नवीन लेखन...

मावशी जगो, माय तर जगोच जगो..!!

जगातील मुख्य विकसित देशांचे उदाहरण घेतले तरी हेच दिसून येते कि त्यांच्या देशात त्यांच्याच भाषेचा वापर मुख्यत्वे करून केला जातो. रशिया, फ्रान्स, जर्मनी, जपान, चीन किंवा एक महत्वाचा देश म्हणून उदयाला येत असलेला ब्राझील हे जगातील बलाढ्य व आर्थिक महासत्ता गणले जाणारे देश आहेत. यापैकी कोणत्याही देशात इंग्रजी किंवा अन्य कोणत्याही परकीय भाषेला मुख्य आणि महत्वाचे स्थान नाही. हे सर्व देश आणि त्याची अर्थव्यवस्था आज जगभरात मान्यता पावलेली आहे हे आपण विसरून चालणार नाही. या सर्व महत्वाच्या देशात शिक्षणाचे प्रमुख माध्यम त्या त्या देशांची भाषा आहे हे आपण नजरेआड करून चालणार नाही. या देशांमध्ये इंग्रजी व इतर परकीय भाषा शिकण्यास प्रोत्साहन दिले जाते ते  केवळ संपर्काचे साधन असावे म्हणून, मात्र मुख्य शिक्षण त्या त्या देशांच्या मातृभाषेतूनच दिले जाते.

नुकतेच ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत श्री. भालचंद्र नेमाडे यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद कराव्यात या अर्थाचे विधान केले. खरतर बंदी घालून काहीही साध्य होत नाही असा आपला अनुभव आहे. त्याउलट देशी भाषांच्या शाळांना प्रोत्साहन, देशी भाषांमध्ये उत्तमोत्तम साहित्य, कलाकृती कशा निर्माण होतील याचा विचार करणे गरजेचे आहे. शाळेत शिक्षणाचं मुख्य मध्यम मातृभाषाच असावी. ती सोप्पी, मुलांना आकर्षक वाटेल अशा पद्धतीने शिकवण्याची गरज आहे. मुलांना आपल्या भाषेची रुची उत्पन्न होईल अशी तिची मांडणी व्हायला हवी. ज्यावेळी व्यवहारात देशी भाषांचे  महत्व वाढेल, देशी भाषांना प्राधान्य दिले जाईल तेंव्हाच इंग्रजी भाषेचं महत्व कमी होत जाईल. प्रशासनाची भाषा, न्यायदानाची भाषा देशीच असावी असा आग्रहच नव्हे तर हट्ट असावा. त्यासाठी आंदोलने देखील करण्याची तयारी ठेवावी लागेल तरच देशी भाषांचं महत्व वाढेल. मी कित्येकदा उच्च न्यायालयात कामानिमित्त जात असतो. तेथे कोर्टासमोर फर्ड्या इंग्रजीत वादविवाद चालू असतात. त्या उच्चशिक्षित वकिलांचा अशील जो माझ्यासारखा असतो किंवा बर्याचदा अर्धशिक्षित किंवा अशिक्षित असतो त्याचा एखादा खटला चाललेला असते. हे सर्व पहाताना एक गमतीचा विचार मनात येतो की ज्याच्या भवितव्यासाठी वा ज्याला न्याय मिळवून देण्यासाठी जे विद्वान वकील न्यायाधीशांसमोर वादविवाद करीत आहेत त्या अशिलाला त्यांचे काय चालले आहे हे काहीच कळत नसते. तो भांबावल्या सारखा एकदा या वकिलाकडे तर एकदा त्या वकिलाकडे पाहत असतो. माझीही बऱ्याचदा अशी परिस्थिती होते हा माझा अनुभव आहे.

सरकारी मराठी भाषा तर एखाद्या मराठीचा बऱ्यापैकी जाणकार माणसाला देखील कळणे अवघड जाते तर एखादा ग्रामीण भागातील मनुष्य ती काय समजणार? त्यातील मराठी(?) शब्दप्रयोग तर अनेकदा अनाकलनीय असतात. त्या शब्दांना मराठी का म्हणावे असा प्रश्न पडतो. केवळ याच कारणांमुळे शासनाच्या अनेक चांगल्या योजना सामन्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत हा अनुभव आहे. केन्द्र सरकारी खात्यांचा पत्रानुभव तर हसावं की रडावं या प्रश्नाच्याही पलिकडचा आहे व असतो. मी बॅंकेत नोकरी करत असताना रिझर्व बॅंकेकडून आम्हाला कामकाजाच्या निमित्ताने पत्र यायची. पत्रं अगदी उच्चस्तरीय अस्खलित इंग्रजी भाषेत लिहीलेली असायची पण शेवटी मात्र जाड ठशांत छपाई केलेलं एक वाक्य असायचं ‘ हम हिन्दी मे पत्र व्यवहार का स्वागत करते है’. म्हणजे काय? मग तुम्ही का नाही हिन्दीत पत्र पाठवले? भाषेच्या या अशा माकडचेष्टा आपल्या देशांत सुरू आहेत आणि महाराष्ट्र त्यातही ‘नं. १’ वर आहे.

मराठी ही आपल्या राज्याची राजभाषा असली तरी ती डोक्यावर राजमुकुट घालून फाटक्या कपड्यात मंत्रालायासमोरच्या फुटपाथवर उभी आहे असे काही वर्षांपूर्वी कुसुमाग्रजांनी सांगितले होते..आता इतक्या वर्षानंतर तिची अवस्था आणखीनच दयनीय झालेली दिसत आहे. मराठी माध्यमांच्या शाळा बंद व्हाव्यात या दृष्टीने सर्व बाजून पद्धतशीर प्रयत्न चालू आहेत. यातला सर्वात मोठा वाट आपल्या मराठी लोकांचाच आहे हे त्यात आणखी दुर्दैव आहे. सुशिक्षीत असोत वा अशिक्षित आई बाप मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यात धन्यता मनात आहेत. त्यासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत मुलाला घालणे म्हणजे काहीतरी मोठा अपराध आहे अशी आपली मानसिक धारणा झालेली आहे. मुलगा वा मुलगी convent मध्ये शिकतो हे सांगणे ‘स्टेट्स सिम्बॉल’ झाले आहे. मराठी बोलणे आज मागासलेपणाचे लक्षण मानले जात आहे. मराठी आई-बाप आपल्या पाल्याने इंग्रजीच बोलावे असा दुराग्रह करत आहेत. यात त्या मुलाचे काय हाल होतात या कडे कोणीही लक्ष देण्याच्या मनस्थितीत नाही. समाजातील शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरावरचे आई-बाप देखील महागड्या फिया भरून आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यासाठी काय वाटेल ते करत आहेत. अस का करता, हे बहुतेकांना विचारलं असता उत्तर एकच मिळतं, इंग्लीश छान बोलता येतं म्हणून. पुन्हा इंग्लीश छान बोलता येण्यानं काय होणार असं विचारता, चांगली नोकरी मिळते हे उत्तर मिळतं. म्हणजे आयुष्याचा पाया असलेली वय वर्ष पाच ते पंधरा अशी महत्वाची १० वर्ष केवळ इंग्रजी बोलता येण्यासाठी आणि तीही नोकरी मिळावी म्हणून खर्च करायची हे असं काहीतरी विचित्र चाललंय..! मुलगा दिवसभर ‘स्कूल’ मध्ये काढून घरी येतो तो मम्मी त्याला ‘स्नॅकस’ आणि ‘मिल्क’ देते. तीच मम्मी मिल्क ला दुध म्हणताना तो ऐकतो व दुध म्हणतो त्याला मम्मी हरकत घेते व म्हणते, ‘नो बेटा डोन्ट से दुध, से मिल्क..’. आता पोर गोंधळात, की मग ही का दुध म्हणते..मग ती सांगते कि दुधवाला अशिक्षित आहे आणि त्याला इंग्लिश कळत नाही म्हणून त्याला मराठीत सांगितले. यावर ते पोरग आपल्याशी समीकरण बांधते की मराठी ही अशिक्षित लोकांची भाषा आहे हळूहळू त्याच्या मनात आपली भाषा मागासलेली आहे असा समज पक्का व्हायला लागतो. ते पोरग ज्या समाजात वावरते तेथील शब्दसंपदा व तो जे शिकतो त्या पुस्तकातील शब्दसंपदा यात त्याला काहीच साम्य दिसत नाही. वर उल्लेख केलेला ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटातील प्रसंग या पार्श्वभूमीवर आठवून पहावा.

भाषा म्हणजे केवळ शब्द आणि त्यांची विशिष्ट पद्धतीने केलेली मांडणी नसते तर त्या त्या भाषेतून, त्या भाषेच्या शब्द संपत्तीतून त्या त्या समाजाचा सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीकडे आपोआप पोचवला जात असतो. मातृभाषेतील शिक्षणामुळे एखाद मुल सुसंस्कृत होण्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. शिक्षणाची भाषा मातृभाषाच असावी हे जगभरातील तज्ञ ओरडून सांगत आहेत. मातृभाषेत शिक्षण व किमान एकतरी अन्य भारतीय भाषा शिकण्याने ज्ञान कशा रुंदावतात. मनुष्य जेवढ्या भाषा शिकतो तेवढा तो जगाविषयी सजग होतो पण या सर्वांचा पाया मात्र नि: संशय मातृभाषा असावी.

थोडेसे भाषेच्या शुद्धतेविषयी..

आज जगातील कोणतीही भाषा तिच्या मूळ स्वरुपात नाही हे सत्य आहे. ज्या भाषा जिवंत आहेत त्या भाषांमध्ये शब्दांची देव-घेव सतत चालू असते किंबहुना ती तशी चालू असेल तर आणि तरच ती भासह जिवंत आहे असे समजण्यास काहीच अह्रकत नाही. आज आपण जी शुद्ध (?) मराठी बोलतो वा वापरतो ती तिच्या मूळ स्वरूपापासून खूप वेगळी आहे तरी ती आपली वाटते यात दुमत नसावे. आजच्या आपल्या प्रमाण मराठी भाषेत फारसी, अरबी वा दक्षिण भारतीय भाषांतील अनेक शब्द बेमालून मिसळून गेले आहेत. आपल्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे ‘फडणवीस’ हे आडनाव चक्क फारसी ‘फर्द्नवीस’चा अपभ्रंश आहे  हे वाचून आपल्यालाही आश्चर्य वाटेल  एवढे ते आपले होऊन गेले आहे. मस्करी, मस्ती, महिरप, मातब्बर, बेशरम, अशील, शंकरपाळे या शब्दांच मूळ अरबी वा फारसी आहे हे कोण सांगायला गेले तर आपण त्याला वेड्यात काढू पण ते खर आहे. पटाईत, निरोप, मुलगा या अस्सल मराठी वाटणाऱ्या शब्दांचं मूळ कानडी आहे. टेबल, स्टेशन, सीम-कार्ड असे इंग्रजी शब्द आता ग्रामीण माणसालाही सहज समजतात व ते तसेच लिहिण्यास व बोलण्यास काहीच हरकत नाही. उलट त्यास मराठी/भारतीय भाषेतील मेज, स्थानक असे प्रतिशब्द दिल्याने त्याचा काहीच बोध होत नाही हि वस्तुस्थिती आहे. भाषा शुद्धीचा अतिरेकी आग्रह शेवटी त्या भाषेच्या विनाशाला कारणीभूत ठरू शकतो. इंग्रजी भाषेतील देखील काही शब्द अपभ्रंशीत होऊन समाविष्ट झाले आहेत. उलट अवतार, जंगल, बंगला, गुरु, लुट, महाराज, मंत्र, रोटी असे कितीतरी भारतीय शब्द इंग्रजी भाषेत मोठ्या सन्मानाने विराजमान झालेले आहेत. प्रतिष्ठित इंग्लिश ऑक्सफोर्ड डिक्शनरीत ७०० हून अधिक भारतीय शब्द स्वीकारले गेले आहेत हे आपल्यापैकी अनेकांना माहित असेल-नसेल पण ही वस्तुस्थिती आहे. ज्या दोन किंवा अधिक भाषा कोणत्याही कारणाने एकमेकींच्या संपर्कात येतात तेंव्हा त्यात शब्दांची अदलाबदली होणे हे अगदी नैसर्गिक आहे. त्यामुळे भाषा अशुद्ध झाली किंवा बाटली म्हणण्याचे काहीच कारण नाही. उलट अशा आदान-प्रदानामुळे भाषा समृद्धच होत असतात. हे दोन नद्यांच्या संगमासारखे आहे. नद्यांच्या संगमाला तीर्थक्षेत्राचा मान देणारी आपली संस्कृती या भाषा रुपी नद्यांच्या संगमाला नक्कीच सन्मान देईल परंतु त्याची सुरुवात वा त्यातील मोठेपणा आपल्या जनतेला कोणीतरी समजावून देणे गरजेचे आहे.

– गणेश साळुंखे 

९३२१८ ११०९१ 

३०२, त्रिमूर्ती,
डॉ. भांडारकर मार्ग,
दहिसर (पश्चिम),
मुंबई – ४०० ०१२.

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..