नवीन लेखन...

माझी माणसं – अंश्याबाई आज्जी

लातूरला बस स्टॅन्ड मागे पोचम्मा गल्ली आहे . अनुसूयाबाई तेथे राहायची . अख्खी पोचम्मा गल्ली तिला ‘अंशाबाई आज्जी ‘ म्हणायची . वय साधारण पासष्टी -सत्तरीच्या मध्ये कोठेतरी . ‘आज्जी ‘ कसली ती  पोचम्मा  गल्लीची  ‘बाप ‘ होती  ! चांगली  उंच धिप्पाड , मजबूत देहयष्टी ! अण्णा आमचे वडील अदमासे साडेपाच फूट पेक्षा थोडे उंच पण आज्जी त्यांच्या पेक्षा वित भर उंचच ! ती त्यांच्या दूरच्या नात्यातली ,  आजी . त्याकाळी माणसं जवळची होती ,भलेही नाती दूरची का असेनात ! नवरा गेल्यावर
भावकीतल्या लोकांनी हिला कंगाल करून टाकलं . जमीन जुमला हिसकावून घेतला . कोर्ट कचेऱ्या केल्या पण काही उपयोग झाला नाही . नाईलाजाने आमच्याकडे आली .

गल्लीत कोणी मेल कि ‘
” मड कुठाय ?” असा पुकार करत आज्जी  आधी पाहून येत असे  . आसपासच्या लोकांना काय वाटेल याचा फारसा विचार न करता ‘
” बर झालं शंकऱ्या मेला ! बायकुचा सूड खाल्ला मेल्यान  आयुष्यभर ! वकिलीत लोकांना अडवून नागवलं ! आता काय बरोबर नेलस रे ,चांडाळा ! ” असला शेरा मारून यायची. बरे कोणी  आज्जी ला अडवू  गेले तर ,
” तू बुरखुंडा येवडा होतास तवा पासून तुला पाहतेय ! मला काय वर तोंड करुन शहाणपणा सांगतोस ! ” म्हणून त्याचाच ‘ पंचनामा ‘ व्हायचा !त्या मुळे तिच्या नादी कुणी लागत नसे .

तिला स्वतःच मुलबाळ नव्हतं . तसा पोरांचा तिटकारा नव्हता ,पण पुळकाही नव्हता . अनुभवलेल्या आयुष्याने थोडे ‘कोरडे ‘ पण वागण्या बोलण्यात आले असावे . रडक्या पोरांची मात्र चीड होती .
“कोण भोकाड पसरलाय रे ?” असा आजीनं आवाज दिला कि थोराड पोर सुद्धा चिडीचूप व्हायची . त्याला हि एक कारण होते . एखाद्या आईने ‘बगा हो आजी ,डिगा हटवादी पणा  करतोय ‘ अशी तक्रार अली कि आजी झटक्यात उठायची , लांब ढांगा टाकत यायची , गप्पकन डिग्याला धरायची अन डोळ्यात तंबाखू पिळायची . आठ -दहा वर्षाचा डिग्या  इंगळी डसल्यागत नाचायचा .

तिचा मुक्काम कायम ढाळंजत असे . दुपारी बारा- एक झाला कि गार पाण्याने अंघोळ करायची. वसरीवर कोपऱ्यातल्या  चुलीवर तवा टाकायची . दोन जाड भाकरी , कारळ  – जवस ,असली एखादी चटणी त्यावर कच्च तेल . सोबत चार-दोन हिरव्या मिरच्या ! कधी बेसन तर कधी भरीत, पण सगळं तिखट जाळ ! असलंच ती मरे  पर्यंत जेवली ! कधी गोड धोड नाही कि कधी मऊसूत भाताची हाव केली नाही ! आमच्या घरात पण जेवली नाही . आपल्या स्वतःच्या हातानं करून खायची . गरमागरम कडी मात्र फार आवडायची . स्वयंपाक झाला कि तेथेच चुली जवळ जेवायला बसायची . चुलीतल्या आहाराचे कोळसे उलथण्याने बाहेर ओढून त्यावर थोरला काडीचा वाडगा ठेवायचा अन मग गत काळातील आठवणी सोबत सावकाश तास -दीड तास जेवायची . कारण जेवताना ती कोठेतरी हरवल्या सारखी वाटे . कदाचित नवऱ्या सोबत शेताच्या बांधावरच्या जेवणाची आठवण होत असावी !

भास्करबाप्पा ,आजीचे पती ,देखणे गृहस्थ होते . नीट -नेटके राहायचे . पांढरे फेक -कोंबड्याच्या अंड्या सारखे धोतर , पांढरी बाराबंदी अन कपाळाला पांढरे भस्माचे पट्टे . शिवभक्त . पण आजी फार देवभोळी नव्हती . पूजा  व्रत -वैकल्ये , तिला जमली नाहीत आणि तिने कधी लोकलज्जेस्तव केलीही नाहीत ! ‘ मला सोंग ढोंग नाय जमत ‘ म्हनणायची . फार लहर आलीतर मारुतीच्या देवळात जाऊन , ‘भीमरूपी — म्हणायची , नाहीतर झोपताना ‘कैलास राणा — ‘ बस . देव माणसात असतो किंवा माणसाच्या रूपाने अडचणीला धावून येतो , हे तिचे मत होते . आषाडी -कार्तिकीच्या वारकऱ्याला पिठलं भाकरी मात्र  तिने कधी चुकू दिली नाही . आमचे अण्णा गमतीने म्हणायचे ,
” आजी , आग ते वारकरी पांडुरंगा साठी नाहीतर, तुझ्या पिठलं भाकरी साठी वारी करतात !”

आजीला बसून खाणारे किंवा खाऊन बसणारे आवडायचे नाहीत . मूठभर जोंधळे सकाळच्या परी वासुदेवाच्या झोळीत टाकताना सुद्धा ‘ काय तर काम धंदा कर कि बाबा , किती दिवस असं मागत फिरणार ‘ असे सुनावत असे .
“अक्का , मला कोण कामच देत नाय ! ” एके दिवशी तो वासुदेव म्हणाला
“असं व्हय , मग ये आमच्या रानात ,तण काढायला ! दिन कायतरी  तुला ! “आज्जी म्हणाली .
दुसऱ्या दिवशी पासून त्या ‘ वासुदेवाने ‘ आजीचे घर वर्ज केले !

गावातल्या लेकी -सुनांना आजीचा मोठा आधार वाटायचा . दुपारी तिपरी पाणवठ्यावर , नदीला धुणं धुताना , ‘अंनश्या ‘ असली का काम कस बिनघोर असायचं . कोण्या टग्याची मजाल व्हायची नाही वाकड्या नजरेनं पाहायची ! चार -दोन जणांना आजीचा झटका बसला होता . मागे एकदा, एका टोळभैरावाने एकटी बघून नदी काठी तिची खोड काढली होती . दोन -चार दिवसांनी तो लंगडत काठीच्या आधारानं चालताना लोकांना दिसला. ‘बैलांन ढुशी दिली ‘ म्हणूं सांगितलं .
” बैलांन नाय , अंशाबाईंनी भिक्याला जी ढुसणी दिली म्हणता , गडी कोलमडलाच नदीकाठच्या गोट्यात! लागूंलाग तीन कचकावून त्याच्या पायावर पाय दिला ! काटूक मोडल्यागत आवाज आला ! वर मानती कशी ‘ पुन्ना अशी आगळीक केलीस , तर अश्या जागी पाय दिन कि तुज्या पन्नास एकराला अन दोन वाड्याला वारस वाटीत घ्यावा लागन !’ जहामर्द बाई हाय ! मानलं बा  आपुन !”त्याच संध्याकाळी गांज्याच्या तारेत म्हादबा बरळला होता !
तेव्हा पासून गावात कोणाचं लग्न झाले कि ‘ पोरीकड जरा लक्ष असुद्या ‘ अशी विनंती पोरीचा बाप नवरदेवाला आणि अंशाबाईला सुद्धा करायचा !

आजीच्या वयाच्या म्हणजे साठी पार बहुतेक बाया ‘सोवळ्या ‘ होत्या . क्षोर केलेले डोकि  लाल किंवा पांढऱ्या  नऊ वार साड्यांच्या  , घट्ट कानामागून घेतलेल्या, पदरानी झाकलेली असत . पण आमच्या आजीचा ,तांब्या एवढा बुचडा ! , नवरा गेला तेव्हा ती असेल चाळीशीच्या आसपास . शेतात गड्याच्या बरोबरीने राबायची . ताकतीला अन मेहनतीला तोडीस तोड ! घरातल्या आणि गावातल्या साळकाया -माळकायानी  ‘सोवळी ‘ हो म्हणून घोशा लावला . साम -दाम -दंड -भेद सारे झाले . तिने कशालाच भीक घातली नाही ! आजीने केशवपनास स्पष्ट नकार दिला ! त्याकाळी ते खूप धाडसाचे होते !  शेवटी बळजबरीने एक नाव्ही तिच्या खोलीत सोडला ——पण झाले भलतेच . तिने तंबाखूचा तोबरा भरला होता . मागचा पुढचा विचार न करता तिने तो त्याच्यात थोबाडावर थुंकला ! त्याच्या डोळ्यात आग पडली !तो डोळे चोळूत बोंबलू लागला ! माणसे धावली पण त्यांना थोडा उशीरच झाला होता ! तोवर त्याच्या हातातला वस्तरा घेऊन जमेल तेवढे त्याच टाळकं खरडलं होत !

ती आता खूप थकली होती . संध्याकाळी वाड्याबाहेरच्या प्रशस्थ ओट्यावर पुढ्यात रंगोबाच्या धाकट्या पोराला (म्हणजे मला ) घेऊन बसायची . संध्याकाळी लपाछपी खेळणारी , हुन्दडणारी पोर विझल्या डोळ्यांनी पाहायची . तिची माझ्यावर खूप माया होती . ‘ हा ‘आमचे ‘हे ‘ आहेत ! याचे डोळे बघ त्यांच्या सारखेच आहेत !आणि धारदार नाक सुद्धा ! माझ्यात जीव अडकला असलं , अन मी येत नाही म्हणून हेच आलेत ! माझ्या साठी !’

तिच्या ‘ धाडसी ‘धडपडीच्या  कथेचे तुकडे माझ्या आई कडून ऐकले . ते विसंगत तुकडे जोडण्याचा मी प्रयत्न केलाय . मला ती अजिबात आठवत नाही , मला आठवतोय तो तिचा खरखरीत मायाळू हात , हलकेच पाठीवरून फिरणारा !
— सुरेश कुलकर्णी

—आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . Bye पुन्हा भेटूच 

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..