प्रेमकथा : पूर्वीच्या आणि आजच्या 

प्रेम प्रत्येक माणसाला पडणारं सुंदर स्वप्न. असंख्य भावनाप्रधान माणसांच्या जीवनाचा विक पॉईंट कॅमेर्‍यात बध्द न झालेलं प्रेम व प्रेमकथा आपल्या सभोवतालीच घडत असतात.

प्रेमकथेमुळे भारतीय चित्रपट सृष्टीला कधीच मरण नाही. असंख्यांना भुरळ घालणार्‍या प्रेमकथांनी सामाजिक जीवनावर अधिपत्य गाजवायला सुरुवात केली आहे. आजच्या चित्रपटातील प्रेमकथा पाहून खर्‍या जीवनात त्यांना प्रत्यक्षात आणणे, एवढेच सामान्य ध्येय उराशी बाळगून जगतायेत आजचे तरुण.   पूर्वीच्या चित्रपटातील प्रेमकथेला दर्दभरा साज होता. शब्दांच्या पलीकडे, नयनांची भाषा, हावभाव, एवढे भांडवल पुरत असे. आजच्या प्रेमकथेनं चित्रपटसृष्टीचं वस्त्रहरण करणं सुरु केलं आहे चुंबन, मिठ्या मारणं, कवटाळणं एवढंच बिबवलं जात आहे. समाज जीवनातील भयानकता, वास्तवाला आमच्या तरुणासमोर येतच नाही.


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

आजच्या प्रेमकथांना प्रेमकथा म्हणायचं का हा प्रश्न आहे. आजचा हिरोसुध्दा बलात्काराचा व रत्काळलेला मार्गच निवडतो. येनकेन प्रकारे प्रेयसी मिळवणे, सोप्या शब्दांत पोरगी गटवणे.  “आसमानसे तारे तोडूंगा” म्हणणारे नंतर अकलेचे तारे तोडतात. आजच्या प्रेमकथेला वास्तवतेच्या नावाखाली ओलेती केलंय, उघड केलय. विकृत मनोवृत्तीचे मानसिक रुग्ण तयार केलेत. आजच्या प्रेमकथाला सुगंध नाही कागदी फुलाप्रमाणे त्या आकर्षक वाटतात. भाव ऐवजी आवश्यक हावभाव, भावुकतेऐवजी कामुकता स्त्री-पुरुषांचा भावनिक गुंता वाढत आहे.

उदात्तीकरणाचा स्पर्श जुन्या प्रेमकथा जास्त आहे. तलत, मुकेश, लताचा दर्द आजही जुन्या पिढीचा ठेवा आहे. आज कोवळ्या पोरापोरीची जोडी, संगीत नामक धांगडधिग्याने पेश होत आहे.

हिसेच्या माध्यमातून प्रेमकथा आज वळण घेत आहे. दोन घराण्यातलं वैर दाखवायच त्यासाठी प्रचंड खुनखराबा करायचा. बुध्दिला न पटणार्‍या अनेक गोष्टी, ज्यात तार्किकता औषधालाही नाही अशा गोष्टी येत आहेत. थोडं निसर्ग सौंदर्य, कोवळी मुलं वेगळ्या चेहर्‍याची, संगीत, तरुणांना भावणारं याच मिश्रण जो ते वापरत आहे. वास्तवतेच भान नसलेल्या  हवेत उडणार्‍या लोकांसाठी अशा प्रेमकथा तयार होत आहेत. बहुतेक प्रेमकथा श्रीमंताच्या मुलांला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेल्या असतात. आमचा आजचा युवक ती “प्रेमकथा” पाहातच नाही तर त्यांच्या मागे हात धुऊनच लागतो. इतर सामान्यांना स्वप्न पाहून इतर कामेही करावी लागतात. आज प्रेमकथा घडवल्या जात आहेत व त्याची पुनरावृत्ती समाजात होत आहे. मुलींना छेडणे, पोरगी पटविणे, आत्महत्या इ. गोष्टी या प्रेमकथा समाजास देत आहेत. प्रेम करणे हा सुंदर निरोगी मनाचा आविष्कार आहे. हे जुन्या प्रेमकथेतून प्रतीत होत होतं. प्रेम करणं म्हणजे शरीरे भिडवायची नसून, मनं भिडवणे होय. आई-बापांना गुंडाळून ठेवणारी प्रेमवीरांची जमात आजच्या प्रेमकथेची देणगी आहे.

विवाहबाह्य संबंध – 

आजच्या प्रेमकथातून स्त्रीपुरुष संबंधाचा गुंता, विवाहबाह्य संबंध जास्त गडदपणे दाखविले जातात. प्रत्येकालाच प्रेम हे टिपकागदाप्रमाणे टिपता येत नाही.

आजच्या कामूक प्रेमकथा व भ्रष्ट राजकारणांनी समाज जीवनाचे संदर्भच बदलून गेले आहेत. प्रेमकथा वासनामय होत आहेत. गल्ला भरण्याचं साधन ठरत आहेत. स्त्रीपुरुष संबंधाची विकृत बाजू मुलांच्या भावविश्वात खळबख माजवत आहे.

“ये मेरा प्रेमपत्र पढकर के तुम नाराज न होना” म्हणणारा नायक व “अरे लोगो जरा देखो ये लडका है या लडकी है” म्हणणारी नायिका आपल्याला आज दिसते. “तुम मेरी जिदगी हो” म्हणणारा नायक आज नायिकेला ४२० व्होल्ट म्हणतो. प्रसार माध्यमातील प्रसारामुळे नको तितक्या प्रेमकथा मुलांसमोर येत आहेत. डिश अँटिना व्हिडिओ प्रसारामुळे तरुणांना समाजातील दुःख, दारिद्रय पहायला नको वाटत आहे.  प्रयोगशाळेत वेगवेगळी रसायने मिळवून जसे प्रयोग केले जातात. तशा प्रेमकथा बनवल्या जात आहेत व समाजात त्या घडत आहेत.

आजच्या प्रेमकथेची सुरुवात शालेय जीवनापासूनच होत आहे. कारण अवती भोवती प्रेमकथांचा मारा होत असतो.  यौवनातल्या तरुणांसमोरच नव्हे तर लहान कोवळ्या मुलांसमोर प्रेमकथा येत आहेत. जीवनातलं ध्येय मिळाल्यानंतर किवा मिळविता मिळविता प्रेम ठीक आहे. पण आयुष्याची सुरुवातच प्रेमाने करुन चालणार नाही. पूर्वी समाजातल्या प्रेमकथा चित्रपटाच्या माध्यमांतून यायच्या पण आज चित्रपटातल्या प्रेमकथांचे प्रयोग समाजात होत आहेत.

आजच्या चित्रपटांना “लव्हस्टोरी” अशी जाहिरात करावी लागते. त्यांना प्रेमकथा म्हणायच कां कामकथा म्हणायच असा प्रश्न पडतो.

जीवनातल्या कठिण प्रश्नांची उकल प्रेक्षकांना उल्लू बनविण्यासाठी केली जात आहे. जे जे वास्तवतेत अशक्य आहे ते आजच्या प्रेम कथेत शक्य दाखविलं आहे. स्वतःची तार्किक, चिकित्सक वृत्ती बाजूला ठेवूनच आजच्या प्रेमकथेचा विचार करता येईल.

आजच्या प्रेमकथा तरुणांच्याच नव्हे तर कोवळ्या मुलांच्या जीवनात खळबळ माजवीत आहेत. त्यांना अस्वस्थ, उद्ध्वस्त करीत आहेत. पूर्वीच्या चित्रपटातील प्रेमकथांच्या केवळ आता मोरपंखी आठवणी राहिल्या आहेत.

प्रेमकथांचा प्रवास हा निश्चित सुखावह नाही. आजच्या चित्रपटांनी प्रियकर प्रेयसीच्या प्रेमच फारच उदात्तीकरण चालवल आहे. आत्मकेंद्री होण्यात आपल्या प्रेमकथा भरच घालत आहेत.

आजच्या प्रेमकथेतून सेक्सची विकृत बाजू तरुणासमोर येत आहे. प्रेमकथेतून येणारं सेक्स् सरकार थोपवू शकत नाही व सेक्स एज्युकेशन देण्याबाबत धाडसी पाऊलही उचलत नाही.

तरुणांना नवं ते हवं वाटत. मूल्य, संस्कार यांना वाट दाखविलेल्यांनी प्रेम हेच सर्वस्व मानण सुरु केले आहे.

केवळ हिसाचार, प्रेमकथा या चाकोरीतून आजच्या चित्रपटांनी बाहेर पडलं पाहिजे. करचुकवे भ्रष्ट नायक, विवाहबाह्य संबंधात गुंतलेल्या नायिका व चित्रपटात येण्यासाठी शरीर उघडं टाकणार्‍या वेळप्रसंगी गहाण ठेवणार्‍या नायिका कुणाशीच प्रामाणिक राहायचं नाही असं भासवित आहेत. या आजच्या प्रेमकथा सामाजिक वाटचालीत फार मोठा अडथळा निर्माण करतील याचा धोका ओळखला पाहिजे.

पूर्वी गाणी अवीट होती. आजची गाणी चावट आहेत. आजची प्रेमकथा प््तार्म्युला आहे. आधी रुसवे, फुगवे, अशक्य वाटणारे प्रेम मध्यांतरपर्यंत सुरु होतं. होळीचं गाणं, नायिकेला भिजवायचं, चुंबन, बलात्कार, आलिगन याशिवाय आजची प्रेमकथा बनतच नाही. मुलांनी त्यातून काय घ्यावं. चार-चौघात त्या पाहता येतील का? हा विचार गल्लाभरु निर्माते कशाला करतील?

जीवनातल्या प्रश्नापेक्षा, सिनेमातले प्रश्न, गाणी याचा अभ्यास आजची पिढी जास्त करते आहे. सभोवतालचे  सजीव आदर्श संपल्यातच जमा आहेत. माध्यमे आजच्या माणसांना खेळवत आहेत. त्यांच्यावर प्रभाव टाकीत आहेत. एखादी प्रेमकथा मुलांना दाखवायची नाही. असं पालकांनी ठरवलं तरी टि.व्ही. वर तो चित्रपट येतोच. चित्रहारमधून, रेडिओ, व्हिडिओमधून मुलांवर त्याचा परिणाम होतोच.

आजच्या प्रेमकथा पाहून प्रत्येकालाच प्रेम करावं वाटायला लागलं तर त्याला तुम्ही आम्ही काय करणार? शेवटी प्रेम हा आविष्कार आहे, तारुण्यातील अविभाज्य भाग आहे. पण फिल्मी स्टाईल प्रयत्न प्रत्येकानेच सुरु केल्यावर या समाजाचं कसं होणार?

चित्रपटात पैसे घेऊन प्रेम केलेलं असतं. लग्नाआधी प्रेम, पळून जाणे, नोंदणी विवाह, हत्या काही प्रत्येक तरुणांसाठी आवश्यक बाब नाहीत. प्रत्येकजण त्याच मार्गाने चालल्यास आधीच संपत चाललेली नैतिकता औषधलाही उरणार नाही.

आमच्या चित्रपटातील प्रेमकथेनी समाज जीवनाचे प्रवाह बदलले आहेत. प्रवाहाला थोपवणं अशक्य असले तरी वळण देणं आपल्या हातात आहे. पूर्वीची प्रेमकथा शब्दांच्या पलीकडले भाव व्यक्त करत होती तर आजची प्रेमकथा केव्हाच शरीरापलिकडे पोहचली आहे.

डॉ. अनिल कुलकर्णी
मोबा. नं. ९४०३८०५१५३
ई-मेल – anilkulkarni666@gmail.com
अे-१३, रोहन प्रार्थना, गांधी भवन,
कोथरुड, पुणे ४११ ०३८.

 

डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी 17 Articles
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....