नवीन लेखन...

लातूर फेस्टिव्हलसाठी निमंत्रण

भिवंडी, चेंबूर, सातारा, बडोदे येथे काही कार्यक्रम करून आयोजक दिनेश केळकर यांच्या रोटरी क्लबसाठी मी दिवाळी पहाटचा कार्यक्रम सादर केला. ‘आनंद भारती’ या संस्थेच्या शतकपूर्तीनिमित्त ‘शंभर संगीतकारांची शंभर गाणी’ असा अभिनव कार्यक्रम आखण्यात आला. संगीत संयोजन सुभाष मालेगावकर करणार होता. सलग आठ तास होणाऱ्या या कार्यक्रमाची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेतली जाणार होती. अनेक कलाकारांबरोबर या कार्यक्रमात मी नऊ गाणी गायली. यानंतर आयोजक किशोर कर्नावट यांच्यासाठी एक कार्यक्रम महाबळेश्वरला केला. ठाण्यातील ज्येष्ठ गायिका लीलाताई शेलार यांच्याकडे लहानपणी मी आईबरोबर गाणे शिकायला जात असे. त्यांच्या म्युझिक अॅकॅडमीला पन्नास वर्षे पूर्ण होत होती.

माझे जे दोन शिष्य आज अनेक कार्यक्रम करत आहेत, त्यांचाच कार्यक्रम मी यानिमित्ताने करणार, असे ठरवून लीलाताईंनी माझा आणि शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक सुरेश बापट यांचा कार्यक्रम आयोजित केला. तुमच्या गुरूने तुमचा सन्मान करणे यापेक्षा मोठे जगात काय असू शकते? सुरेश आणि माझ्यासाठी हा कार्यक्रम भावनिक आणि अविस्मरणीय ठरला. डिसेंबरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन ठाण्यामध्ये करण्यात आले. या संमेलनाच्या पूर्वसंध्येला ठाणेकर कलावंतांचा कार्यक्रम नरेन्द्र बेडेकर यांनी सादर केला. या कार्यक्रमात मी गायलो. या संमेलनामध्येच ‘इंडियन मॅजिक आय’ या कंपनीने झी मराठी चॅनलसाठी ‘मराठी संगीत रजनी आयोजित केली. या कार्यक्रमातही मी गाणी सादर केली. माझ्याबरोबर मृदुला दाढे-जोशी, विनायक जोशी, नंदेश उमप, अनघा ढोमसे, अतुल परचुरे आणि सुबोध भावे हे कलाकार होते. माझा रेकॉर्डिस्ट मित्र प्रमोद कैलास या वेळी ‘इंडियन मॅजिक आय’ या कंपनीत काम करत होता. ‘गाऊ विठोबाचे नाम’ या माझ्या पहिल्या अल्बमपासून माझी अनेक गाणी त्याने रेकॉर्ड केली होती. या कार्यक्रमाच्या मध्यंतरात प्रमोदने माझी भेट घेतली. “अनिरुद्ध, माझे एक महत्त्वाचे काम तुझ्याकडे आहे. आम्ही लातूर फेस्टिव्हल- २०११ चे आयोजन करत आहोत. यामध्ये एक मोठी सुगम संगीत स्पर्धा घेतली जाणार आहे. यात अंतिम फेरीच्या स्पर्धकांची निवड झाल्यावर त्यांच्यासाठी आम्ही उत्तम गाणे सादर करण्यासाठी चार दिवसांची कार्यशाळा घेणार आहोत. तुझ्याकडे इंडियन आयडॉलसारख्या मोठ्या स्पर्धेचा अनुभव आहे. तेव्हा हे काम तू करावेस आणि या अंतिम स्पर्धेचा परीक्षक म्हणून देखील असावेस असे मला वाटते.” प्रमोद म्हणाला. “मी हे काम नक्की करेन प्रमोद !” मी उत्तरलो. एकूण २०१० हे वर्ष मला एक नवीन काम देऊन जात होते.

लातूर फेस्टिव्हल २०११ साठी मी ४ जानेवारी २०११ रोजी लातूरला निघालो. मराठवाड्यात जाण्याची माझी पहिलीच वेळ होती. पण तेथील माणसे अत्यंत प्रेमळ होती. सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन अजय पांडे यांच्याकडे होते. हा माणूस हिंदू, उर्दू आणि मराठी गझलचा निस्सीम चाहता होता. स्वतः ते गझलच्या रचनाही करत. अंतिम फेरीत पोहोचलेल्या अनेक स्पर्धकांना सुगम संगीताचे शिक्षण मिळाले नव्हते. त्यांच्यासाठी ही कार्यशाळा गरजेची होती. सलग चार दिवस मी त्यांच्यावर मेहनत घेतली. त्यांच्यात खूपच फरक पडला आणि तो अंतिम स्पर्धेच्या त्यांच्या गायनातून दिसला. या स्पर्धेचे माझ्याबरोबरचे दुसरे परीक्षक संगीतकार मिलिंद जोशी होते. त्यांनी हा फरक बोलूनही दाखवला. ही सुगम संगीत स्पर्धा आणि एकूणच लातूर फेस्टिव्हल २०११ यशस्वीरीत्या पार पडले.

घरी परतल्यावर ‘गीत जगमगाएँ रागोंके’ हा शास्त्रीय रागांवर आधारित हिंदी व मराठी गाण्यांचा कार्यक्रम बेडेकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह थोरले बाजीराव पेशवे सभागृहात मी सादर केला. निवेदन भाऊ मराठे यांचे होते. या कार्यक्रमाला रसिकांची उत्तम दाद मिळाली.

यानंतर आमच्या स्वर – मंच म्युझिक अॅकॅडमीच्या सुशोभिकरणाचे काम आम्ही सुरू केले. आचार्य बिल्डींग येथे स्वर-मंचची दुसरी ॲकॅडमी उभी रहात होती. कुशल इंटिरिअर डेकोरेटर गणेश अंबिके यांनी हे काम केले. काही महिन्यातच या ॲकॅडमीचे उद्घाटन आमदार एकनाथ शिंदे आणि अरुण सोनाळकर यांच्या हस्ते झाले.

-अनिरुद्ध जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..