नवीन लेखन...

मनस्पंदन..

“पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा.. अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात..”

आयुष्यात आपल्याला सर्वांत जास्त नक्की कोण आवडतं हे ठरवायचं म्हटलं तर थोडं अवघड होईल. कारण आपल्या मनाच्या सर्वांत जवळचं कोण आहे हे ठरवणं जरा कठीणच असतं. रोजच्या जीवनात आयुष्य जगताना आपल्याला अनेक प्रकारची लोकं भेटतात. रक्ताची नाती तर जन्माच्या आधीपासूनच असतात. आयुष्यात भेटणारी, सोबत असणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला आवडेलच असे नाही. पण काही व्यक्तींचं मनातील स्थान हे अढळ असतं. काही व्यक्ती मनाच्या अत्यंत जवळ असतात, तर काही माणसे पिंपळाच्या पानासारखी असतात, जाळी झाली तरी मनाच्या पुस्तकात हळुवारपणे जपुन ठेवावीशी वाटतात.
जाणीव आणि बुद्धी यातून उत्पन्न होणाऱ्या वेगवेगळ्या छटा, भाव-भावना, आचार-विचार, मत, ज्ञान, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, स्मरणशक्ती आणि चेतना या गोष्टी ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणाला मन असे म्हणतात. मन हे माणसाचं एक अदृष्य अवयव असतं. परंतु डोळ्यांना दिसणारी प्रत्येक गोष्ट सत्य असेलच असे नाही आणि सत्याला आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ते डोळ्यांना दिसायलाच पाहिजे असेही नाही. म्हणून मन जरी अदृश्य असले तरी त्याचे अस्तित्व अनुभवता येते, प्रकर्षाने जाणवते. असे म्हणतात की संपूर्ण विश्व हे स्पंदनमय आहे. मनातून निघणारी स्पंदने ही आपल्या मनाला प्रिय असणाऱ्या, जवळ असणाऱ्या व्यक्तीला नक्की जाणवतात. क्षणभर डोळे बंद केले तर त्याच उत्तर बहुतेक मिळेल. कारण पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा.. अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात. उघड्या डोळ्यांना फक्त वरवरचे चेहरे दिसतात, बंद डोळ्यांच्या मनाच्या दृष्टीला मात्र चेहरे दिसत नसले तरी आतलं दिसतं, जाणवतं. बंद डोळ्यांना खूप गरज असतांना साथ देणाऱ्या त्या हाथांचा स्पर्श कळतो, भावनिक साथ दिसते. उघड्या डोळ्यांना फक्त भौतिक सुख आणि सौंदर्य दिसतं, म्हणून ते नेहमी भ्रमात पडतात. पण बंद डोळ्यांचे अनुभव नेहमी खरे ठरतात.
एखादी मनाला भावणारी व्यक्ती जेव्हा आपल्यापासून दूर होते तेव्हा होणारे दुःख हे फक्त आपले मनच जाणू शकते. कधी कधी त्या दुःखाचे प्रतिबिंब डोळ्यातून झिरपते. आकाश असंख्य ताऱ्यांनी भरलेलं असतं, पण आपल्याला तुटलेला ताराच लक्षात राहतो. आठवणी तुटणाऱ्या ताऱ्यासारख्या असतात क्षणार्धात नाहीशा होतात, पण काही क्षणांचा का होईना आनंद देतात. आपण त्या व्यक्तीला टाळू शकतो, त्यांच्या आठवणींना नाही..
काही माणसं आयुष्यातून एकदा निघून गेले की परत येत नाहीत. बहुदा ते गेल्यावरच त्यांची किंमत कळते. का घडतं असं ? मिठाचं महत्व जेव्हा पानात असतं तेव्हा कळतच नाही, नंतर फार उशिरा कळतं. कारण त्यावेळी माणसाचं लक्ष पानात येणाऱ्या गोड पदार्थावर असतं, त्यावेळी गोड पदार्थाची झिंग चढलेली असते. त्या गोड पदार्थाच्या मोहापायी ताटातल्या मिठाकडे जराही लक्ष जात नाही. कारण आपण त्याला कुठेतरी गृहीत धरायला लागतो. त्याचा खारटपणा नकोसा वाटतो. ते आपल्या पानातील इतर पदार्थात मिक्स होऊ नये म्हणून आपणच त्याला स्वतःहून बाजूला करतो. नकोच वाटतात आपल्या आयुष्यात अशी मिठासारखी माणसं कारण ती आपल्या चांगल्यासाठी सल्ला देतात, कधी हक्काने कान धरतात तर कधी पोटतिडकीने समजावून सांगतात. आणि आपल्याला तेव्हा ते सहजासहजी पटत नसतं.
सारा निसर्गसंसार हा मानवी मनाचाच खेळ आहे. मनाचंही विचित्रच असतं.. समोरच्या व्यक्तीच्या एका शब्दानेही तुटेल इतकं नाजूक आणि इतरांना आधार देताना स्वतःच्या दुःखाची पर्वा नसते इतकं कठोर. या मनाला सांभाळण्याच्या प्रयत्नात बुद्धीवादी माणसं ही लयाला जातातं. म्हणून मन जपायला शिकले पाहिजे.
आपल्या भावना मनमोकळेपणाने व्यक्त करणा-याला समोरच्या व्यक्तीच्या उत्तराची काळजी कमी असते. कारण समाधान हे आपले मन मोकळे करण्यात असते. मग पुढे कोणीही असो. आपल्या आजूबाजूला, नातेसंबंधात सर्वांनाच वाटतं की, ‘कुणीतरी आपलं कौतुक करावं, मन भरून गप्पा माराव्यात, आपली प्रशंसा करावी’ ही मायेची भूक सगळ्यांना असते. प्रेरणेचे आणि कौतुकाचे दोन शब्द सुद्धा एखाद्याच्या जीवनात अभूतपूर्व बदल घडवू शकतात. म्हणून त्यासाठी खोटी स्तुती करू नका, त्याऐवजी प्रत्येकातील चांगले गुण शोधा व प्रामाणिकपणे मोकळ्या मनाने त्याचे कौतुक करा. तुमच्या या वागण्यामुळे तुम्ही लोकप्रिय व्हाल. लोक तुमचे बोल एखाद्या खजिन्याप्रमाणे जपून ठेवतील आणि तुम्ही त्यांना विसरले तरी ते मात्र तुम्हाला कायमचे स्मरणात ठेवतील.

फुलं साठवणं सोपं असतं, पण त्याचा सुगंध आपल्याला मनातच साठवावे लागतात. तसचं सुखाचे क्षण हे क्षणिक असतात. त्याना टिकवून ठेवता येत नाही. पण मनात साठवून ठेवल्यावर तेही चिरतरूण राहतात आणि आपणही…

मनस्पंदन..

Shyam’s Blog

 

Avatar
About Shyam Thackare 17 Articles
एक वाचक, एक श्रोता आणि रोजच्या जीवनातून जे अनुभव गाठीशी येतील ते अलगद कागदावर उमटवणारा मी...आणि काही आठवणी, काही अनुभव, काही मतं… लेखणीद्वारे मांडण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न…!
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..