माझी पहिली वारी

जून महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात श्री. करंदिकरांनी मला वारीला येण्यासंबंधी विचारले. मी अजून पर्यंत वारीला गेलेलो नसल्याने मला तर जाण्याची इच्छा होती. करंदिकरांना तसे कळवताच ते त्या तयारीस लागले. त्यांनी आपल्या पुण्यातील मित्राशी संपर्क साधला व पुणे सासवड या प्रवासाची तयारी केली. सासवडला राहण्यासाठी त्यांनी त्यांच्या

मित्राला फोन करून हॉटेल बुकिंग संबंधी कळवले, व मला तसे कळवले. माझ्या परिचयातील सौ. भोसेकर यांचे कोणी नातेवाईक तेथे राहात असल्याचे माझ्या ऐकिवात होते म्हणून मी त्यांना आमच्या सासवडला जाण्याच्या कार्यक्रमाविषयी बोललो. त्यांनी सासवडला त्यांच्याच घरी राहाण्याचा आग्रह केला व तसे श्री. करंदिकरांनाही कळविण्याबद्दल त्यांनी मला सांगितले. त्यांच्या घरचा पत्ता व तेथे राहण्यासाठी संपर्क म्हणून त्यांच्या भावाचा फोन नंबरही कळवला.

सुरवातीला मी व बाबा असे दोघेजण सासवड येथे जाणार होतो, वारीच्या दृष्टीने सोयिस्कर म्हणून त्यांनी मला, चालताना हात मोकळे राहावेत, अशी सोयीची पाठीवर बाळगायची एक बॅगही दिली, परंतु त्यांच्या हरियाळी या संस्थेतून त्यांना लोणंद येथे देखील काही काम सोपवले, शिवाय सौ. करंदिकरही आयत्यावेळी वारीसाठी तयार झाल्या. मुक्काम काही दिवस वाढल्यामुळे त्याप्रमाणे तयारीस लागलो.

आम्ही ठरल्या प्रमाणे ठाणे येथून मी, श्री. व सौ. करंदिकर शनिवार दि. २८ जून रोजी दुपारच्या AC बसने पुण्याला गेलो, करंदिकरांच्या घरी, धनलक्ष्मी,पौड रोड येथे त्या रात्री मुक्काम केला.

दिनांक २९, रविवारी सकाळी लवकर उठून आम्ही “अभिमान हाइट्स” येथे डॉ. उपळेकर यांचे कडे गेलो. सकाळचा हरीपाठाचा कार्यक्रम झाला. तेथे भावना कुळकर्णी यांनी एक शांतीरसातील भावपूर्ण अभंग त्यांच्या सुरेल आवाजात गायला तो खूपच भावला. प.पू. मामासाहेब देशपांडे यांच्या माऊली ह्या स्मारक मंदिराचे दर्शन घेतले व आम्ही श्री. वागळे यांच्या गाडीने सासवडला जाण्यासाठी निघालो, बरोबर श्री.उपळेकर होते, कार्यक्रमाची सर्व व्यवस्था ते जातीने पहात होते, हातात दोन दोन मोबाईल्स घेऊन आपल्या सहकार्यांना मार्गदर्शन करत होते. अधुन मधून गाडी थांबवून सर्वजण व्यवस्थित मार्गी लागले आहेत याची खात्री करून घेत होते. आमच्या बरोबर तीन चार डॉक्टर मंडळी, आठ दहा स्वयंसेवक व एक मिनिबसरुपी फिरती रुग्णवाहिका व एक टेंपो असा लवा जमा होता. ही सर्व व्यवस्था पुढील पंढरपूर पर्यंतच्या प्रवासात कार्यरत राहणार होती व वाटेत वारकर्‍यांची योग्य ती औषध पाण्याची विनामूल्य सेवा करण्यासाठी सज्ज झाली होती. आह्मी तिघे केवळ सह प्रवासी होतो.

सासवड येथे गेल्यावर प्रथम नाश्त्याची सोय करून सर्वजण दोन एक कि.मि. अंतरावर फिरता दवाखाना घेऊन प्रस्थापित झालो. डॉक्टर मंडळींनी त्यांचा दवाखाना उभा केला.

मी व श्री. करंदिकर डॉक्टरांची परवानगी घेऊन, दिवेघाटातील वारी दर्शनासाठी म्हणून सात एक कि.मि. चालत गेलो, वाटेत कदाचित कोणी लिफ्ट देईल म्हणून जागरुक होतो, पण तसा योग नव्हता, चहापाणी, थोडीशी विश्रांती असे करत सर्व अंतर चालत गेलो व एका कट्ट्यावर निवांतपणे बैठक ठोकली, सासवड हे ठिकाण पुण्याहून अधिक उंचीवर असल्याने हवा खूपच थंड होती, कधी धूप, कधी छाव, कधी अत्यंत बारिक तुषारांचा सुखद पाऊस असे सुरेख वातावरण होते. समोर उजव्या हाताला वळणारा, खूप मोठ्या त्रिज्ज्येचा घाटावर खाली जाणारा लांबच लांब रस्ता दिसत होता, या मोक्याच्या ठिकाणी बर्‍याच वृत्तवाहिन्यांनी आपापले कॅमेरे हे आगळे वेगळे चित्र टिपण्यासाठी सज्ज ठेवले होते. हळू हळू दिंड्या येण्यास सुरवात झाली होती. अथांग, अमर्याद, अनंत अशा विषेशणांना न्याय देणार्‍या वारकर्‍यांच्या, पांढर्‍या रंगाचा पेहेराव, डोईवर फेटा / टोपी, हातात भगवे झेंडे, टाळ, मृदुंगाच्या साथीने “ज्ञानेश्वर मावोली (माऊली) तुकारामा”चा अखंड गजर सुरू असलेल्या न संपणार्‍या रांगा पाहून मन थक्क झाले, ही तर वारीची सुरवात होती, घाटात चालताना आलेल्या थकव्याचे मागमुसही चेहर्‍यावर दिसत नव्हते, चेहर्‍यावर “विठोबाला भेटण्याची” सात्विक ओढ स्पष्ट दिसत होती. भूक, तहान, निवारा किंवा अन्य कोणतेही प्रष्ण / कोणतीही सबब त्यांना सतावत नव्हतॊ, विठ्ठलाप्रती अतूट श्रद्धाच त्यांचे मार्गदर्शन करीत होती.

आम्ही कट्ट्यावर बसल्या बरोबर आणलेली न्याहारी वजा जेवण काढून वाटेत घेतलेल्या फळांसह जेवण उरकले. बसल्या बसल्या वारकरी लोकांचे अवलोकन करीत होतो, अनेक जण अनवाणी होते, काही वारकरी आजारी असल्याचे जाणवत होते, बहुतेक वारकरी हे शेतकरी वर्गातून आल्यासारखे वाटत होते, अनेक जाती, धर्म, लहान वयस्क, सुशिक्षित अशिक्षित, असा तो समुह होता. काही जण वाटेतच त्यांनी आणलेल्या प्लास्टिकवर विश्रांतीसाठी आडवे झाले होते, जमिनीवरील चिखल किंवा उंचसखलपणा ह्याचे त्यांना काहीच वावगे नव्हते. वाटेवर अनेक स्वयंसेवी संस्थांनी, चहा, पाणी, खिचडी, केळी, फळे इत्यादीचे वाटप मोफत करून वारकर्‍यांची सोय केली होती, पोलिस बंदोबस्तही होता. परंतु स्वच्छतेचा मात्र पूर्ण अभाव जाणवला. वाटेतच केळी व फळांची साले, चहासाठी दिलेले प्लास्टिकचे कप, खिचडी साठी दिलेले द्रोण आणि तत्सम कचरा सर्वत्र पसरला होता. वारकर्‍यांची संख्या प्रचंड असली तरी या बाबत काही व्यवस्थापन करण्यास वाव आहे असे वाटले, वारकरी आपली वारी सुरू करण्या अगोदरच ह्या विषयावर त्यांचे स्वयंसेवी संस्थेनी प्रबोधन करणे व वाटेत काही कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची ठिकाणे निर्माण करणे शक्य आहे असे वाटले. वारीचा कार्यक्रम हा पांडुरंगाशी निगडीत आहे आणि परमेश्वराला स्वच्छतेचे काही वावगे नाही. आणि अशी स्वच्छता राखून वारी पार पाडल्यास त्यांच्या एकंदर एरव्ही अनेक वैशिष्ट्ये असलेल्या वारीची खासियत अधिकच वाढेल !!!

वाटेत एका शेतकर्‍याबरोबर संवाद साधण्याचा योग आला. शेतकरी वर्गाची आवक जावक बर्‍या पैकी आहे असे जाणवले, त्यांचे

उत्पन्न जसे छान आहे तसाच खर्चही खूप आहे. वर्षभर त्यांचा कार्यक्रम भरगच्च असतो सुटी अशी नसतेच व वारीतील ते दोन आठवडे हीच त्यांची विश्रांती असते असे समजले. त्यांचे सर्व कुटुंब शेतीसाठी हातभार लावते, मोबाईल, टी.व्ही. लाईटस इ. सर्व सुविधा ते उपभोगतात. विठ्ठलाप्रती अतूट श्रद्धा हीच त्यांची खासियत आहे. नित्त्य हरिपाठ व नित्यनैमित्तिक व्यवहारात चाल ढकल अजिबात नसते.

जसजशा दिंड्या येण्यास सुरवात झाली तसे आम्ही दोघांनी एका दिंडीसोबत चालण्यास प्रारंभ केला, बाबांना अभंग, मृदुंग व टाळ यांच्या नादाचे खूपच अप्रूप आहे ते जाणवले, अनेक वेळा त्यांनी वारी केलेली आहे, अनेक अभंग मुखोद्गत आहेत. जाता जाता जेव्हा माऊलीची पालखी आली तेव्हा पादुकांच्या स्पर्शासाठी बाबांच्या अंगात एकच उत्साह संचारला, धावत धावत त्यांनी ती पालखी गाठली व गर्दीची तमा न बाळगता त्यांच्या मनाप्रमाणे चरणस्पर्श (पादुकांचे दर्शन व वंदन) उरकले. तुलनेत माझी माऊलीप्रत श्रद्धा कमी असल्याने पादुकांच्या दर्शनाची ओढ थोडीशी कमी होती व त्यामुळे माझा चालण्याचा / पळण्याचा वेग कमीच पडला, परंतु संपूर्ण गर्दीत मी, चुकामुक होऊ नये म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवून होतो. या प्रसंगा नंतर मात्र मी बाबांना त्यांची पिवळ्या रंगाची छत्री सतत उघडी ठेवण्याची सुचना केली जेणे करून चुकामुक टाळणे सोपे जाणार होते. सासवड येथे माउलीच्या विश्रांतीची एक जागा निश्चित करून ठेवली होती तिथपर्यंत आम्ही चालत दिंडी सोबत आलो, वाटेत अनेक वेळा पाऊस येत होता, वाटेत चिखलाचे साम्राज्य होते. रात्री ८ च्या सुमारास आह्मी आमच्या मुक्कामा पर्यंत पोचलो, जवळच अल्पोपहार व चहा घेतला, एव्हांना पाय बोलू लागले होते. जवळ जवळ १६ कि.मि. इतके पायी चालणे झाले होते. माझ्या पायातील एका बुटाचे पट्टे निकामी झाल्यामुळे ते घसपटून हलकिशी इजा झाली होती, बॅंडएड लावून त्याचा बंदोबस्त केला.

नऊ वाजण्याच्या सुमारास इतर सहप्रवासी त्यांचा फिरता दवाखाना बंद करून परत आले. जेवणाची तयारी होई पर्यंत आरतीचा कार्यक्रम उरकला, नंतर जेवण उरकून आम्ही तिघे सासवड येथे गावातच दुसर्‍या एके ठिकाणी, श्री. पुरंदरे यांचे घरी जाण्यासाठी निघालो, थोडासा उशीर झालेला होता व गावात सामसुम झालेली होती. पत्ता विचारण्यास शेवटी एका वाड्यात शिरून चौकशी केली. व श्री. पुरंदरे यांचे घर गाठले. ते वाटच पाहात होते. आमची चालून चालून खुप दमछाक झाल्यामुळे आम्ही विशेष गप्पा न मारता पाणी पिऊन झोपेला पसंती दिली.

सासवडची थंड हवा, रात्रीची विश्रांती यांनी आम्ही ताजेतवाने झालो, नशिबाने कोणासहि विशेष त्रास झाला नाही. सकाळची आंघोळ उरकून, श्री. पुरंदरे यांच्याशी संवाद साधला, त्यांनी दिलेला अल्पोपहार उरकून जवळच नदी काठी असलेल्या देवळात दर्शन घेऊन आलो. जेवणाचा आग्रह होत होता परंतु आता आम्हाला पुणे येथे परत फिरण्याचे वेध लागले होते. श्री. पुरंदरे यांचा निरोप घेऊन, त्यांचे आभार मानीत परतीच्या मार्गास लागलो. अर्ध्या वाटेत आम्हाला रिक्षा मिळाली व आम्ही बसस्टॅंड गाठला. लवकरच पुण्याला जाणारी बस मिळाली. पुणा गाठे पर्यंत एक वाजला, वाटेतच किनारा या हॉटेल मधे जेवण उरकले व “धनलक्ष्मी” गाठली. घरातील गॅस संपल्यामुळे थोडीशी अडचण आली, परंतु हॉटप्लेट व मायक्रोवेव्ह ही साधने वापरून सौ. वहिनींनी त्यातून मार्ग काढला. दुपारची विश्रांती घेऊन, चहा पाणी झाले व लहानसा फेर फटका करून आलो. रात्री लवकरच झोप घेतली.

दिनांक १ जुलै २००८ : सकाळी चहा पाणी आटोपून धनलक्ष्मी जवळच असलेल्या एका टेकडी वर फिरायला गेलो, बाबांची काही परिचित मित्रमंडळी तेथे त्यांना भेटली. वारीतील प्रवासाचा अजूनही थोडासा थकवा जाणवत होता. संध्याकाळी आमचा लोणंद येथे जाण्याचा कार्यक्रम आम्ही रद्द केल्याने, परतीच्या प्रवासाचे गुरवार, दि. ३ जुलैचे तिकिट काढले जवळच आम्ही बाबांच्यामुलीकडे, सौ. कान्हेरे यांचे कडे जाऊन आलो, तेथून जवळच माझा मित्र सुभाष जोशी याचे कडेही जाऊन आलो, वाटेत अल्पोपहारचे पार्सल घेतले व रात्री ९ चे सुमारास घर गाठले. जेवण घेऊन विश्रांती घेतली.

दि. २ जुलै २००८ : सकाळी चहा पाणी उरकून टेकडीवर जाऊन आलो, येताना बाबांच्या नात्यातील एका बाईंचे देहावसन झाल्याचे समजले व त्यांचा मुलगा व इतर नातेवाईक सकाळी घरी पोचली, क्रिया कर्म करून नातेवाईकांनी स्नान उरकून घेतली, जेवणे उरकली. मी माझे एक स्नेही मुळ्ये यांचे घरी राहण्यासाठी संध्याकाळी बाहेर पडलो, त्यांचे घरी रात्री जेवण उरकून गप्पांचा कार्यक्रम झाला, मला “तारे जमीन पर” हा पिक्चर बघण्याचा आग्रह झाला थोडावेळ बघून मी झोपेला पसंती दिली.

दि. ३ जुलै २००८ : सकाळी लवकर उठून मी बाहेर जवळच असलेल्या टेकडीवर फिरायला गेलो, तासभरात फिरून आलो, चहा नाश्ता, अंघोळ इ. उरकून जितेंद्र मुळ्ये यांनी नवीनच घेतलेल्या Santro मधून त्याच्या कार्यालयापर्यंत गेलो, त्याचे छोटेसे काम उरकून त्याने मला वनास येथील “धनलक्ष्मी” येथे सकाळी ११ वाजेपर्यंत आणून सोडले, घरी बाबा वाटच पाहात होते, वेळ अचुक पाळल्याबद्दल कौतुक केले. आता आमची परत जाण्याची तयारी तपासून पाहिली, जेवणे उरकली व १२ चे सुमारास बस गाठण्यासाठी मार्गस्थ झालो. घरापासून बसचा थांबा जवळच होता. बसही फार वाट पाहायला न लागता आली. परतीच्या प्रवासात बसमधे फारशी गर्दी नव्हती. जेवणे झालेलीच होती, झोपेचा कार्यक्रम यथावकाश टप्प्या टप्प्यात उरकून घेतला. वाटेतच एका सह प्रवाशाच्या मोबाईल वर मुंबईत काही गडबड होऊन “भा.ज.प.” ने बंद पाळल्याचे समजले, निमित्त होते – हिंदू अमरनाथ यात्रेकरूंच्या विश्रांतीसाठी जम्मू राज्याने दिलेली जमीनेचे वाटप रद्द केल्याचे. हायवेवर काहीही गर्दी नसल्याने बस दणादण पळत होती, अडीच तासातच ठाणे गाठले. घरी जाण्यापूर्वीच रात्रीचे जेवणाचे निमंत्रण देण्यास बाबा विसरले नाहीत.

मी चालतच घर गाठले, ठाणे बंद असल्याने बाजारातून दूध मिळू शकले नाही. शेजार्‍यांकडून घराची चावी घेतली, आयता गरमा गरम चहाही मिळाला. सुदैवाने वीज शाबूत होती, बरेच दिवसांचे कपडे धुण्यासाठीचा “धोबी घाट” कार्यक्रम मशीन वर उरकला, घरात पडलेल्या वर्तमानपत्रांचा धावता समाचार घेतला, थोडीशी डुलकी घेतली, टी.व्ही. वर बातम्या पाहिल्या.

साडे सातच्या सुमारास बाबांच्या घरी गेलो, सहा दिवसांची वारीसह सफळ संपन्न घडवलेल्या यात्रेबद्दल बाबांचे नारळ व श्रीफळ देऊन रीतसर नमस्कार करून आभार मानले, प्रवासात झालेल्या खर्चाचे वाटप केले व माझ्यातर्फे डॉ. उपळेकरांचे आभार पोचवण्याची विनंती बाबांना केली. माझ्या आवडीचे गोडाचे जेवण, जेवतांना वारी बद्दलच्या गप्पा व जेवणानंतर (पा.प.) म्हणजे पान पट्टीने त्या दिवसाची सांगता झाली.

बाबांनी दुसरेच दिवशी तत्परतेने त्यांनी प्रवासात काढलेल्या फोटोंचा “प्रसाद” मेलवर पाठवला.!!! बाबा व कॅमेरा याचे अतूट नाते आहे व ह्या त्यांच्या आवडीने त्यांनी अनेक मित्रगण जमविल्याचे जाणवले.

बाबांमुळे मला प्रथमच वारीचे जवळून दर्शन झाले व त्यात थोडा का होईना सहभाग घेता आला, त्यांचे तसेच सौ. वहिनींची अधिक ओळख झाली, वारीचा आनंद मी मनसोक्त लुटला.

वारी यात्रेतील ठाणे, पुणे येथील सर्व सहप्रवाशांचे आभार !!!!!!!!!!

श्री. करंदीकर यांना मी इ-मेल ने ’वारी दर्शन’ या मथळ्याखाली वर लिहिलेला ’अहवाल’ पाठवला होता, त्याची प्रतिक्रिया त्यांनी खालील शब्दात व्यक्त केली.

Dear Shree ,Instead of Darshan I would call it a Video..You have really described everything in minute details so beautifully.I cannot remember things in details so much.I will have to preserve your article as a prized collection.Specially about my struggle of taking Mauli’s Darshan !Oh ! it is so touching.Thank you so much.Thanks also for the beautiful photographs of the babies with the dogs.with immense Love and peace,

Ram.

N.B.I am writing this message when I am alone at home.My family has yet to return from my elder son’s place.I am sure my wife will enjoy the article.

— श्रीकृष्ण जोशी

Avatar
About Guest Author 515 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…