नवीन लेखन...

धर्मवीर चित्रपटाच्या निमित्ताने !

आज धर्मवीर आनंद दिघे यांची पुण्यतिथि !

नुकताच मी “धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे “ हा चित्रपट पाहिला आणि माझ्या डोक्यात विचारांचे कल्लोळ माजू लागले. दिघे साहेबांचे जे असंख्य चाहते होते त्यात मी सुद्धा होतो. फक्त चाहताच नव्हे तर मी त्यांचा अनेक दशके त्यांचा अनुयायी आणि सहकारी सुद्धा होतो.

मी घरचा अत्यंत सूस्थितीतील आणि पांढरपेशा कुटुंबात वाढलो होतो . शिक्षण पूर्ण केल्यावर एका मोठ्या कंपनीत प्लांट मॅनेजर म्हणून कार्यरत होतो. घरचे कुणीही राजकीय क्षेत्रात सक्रिय नव्हते . पण मला शिवसेना प्रमुखांचे विचार खोलवर पटले होते. वाचनाची आवड असल्याने मी प्रबोधनकार ठाकरे यांची जवळजवळ सर्व पुस्तके वाचली आणि त्या विचारांच्या प्रेमात पडलो. लहानपणा पासून मी शिवसैनिक म्हणवून घेण्यात धन्यता वाटून घेवू लागलो . मा. बाळसाहेबांची भाषणे ऐकणे आणि शिवसेनेचे काम करणे याचे जणू काही व्यसनच मला जडले होते.

शिवसेनेबद्दलच्या याच ओढीमुळे मी दिघे साहेबांच्या कार्यालयाकडे आकृष्ट झालो. त्यांचे निवासस्थान आणि कार्यालय माझ्या घरा जवळच होते. त्यांच्या कार्यालयात मी रविवारी जावून बसू लागलो आणि त्यांचे निरीक्षण करू लागलो . त्यांच्या संपर्कात आल्यानंतर मी त्यांचा चाहता आणि नंतर भक्त कधी झालो ते माझे मलाच कळले नाही. साधारण १९८० पासून मी दररोज रात्री त्यांच्या कार्यालयात बसू लागलो. हळू हळू दिघे साहेब माझ्याशी बोलू लागले . मला लहानसहान जबाबदाऱ्या देवू लागले . त्यांनी दिलेली कामे करण्यात मला आनंद वाटू लागला . त्या कामात माझे मन रमू लागले आणि मी शिवसेनेचा सक्रिय कार्यकर्ता झालो. एके दिवशी अचानक दिघे साहेबांनी मला एक काम दिले . एक कौटुंबिक वाद मिटवण्याची जबाबदारी मला दिली. मी ते काम यशस्वी करून दाखवले . नंतर दिघे साहेब मला लोकांच्या तक्रारी ऐकून त्यावर तोडगा काढायला सांगू लागले . मलाही त्या कामात रस वाटू लागला . माझ्या साठी त्यांच्या कार्यालयात स्वतंत्र बसण्याची व्यवस्था दिघे साहेबांनी केली . रात्री आठ वाजल्यापासून मध्य रात्री पर्यन्त ते काम मी करू लागलो .
ग्राहक संरक्षण कक्ष आणि समांतर न्यायालय..!

मी दिलेले निर्णय दिघे साहेबांना आवडू लागले . माझ्या बरोबर मदतीला त्यांनी प्रमोद नाईक आणि रतीलाल सोनटक्के यांना काम करायला सांगितले आणि दिघे साहेबांचे समांतर न्यायालय सुरू झाले . दिघे साहेबांची लोकप्रियता आणि कामाचा व्याप प्रचंड वाढला होता . मुंबईत सेना भवन या ठिकाणी मा. सुधीर भाऊ जोशी यांनी ग्राहक कशाची स्थापना केली होती आणि ठाण्यात सुद्धा ग्राहक कक्ष सुरू करावा अशी सुधीर भाऊ यांची अपेक्षा होती . सुधीर भाऊ दिघे साहेबांशी बोलले आणि ठाण्यात टेंभी नाक्यावर एक सुंदर जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करून त्या कार्यक्रमात मा. सुधीर भाऊ यांना बोलावून दिघे साहेबांनी ठाणे जिल्हा ग्राहक संरक्षण कक्ष सुधीर भाऊ यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरू केला स्वतः दिघे साहेब अध्यक्ष आणि मी सरचिटणीस म्हणून काम सुरू केले .

हळू हळू ग्राहक कक्षाचा व्याप वाढत गेला . दररोज घरी जायला रात्रीचे २ वाजू लागले. दिघे साहेबांचा सहवास लाभू लागला . अनेक वेळा विविध सामाजिक समस्येवर त्यांच्याशी चर्चा होत होत्या . आणि त्यामुळे दिघे साहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू जवळून अभ्यासता आले.

दिघे साहेब कुठल्या प्रसंगात कसे वागतात ,कसे बोलतात ,त्यांची निर्णय क्षमता ,विषयाचा प्रचंड अभ्यास ,त्यांची अफाट स्मरणशक्ती याचा अनुभव मी दररोज सतत घेत होतो. दिघे साहेबांचे राजकारण मी जवळून पाहत होतो. त्यांच्यावर असलेले लोकांचे प्रेम मी सतत अनुभवत होतो.

दिघे साहेबांचे संघटन कौशल्य वादातीत होते. त्यांना माणसांची उत्कृष्ठ पारख होती . स्मरणशक्ती अफाट असल्याने हजारो लोकांना ते नावाने ओळखत असत . एकदा त्यांच्या संपर्कात आलेली व्यक्ति ते कधीच विसरत नसत .

दिघे साहेबांचे स्वतंत्र हेर खाते होते . त्यांना संपूर्ण जिल्ह्याची माहिती अगदी बिनचूक मिळत असे . त्यामुळे पदाधिकारी आणि शिवसैनिकाच्या कामाची माहिती त्यांना होती. दिघे साहेब कधी कुणाला जवळ करतील आणि कुणाला बाजूला काढतील हे कोडे कुणालाही सुटत नसे.

दिघे साहेबांची गुप्तता हा मोठा संशोधनाचा विषय होता . त्यांच्या मनातील ते कुणाही जवळ साहस उघड करीत नसत .कुणालाही कुठल्याही पदाचे ते स्वप्न दाखवत नसत. अगदी आयत्या वेळी कुणाला काय जबाबदारी देतील हे संघटनेतील कुणालाही सांगता येत नव्हते .

अगदी नगरसेवक पदासाठी उमेदवारी जाहीर करताना कमालीची गुप्तता पाळली जायची . ज्याला उमेदवारी मिळायची त्याच्या घरी रात्री १२ ते ०२ च्या सुमारास फॉर्म भरण्याच्या आदल्या दिवशी निरोप जायचा आणि त्या व्यक्तीला आनंद आश्रमात बोलावून ए बी फॉर्म दिला जायचा .

दिघे साहेबांचे शिवसेनेवर आणि मा. शिवसेना प्रमुखांवर जिवापाड प्रेम होते. संघटनेशी गद्दारी त्यांना बिलकुल मान्य नव्हती. शिवसेनेसाठी त्यांनी त्यांच्या जीवनाचा होम केला होता. त्यांनी पक्षासाठी लग्न केले नाही . कुटुंबाशी फारशी जवळीक ठेवली नाही . एकटे राहणे त्यांनी पसंत केले होते. दर शनिवारी ते त्यांच्या वृद्ध आईला भेटायला जात असत आणि आईच्या घरी जेवत असत. इतर वेळी त्यांना रूईकर नावाचा त्यांचा मित्र जेवणाचा डबा आणून देत असे. एखाद्या गरीब शिवसैनिका कडे अचानक जावून त्याच्या घरी जे शिजवले असेल ते जेवणे ही त्यांची खासियत होती . त्यांना मसुराची आमटी आवडत असे. गोड खाण्याची आवड नव्हती . रात्री खूप उशिरा जेवणे आणि पाणी कमी पिणे या मुळे त्यांच्या तब्बेतीवर परिणाम होत असे.

कुणाच्याही वेदनेत आणि आनंदात ते जरी सहभागी होत असले तरी ते “स्थितप्रज्ञ” होते. त्यांना सुखाचे किंवा कूठल्याही प्रकारच्या वेदनेचे प्रदर्शन करणे मान्य नव्हते. त्यांचा देवावर जरी प्रचंड विश्वास होता तरी त्यांचा कर्मावर भर असायचा .त्यांच्या आश्रमात सर्व जाती धर्मातील साधू ,मुनी ,फकीर संन्यासी यांना मुक्तद्वार होते. अनेक मंदिरे धार्मिक स्थळे त्यांनी पाहीली होती. अनेक विविध संप्रदायाच्या लोकांना त्यांच्याबद्दल आपलेपणा होता. ठाण्यातील जवळ जवळ सर्वच दर्गे ,गुरुद्वारा ,चर्चेस आणि मंदिरात ते आवर्जून जात असत . त्या ठिकाणी सत्कार स्वीकारत असत. भिवंडी दंगलीच्या वेळी हातात कुठलेही शस्त्र न घेता नुसत्या नजरेच्या धाकाने त्यांनी दंगल शांत केली होती. अनेक मुस्लिम नेते त्यांच्या शब्दाला मान देत असत .

त्यांनी घडविलेल्या कार्यकर्त्यांमध्ये सर्व धर्मीय कार्यकर्ते होते. मोठ मोठे उत्सव साजरे करायला त्यांना आवडत असत . त्यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सव ,दहीहंडी यांना संपूर्ण देशात प्रचंड लोकप्रियता मिळाली होती . उत्सवात शिस्त आणि देखणेपणा होता. ज्याचे काम त्यानेच करायचे यावर त्यांचा कटाक्ष असे . दुसऱ्याच्या कामात लुडबूड त्यांना सहन होत नसे .
इतर पक्षातील अनेक प्रमुख नेत्यांच्या बरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध होते पण हा सलोखा त्यांनी कधीही पक्ष हिताला बाधा येईल असा वाढवला नव्हता .

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट मला काही अंशी आवडला असला तरी त्यातील दिघे साहेबांचे व्यक्तिचित्रण हे त्यांच्या एकूण चरित्राशी पूर्णतः सुसंगत नाही .

चित्रपटाची निर्मिती करून घेणाऱ्या व्यक्तीने हा चित्रपट त्याचे स्वतःचे व्यक्तिस्तोम वाढवण्यासाठी निर्माण केला आहे हे अनेक प्रसंगात जाणवत होते.

दिघे साहेब कुणालाही तू पुढे भविष्यात अमुक मंत्री होशील तमुक मंत्री होशील असे म्हणण्याची शक्यता शून्य आहे.

दिघेसाहेबांनी स्वतः हातात शस्त्र कधीच घेतले नव्हते . त्यामुळे दंगलीचा तो प्रसंग अवाजवी वाटत होता. नजरेने दंगल काबूत आणण्याची क्षमता असलेली दिघे साहेब तलवार हातात कां घेतील ?

अनेक नगरसेवकांच्या नवीन घेतलेल्या गाड्यांची पूजा दिघे साहेबांनी त्यांच्या कार्यालयाजवळ केली आहे. अनेक नगरसेवकांच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन त्यांनी स्वतः केलेले मी पाहिले आहे. त्यामुळे सहा महिन्याच्या आत एखाद्या नगरसेवकानी नवी गाडी घेतली म्हणून त्या नगरसेवकाला चाबकाने फोडून काढण्याचा प्रसंग मला तद्दन खोटा वाटतो .
गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिघे साहेबांनी स्वतःचे पाय धुवून घेतले हा प्रसंग मला खोटा वाटतो. त्यामुळे हा चित्रपट माझ्या सारख्या दिघे साहेब प्रेमी माणसांसाठी पुनःप्रत्ययाचा आनंद देणारा असला तरी काही खोट्या प्रसंगा मुळे चित्रपटास गालबोट लागले हे नक्की

दिघे साहेब हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. भविष्यात या विषयावर कुणीतरी डॉक्टरेट नक्की मिळवेल इतके त्यांचे व्यक्तिमत्व प्रचंड मोठे आणि गूढ होते या बद्दल माझ्या मनात शंका नाही .

स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मृतीस माझा नमस्कार ..

— चिंतामणी कारखानीस 
प्रवक्ता
शिवसेना ठाणे जिल्हा
माजी अध्यक्ष ठाणे महानगर पालिका शिक्षण मंडळ

चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस 75 Articles
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..