नवीन लेखन...

लोणावळ्याजवळचा कोरीगड

Korigad Near Lonavala

गड, कोट, किल्ले असे शब्द घेतले की, डोळय़ांसमोर इतिहास नाचू लागतो. राजवटी, लढाया, पराक्रम, कटकारस्थाने आणि अशा कितीतरी स्थलकालाच्या घटना त्या त्या वास्तूभोवती फेर धरायला लागतात. पण प्रत्येक गडकोटांना असा ज्वलंत इतिहास मिळतोच असे नाही. पण अशांपैकी काहींचे भाग्य मात्र मग भूगोलात उजळते आणि निसर्ग त्यांना आपली सारी अपूर्वाई बहाल करतो. या कुळातीलच एक लोणावळय़ाजवळचा कोरीगड! इतिहासाच्या उत्खननापेक्षा निसर्गाची भटकंती घडवणारा; म्हणूनच पावसाळा स्थिरावला की, एखाद्या वारी वेळ काढून कोरीगडची वाट धरावी. लोणावळय़ाच्या दक्षिणेस कोरबारसे मावळात एक वाट गेली आहे. या वाटेवरील आंबवणे गावच्या डोक्यावर हा कोरीगड. ‘सह्य़ाद्री’कार स. आ. जोगळेकर म्हणतात, कोरी हे कोळय़ांच्या एका पोटजातीचे नाव. तेव्हा या कोरी लोकांचा गड तो कोरीगड आणि त्याचा मावळ तो कोरबारसे. लोणावळय़ापासून या कोरीगडापर्यंत अंतर आहे साधारण वीस किलोमीटर. याशिवाय मुळशी रस्त्यावरील माले गावातूनही एक रस्ता घुसळखांबमार्गे कोरीगडकडे जातो. पण या दोन्ही वाटांवरून एका दिवसात ही भ्रमंती करायची असेल तर स्वतचे वाहन असणे सोयीचे. अन्यथा लोणावळय़ातून सुटणारी दुपारी १२ किंवा सायंकाळी पाचची भांबुर्डे एस.टी. पकडायची आणि आंबवणे गावातील महादेवाच्या मंदिरात मुक्काम ठोकत गडदर्शन आटोपायचे.

असो, तर या आंबवणेत आलो की, या गावातूनच एक वाट तीन हजार फूट उंचीच्या या गडावर जाते. पण यापेक्षा एक सोपी वाट आंबवणे अलीकडच्या शहापूरमधून गडाकडे निघते. हे शहापूर म्हणजे गडाची एकेकाळची पेठ. यामुळे गावचा उल्लेख पेठ शहापूर असाही होतो आणि यामुळेच कोरीगडला कुवारीगड, कोराईगडच्या बरोबरीने शहागड असेही म्हणतात. तर हे शहापूर ओलांडले की, एका मोठय़ा घळीतून जाणारा हा मार्ग थेट गणेश दरवाजात येऊन थडकतो. या दरवाजाअलीकडेच काही प्राचीन खोदीव लेण्या दिसतात. यातीलच एका लेणीत गणेशाची स्थापना केली आहे. त्यामुळे या दरवाजालाही त्याची ओळख मिळाली – गणेश दरवाजा! हा गणेश दरवाजा ओलांडून आत गेलो की, उत्तम तटबंदी आणि भरपूर सपाटी असलेला गड समोर येतो. यातील बलदंड तटावरूनच गडप्रदक्षिणा सुरू करावी. उत्तम तट, शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या तोफा, गडदेवता कोराईदेवी आणि पाण्याने काठोकाठ भरलेली दोन तळी ही एवढीच ती काय कोरीगडची दुर्गसंपत्ती! पण आपण पावसाळय़ात आलो तर या वेळेची हिरवाई या मोजक्याच निर्जीव अवशेषांनाही जिवंत करते. यातही सर्वात जास्त लक्ष जाते ते गडावरील दोन मोठय़ा तळय़ांकडे. पश्चिम तटाला खेटून असलेली ही तळी पावसाळय़ात काठोकाठ भरतात. अगदी कधीकधी वाऱ्याच्या हेलकाव्यावर हे पाणी बाहेर पडू पाहते. अशा वेळी या कठडय़ावर यावे आणि आपल्याच हलणाऱ्या प्रतिमा पाहत तासन् तास बसून राहावे. या तळय़ाच्याच पाश्र्वभूमीवर कोराई देवीचे मंदिर आहे. भव्य आणि तेजस्वी मूर्ती. असे म्हणतात की, शेवटच्या मराठे-इंग्रज लढतीत जेव्हा हा गड पडला तेव्हा इंग्रजांनी या देवीचे दागिने उतरवले आणि ते मुंबईच्या मुंबादेवीला घातले. पुढे काळाच्या ओघात देवीचे छतही कोसळले. यामुळे एरवी कधी आलो की, उघडय़ावरील ही मूर्ती आणि तिची ही कथा आठवली की हळहळ व्यक्त होते. पण तेच पावसाळय़ात आलो की, भोवतालच्या हिरवाईतून असंख्य रानफुले उमलतात आणि जणू हे सारे दु:ख बाजूला सारत कोराईदेवी नवरात्रासाठी पुन्हा सालंकृत होते.

गडाच्या पोटातील काही खोदीव लेण्यांकडे पाहून हा गड प्राचीन असावा असे वाटते. पुढे तो कोळय़ांच्या ताब्यात असताना १४८६ मध्ये निजामशाहीने जिंकल्याची नोंद आहे. यानंतर १६४६ मध्ये अन्य गडांबरोबर कोरीगडही स्वराज्यात दाखल झाला. १७०० मध्ये पुन्हा मुघल राजवटीकडून पंत सचिवांनी हा गड स्वराज्यात आणला आणि अखेर १८१८ च्या शेवटच्या मराठे-इंग्रज युद्धात तीन दिवसांच्या प्रखर लढय़ानंतर गडावर युनियन जॅक चढला. इतिहास सांगणाऱ्या या काही सन-सनावळय़ा आणि घटना कोरीगडाबाबत मिळतात. इतिहासाचे हे दाखले देणाऱ्या सहा तोफा आजही गडावर दिसतात. पैकी ११८ इंच लांबीची ‘लक्ष्मी’ ही सर्वात थोरली. तिच्या हिशेबाने उभे राहावे आणि उगाच समोरच्या मावळाकडे उरी अभिमान घेत पाहावे. गडावरील हे विशेष पाहत असतानाच आपल्या नजरा आजूबाजूलाही वळतात. यामागे दऱ्याखोऱ्यांचा मावळ हे कारण तर असतेच, पण त्यातही पावसाळा हे खास निमित्त असते. एरवी लक्षातही न येणारे डोंगर पाऊस पिऊन हिरवे-ओले झाले की, उगीचच ओळखीचे वाटतात. मग त्यातही थोडेसे धुके हटले की, दूरदूरचे कर्नाळा, माणिकगड, प्रबळगड, मोरगड, ढाक, राजमाची ही दुर्गमंडळी ओळखी देऊ लागतात. तळातील भातखाचरांची सर्वच गावे एकसारखी वाटतात. मुळशी जलाशय या साऱ्या देखाव्याला एक निळी किनार देतो आणि मग हे सारे पाहता पाहता कोरीगडची मुशाफिरी आकार घेऊ लागते.

पावसाळ्या मध्ये हा गड फिरताना एक वेगळाच अनुभव येतो. या गडाची भटकंती करीत असताना समोरील गावामधून वारकरी सप्ताहातील कीर्तने ऐकायला येत होती. या मधुर गाण्याच्या तालावर गड कधी फिरून झाला हे कळेच नाही. पावसाची अधूनमधून येणाऱ्या सरी आणि गार वाहणारा वारा अंगावरती शहारे उभे करीत होता. खरे तर या साऱ्याचा मोह ‘त्यांनाही’ झाला, त्यातूनच श्रीमंतांचा सहारा आता या कोरबारसे मावळात उभा राहिला. पण त्याच्या या विळख्यात आमचा कोरीगड मात्र उगाचच अवघडून उभा राहिल्यासारखा वाटतो. चालायचेच, काळाचा महिमा! पण या ‘काळा’ला एकच विनंती; गावे, शेती, जमिनी गेल्या; आता आमचा गड तरी आहे असाच सोळाव्या शतकातील राहू द्यावा! राजांच्या या कोरीगडालाही त्याचा मोकळा श्वास घेऊ द्यावा!

सौजन्य : संतोष घारे यांनी लिहिलेला हा लेख मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी शेअर करत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..