( पूर्वप्रसिद्धी – ‘क्रिक कथा’ दिवाळी अंक – २०२३ [संक्षिप्त स्वरूपात] )
अनेकदा आपण बघतो की मुलं आपल्या आई-वडिलांचा किंवा थोरल्या भावंडांचा व्यवसाय/पेशा स्वतःसाठी स्विकारतात आणि त्यात यशस्वीदेखील होतात. कला,क्रीडा क्षेत्रातही अशी काही उदाहरणे आढळतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येसुद्धा आपल्याला अश्या काही वडील-मुलगा किंवा भावा-भावांच्या जोड्या आढळतील. पटकन आठवणारी नावे म्हणजे : अमरनाथ, मांजरेकर, मंकड, ब्रॉड ईत्यादी पिता-पुत्र तर गुप्ते, चॅपेल, वॉ, हसी, पंड्या वगैरे भावांच्या जोड्या. पण मंडळी, त्याही पुढे जाऊन अशी काही क्रिकेटमयी ‘सख्खी’ कुटुंबे आहेत ज्यातील ‘दोनपेक्षाही अधिक’ सदस्यांनी ‘आंतरराष्ट्रीय’ क्रिकेटमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. मराठी रसिकांना विसुभाऊ बापट यांचा “कुटुंब रंगलय काव्यात” कार्यक्रम चांगलाच परिचित असतो. त्याच धर्तीवर अश्या क्रिकेटनिपुण कुटुंबांना बघितल्यावर म्हणावेसे वाटते – “कुटुंब रंगलय क्रिकेटमध्ये”!
आपल्या भारतापासून सुरुवात करायची झाल्यास सर्वप्रथम लक्षात येते ते म्हणजे “अमरनाथ” कुटुंब. १९३३ साली ‘लाला’ अमरनाथ यांनी मुंबईत ‘बॉम्बे जिमखान्या’वर इंग्लंडविरुद्ध पदार्पणात झळकावलेले शतक भारतासाठी पहिले कसोटी शतक ठरले. २४ कसोटी खेळलेले लाला चांगल्यापैकी मध्यमगती गोलंदाजही होते. निवृत्तीनंतर निवड समिती अध्यक्ष आणि समालोचक म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली. त्यांच्या तीन मुलांपैकी मधला ‘मोहिंदर’ सर्वात यशस्वी ठरला. अनेकदा भारतीय संघात आतबाहेर झालेल्या आणि १९६९ साली पदार्पण केलेल्या मोहिंदरची कारकीर्द दोन दशके चालली. अतिशय जिद्दी, लढाऊ फलंदाज अशी ख्याती असलेला मोहिंदर उपयुक्त मध्यमगती गोलंदाजही होता. १९८२-८३ या कारकिर्दीतील सोनेरी कालखंडात त्याने कसोटीत खोऱ्याने धावा काढल्या, आणि ८३ विश्वचषकाच्या उपांत्य आणि अंतिम फेरीत आपल्या अष्टपैलू खेळाने सामनावीराचा बहुमान मिळवताना भारताला प्रथमच विश्वचषक मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. लालांचा मोठा मुलगा ‘सुरिंदर’ याने १९७६ साली पदार्पणात कसोटी शतक झळकवत झोकात सुरुवात केली पण तो धडाका कायम न राखता आल्याने फक्त १० कसोटी आणि ३ वन-डे खेळून तो अंतर्धान पावला. लालांचा धाकटा मुलगा ‘राजिंदर’ फक्त प्रथम दर्जाचे क्रिकेट खेळला.
→ जालंधर येथे जन्मलेले मेजर ‘सय्यद वजीर अली’ दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या भारताच्या सर्व सातही कसोटी सामन्यात सहभागी झाले. आक्रमक फलंदाज असलेले वजीर कामचलाऊ गोलंदाजी टाकीत. फाळणीनंतर वजीर पाकिस्तानात स्थायिक झाले. वजीर यांचा धाकटा भाऊ ‘सय्यद नझीर अली’ हा देखील भावाप्रमाणे आक्रमक फलंदाज आणि त्याच्याहून चांगला मध्यमगती गोलंदाज होता. पण भारतासाठी तो केवळ दोन कसोटी खेळू शकला. तर वजीर यांचा फलंदाज असलेला मुलगा ‘खालीद वजीर’ हा ‘पाकिस्तानसाठी’ दोन कसोटी खेळला.
→ १९१० साली जालंधर मध्ये जन्मलेले ‘मोहम्मद जहांगीर खान’ मध्यम-तेज गोलंदाज आणि आक्रमक फलंदाज होते. ते भारतासाठी चार कसोटी खेळले आणि फाळणीनंतर पाकिस्तानात स्थायिक होऊन एक खेळाडू, प्रशिक्षक आणि निवडकर्ता म्हणून तेथील क्रिकेट घडवण्यात मोलाची भूमिका बजावली. जहांगीर यांचा मुलगा ‘माजिद खान’ याने पाकिस्तानसाठी एक आकर्षक, आक्रमक फलंदाज म्हणून आपला काळ गाजवला. ६३ कसोटी आणि २३ एकदिवसीय सामने खेळलेल्या माजिदने उपयुक्त ऑफ-स्पिन गोलंदाजी करत काही सामन्यात पाकिस्तानचे नेतृत्वही केले. तर माजिदचा मुलगा ‘बाजीद खान’ याने पाकिस्तानसाठी फलंदाज म्हणून १ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने खेळले. तसेच जहांगीर खान यांचे पुतणे इम्रान खान आणि जावेद बर्की यांनीही पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले.
→ पाकिस्तानमधील एक क्रिकेटमय कुटुंब म्हणजे चार ‘मोहम्मद’ बंधू आणि थोरल्या हनिफचा पुत्र ‘शोएब’. लिटल मास्टर ‘हनिफ मोहम्मद’ म्हणजे पाकिस्तानच्या सर्वकालिक महान फलंदाजांपैकी एक. वेस्ट इंडिज विरुद्ध ९७० मिनिटांत ३३७ धावांची सर्वात संथ खेळी त्याच्या नावावर आहे तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४९९ धावांवर धावबाद होण्याची अनोखी नोंदही. अतिशय तंत्रशुद्ध, सरळ फलंदाजीसाठी प्रसिद्ध हनिफने खंबीर नेतृत्वही केले. त्याचा भाऊ ‘मुश्ताक’ याने अतिशय लहान वयात कसोटी संघात स्थान मिळवले. ५७ कसोटी आणि १० एकदिवसीय सामने खेळलेला मुश्ताक फलंदाजी बरोबरच चांगली लेग-ब्रेक गोलंदाजीही करत असे. ‘रिव्हर्स स्वीप’ फटक्याचा जनक म्हणूनही मुश्ताककडे पाहिले जाते. त्यांचा ‘वजीर’ हा भाऊ २० कसोटी खेळला जो ‘नॅशनल बँक ऑफ पाकिस्तान’मध्ये बँकर म्हणूनही काम करत असे. सर्वात धाकटा ‘सादिक’ हा सर्व भावांत एकमेव डावखुरा फलंदाज होता. तो पाकिस्तानसाठी ४१ कसोटी आणि १९ एकदिवसीय सामने खेळला. यांचा आणखी एक भाऊ ‘रईस’ फक्त प्रथमश्रेणी क्रिकेट खेळला. हनिफचा मुलगा ‘शोएब’ हा अतिशय संयमी, एकाग्र सलामी फलंदाज होता. कामचलाऊ फिरकी गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असलेला शोएब ४५ कसोटी आणि ६३ एकदिवसीय सामने खेळला.
→ अष्टपैलू ‘मंझूर इलाही’ १९८४ ते १९९५ दरम्यान पाकिस्तानसाठी ६ कसोटी आणि ५४ एकदिवसीय सामने खेळला. आपल्या वादळी फलंदाजीने त्याने काही वन-डे सामने पाकिस्तानला जिंकून दिले. तर फलंदाज असलेला त्याचा भाऊ ‘झहूर इलाही’ २ कसोटी आणि १४ एकदिवसीय सामने खेळला. मात्र तब्बल २५ वर्षे तो प्रथमश्रेणी क्रिकेट खेळत राहिला. त्यांचा धाकटा भाऊ ‘सलीम इलाही’ याने क्रिकेटजगताचे लक्ष्य वेधून घेतले ते १९९५ साली पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात ठोकलेल्या शतकाने. हा पराक्रम त्याने अवघ्या १९ व्या वर्षी केला आणि तेही त्याआधी एकही प्रथमश्रेणी सामना न खेळता. मात्र अशी धमाकेदार सुरुवात होऊनही सातत्याअभावी त्याच्या नावावर १३ कसोटी आणि ४८ एकदिवसीय सामनेच लागले.
→ पाकिस्तानच्या नामवंत आणि वाचाळ यष्टीरक्षकांपैकी एक म्हणजे ‘मोईन खान’. ६९ कसोटी आणि २१९ एकदिवसीय सामने खेळलेल्या मोईनला नेहमीच रशीद लातिफची कडवी स्पर्धा झेलावी लागली. १९९२च्या विश्वविजेत्या पाकिस्तान संघातील तो एक प्रमुख युवा खेळाडू होता. त्याचा मोठा भाऊ ‘नदीम खान’ डावखुरा फिरकी गोलंदाज होता जो केवळ २ कसोटी व २ वन-डे सामने खेळला. मोईनचा यष्टीरक्षक असणारा मुलगा ‘आजम खान’ आतापर्यंत ५ टी२० सामने खेळलाय जो आपल्या भरभक्कम, गोलमटोल शरीरयष्टिने जास्त लक्ष वेधून घेतो.
→ पाकिस्तानचा यशस्वी यष्टीरक्षकांपैकी असलेला म्हणजे ‘कामरान अकमल’. ५३ कसोटी, १५७ वन-डे आणि ५८ टी२० खेळलेल्या कामरानच्या खेळात अजिबात सातत्य नसे. कधी सुंदर फलंदाजी तर कधी अगदी वाईट, कधी उत्कृष्ट यष्टीरक्षण तर कधी अगदी गचाळ. त्याच्याहून लहान भाऊ ‘अदनान अकमल’ हा तिन्ही भावात उत्कृष्ट यष्टीरक्षक होता तरी त्याला २१ कसोटी आणि ५ वन-डे सामान्यांतच संधी मिळाली. तर धाकटा ‘उमर अकमल’ हा सर्व भावंडांत सर्वात प्रतिभाशाली मानला जातो. यष्टीरक्षणापेक्षा फलंदाजीत त्याचा जास्त बोलबाला असून त्याने पहिल्याच कसोटीत आणि तिसऱ्याच वन-डेत शतक ठोकले आहे. पण फॉर्ममधील उतारचढाव व वादग्रस्त स्वभाव यामुळे सतत संघाच्या आतबाहेर होणाऱ्या ३३ वर्षीय उमरने आपल्या खेळ व वर्तनावर लक्ष दिल्यास अजूनही पाकिस्तान क्रिकेटमध्ये आपले योगदान देऊ शकतो.
→ इंग्लंडमधील ऋषितुल्य क्रिकेट-घराणे म्हणजे ‘ग्रेस’ कुटुंब. यातील सर्वात प्रसिद्ध म्हणजे ‘WG’ अर्थात ‘विल्यम गिलबर्ट ग्रेस’. १८४८ मध्ये जन्मलेल्या विल्यम यांनी वैद्यकीय पदवी घेतली होती. ते २२ कसोटी खेळले पण विशेष म्हणजे तब्बल ४४ वर्षे प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले. यात त्यांनी ५४,०००च्या वर धावा केल्या आणि २८०० च्या वर बळी घेतले. तसेच ५०व्या वर्षी इंग्लंडसाठी कसोटी खेळली. ३४ वर्षे प्रथमश्रेणी क्रिकेट खेळलेला त्यांचा मोठा भाऊ ‘एडवर्ड मिल्स ग्रेस’ आणि धाकटा भाऊ ‘जॉर्ज फ्रेडरीक ग्रेस’ हे मात्र इंग्लंडसाठी केवळ एकच कसोटी खेळू शकले. तर या घराण्याची हेन्री, नॉर्मन, चार्ल्स, विल्यम ही पुढची पिढी प्रथमश्रेणी क्रिकेट खेळली तरी त्यांना इंग्लंडचे प्रतिनिधित्व करता आले नाही.
→ १८५८ मध्ये जन्मलेला ‘फ्रँक हर्न’ असा विशेष क्रिकेटपटू होता जो इंग्लंडसाठी २ कसोटी खेळला तर आरोग्याच्या कारणास्तव केपटाउन येथे स्थायिक झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेसाठी ४ कसोटी. जेव्हा तो द. आफ्रिकेसाठी पदार्पण करत होता तेव्हाच त्याचे दोन सख्खे भाऊ इंग्लंडसाठी पदार्पण करत होते. पण अष्टपैलू ‘अॅलेक हर्न’ आणि ‘जॉर्ज हर्न’ यांच्या नशिबी हा एकच कसोटी सामना होता. तर फ्रँक याचा मुलगा ‘जॉर्ज अल्फ्रेड लॉरेन्स हर्न’ याच्या नावे द.आफ्रिकेसाठी यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून ३ कसोटी सामने लागले.
ऑस्ट्रेलियाच्या ‘व्हिक रिचर्डसन’ने १९२४ ते १९३५ या कालावधीत १९ कसोटीत खेळताना कर्णधार व नंतर समालोचक म्हणून आपली छाप सोडली, तसेच इतर अनेक खेळातही कौशल्य सिद्ध केले. त्याच्या तीन नातवंडांनी म्हणजे ‘इयान, ग्रेग व ट्रेव्हर’ या ‘चॅपेल’ बंधूंनीही ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. ७५ कसोटी आणि १६ वन-डे खेळलेल्या फटकळ स्वभावाच्या ‘इयान’ने फलंदाजी बरोबरच कप्तान आणि समालोचक म्हणून जगभर नाव कमावले. तर ८७ कसोटी आणि ७४ वन-डे खेळणारा ‘ग्रेग’, १९७५-८५ या काळात गावसकर व विव्ह रिचर्डस यांच्या बरोबरीने महान फलंदाज म्हणून गणला जाई. आपल्या पहिल्या आणि अखेरच्या कसोटीत त्याने शतक झळकावले. मात्र तो भारताचा प्रशिक्षक असताना गांगुली व इतर ज्येष्ठ खेळाडुंबरोबर झालेल्या कडवट मतभेदांमुळे, तो आपल्याकडे तसा अप्रियच आहे. धाकटा ‘ट्रेव्हर’ आपल्या मोठ्या भावांइतका गुणवान नव्हता. फक्त ३ कसोटी आणि २० वन-डे खेळलेला ट्रेव्हर लोकांच्या स्मरणात राहिला तो, किवींविरुद्धच्या वनडे सामन्यात सामना न हरण्यासाठी शेवटचा चेंडू सरपटी टाकल्यामुळे.
→ ऑस्ट्रेलियाचा तीन सामने खेळणारा ‘डेव्हिड विल्यम ग्रेगरी’ हा १८७७ मध्ये क्रिकेट इतिहासातल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्यावाहिल्या कसोटीत संघाचा कर्णधार होता. त्याचा भाऊ ‘नेड ग्रेगरी’ हाही त्या पहिल्या व आपल्या एकमेव कसोटीत खेळला आणि कसोटीत शून्य करणारा तो पहिला खेळाडू ठरला. नेडचा सिडनी मैदानावर जन्मलेला ‘सिडनी एडवर्ड ग्रेगरी’ हा मुलगा ५८ कसोटी खेळला, ६ कसोटीत नेतृत्व केलं आणि कव्हर्समधील चपळ क्षेत्ररक्षक म्हणून गाजला.
→ ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ‘जेफ मार्श’ १९८७च्या विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा सदस्य होता. त्याची डेव्हिड बून बरोबरची जोडी चांगलीच यशस्वी ठरली. ५० कसोटी आणि ११७ वन-डे खेळलेल्या जेफचा मोठा मुलगा ‘शॉन’ याने २०११ मध्ये कसोटी पदार्पणात शतक करत जोशात सुरुवात केली पण ३८ कसोटी, ७३ वन-डे व १५ टी२०च्या पुढे तो जाऊ शकला नाही. जेफचा धाकटा मुलगा अष्टपैलू ‘मिशेल’ काही कसोटी खेळला असला तरी तो सध्या प्रामुख्याने वन-डे व टी२० स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जातो.
→ न्यूझीलंडमधील क्रिकेट विश्वस्तरावर स्थापित करण्यात १९१५ मध्ये जन्मलेल्या, ११ कसोटी खेळलेल्या ‘वॉल्टर हॅडली’ यांनी फलंदाज, कर्णधार, निवडकर्ता, व्यवस्थापक, प्रशासक या भूमिकांतून मोलाचे योगदान दिले. त्यांचा थोरला मुलगा ‘बॅरी’च्या खात्यात फलंदाज म्हणून केवळ २ एकदिवसीय सामने लागले, तर धाकटा मुलगा ‘डेल’ याच्या नावे एक मध्यमगती गोलंदाज म्हणून २६ कसोटी आणि ११ एकदिवसीय सामने आहेत. मात्र मधला ‘सर रिचर्ड हॅडली’ याने सर्वकालिक महान तेज गोलंदाजांच्या व श्रेष्ठ अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत मानाचे स्थान मिळवले. ८६ कसोटी व ११५ वन-डे खेळणारा रिचर्ड हा ४०० कसोटी बळींचा टप्पा ओलांडणारा पहिला गोलंदाज होता. विशेष म्हणजे रिचर्डची पत्नी ‘कॅरेन अॅन मार्श’ ही देखील क्रिकेटपटू होती जी न्यूझीलंडसाठी एक वन-डे सामना खेळली आहे.
→ न्यूझीलंडच्याच ‘ब्रेसवेल’ परिवारातील ‘ब्रेंडन’ हा वेगवान गोलंदाज म्हणून ६ कसोटी व १ वन-डे खेळला, तर त्याचा मोठा भाऊ ‘जॉन’ चांगला ऑफस्पिनर व तळाचा उपयुक्त फलंदाज म्हणून ४१ कसोटी व ५३ वन-डे सामन्यात चमकला. त्यांचे दोन भाऊ ‘डग्लस’ व ‘मार्क’ मात्र फक्त प्रथमश्रेणी क्रिकेटच खेळू शकले. ब्रेंडनचा मुलगा ‘डग’ याने वेगवान गोलंदाज या नात्याने आतापर्यंत २८ कसोटी, २१ वन-डे व २० टी२० सामने खेळले आहेत. तर मार्कचा मुलगा ‘मायकल’ याने २०२२ मध्ये ३१व्या वर्षी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत अष्टपैलू खेळाडू (डावखुरा फलंदाज व ऑफस्पिनर) म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले आहे.
→ दक्षिण आफ्रिकन ब्रदरहूड म्हणून ख्यातनाम असलेल्या ‘टॅन्क्रेड’ परिवारातील ज्येष्ठ बंधू-१८६५ साली जन्मलेल्या ‘बर्नार्ड’ याने फलंदाज म्हणून २ कसोटी खेळले, तर धाकटा भाऊ यष्टीरक्षक ‘व्हिन्सेंट’ याच्या कपाळी अवघ्या एका कसोटीचा टिळा लागला. सर्वात मोठी कारकीर्द ठरली ती १४ कसोटी खेळलेल्या सलामीवीर फलंदाज मधला भाऊ ‘लुई जोसेफ’ याची.
→ आफ्रिकेतील अजून एक प्रसिद्ध घराणे म्हणजे ‘पोलॉक’ परिवार. १९१४ साली जन्मलेले ‘अँड्रू मॅक्लिन’ हे फक्त प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले असले तरी त्यांच्या ‘ग्रॅमी’ व ‘पीटर’ या मुलांनी दक्षिण आफ्रिकेसाठी क्रिकेटविश्व गाजवले. ६१ची कसोटी फलंदाजीची सरासरी असणाऱ्या ग्रॅमीचे वर्णन तर डॉन ब्रॅडमन यांनी ‘इतिहासातील सर्वोत्कृष्ट डावखुरा फलंदाज’ असे केले होते. तर पीटर हा उत्कृष्ट वेगवान गोलंदाज आणि चांगला आक्रमक फलंदाज होता. मात्र वर्णद्वेषी धोरणामुळे आफ्रिकेवर १९७० ते १९९१ या काळात बंदी आल्याने, ह्या भावांच्या नशिबी अनुक्रमे २३ व २८ कसोटी सामनेच होते. १९७३ साली जन्मलेला ‘शॉन’ हा पीटरचा अष्टपैलू मुलगा मात्र नशीबवान ठरला आणि शंभराहून अधिक कसोटी व तिनशेहून जास्त वन-डे सामन्यांसह १२ टी२० सामने खेळत त्याने आफ्रिकेसाठी विक्रमी योगदान दिले. ४०० कसोटी बळी मिळवणारा आफ्रिकेचा तो पहिला गोलंदाज ठरला. ग्रॅमीचे दोन मुलगे ‘अँड्रू’ आणि ‘अॅंथनी’ यांना मात्र केवळ प्रथमश्रेणी क्रिकेटवरच समाधान मानावे लागले.
→ ’काळा ब्रॅडमन’ उपाधीने ओळखला जाणाऱ्या वेस्ट इंडिजचा ‘जॉर्ज हेडली’ या महान फलंदाजाची कारकीर्द दुसऱ्या महायुद्धामुळे २२ कसोटींपर्यंत मर्यादित राहिली, ज्यात त्याची ६०ची जबरदस्त सरासरी होती. त्याचा मुलगा ‘रॉन हेडली’ हा आकर्षक डावखुरा सलामीवीर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असला तरी त्याच्या नावे फक्त २ कसोटी आणि १ वन-डे सामने लागले. रॉन नंतर इंग्लंडमध्ये स्थायिक झाल्याने त्याचा मुलगा ‘डीन हेडली’ इंग्लंडकडून क्रिकेट खेळला. चांगला वेगवान गोलंदाज असलेल्या डीनची कारकीर्द सततच्या दुखापतींमुळे १५ कसोटी आणि १३ वन-डे सामने यावरच संपुष्टात आली.
→ श्रीलंकेसाठी पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमय कुटुंब ठरले ते ‘वेट्टीमुनी’. मोठा भाऊ ‘सुनिल’ १९७५ आणि ७९ च्या विश्वचषकात सलामी फलंदाज म्हणून ३ एकदिवसीय सामने खेळला. इतर दोघे भाऊही सलामी फलंदाज होते, ज्यातील ‘मित्रा’ हा ८३ साली २ कसोटी आणि १ वन-डे सामन्यापुरता दिसला. तर ‘सिदाथ’ २३ कसोटी आणि ३५ वन-डे खेळून भावंडात सर्वात यशस्वी ठरला.
→ श्रीलंकन क्रिकेटमधील बडे प्रस्थ म्हणजे ‘रणतुंगा’ परिवार. ‘अर्जुना’ याने आपल्या देशाच्या पहिल्याच कसोटीत १८व्या वर्षी पदार्पण केले आणि देशासाठी पहिला अर्धशतकवीर ठरला. तब्बल ९३ कसोटी आणि २६९ एकदिवसीय सामने खेळलेल्या डावखुऱ्या अर्जुनाने प्रभावी, चिवट फलंदाजीने आणि उपयुक्त गोलंदाजीने मोठे योगदान दिलेच पण विशेष लक्षवेधी असे ते त्याचे कल्पक व कणखर नेतृत्व. १९९६च्या वर्ल्ड-कप विजयाने त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. निवृत्तीनंतर अर्जुना श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष झाला इतकेच नाही तर नंतर राजकारणात शिरून केंद्रीय मंत्रीमंडळात मंत्री देखील झाला. त्याच्या इतर भावांना मात्र माफक यश मिळाले. मोठा भाऊ सलामी फलंदाज ‘धम्मिका’ २ टेस्ट व ४ वन-डे खेळला तर लहान भाऊ ‘निशांथा’ जो मध्यमगती गोलंदाज होता तो फक्त २ वन-डे. सर्वात धाकटा ‘संजीवा’ या प्रतिभावान डावखुऱ्या फलंदाजाची कारकीर्द ९ टेस्ट व १३ वन-डे, एवढीच सीमित राहिली.
→ ‘केविन करन’ हा झिंबाब्वेचा अप्रतिम अष्टपैलू खेळाडू होता. कपिलदेवच्या वादळी १७५ धावांच्या खेळीसाठी प्रसिद्ध सामन्यात (१९८३ विश्वचषक) भारताची ५ बाद १७ अशी वाईट अवस्था करण्यात त्याचा हातभार होता. केविन दोन विश्वचषकासह फक्त ११ वन-डे खेळला असला तरी मायदेशाबरोबर इंग्लंडमध्येही १९ वर्षे उत्तम प्रथम दर्जाचे क्रिकेट खेळला. त्याची ‘टॉम’ व ‘सॅम’ ही दोन अष्टपैलू मुले इंग्लंडकडून खेळताना क्रिकेटच्या तिनही प्रकारात चुणूक दाखवत आहेत. सॅम तर २०२२च्या टी२० विश्वचषकाचा मालिकावीर होता. त्यांचा ‘बेंजामीन’ हा आणखी एक भाऊ इंग्लंडमध्ये प्रथमश्रेणी क्रिकेट खेळत आहे.
→ झिंबाब्वेच्या ‘मासाकाद्झा’ कुटुंबातील ‘हॅमिल्टन’ याने २००१ मध्ये १७व्या वर्षी कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज होण्याचा विक्रम वेस्ट इंडिजविरुद्ध केला. २०१९ पर्यन्त त्याच्या नावावर ३८ कसोटी, २०९ वन-डे व ६६ टी२० सामने आहेत. त्याचा लहान भाऊ ‘शिंगराई’ जो वेगवान गोलंदाज आहे, आतापर्यंत ५ टेस्ट, १६ वन-डे व ७ टी२० सामने खेळला आहे. तर डावखुरा फिरकी गोलंदाज असणाऱा धाकटा भाऊ ‘वेलिंग्टन’ हा सध्या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात झिंबाब्वेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करत आहे.
तर क्रिकेटप्रेमींनो, आपण ह्या लेखात एकाच कुटुंबातील नात्यात असणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा विचार केलाय. त्याशिवाय थोड्या लांबच्या नात्यातील अनेक क्रिकेटपटू-परिवार आपल्याला सापडतील. त्याविषयी पुन्हा कधीतरी. सध्यातरी आपण क्रिकेटच्या रंगात न्हाऊन निघालेल्या आणि आपल्यालाही क्रीडारसिक म्हणून क्रिकेट-रंगात रंगवलेल्या या कुटुंबांचे मनसोक्त कौतुक करूया !!
– गुरूप्रसाद दि पणदूरकर, मुंबई.


Leave a Reply