क्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – लेख १

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान, भगूर, जि. नाशिक
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान, भगूर, जि. नाशिक

सावरकरांचा जन्म २८ मे १८८३ साली महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी झाला . त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी विनायकराव हे दुसरे होते. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव हे त्यांचे धाकटे भाऊ होते. सावरकरांची आई सावरकर नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्‍नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील १८९९ साली आलेल्या प्लेगला बळी पडले होते .

लहानपणापासूनच अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विनायकरावांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयात झाले. वयाच्या १३ वर्षीच त्यांना कविता करण्याचे वेड लागले.छत्रपती शिवरायांचे चरित्र वाचण्याची त्यांच्या युध्द कथा ऐकण्याची त्यांना आवड होती.अगदी लहानपणा पासून त्यांना परकीय सत्तेची घृणा होती.खेळण्याच्या वयात ते वेळ मिळेल तेव्हा चिंतन करत.लेख लिहित .शस्त्र बाळगणे ,चालवणे आणि ती मिरवणे त्यांना आवडे.”स्वदेशीचा फटका” आणि ,स्वतंत्रतेचे स्तोत्र या रचना त्यांनी लहानपणी केल्या होत्या .संस्कृत ,आणि इंग्रजीवर त्यांनी प्रभुत्व मिळवले होते.सशस्त्र लढाई केल्याशिवाय स्वतंत्र होता येत नाही हे विचार त्यांच्या मनात पक्के रुजले होते.


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

इंग्रजांनी चापेकर बंधूंना फासावर चढवले आणि सावरकर मनातून पेटून उठले. त्यांची कुलदेवता भगवती (कालिका) होती. असे म्हणतात की चापेकर बंधूंच्या फाशीनंतर सावरकर घरातील देव्हाऱ्यातील देवी समोर संतापाने स्वतःचे प्राण त्याग करण्याच्या मनःस्थितीत होते. या देशाला स्वातंत्र्य दिलेस तर मी माझी मान सुद्धा कापून तुझ्यावर माझ्या रक्ताचा अभिषेक करीन असे ते देवी समोर बसून गाऱ्हाणे घालीत होते. “देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन” अशी शपथ त्यांनी देवी समोर घेतली. मनात जी क्रांतीची ठिणगी पेटली त्यामुळे सावरकर अत्यंत अस्वस्थ होते.

१९०१ मध्ये त्यांचा विवाह यमुनाबाई यांच्या बरोबर त्यांच्या मोठ्या बंधूंनी लावून दिला .लग्नानंतर १९०२ साली पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व इ.स. १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.कुशाग्र बुद्धिमत्तेचे सावरकर शिकत होते तसेच अनेक ग्रंथांचे वाचनही करीत होते.पुण्यात शिकत असताना त्यांनी जे मित्र गोळा केले ते सुद्धा समविचारी आणि देशप्रेमी असेच होते.पागे आणि म्हसकर हे त्यांचे पुण्यातील सहकारी होते.”राष्ट्र भक्त समूह”ही तरुणांची गुप्त संघटना त्यांनी पुण्यात स्थापन केली .ही संघटना “मित्रमेळा ” म्हणून उघड काम करीत असली तरी हा मित्रमेळा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करीत होता.याच मित्र मेळ्यातील कार्यकर्त्यांनी पुढे सावरकरांच्या नेतृत्वात “अभिनव भारत “या संघटनेची स्थापना केली.पुण्यात असताना सावरकरांनी जीवाला जीव देण्याऱ्या अनेक क्रांतिकारक पण कुशाग्र बुद्धीच्या साथीदारांना जोडले.शिकत असताना १९०५ साली प्रथम त्यांनी विदेशी कपड्याच्या मालाची होळी केली.कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांना शामजी वर्मा यांनी जाहीर केलेली “शिवाजी शिष्यवृत्ती ” मिळाली आणि ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले.लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला त्यांनी जी प्रस्तावना लिहिली होती त्यात सावकरांनी सशस्त्र क्रांतीच्या तत्त्वज्ञानावर भाष्य केले होते .

रणाविण स्वातंत्र्य कुणा मिळाले …….!!!!

गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ स्वातंत्र्य शाहीर यांना निसर्गाने कमालीची काव्यप्रतिभा दिली होती. गोविंद यांचे वडील नाशिकमध्ये गवंडीकाम करीत असत. गोविंद चार-पाच वर्षांचे असतानाच वडील वारले. स्वतः गोविंद यांनाही त्यानंतर काही दिवसांतच मोठा ताप भरला व त्यांचे दोन्ही पाय लुळे बनले. ते अपंग झाले.

नाशिकमध्ये विनायक दामोदर सावरकर आणि बाबाराव सावरकर हे काही काळ गोविंद यांच्या शेजारीच राहायला होते. सावरकरबंधूंनी ‘मित्रमेळा’ ही संस्था स्थापन केली होती. या संस्थेत गोविंद रमू लागले. गोविंद यांच्या देशभक्तिपर रचना ‘लघु अभिनव माला’मध्ये प्रसिद्धही होऊ लागल्या. पुढे हाच ‘मित्रमेळा’ ‘अभिनव भारत’ या नावाने ओळखला जाऊ लागला. गोविंद या संस्थेचे एक महत्त्वाचे सदस्य होते.

‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले? ‘,
‘कारागृहाचे भय काय त्याला? ‘,
‘नमने वाहुनि स्तवने उधळा’,
‘मुक्या मनाने किति उधळावे शब्दांचे बुडबुडे? ‘

अशा कवीगोविंदांच्या किती तरी कविता त्या काळी महाराष्ट्रभर गाजल्या आणि पुढे या कवितांमधील ओळींना सुभाषिते होण्याचे भाग्य लाभले.त्यातील ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले’? हे एक सुभाषित .ही कविता त्यांनी लोकमान्य टिळकांवर केली होती.विनायकराव सावरकरांचे सर्व स्नेही अशा देश प्रेमानी भरलेल्या विचारांचे होते.

प्रखर देशभक्तिपर कविता लिहिणार्‍या या स्वातंत्र्यशाहिराच्या काही कविता स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारकडून जप्‍तही करण्यात आल्या होत्या.

लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ मध्ये अभिनव भारताचे कार्य सुरू झाले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य होता . मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून, हसत-हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या ३ सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.

सावरकरांनी ” अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर” हा ग्रंथ लिहिला .पूर्वी या लढ्याचा उल्लेख लोक अठराशे सत्तावन्नचे “बंड” असा करत असत परंतु सावरकरांनी ब्रिटीशांच्या नाकावर टीच्चून या लढ्याचा उल्लेख स्वातंत्र्य समर असा केला आणि सरकारच्या भिवया उंचावल्या गेल्या. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध केला .राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती.

(अपूर्ण …..क्रमशः ….)

— चिंतामणी कारखानीस 

Avatar
About चिंतामणी कारखानीस 74 Articles
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे पदाधिकारी होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....