नवीन लेखन...

किल्ले माणिकगड

Manikgad Fort

 

चंद्रपूर हा विदर्भामधील जिल्हा असून धनसंपदेमुळे निसर्गसंपन्न झालेला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या नैऋत्य बाजूला राजुरा तालुका आहे. या तालुक्यामधे माणिकगडाचा वनदुर्ग आहे.

चंद्रपूर हे जिल्ह्याचे शहर गाडीमार्गाने उत्तम पैकी जोडलेले असून नागपूर – वारंगळ या रेल्वे मार्गावर आहे. चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, कोपरना मार्गे अदिलाबाद कडे गाडी रस्ता जातो. या रस्त्यावरील राजुराच्या पुढे साधारण २० ते २५ किलोमीटर अंतरावर चांदूर गाव आहे. चांदूर औद्योगिककरणामुळे चांलेच प्रसिद्धीला आले आहे. चंद्रपूरपासून तास दीड तासात आपण वाहनाने चांदूर पर्यंत पोहचू शकतो.

चांदूर गावाच्या दक्षिणेला १२ किलोमीटर अंतरावर माणिकगडाचा वनदुर्ग झाडीमधे विसावलेला आहे. घनदाट जंगलामुळे माणिकगड लांबून ओळखता येत नाही. चांदूरपासून जीवतीकडे एक गाडीरस्ता जातो. या गाडी रस्त्यावर माणिकगड आहे. माणिकगड सिमेंट चा कारखाना याच परिसरामधे आहे. या कारखान्यासाठी येणार कच्चामाल रोप-वे च्या ट्रॉलीजमधून येत असतो. माणिकगड किल्ल्याकडे जाताना रस्त्याच्या बाजूने जाणार्‍या या ट्रॉलीज आपले लक्ष वेधून घेतात.

या मार्गाच्या बाजुला असलेल्या तलावाच्या फुगवटय़ाचे पाणी ओलांडले की पुढे रस्ता चढणीला लागतो अर्धा डोंगर चढल्यावर डावीकडे मंदिराचा परिसर दिसतो. येथेच गाडीतून पायउतार व्हावे लागते डावीकडील वाट मंदिराकडे तर उजवीकडील कच्चामार्ग किल्ल्याकडे जातो. किल्ल्याच्या दाराजवळ वनखात्याचा स्वागताचा फलक लावलेला आहे. दाराच्या फाटकावर वाघाचे चित्र लावलेले असल्याने आपल्या स्वागताला वाघ ही हजर असू शकतो अशी न कळत सूचनाच वनखातयाने दिल्याची जाणीव होते.

या दरवाजावरील शिल्पे न्याहाळून आपण पुढे निघाल्यावर कातळात कोरुन काढलेला मार्ग लागतो. याच्या बाजुंची उंची पाचसहा फुटांपासून दहाबारा फुटांपर्यंत आहे. या घळी सारख्या मार्गावर दरवाजा आहे. जुन्या दरवाजाचे दगडी अवशेष पहायला मिळतात. पहारेकर्‍याच्या देवडय़ा आहेत. या ओलांडून आत गेल्यावर काहीसा सपाट भाग लागतो. माणिकगड लांबुळक्या आकाराचा आहे. पुर्व बाजुला पुर्वी पूर्ण तटबंदी होती व त्यात जागोजाग बुरुज होते हे आता ढासळलेले आहेत तर काही अर्धवट ढासळण्याच्या मार्गावर आहेत.

पूर्वी परिसरातील अरण्याने माणिकगडाचा भेदकपणा वाढवून बचाव केला होता पण आता गडावर कोणाचेच वास्तव्य नसल्याने आणि दुर्लक्ष झाल्याने आजुबाजुच्या अरण्याने आपला विळखा आवळला आहे. पावसाळ्यानंतर किल्ल्यावर गेल्यावर झाडी झुडुपांच्या मुळे सर्व बांधकाम झाकोळून जाते. उन्हाळ्यामधेच किल्ला पहायला जाणे उत्तम आहे.

सध्या गडचिरोली जिल्ह्यामधे वैरागडाचा किल्ला आहे. येथे नागवंशिय राजा पहीला कुरुम प्रहोद हा होता. या माना जमातीमधील नागवंशिय राजा महीन्दु योन माणिकगड किल्ला ९ व्या शतकात बांधल्याचा उल्लेख आहे. याचे राज्य ९ ते १२ व्या शतकांपर्यत टिकले. पुढे हा प्रदेश गौंड राजाच्या अधिपतयाखाली आला. या माना वंशिय नाग राजाची अग्रदेवता माणिक्य देवी आहे. हिच्या नावावरुनच या किल्ल्याला माणिकगड नाव दिले गेले असावे. पुढे माणिक्यगडाचे अपभ्रंश होऊन माणिकगड झाले.

गडाचे दरवाजे, त्यावरील नागाचे तसेच व्याळाची शिल्पे, तोफ, तटबंदी, बुरुज, बुरुजावरील मुर्ती, तळघर, खोल विहीर, वाडय़ाचे अवशेष असे गडविशेष माणिकगडावर पहायला मिळतात. गडच्या माथ्यावरुन जंगलाचा दिसणारा देखावा आपल्याला मंत्रमुग्ध करतो. जंगलाचे सौंदर्य मनात साठवितच आपण परतीच्या मार्गाला लागतो. जर पुन्हा आपण चंद्रपुरला येणार असू तर वाटेमधील बल्लारपूर येथिल वनखात्याच्या संग्रहालयाला अवश्य भेट द्यायला पाहीजे.

सौजन्य: प्रमोद मांडे (महान्यूज मधून साभार)

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..