नवीन लेखन...

मनन शक्ति

मानवी मनाचा व त्यामध्ये असलेल्या अद्भुत शक्तींचा शोध लावण्याचा प्रयत्न विज्ञानाने केला आहे. आज ह्या मनाची गती खूप तीव्र झालेली बघतो. म्हणूनच मनोरुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. एका मिनिटामध्ये २५ ते ३० विचार चालतात. पूर्ण दिवसामध्ये ४०,००० ते ६०,००० विचार येतात. जर ह्याच गतीने विचार चालत राहिले तर हे मन आणखी कमजोर होऊन जाईल. म्हणून मनाची शक्ती वाढवण्यासाठी मननशक्तीचा उपयोग करणे आवश्यक आहे.

शालेय जीवनामध्ये एखादे उत्तर लक्षात राहण्यासाठी पाठांतर करावे लागायचे. वारंवार त्याच ओळींना मनामध्ये बोलत राहण्याचा अभ्यास केला जायचा. त्या अभ्यासाने चांगल्या मार्क्सनी पास झालो. पण जीवनामध्ये सफल व्हायचे असेल तर मनन शक्तीला वाढवण्याची आवश्यकता आहे. मनन अर्थात एखाद्या बाबीवर केलेले चिंतन. हे चिंतन चांगले किंवा वाईट दोन्ही प्रकारचे असू शकते. चिंतनाची दिशा जर सकारात्मक असेल तर मन शक्तिशाली बनेल पण तेच नकारात्मक असेल तर मन कमकुवत बनेल. कारण विचारांचा प्रवाह कोणत्या दिशेने वाहतो हे बघणे आवश्यक आहे.

आज एखादा श्रेष्ठ विचार मनामध्ये आला पण त्याला कर्मामध्ये आणण्याची शक्ती सर्वांमध्ये नसते. काही विचार मनामध्येच समाप्त होतात. जसे सागरामध्ये उठणाऱ्या लाटा सागरामध्येच विरून जातात. तसेच कित्येक विचार मनामध्ये विरून जातात. एखादा व्यक्ती खूप गरीब असेल, त्याच्यासाठी मोटार, गाडी, बंगला ….. ह्या सर्व गोष्टी स्वप्न असतात. पण एखाद्याने वारंवार ते प्राप्त करण्यासाठी विचार केला व स्वतःला जाणीव करून दिली की मी हे सर्व काही मिळवू शकतो. तर नक्कीच ह्या मनन करण्याने त्यांच्यामध्ये ती क्षमता येऊ शकते व तो जे हवे ते प्राप्त करू शकतो. मोबाईल एक महत्वाचे साधन आहे पण त्याचा वापर करायच्या आधी त्याला रोज कित्येकदा चार्ज करावे लागते. त्याचप्रमाणे एखाद्या महत्वाच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचायचे असेल तर त्याचे मनन करून मनाची शक्ती वाढवण्याची आवश्यकता आहे.

मननशक्तीला आपण पचनशक्ती सुद्धा म्हणू शकतो. शरीराला रोज आपण खाऊ घालतो. खाल्लेले अन्न पचावे म्हणून एका घासाला ३२ वेळा चावावे अशी शिकवण लहानपणी मिळायची. पचनशक्ती चांगली असेल तर शरीर स्वस्थ, निरोगी बनते. खाल्लेले अन्न शरीराची शक्ती बनून पूर्ण शरीराला रक्त पुरवठा करते. तसेच मनन केल्याने आपली मनाची शक्ती वाढते व विचारांची ऊर्जा निर्माण होऊन कार्यक्षमता बळकट होते. तसेच मनन केल्याने एखाद्या विचाराला एकसारखे चघळत राहिले तर त्याचा रस आपल्याला मिळतो व तो विचार बुद्धीद्वारे धारण करण्याची शक्ती आपल्यामध्ये येते. आपणासर्वांना माहित आहे की संबंधांमध्ये सहन करावे लागते, काही परिस्थितीमध्ये ताबडतोब निर्णय घ्यावे लागतात, आपले विचार सकारात्मक असायला हवे…… खूप काही माहित आहे पण त्याला आत्मसात करण्यामध्ये किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये कोणती शक्ती वापरावी ह्यामध्ये गफलत होऊन जाते. अशावेळी बुद्धीद्वारे ते करण्याची शक्ती आपल्यामध्ये तेव्हा येते जेव्हा मनन करून ती समज आपण बळकट केलेली असेल.

एक खेळणी विकणारा मनुष्य होता. त्याच्याकडे ३ बाहुल्या होत्या. ज्या दिसायला एकसारख्या होत्या. पण त्यांची किंमत वेगवेगळी होती. एका बाहुलीची किंमत दहा रुपये, दुसरीची शंभर रुपये तर तिसरीची हजार रुपये होती. एकदा तो खेळणी विकण्यासाठी निघाला. फिरत-फिरत तो राजाकडे आला. राजाला त्या सर्व खेळण्यांमध्ये ह्या तीन बाहुल्या आवडल्या. त्याने खेळणे विकणाऱ्याला त्यांची किंमत विचारली. त्यांची किंमत ऐकल्यावर त्याला प्रश्न पडला की असे काय आहे जे ह्यांच्या किंमतीमध्ये इतके अंतर आहे. तो त्या बाहुल्यांना निरखून पाहतो पण त्याला कळत नाही. तेव्हा तो खेळणी विकणारा व्यक्ती एक तार काढतो व पहिल्या बाहुलीच्या कानात टाकतो. ती तार एका कानात टाकल्यावर दुसऱ्या कानातून बाहेर पडते म्हणून तिची किंमत दहा रुपये. दुसऱ्या बाहुलीच्या कानात टाकतो तर ती तोंडाद्वारे बाहेर पडते म्हणून तिची किंमत शंभर रुपये व तिसऱ्या बाहुलीच्या कानात टाकतो तर ती कुठूनच बाहेर पडत नाही म्हणून तिची किंमत हजार रुपये. राजा समजून जातो की फरक कुठे आहे. आपण ही कदाचित असेच करतो, नाही का ?

खूप काही चांगले ऐकतो वा वाचतो. पण जे ऐकले आहे ते एका कानाने ऐकतो व दुसऱ्याने काढून टाकतो. त्यामुळे जे चांगले ऐकले आहे, त्याची जीवनामध्ये धारणा न झाल्याने कोणते ही परिवर्तन होत नाही. कधी-कधी काहींचे जीवन चरित्र वाचतो. प्रेरणादायी खूप साऱ्या गोष्टी आपल्याला मिळतात. वाचताना आपण सुद्धा तसे वागावे असे ठरवतो किंवा जे चांगले वाटले त्याचे वर्णन ही करतो. पण ते तेवढ्या पुरतेच राहते. कदाचित त्याचा फायदा दुसऱ्यांना होतो. ही पण कोणाला ही न ऐकवता आपण जर त्या सर्व गोष्टी स्वतःच्या जीवनामध्ये उतरवल्या तर नक्कीच आपल्या जीवनाची किंमत वाढते. पण ते आणण्यासाठी मनन करण्याचा अभ्यास असावा.

मनन अर्थात चांगल्या विचारांवर केलेले चिंतन. हे चिंतन करण्यासाठी स्वतःला व्यर्थ किंवा नकारात्मक गोष्टींपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. जसे एका म्यानामध्ये दोन तलवार राहू शकत नाहीत तसेच एकाच वेळी मनामध्ये चांगले आणि वाईट दोन्ही राहू शकत नाही. जसे शरीराचे स्वास्थ्य सांभाळायचे असेल तर एकाचवेळी आपण उकडलेल्या भाज्या आणि त्याचबरोबर वडा, सामोसा नाही खाऊ शकत. साधे भोजन खाण्यापाठीमागचा आपला उद्देश सफल होणार नाही. तसेच व्यर्थ आणि समर्थ दोन्ही प्रकारचे चिंतन एकाचवेळी होऊ शकत नाही. मला मनन करून विचारांच्या शक्तीचा अनुभव करायचा असेल तर मला व्यर्थपासून मुक्त राहून समर्थ संकल्पांचे मनन करण्यासाठी विशेष वेळ काढायला हवा.

ह्या मनन शक्तीने एका साधारण दृश्यावर मनन करून न्यूटनने गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला. अर्थातच मनन चिंतन केल्याने आपण सत्याचा शोध लावू शकतो. जसे जमिनीमध्ये लपलेले खजाने शोधून काढण्यासाठी जमिनीला कितीतरी फूट खोदावे लागते तसेच विचारांच्या खोल दरीत गेल्यावरच आपण अमूल्य रत्न ( बहुमोल विचार ) प्राप्त करू शकतो. जीवनाचा मार्ग सहज आणि सरळ बनवायचा असेल तर सकारात्मक चिंतन करून मनाला शक्तिशाली बनवा. मनन करून जीवनाचे रहस्य समजून घ्या. स्वतःचेच शिक्षक बनून जीवनाचे धडे शिकवा. ह्या चंचल मनामध्ये किती शक्ती लपली आहे ह्याचा अनुभव घ्या.

— ब्रह्माकुमारी नीता

Avatar
About ब्रह्माकुमारी नीता 44 Articles
मी ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये 20 वर्षे समर्पित जीवन जगत आहे. मी एक राजयोग शिक्षिका आहे. meditation व त्याच बरोबर अनेक संस्था, शाळा, कॉलेज, ऑफिस मध्ये जाऊन managment चे courses ही घेते. मराठी वर्तमान पत्रात ही लेखन करण्याचे कार्य करते. विचारांना सकारात्मक कसे बनवावे, तणावमुक्त जीवन, स्पंदन, क्रोधावर नियंत्रण, निसर्गाचे सान्निध्य, शब्द, पालकत्व……..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..