनी मांडलेले मनोगत
आपण मोठेपणी लेखक व्हावं, असं सर्वसाधारणपणे कोणालाही वाटत नाही किंवा आपल्या मुलाला, मुलीला लेखक होण्याची इच्छा व्हावी असं कुठल्या पालकांनाही वाटत नाही. लेखकच काय, गायक, संगीतकार, चित्रकार व्हावं असंही लहाणपणी कोणाला वाटत नाही किंवा वाटू दिलं जातही नाही. शाळेच्या दिवसांपासूनच या सर्व गोष्टींना ‘एक्स्ट्रा करिकुलर अॅक्टिव्हिटीज’ असं गोंडस नाव दिलेलं असतं. सामान्य मराठी भाषेत या सगळ्याला ‘नसते उद्योग’, ‘लष्कराच्या भाकऱ्या भाजणे’ अशी रोखठोक नावं दिलेली असतात. मराठी भाषेत लपवाछपवी नाही. आज थोडीफार तरी आलेली आहे, एकेकाळी ती अजिबातच नव्हती. विवाह पत्रिके तसुद्धा उगाचच ‘शुभमंगल योजिले आहे’, ‘मंगल परिणय होत आहे’ किंवा ‘दोन जिवांचे मिलन होणार आहे’ असली वाक्ये लिहिण्याची पद्धत आता आता आली आहे. पूर्वी चिरंजिव अमूकतमूक आणि चि.सौ.का. अमकीढमकी यांचा शरीरसंबंध योजिला आहे असं स्पष्टपणे आधीच सांगून टाकलं जायचं.
तर सांगायचं म्हणजे अशा वातावरणात आपण लेखक व्हावं असं सुद्धा कोणाला ठरवता येत नाही, तिथे आपण विनोदी लेखक होऊन स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घ्यावा, असं कुणाला वाटणार?
पण इंजिनीअर, डॉक्टर, मास्तर, क्लार्क असं काहीतरी होता होता आपण लेखकही होऊ असं वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षी कधी तरी वाटू लागलं याचं कारण माझे वडीलही नोकरी करता करता कथा, कविता, मंगलाष्टके लिहित असंत. लोकप्रिय गाण्यांच्या चालीवर गाणी तयार करत. बाबांच्या बोलण्यात, लिहिण्यात विनोद, मस्करी, थट्टा असे. मित्रांच्या मैफलीत वातावरण हसतं खेळतं ठेवण्यात बाबा पुढे असत. नातेवाईंचा गोतावळा जमला की सगळ्यांची अपेक्षा, ‘आता वसंतराव सगळ्यांना ‘ तीन हसवतील’ अशी असे आणि बाबा ती अपेक्षा पूर्णही करत. साठच्या दशकात ‘मिलन’ या चित्रपटातलं ‘सावन का महिना पवन करे सोर’ हे गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. बाबांनी त्याच चालीवर, ‘आजकालच्या तरुणाशी, न लगे हरिनाम, ओठांमध्ये आणि तोंडामध्ये पान’ असं गाणं रचलं, जे आमच्या गावात चांगलंच लोकप्रिय झालं होतं एक चुटका बाबांकडून मी अनेकदा, विविध ठिकाणी ऐकला- एका गृहिणीनं संगीताचा क्लास लावला. एकदा तिचा नवरा ऑफिसमधून घरी आला तर ती गृहिणी शास्त्रीय संगीताची प्रॅक्टिस करत होती- सारे सारे मरे मग मरे धनी.. यावर बाबांना हमखास हास्याची टाळी मिळत असे.
हे सगळं मनात कुठे तरी जिरत गेलं आणि मीही लिहू लागलो आणि ‘ब्रुकबॉण्ड चहा, एकदा पिवूनच पहा’ अशा ओळी एकदा मला सूचल्या तेव्हा वाटलं की, जमतं. बाबांचं शिक्षण जेमतेम त्यामुळे वाचनाला मर्यादा पडायच्याच, पण तरीही घरी पुस्तकं, मासिकं सारखी आणली जात असंत. पुढं माझ्या वाचनाला दिशा मिळत गेली, वाचनाचा विस्तार होत गेला आणि सुदैवानं लिखाणाच्या म्हणजे पत्रकारितेच्या क्षेत्रातच नोकरीही करु लागलो तेव्हा तर पुस्तकांचं विशाल जग माझ्यासाठी खुलं झालं. साहित्याची जाण असणारी माणसं माझ्या अवतीभवती वावरू लागली, चांगलं वाईट काय ते सांगू लागली. चित्रपटांची, चित्रपट संगीताची आवडही बाबांकडूनच माझ्यात उतरली होती. आमच्या घरात सगळ्यांना म्हणजे आम्हा चारही भावंडांना शेकडो गाणी तोंडपाठ आहेत. घरी पहिल्यांदा टेपरेकॉर्ड विकत घेतला तेव्हा त्याच्यासोबत लता-रफी यांच्या गाण्याची तसेच वसंतराव देशपांडे यांच्या गाण्याची अशा दोन कॅसेट फ्री मिळाल्या होत्या. त्यातलं कुठलं गाणं सपलं की कुठलं सुरू होणार हे इतकं पक्कं डोक्यात बसलं की आजही ते लक्षात आहे. लिखाण, विनोदाची जाण आणि चित्रपट हे तीन घटक माझ्यात माझ्याही नकळत एकत्र नांदू लागले आणि योग्यवेळी ते प्रकटही झाले.
-मी चित्रपटांची समीक्षा लिहू लागलो तेव्हा, समीक्षणांची शीर्षके, समीक्षणातील काही वाक्ये यातही हा तिकरसपणा डोकावू लागला. उदाहरणार्थ अमिताभ बच्चनच्या ‘मेजर साहब’ या चित्रपटाच्या समीक्षणाचे शीर्षक मी दिले होते, ‘बच्चन साहेबांची मेजर चूक. ‘ ‘हम साथ साथ है’ ला मी ‘रामायणाचे बोन्साय म्हटले होते.’ ‘अक्का’ या नावाचा एक मराठी चित्रपट आला होता, त्याच्या समीक्षणाचे शीर्षक मी ‘एक मानसिक धक्का’ असे दिले होते. वाचकांना ते आवडत होते आणि लोकसत्ताने ‘रंगतरंग’ ही चित्रपट विषयक पुरवणी सुरू केली तेव्हा त्यात गॉसिप लिहिताना मी सत्य-कल्पिताच्या मिश्रणाला विनोदाची फोडणी देऊ लागलो, त्याला तर फारच मस्त प्रतिसाद मिळू लागला. त्यातूनच पुढे ‘दोन फुल एक हाफ’ हे सदर आणि ‘तंबी दुराई’ हा लेखक जन्माला आला. हे सदर लोकप्रिय झाल्यावर दिवाळी अंकांकडून सतत विनोदी लेखांची मागणी होऊ लागली. ‘गंभीर लिहिणारा आणि विनोदीही लिहू शकणारा’ अशी दुहेरी ओळख आपल्याकडे सहसा कुणाला निर्माण करता येत नाही. कारण शिक्के मारायची आपल्याला फार आवड आहे. परंतु मी त्यात बऱ्यापैकी यशस्वी झालो आहे, असं अर्थात मला वाटतं. जत्रा, आवाज, डोंबिवलीकर, अनुभव, कॉमेडी कट्टा, कालनिर्णय कॅलेंडर अशा अनेक अंकांमध्ये विनोदी कथा – लेख लिहित असतानाच मी पद्मगंधा, ऋतुरंग, रूची, कालनिर्णय दिवाळी, उद्याचा मराठवाडा अशा अंकांमध्ये गंभीर लेख व कथाही लिहिल्या. दोन्ही प्रकारच्या लिखाणाला उत्तम प्रतिसाद मिळत आला आहे. मला चित्रपटांच्या पटकथा, संवाद लिहिताना माझ्या या दुहेरी क्षमतेचा फार उपयोग झाला. विशेषतः संवादांना उपहास, विनोद, तिरकसपणा यांचा फार उपयोग होतो.
विनोदासाठी चौफेर निरीक्षण आणि जगाकडे सतत तिरकसपणे पाहण्याची वृत्ती हवी असते हे फारच बोथट झालेले विधान असले तरी त्याचा आशय बोथट झालेला नाही. कोण कसा बोलतो, कसा वागतो, त्याच्या लकबी, त्याची वक्तव्ये यावर लक्ष ठेवल्याशिवाय सामाजिक-राजकीय विनोद करता येत नाही. माणसांच्या वृत्ती माहिती नसतील तर ‘मीच एवढा शहाणा कसा? ‘ या शीर्षकातली गंमत कळणार नाही. हल्ली बँका अगदी बारिक सारिक कारणांसाठी कर्ज देऊ लागल्या आहेत, त्यावर मला सुतावरुन स्वर्ग गाठण्यासाठी कर्ज मिळेल का?’ असं विचारणारा ग्राहक आणि ‘स्वर्ग गाठण्यासाठी किती सूत लागेल’ असं विचारणारा बँक कर्मचारी हा सामाजिक विनोद कळण्याएवढी प्रगल्भता वाचकाकडेही हवी असते. सुदैवानं मला सतत असा वाचक मिळत गेला आणि त्याची दादही मिळत गेली. ‘बलुतेदारी संपली परंतु आपल्याला महिन्याला विविध बिले द्यावी लागतात. त्यामुळे आता बिलुतेदारी आली आहे,’ हा विनोद समजून घेणारे वाचकही लाभले. पुस्तकातील सर्वच लेखांविषयी इथे लिहित नाही, वाचतांना त्यांची ओळख होत जाईल. विनोद फक्त हसवत नाही, तर तो सावध करतो, चुकीच्या गोष्टींची खिल्ली उडवतो, उपहासाचा शस्त्र म्हणून वापर करतो आणि अनेकदा खंतही व्यक्त करतो.
गंभीर लिखाणाला जसा एक हेतू असतो तसाच तो विनोदालाही असतोच असतो. या पुस्तकातील सर्व लेखही याच पद्धतीचे आहेत. विविध निमित्तानं ते विविध ठिकाणी लिहिलेले असले तरी त्यात हा समान धागा आहेच. शब्दनिष्ठ, प्रसंगनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ अशा सर्व प्रकारच्या निष्ठांना वाहिलेले विनोद यात आहेत.
ज्या दिवाळी अंकांमध्ये, अंकांमध्ये हे लेख पूर्वी प्रसिद्ध झालेले आहेत त्यांचे आभार. माझ्या मागे तगादा लावून हे लेख एकत्र करुन घेऊन त्याला पुस्तकाचे रूप देण्याचा आग्रह धरणारे माझे मित्र, अनघा प्रकाशनाचे श्री. मुरलीधर नाले आणि अमोल नाले यांचेही आभार. पुस्तकाच्या शीर्षकाचा आशय नेमकेपणी चित्रातून व्यक्त करण्याबाबत ख्याती असलेले सतीश भावसार यांनी या पुस्तकाच्या मुखपृष्ठातही ते समर्पकरित्या साधलेले आहे, त्यांना मनापासून धन्यवाद.
‘मीच एवढा शहाणा कसा’ असा प्रश्न पडून, ज्या माणसांमुळे, प्रवृत्तींमुळे मला विनोद निर्मिती करता आली, त्यांचे विशेष आभार. ते असेच वागत-बोलत राहोत आणि माझ्या विनोदाची चूल सतत पेटती राहो, अशी इच्छा व्यक्त करतो.
— श्रीकांत बोजेवार
Leave a Reply