नवीन लेखन...

‘क्षितिजगामी : एक प्रवास अपराजित जिद्दीचा’ – पुस्तक परिचय

अष्टपैलू व्यक्तिमत्व सौ. नीता चापले लिखित ‘क्षितिजगामी : एक प्रवास अपराजित जिद्दीचा’ हे एक अत्यंत प्रेरणादायी आत्मकथन आहे. दिलीपराज प्रकाशनातर्फे जून २०२५ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला अल्पावधीतच अनेक पुरस्कार लाभले आहेत. एका गुणवान खेळाडूचा आणि बहुआयामी स्त्रीचा, क्रीडा क्षेत्रातील आणि सार्वजनिक आयुष्यातील थक्क करणारा प्रवास आणि संघर्ष या पुस्तकातून वाचकांसमोर येतो.

या पुस्तकाला डॉ. प्रमोद मुनघाटे यांची प्रस्तावना लाभली आहे, जे साहित्य अकादमी (नवी दिल्ली) आणि ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ’ यांचे सदस्य आहेत. नागपूरच्या राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित लेखिका डॉ. लीना निकम आणि अॅथलेटिक्स व पॅरा-पॉवरलिफ्टिंग क्षेत्रातील अर्जुन व द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त श्री. विजय मुनीश्वर यांच्या कौतुकपूर्ण शुभेच्छा लाभल्या आहेत. लेखिकेने श्री. दिनकर दाभाडे (लेखक) यांचे प्रेरणास्त्रोत म्हणून आभार मानले आहेत, ज्यांनी तिला आत्मकथन लिहायला प्रवृत्त केले. आपल्या मनोगतात लेखिका आशा व्यक्त करते की आपले हे पुस्तक महिला क्रिकेटप्रेमींना, महिला सक्षमीकरणासाठी आणि खेळात व जीवनात सकारात्मकता बिंबवण्यासाठी प्रेरित करेल, ज्यामुळे तिचा हा लेखनप्रपंच सार्थकी लागेल.

लेखिका माहेरची ‘भोयर’. लेखिकेचे घराणे मूळचे विदर्भातल्या भंडारा जिल्ह्यातल्या पवनी तालुक्यातल्या ‘भुयार’ गावचे. तिचे वडील व काका शिक्षणासाठी नागपूर शहरात येऊन स्थायिक झाले. तिचे आजोबा शेतकरी व पहिलवान होते, तर वडील आधी कोर्टात क्लार्क आणि नंतर वकील झाले. लेखिका लहानपणापासूनच अगदी हूड आणि उपद्व्यापी स्वभावाची. शिक्षणापेक्षा खेळ, मस्ती, दांडगाई करण्यात स्वारस्य. दोन भावांपेक्षा बॅक बेंचर लेखिकेलाच खेळात व अवांतर गोष्टींत जास्त इंटरेस्ट. भावांना कोणी काही बोलले किंवा त्रास दिला तर हीच त्यांना झोडपून येई. सावळा रंग आणि कुणब्याची पोर म्हणून काही वेळा तिला हिणवले जाई, पण ते विशेष मनावर न घेता ती आपली कामे चालू ठेवी. शाळेत सातवीत असताना लेखिका कबड्डी खेळू लागली. पण घरातील वातावरण पारंपारिक आणि शीघ्रकोपी वडिलांची शिस्त कडक. त्यांना मुलींनी मेकअप केलेला, छोटे कपडे घातलेले आवडत नसत. त्यामुळे लेखिकेची कबड्डी थांबली पण पूर्ण कपडे घालून खेळता येणारे क्रिकेट चालू झाले. क्रिकेटमध्ये तिने चांगलीच गती मिळवली आणि एक यष्टीरक्षक व फलंदाज म्हणून छान प्रगती साधली. क्रिकेट खेळत असली तरी पारंपारिक वातावरणामुळे तिला घरातली सर्व कामे करावी लागत. चपात्या लाटण्यापासून सर्व स्वयंपाक तिला शाळेपासूनच येऊ लागला. लेखिकेच्या अकराव्या वर्षी आजीला लकवा मारला, तेव्हापासून आजी स्वर्गवासी होईपर्यंत तिने आजीची सर्व प्रकारे सेवा केली.

शाळेनंतर कॉलेजमध्येही तिने क्रिकेट खेळत नाव कमावले. थोड्याच काळात ती नागपूर विद्यापीठाची कप्तान, यष्टीरक्षक व तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज या स्वरूपात आधारस्तंभ बनली. एका युनिव्हर्सिटी स्पर्धेत दिल्लीमध्ये आपल्या विद्यापीठासाठी एका हरलेल्या सामन्यात तिने नाबाद ९१ धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. या खेळीचे खूप कौतुक झाले आणि विदर्भातल्या अनेक वर्तमानपत्रात ती बातमी छापून आली. क्रिकेटमधील अशा प्रगतीमुळे देशासाठी खेळण्याचे स्वप्न पुरे होणार असे वाटत असतानाच एका अनपेक्षित घटनेने तिचे क्रिकेट थांबले. क्रिकेट अकस्मात थांबले असले तरी तिचे लग्न जमण्याला हीच ९१ धावांची खेळी व बातमी कारणीभूत ठरली. मुंबईमध्ये एका प्रतिष्ठित खाजगी कंपनीत इंजिनियर असणारे श्री. नितीन चापले यांचे स्थळ सांगून आले आणि लेखिका विवाहबद्ध होऊन नवी मुंबईत राहायला आली. विवाह जमल्यावर नीताताईंनी इंग्रजी साहित्यात ‘एम.ए.’ पूर्ण केले. सासूबाई कोडकौतुक करणाऱ्या मिळाल्या पण क्वचित काही शुल्लक कारणावरून ओरडाही मिळे. १९९५ साली त्यांना मुलगी ‘ऐश्वर्या’ झाली पण तिला जन्मजात हृदयाला छिद्र होते. पुढे शस्त्रक्रियेने हा दोष बरा झाला. २००१ साली त्यांना मुलगा ‘तेजस’ झाला. जन्माच्या वेळी हायफोक्झीया झाल्यामुळे त्याच्या मेंदूच्या वाढीवर परिणाम झाला. यामुळे तो काहीसा अ-सामान्य, स्लो लर्नर झाला. त्यात डिसेंबर २००७ पासून त्याला फिटस् येऊ लागल्या.

असे संघर्षमय आयुष्य जात असतानाच २००३ साली नवऱ्याच्या नोकरीतील बदलीमुळे लेखिकेला एक वर्ष कलकत्त्यामध्ये राहावं लागले. तिथेही त्यांनी मुलीच्या व स्वतःच्या विविध ऍक्टिव्हिटीज चालू ठेवल्या. मुंबईत परतल्यावर २००५ साली मुलीच्या एका शिक्षकाच्या आग्रहानुसार (क्रिकेटप्रेम स्वस्थ बसू देत नव्हतेच) त्यांनी नवी मुंबईमध्ये स्वतःच्या नावाची क्रिकेट अकॅडमी चालू केली. असे करणाऱ्या त्या महाराष्ट्रातल्या पहिली महिला ठरल्या. आपल्या अॅकॅडमीच्या मुलांना घेऊन त्यांनी राज्यभर आणि बाहेरही अनेक दौरे केले. त्यांचा एक विद्यार्थी १९ वर्षाखालील गटात देशासाठीदेखील खेळला आहे. पुढे त्यांनी पॅराप्लेजिक मुलांसाठीही क्रिकेट प्रशिक्षण सुरू केले. अजित वाडेकरांच्या अपंगांच्या क्रिकेट संघटनेशीही त्यांचा संबंध आला. २०१३  च्या जुलैमध्ये एक मोठे संकट त्यांच्यावर आले. त्यांच्या हरहुन्नरी, क्रिकेटपटू मुलीचा अवघ्या १७ व्या वर्षी रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. हा त्यांच्यावर खूप मोठा मानसिक आघात होता. त्यानंतर दोन वर्षे त्यांचे घराबाहेर पडणे जवळपास बंद झाले होते. मुलीनंतर काहीच महिन्यांनी त्यांची आधार असणारी आई देखील गेली. त्यांचे क्रिकेट प्रशिक्षण पूर्णपणे थांबले. परंतु एका मित्राच्या सांगण्यानुसार स्ट्रेस थेरपी म्हणून त्यांनी मुलीच्या आठवणीवर आणि भारतातल्या महिला क्रिकेटच्या प्रवासावर, ‘क्रिकेटच्या ऐश्वर्या’ हे पुस्तक लिहिले. त्याचे २०१६ साली तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमोचन झाले.

२०१८ साली त्यांनी क्रिकेटपटू मुलींच्या निवड समितीवर सदस्य म्हणून काम चालू केले. तसेच क्रीडा मार्गदर्शक म्हणून काम करताना महिला खेळाडूंना भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांना व्यासपीठ देण्याचे आणि प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले. २०१९ मध्ये दुबईला जाऊन क्रिकेट प्रशिक्षकाची ‘आयसीसी लेवल १’ ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. पण कौटुंबिक संकटांची मालिका चालूच होती. २०२१ साली कोरोनामुळे भाऊ सतीश देवाघरी गेला तर पुढच्या वर्षी वडिलांचे छत्रही हरवले. पाठोपाठ नवऱ्याची अँजिओप्लास्टी करावी लागली. अश्या कौटुंबिक आघातांमुळे लेखिकेची मानसिक स्थिती डळमळीत होऊ लागली. त्यांच्या हाताला मुंग्या येणे चालू झाले. वजन बरेच वाढले. अशातच वजन कमी करण्यासाठी म्हणून त्या जिममध्ये गेल्या असता त्यांना पॉवरलिफ्टिंग खेळाची माहिती झाली. हेही करून बघूया म्हणून त्या त्यात रस घेऊ लागल्या. वयाची ४८ वर्षे उलटल्यावर या खेळात सहभागी होऊ लागल्या.

मनगटाच्या कार्पेल टनेलचा आणि गुडघ्याचा स्नायू दुखावल्याचा त्रास होत असतानाही त्या जिद्दीने पॉवरलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागल्या. कारण त्यांना त्यायोगे आपल्या शारीरिक आजारांतून आणि मानसिक त्रासातून सुटका झाल्यासारखे वाटत असे. त्यांची पॉवरलिफ्टिंगची पहिली राष्ट्रीय स्पर्धा इडुक्की (केरळ) येथे झाली. तेथे त्यांनी नी-कॅप घालून वेदनांवर मात करत कांस्यपदक जिंकले. आपल्या दुसऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी काही प्रकारांत राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धांतून काही चांगले अनुभव येत असतानाच काही व्यक्तींचे आणि आयोजकांचे वाईट अनुभवही आले. अर्थात ते सर्वच क्षेत्रांत येत असतात. आतापावेतो विविध क्षेत्रातील अष्टपैलू, यशस्वी संचारामुळे त्यांचे विदर्भात व महाराष्ट्रातही नाव होऊ लागले. यामुळे चंद्रपूर येथील पुरोगामी साहित्य संमेलनात त्यांना बोलावणे येऊन त्यांचा विशेष सत्कार झाला. याच काळात त्यांना सोपल सर भेटले ज्यांनी त्यांना पॉवरलिफ्टिंग खेळामधील बॉडी स्ट्रेन्ग्दनिंगसाठी ‘अॅक्वा वॉक’ (पाण्यात चालणे) करण्याचा सल्ला दिला. त्यानिमित्ताने त्यांची स्विमिंग खेळाशी ओळख झाली. २०२२ साली पन्नासाव्या वाढदिवसानंतर त्या जलतरण शिकल्या. त्यातही प्राविण्य मिळवून वरिष्ठ स्तरावरील जलतरण स्पर्धात सहभागी होऊ लागल्या. आता तिथेही त्या पदके मिळवू लागल्या आहेत. स्वत: स्विमिंग करत असतानाच आता त्या नवशिक्या स्त्रियांना स्विमिंग शिकवतात.

असा हा नीताजींचा आतापर्यंतचा विलक्षण जीवनपट बघितल्यावर कळून येते की ‘क्षितिजगामी’ हे केवळ एका खेळाडूचे चरित्र नसून, ते प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःचे क्षितिज विस्तारणाऱ्या एका ध्येयवेड्या स्त्रीचे आत्मकथन आहे. यात नागपूर विद्यापीठाचे क्रिकेट कर्णधारपद भूषवण्यापासून ते पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन आणि राष्ट्रीय जलतरणपटू म्हणून स्वतःला सिद्ध करण्यापर्यंतचा नीता चापले यांचा प्रवास अत्यंत चित्तवेधक पद्धतीने मांडला आहे. पुस्तकाचे उपशीर्षक ‘एक प्रवास अपराजित जिद्दीचा’ हे या पुस्तकाच्या गाभ्याला पूर्ण न्याय देते. हे उपशीर्षक सार्थ ठरवणाऱ्या अनेक घटना पुस्तकातून प्रत्ययास येतात. महिला क्रिकेटमध्ये आजच्यासारखे ग्लॅमर, पैसा आणि सुविधा नसण्याच्या काळात कौटुंबिक, आर्थिक आणि सामाजिक अडचणींवर मात करत त्यांनी आपल्यातला खेळ आणि खेळाडू जिवंत ठेवला. खेळाशी त्या खेळाडू, मार्गदर्शक, निवड समिती सदस्य, प्रशिक्षक, लेखिका, वक्ता अशा विविध प्रकारे जोडलेल्या राहिल्या आहेत. त्यांच्या या स्वर्णीम यशाचं कौतुक अनेक सामाजिक आणि साहित्य संस्थांनी केलय. शिवाय नागपूर आणि मुंबई आकाशवाणी, मुंबई दूरदर्शनने त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांचा या जिद्दी प्रवासाची कहाणी अनेक रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेली आहे.

पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती, प्रामाणिक आणि मनाला भिडणारी आहे. सर्वसामान्यांना कळेल अश्या सोप्या, प्रवाही भाषेत त्या जीवनपट उलगडून दाखवतात. आपल्या लहानपणाचा काळ, आजी-आजोबांबरोबरचा संवाद रंगवताना त्या स्थानिक वैदर्भीय बोलीभाषा वापरतात. त्यामुळे तो काळ, परिसर आणि ती माणसे जिवंत होतात. लेखनशैली अगदी आपल्या मित्रमंडळींशी गप्पा माराव्यात अशी अकृत्रिम, संकोचरहित आहे. आपल्या आयुष्यातील चढ-उतार मांडताना लेखिकेने कुठेही अतिशयोक्ती केलेली नाही. त्यांचे पारदर्शक मन, उत्साही व्यक्तिमत्व, मोकळाधाकळा धाडसी स्वभाव त्यांच्या आयुष्यातल्या वर्णीत घटनांमधून ठायीठायी जाणवतो. नियतीने अनेकदा परीक्षा घेतली पण जिद्द, आत्मविश्वास यांच्या जोरावर निग्रहाने लढा दिला हे त्या वारंवार ठासून सांगतात.

‘क्षितिजगामी’ हे पुस्तक केवळ क्रीडाप्रेमींसाठीच नव्हे, तर आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात संघर्ष करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक ऊर्जा देणारे मार्गदर्शक आहे. अपयशाने खचून न जाता नव्या जिद्दीने पुन्हा पुन्हा कसे उभे राहायचे याचे हे एक उत्तम पाठ यातून मिळतो. ज्यांना वाटते की आपण आपल्या आयुष्यात परिस्थितीमुळे काहीच करु शकलो नाही अशांच्या डोळ्यात हे पुस्तक अंजन घालते. आत्मकथनाचा उपसंहार करताना मात्र त्या काहीश्या भावुक होतात. मुलीच्या आठवणीत कातर होताना तिला आश्वासित करतात की, जरी त्या तिचे आवडीचे नृत्य शिकू शकल्या नाहीत तरी मन शांत करण्यासाठी आत्ता त्यांनी तिच्या लाडक्या पेंटिंगची कास धरलीय. आता त्या मुलीची स्वप्नं पुढे नेत आहेत, मोकळं होत स्वत:साठी जगत आहेत. काही प्रेरणादायी साहित्यिक सुविचार त्या अंतिम पृष्ठांत मांडतात –

– शरीर थकेल पण मन थकू देऊ नका,

– नदीच्या प्रवाहाबरोबर पोहायचे की विरुद्ध ते आपणच ठरवायचं,

– स्वत:ला शोधण्याचा प्रवास करताना पोहत राहायचं थांबायचं नाही,

– लाटांशी झगडतच पुनः पुन: जगण्याचं बळ मिळवायचं,

– लाटा मोठ्या असल्या तरी जिद्द ठाम असेल तर किनारा लांब नसतो.

लेखिकेच्या शब्दात बोलायचे झाले तर एक कारकीर्द संपली असे वाटत असताना दुसऱ्या नव्या कारकिर्दीची वाट त्यांना सापडते. एक जन्म संपताना अनेक नवे पुनर्जन्म होत आले आहेत. जगण्यातली आणि खेळातली अनेक क्षितिजे पादाक्रांत केल्यावर आता इंग्लिश खाडी पोहून जाण्याचे स्वप्न त्यांना खुणावते आहे. या नवीन क्षितिजाला त्यांनी लवकरच गवसणी घालावी हीच मनोभावे शुभेच्छा.

 – गुरुप्रसाद दि पणदूरकर.  

Avatar
About गुरुप्रसाद दिनकर पणदूरकर 44 Articles
माजी बँकर, मुक्त लेखक. विविध संकेतस्थळे, दिवाळी अंकांतून क्रिकेटविषयक, बँकिंगसंबंधी, अर्थविषयक व व्यक्तिचित्रणात्मक लेखन. विशिष्ट संकल्पनांवर आधारित शब्दकोडी रचण्याचा छंद. या शब्दकोड्यांना अनेक दिवाळी अंक, हिंदुस्थान पोस्ट साप्ताहिक यांमधून प्रसिद्धी. मराठी साहित्य, खेळ (विशेषत: क्रिकेट), भारतीय इतिहास यांमध्ये विशेष रुची.
Contact: Twitter

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..