नवीन लेखन...

मॅचिंग मंगळसूत्र

पूर्वीच्या काळी गावागावात, चोपेवर, देवळाच्या पारावर, किंवा एखाद्या मोठ्या वृक्षाच्या सावलीत चौथऱ्यावर त्याचप्रमाणे शहरातील मुख्य चौकात, एखाद्या पानठेल्यावर किंवा नाक्यावर लोक समूहाने एकत्र यायचे. उशिरापर्यंत त्यांचे रात्री गप्पांचे फड बसायचे. त्याच पद्धतीने हल्ली इंटरनेटच्या माध्यमातून, व्हाट्सअप किंवा फेसबुक यांच्या ओट्यावर बसून म्हणू या हवं तर आपण. तर समूहानेच एकत्र येऊन गप्पांचे फड रात्री उशिरापर्यंत भरलेले दिसून येतात.

अशाच गप्पा चालू असताना आमच्या एका मैत्रिणिंच्या समूहावर कोणीतरी पोस्ट टाकली. अर्थात ती चक्क एक मंगळसूत्राची जाहिरात होती. “नवरात्रीनिमित्त मॅचिंग मंगळसूत्र मिळतील”. आणि त्याखाली खूप साऱ्या रंगांची वेगवेगळी मंगळसूत्र.अशी पोस्ट होती ती. लगेच एका खट्याळ मैत्रीणींना विचारले मॅचींग नवरा पण मिळतो का ग? झालं, तिने हे विचारले आणि बऱ्याच जणी भराभरा अवतरल्या ना समुहावर ! बहुतेक जणींनी भुवया उंचावल्या. हे चित्र बघून थोडे सावरते घेण्याचा प्रयत्न केला. म्हटलं, आपण निवडलेला जोडीदार हा मॅचिंग असल्या शिवायच लग्न करतो का आपण त्याच्याशी? दुसरीने लगेच नवरा हा मित्र कसा असावा वगैरे वगैरे समर्पक अशा काही पोस्ट टाकल्या. त्यानंतर थोडा वेळ गेला. आम्हा मैत्रिणींचा हसण्या खिदळण्यात.

जशी रात्र चढत्या क्रमाने वाढू लागली, तसे नेहमीप्रमाणेच माझ्या डोक्यात विचारांची चक्रं ही वेगाने फिरू लागली .दिवसभरात आपल्या कळत नकळत घडणार्‍या गोष्टी, घटना यांचा आढावा मन घेऊ लागले. प्रत्येक गोष्टीचा एक निश्चित अर्थ अशावेळी डोक्यात नक्की होतो. त्यानुसार मन स्थिर होऊ लागते.

संध्याकाळच्या मंगळसूत्राच्या त्या पोस्टने सुद्धा मनात चलबिचल वाढवलेली होतीच. मनात आलं मॅचींग मंगळसूत्र आहे, तर मग त्या अनुषंगाने “मॅचिंग नवरा मिळेल का”? हा प्रश्न किती समर्पक असाच विचारला तिने.

आपल्या भारतीय रूढी-परंपरांमध्ये मंगळसूत्राचे केवढे पवित्र स्थान आहे.सौभाग्य अलंकारातील हा एक प्रमुख दागिना.तो कसा घडवावा? तो कसा असावा? याचे पण काही परंपरागत संकेत आहेत. आधुनिकीकरणाच्या नादात परंपरांना फार पटकन विसरले जाते आपल्याकडून. तसेच काहीसे झाले असणार आणि त्याची परिणती मॅचिंग मंगळसूत्राच्या पोस्टमधून कोणीतरी पसरवली असेल .दुसरीने विचारले तशी ‘मॅचिंग नवरा मिळेल’ अशी पोस्ट अजून तरी कोणी पाठवलेली नाही. लिव्ह इन रिलेशनशिप या संकल्पनेतून ‘मॅचींग नवरा पहिजे’ही संकल्पना उदयास आली तर नवल वाटू नये.

वसुधा खूप सालस सोज्वळ, कुटुंब सदस्यांना एकत्रित बांधून ठेवणारी अशी हुशार. मनासारखा जोडीदार मिळाला. दृष्ट लागावी असा संसारही बहरत गेला .पण दुर्दैवाने नवरा मात्र वाईट सवयींच्या मित्राच्या विळख्यात सापडला. त्यांच्यातीलच एक बनून गेला. त्यातून बाहेर पडण्याची सुतराम शक्यता नव्हती.अशा उद्विग्न मनस्थितीत जर तिला वाटले, मॅचींग नवरा मिळेल का कुठे?तर? माणसाचे मनच ते !काहीही विचार येऊ शकतात,नाही का? या मनात.

वंदना एक होतकरू मुलगी. लग्नाला सात-आठ वर्षे झालेली. दोन छोटी मुलं आहेत पदरात पण तिचा नवरा विपुल अचानक एका अपघातात सापडला. क्षणात होत्याचे नव्हते झाले. तिला नोकरी मिळाली. पण दोन छोट्या बाळांना घेऊन आयुष्याची दोरी ओढणं काही सोपं नाहीये. मजबूत हातांचा आधार मिळणं ही खरी मानसिक गरज आहे आपली. असे भाष्य केले तिने कोणाजवळ. आणि समजून घेणारा नवरा,जोडीदार म्हणून मिळेल का? असे तिचे वाटणे काही चूक ठरेल असे वाटत नाही.

भावना स्वतःच्या पायावर स्थिरावलेली एक सरळमार्गी स्त्री. सुयोग्य जोडीदार मिळवून वीस वर्षे झाली. संसार थाटलेला पण संसारवेलीवर फुल उगवले नाही.पण त्याचेही दोघांनाही अजिबात शल्य नव्हते. समंजस नवऱ्याला एक दिवस अचानक ऑफिस मध्ये काम करत असताना हृदय रोगाचा त्रास झाला आणि त्यात तो कायमचा संपला. जोडीदाराच्या मृत्यूने पोकळी निर्माण झाली, भावना च्या आयुष्यात. वयही अर्धवट धड तरुण नाही आणि वृद्धत्वाकडे झुकलेले सुद्धा नाही. काय बिघडले? तिने आपल्याला साजेसा नवरा मिळेल का? असे विचारले तर?

डोळे उघडे ठेवून बघितले तर, अशा काही परिस्थितीजन्य कारणातून दुसऱ्यांदा ‘नवरा’ या संकल्पने खाली एखाद्या स्त्रीने योग्य जोडीदार निवडला तर? त्यात गैर वाटण्यासारखे काही नाही. ही स्वागतार्ह वस्तुस्थिती आनंदाने स्वीकारावी.

पण थोडीशी गंमत म्हणून हल्लीच्या उच्छ्रंकूल जीवनशैलीत जर एखादी युवती मॅचींग ड्रेस प्रमाणेच मॅचींग नवरा बदलत राहिली तर काय परिस्थिती उद्भवेल ? क्षणभर खरंच गंभीरपणे विचार केला या गोष्टींचा, तर अशा परिस्थितीत एकमेकींच्या नवऱ्याची पळवापळवी होईल. ‘नवरा मिळेल’ अशा जाहिराती झळकतील! गुणवर्णनासह त्याचे मार्केटिंग होईल. भाडे आणि अटी दोन्हीही सांगितली जातील. शिवाय एखाद्या शोभेच्या बाहुल्या सारखी परिस्थिती होईल बिचाऱ्याची !

खरं म्हणजे आजच्या समाजरचनेत, मुलींचे लक्षणीय घटलेली संख्या आणि मुलांचे लग्नाचे वय उलटून जमाना झालेले वय त्यांचे वाढलेले लक्षणीय प्रमाण! अशा परिस्थितीत तात्पुरता मॅचिंग नवरा मिळेल का अशा जाहिरातींना अजून तरी सुरुवात झाली नाही. हे या समाजाचे सुदैवच म्हणायचे.

हल्ली लग्नाच्या बाबतीत मुली फार चोखंदळ बनल्या आहेत. त्यांचे चोचले नखरे फारच वाढलेले आहेत. लग्नासाठी त्या असाव्यात एवढ्या गंभीर नाहीत वगैरे वगैरे वाक्य वारंवार कामी येतात. या विधानांना दोन्ही बाजू आहेत.एक तर मुली भरपूर शिक्षण घेऊन कमावत्या आणि प्रगल्भ विचारांच्या बनल्या आहेत. त्यांना स्वतःची अशी वेगळी स्वतंत्र विचारसरणी आहे. त्यांनी ती उपयोगात आणली तर त्यात चुकीचे काहीच नाही. या पुरुषप्रधान संस्कृतीने मुलींना खालच्या पातळीला ठेवत नेहमीच दुय्यम वागणूक दिलेली आहे. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवत त्यांच्या अंगी मागासलेपण रुजवत ठेवले आहे . त्यांना कायमचे परावलंबित्व बहाल केले. हा सारा इतिहास आधुनिक मुलींना ज्ञात झाला आहे. हे सारे खोडून काढण्याचा चंग मग त्यांच्या मनाने बांधला असेल, तर यात नवल ते काय? आजची मुलगी शिक्षणाने प्रगल्भ आर्थिक दृष्टीने सक्षम स्वयंसिद्ध बनली आहे. असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. याचा परिणाम म्हणून तिची मतं बंडखोर बनली असतील तर असे का होऊ नये? असा प्रतिप्रश्न विचारावासा वाटतो. याचा अर्थ या सर्व परिस्थितीचा दुरुउपयोग करून मुलींनी वागावे. असे अजिबात नाही. आपली निर्णय क्षमता वापरत असताना मुली असो किंवा मुलं त्यांनी आपल्या घरातील इतर मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन आवश्य घ्यावे .त्यांचे अनुभवाचे बोल खूप काही शहाणपण शिकवून जातात. हे अगदी खरे आहे. आपण वयाने, विचाराने, शिक्षणाने प्रगल्भ झालो आहोत म्हणजे दुसऱ्या कोणाच्या मतांचा आदर करूच नये असे होत नाही. समंजस आणि खऱ्या अर्थाने वैचारिक समृद्धी असणारी मंडळी या गोष्टीचा विचार नक्कीच करतात. आजही भारतीय संस्कृतीचे मूळ संस्कार केंद्र आपली कुटुंब पद्धतीच आहे. यावर बहुसंख्य लोकांचा विश्वास आहे. तो कायम राहील अशी आशा बाळगत, काही प्रमाणात का असेना या विरोधी विचारधारा असणारेही याच भारतीय समाजात आहेत. हेसुद्धा नाकारुन चालत नाही. अशांसाठी मंगळसूत्राला जर नवरा किंवा सहकार्याची उपमा दिली तर, हे मंगळसूत्र वारंवार बदलण्याची सवय लागण्याची शक्यता निश्चित व्यक्त करता येऊ शकते.

क्षुल्लक कारणावरून घटस्फोट मागणाऱ्या नवरा बायकोचे न्यायालयीन खटल्यातील प्रमाण बघितले, तर धास्ती वाटते. हे सुद्धा खरेच आहे. किंबहुना घटस्फोटाचे प्रमाण खूप मोठे आहे. ही गोष्ट निश्चितच सामाजिक स्वास्थ्य विचलित करणारी ठरू शकते. तसेच सामाजिक पर्यायाने कौटुंबिक स्वास्थ्य जर कायम बिघडत असेल तर ‘मॅचिंग मंगळसूत्रा’ प्रमाणेच ‘मॅचींग नवरा’ ही मिळेल अशी जाहिरात झळकावयास वेळ लागणार नाही. वेळीच सावध राहून तारतम्याने वागले तर परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते.

तेव्हा, खरंच तरुण मित्र मैत्रिणींनो वेळीच सावध व्हा देशाचा एक सजग आणि प्रगल्भ नागरिक बना असे आवाहन करावेसे वाटते.

© नंदिनी म. देशपांडे.

Avatar
About नंदिनी मधुकर देशपांडे 18 Articles
ललित लिखाणाची खास आवड आहे. मासिकं,दिवाळी अंक, दैनिकातून लेखन करते.'आठवणींचा मोरपिसारा' हा ललित लेख संग्रह प्रकाशित झालेला असून, त्यास प्रथम प्रकाशनाचा पुरस्कार प्राप्त आहे.(२०१६-१७). 'मनमोर'नावाचा ब्लॉग आहे. वाचनाची आवड जोपासणे. शिक्षण. एम.ए. बी.एड. एल.एल.बी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..