नवीन लेखन...

मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण

गुलाबाच्या झाडावरील काटे मोजत बसण्यापेक्षा त्याची सुंदर फुले मोजा. जो काटे मोजत राहतो त्यांच्यासाठी फुलेही काटेच बनतात. असं असतं आपल्या विचार करण्याच्या पद्धतीचं. तुम्ही जसा विचार करता तसेच घडता.

रतन टाटा यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे. ‘लोखंडाला कोणीही नष्ट करू शकत नाही; पण त्याचा स्वत:चा गंजच त्याला नष्ट करू शकतो.’ तसेच माणसालाही कोणी नष्ट करू शकत नाही; पण त्याच्याच मनाचा दृष्टिकोन त्याला नष्ट करू शकतो. नष्ट होण्याऐवजी श्रेष्ठ बनण्याचा प्रयत्न आपण का बरे करू नये? चला श्रेष्ठ आणि सर्वश्रेष्ठ कसं बनायचं याचा विचार आपण करू.

‘कॅशियस क्ले’ म्हणजेच जगप्रसिद्ध मुष्टियोद्धा मुहम्मद अली. बारा वर्षांचा असताना पासून त्याने आपल्या कोटावर छोटीशी प्लेट लावली. ‘मी सर्वश्रेष्ठ आहे’ असे त्यावर कोरलेले होते. आपण अजिंक्य आहोत, हे तो वेडीवाकडी गाणी गाऊन चारचौघात जाहीरपणे बोलून दाखवायचा. त्याचं ते ब्रीदवाक्य होतं. कधीकधी त्याला हारही पत्करावी लागायची पण तो तीनवेळा जगातला अजिंक्य हेवीवेट मुष्टियोद्धा ठरला. चमत्काराप्रमाणे भासणा-या सगळ्या लोकविलक्षण यशाचं मूळ त्या व्यक्तीच्या सकारात्मक विचारात असतं.

जे मागतात शक्ती,
आभाळ पेलण्याची
देते त्यास आई,
उंची हिमालयाची

मी हे करू शकतो, असा ठाम विश्वास बाळगला व आपल्यात आत्मविश्वासाची शक्ती जागृत केली तर आभाळाएवढी संकटं जरी आली तरी विश्वास बाळगा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. असा सकारात्मक दृष्टिकोन मात्र असावा लागेल.

डेल कारनेगी नावाच्या एका विद्वानाने सकारात्मक दृष्टिकोनाला व्यक्तिमत्त्वाचा आत्माच म्हटले आहे. कारनेगी म्हणतात, यशात ३० टक्के परिश्रम व ७० टक्के दृष्टिकोन यांचा वाटा असतो.

त्याच्याही खूप वर्षे अगोदर तुकोबांनी सांगितले आहे- ‘मन करा रे प्रसन्न,सर्व सिद्धीचे कारण’ म्हणजेच सकारात्मक विचार ठेवा व प्रथम आपण आपलीच ओळख करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आपली क्षमता, आपल्यातले प्लस पॉर्इंट, मायनस पॉर्इंट जाणून घ्यावे व त्यास सकारात्मकतेची झालर जोडावी म्हणजे आपण यश मिळवू शकतो.

संत कबीर आपल्या दोह्यातून आपणास सांगतात-
अपने अपने चोर को,
सब कोय डारै मार
मेरा चोर मुझको मिलै,
सरबस डारू वार
‘अपने आप को पहचानिए’ असेही हिंदीत म्हटले जाते.

व्यक्तिमत्त्व हे त्यावरून घडते. अशा विचारांचे मनन, चिंतन, वाचन माणसाने सातत्याने करावे. हे फारच उपयुक्त ठरते. त्यामुळे स्वत:ची ओळख होते. आपणास सहज इतरांविषयी विचारले की आपण भरभरून त्याच्या गुण-दोषांची थैली उघडतो; पण स्वत:विषयी काही विचारलं तर मात्र बोलण्यास कचरतो. स्वरूप ओळखा असे संत सांगतात. ज्यांना स्वरूप कळाले त्यांनीच जगावर राज्य केले अन् तेच आजही करताहेत.

संत कबीर दोह्यात आपणास हेच सांगतात- जगातले सर्वच आपापल्या शत्रूंना मारून टाकतात. मात्र पकडले न जाणारे मन मला मिळाले तर मी त्याला मारणार तर नाहीच उलट माझे सर्वस्व त्याला अर्पण करेन, त्यांच्याशी मैत्री करेन. स्वत:ची ओळख होण्यासाठी स्वत:चे मन, प्रवृत्ती, कल, सवयी यांचा अभ्यास होणे महत्त्वाचे. एकदा का हा अभ्यास झाला म्हणजे गुण-दोष दिसतात. दोष कमी करत गेलो की मग गुण वाढीस लागतात. आपण काय करतो, का करतो, त्याचे काय परिणाम होणार हे कळते. त्यावेळी आपले मन सापडते.

‘तोरा मन दर्पण कहलाये’ असं दर्पणासमान मन आपणास सारे काही दाखवते. मग काय हा अल्लाऊद्दीनचा दिवा असलेलं आपलं मन हवं ते मिळवून देतं व आयुष्यातल्या अडचणी, संकटे, दु:ख यावर उपाय सापडतो व आपल्या आयुष्याला आकार मिळतो.
आपल्याही आसपास सकारात्मक विचार करून आपल्या स्वत:च्या आयुष्याला, दुस-याच्या आयुष्यालाही आकार देण्याचा सातत्याने प्रयत्न करणारी व्यक्तिमत्त्वे आढळतात. फक्त उघड्या डोळ्यांनी त्यांना अनुभवण्याची गरज असते.

जसा कुंभार ओल्या मातीला आकार देत असतो, प्रसंगी तो धपाटाही देतो व आधारही.
थोडक्यात सांगायचं तर अडचणीपासून कोणीही सुटलेला नाही. अडचणीविना जीवन एक भ्रम आहे. वाळवंटातल्या मृगजळाप्रमाणे अशा जीवनामागे धावून मानसिक व शारीरिक शक्ती वाया घालविण्याऐवजी अडचणी पेलून त्यावर मात करण्यातच खरे कौशल्य आहे. अशा या व्यक्तिमत्त्वापासून गुण घेऊ या अन् म्हणू या ‘सकारात्मक विचारच देतील आयुष्याला आकार’ आणि चला आयुष्य सकारात्मक विचारानं जगू या !

कुसुमाग्रज कवितेतून सांगतात-
कुंभारासारखा गुरू
नाही रे जगात
वरूनी घालतो धपाटा,
आतुनी आधाराचा हात.

— दीपक गायकवाड 

Avatar
About दीपक गायकवाड 33 Articles
दीपक गायकवाड हे महाराष्ट्रातील पहिली ऑनलाईन स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी- "आदित्य ॲकॅडमी" चे क्रिएटिव्ह डायरेक्टर तथा संस्थापक आहेत.

2 Comments on मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..