नवीन लेखन...

कोकण म्हणजे स्वर्ग

‘येवा, कोकण आपलोच आसा’ असं म्हणत अख्ख्या जगाला मायेनं आणि अगत्यानं साद घालणारं आपलं कोकण. फणसासारख्या वरून थोड्या काटेरी, फटकळ, पण आतून मात्र गऱ्यांसारख्या गोड माणसांचं आपले कोकण. खवय्यांसाठी चटकदार माशांची मेजवानी, रानमेवा, सोलकढी आणि अस्सल कोकणी जेवणानं रसना तृप्त करणारं आपलं कोकण, माडा-पोफळीच्या गर्द महिरपीतून डोकावणारी जांभ्या दगडांची, उतरत्या कौलारू छपरांची सुंदर घरं, विस्तीर्ण समुद्रकिनारे, सुरूची बनं, गडकिल्ले, वळणावळणाचे रस्ते, देखणी मंदिरं दिमाखात मिरवणारं, नीतिमंत, बुद्धिमंत, कर्तृत्ववान अशा अनेक नररत्नानं मायभूमी, कर्मभूमी असणारं आणि वैशिष्ट्यपूर्ण लोकपरंपरांचा वारसा सांगणारं सर्वार्थानं समृद्ध, वैभवशाली असं आपलं कोकण म्हणजे ‘स्वर्गादपि गरीयसी’च!

काय नाही आपल्या कोकणात? अगदी महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तरी देशाची आर्थिक राजधानी महानगरी मुंबई, झपाट्यानं  वाढणारं मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर, ऐतिहासिक वारसा सांगणारा रायगड, तर निसर्गाने सौंदर्याची मुक्तहस्ताने उधळण केलेले रत्नागिरी-सिंधुदुर्ग. कोकणाला स्वर्ग म्हणायला आणखी हवं तरी काय? स्कंदपुराणामध्ये गुजरातपासून ते थेट केरळपर्यंतचा प्रदेश म्हणजे ‘सप्तकोकण’ असा उल्लेख सापडतो, तर  महाभारतामधल्या भीष्मपर्वात गोमंतक, गोपराष्ट्र, गोकर्ण, परांत, अपरान्त, केरळच्या उत्तरेला असलेल्या शूर्पारकापर्यंत विस्तारलेल्या प्रदेशाला ‘कोकण’ असं म्हटलेलं आहे. द्रविड भाषेत खडबडीत प्रदेश म्हणजे कोकण तर संस्कृतात ‘क’ म्हणजे पाणी तर ‘अंक’ म्हणजे मांडी किंवा कुशी, यापासून तयार झालेला धातू ‘कोंक’ आणि शब्द कोकण. अर्थात शब्दातूनच आपल्या सौंदर्याची अनुभूती देणारं हे देवभूमी, परशुराम भूमी कोकण.

या नंदनवनाचं वर्णन करण्याचा मोह प्रतिभावंत साहित्यिकांना तरी कसा बरं आवरेल? कोकणात पहिल्यांदाच जाणाऱ्या गोमूच्या ‘घोवाला’ निळी खाडी, काठावरची हिरवी झाडी, आबोलीच्या फुलांचा ताटवा, भेटणारी गोड, साधीभोळी कोकणी माणसं, उंचच उंच माड, शिडाची गलबतं दाखवायचा आग्रह गदिमा करतात. कविवर्य मंगेश पाडगावकरांना ‘वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा’ असं म्हणताना ‘तो आईसारखं थोपटून निजवणारा’ वाटतो, तर वि. स. खांडेकर यांना कोकणातल्या जुन्या आठवणी या मुरलेल्या आंबट गोड लोणच्यासारख्या वाटतात. आरती प्रभू लिहितात, ‘धुकें फेंसाळ पांढरे दर्वळून दंवे, शून्य शृंगारतें आतां होत हळदिवें’, ‘माझ्या गोव्याच्या भूमीत लाल माती, निळे पाणी’ असं म्हणताना बाकीबाब बोरकर सारा निसर्ग डोळ्यांसमोर उभा करतात.

तैलबुद्धी लाभलेली, मोठं उघडं पोट सावरत चालणारी, पंचा नेसणारी बेरकी कोकणी माणसं दिसली की, ‘देवगडचो हापूस म्हणजे सगळ्या आंब्यांचो बापूस’ असं म्हणणाऱ्या पुलंचा ‘अंतू बर्वा’ हा आठवतोच! साने गुरुजींच्या लिखाणात कोकणातला साधेपणा गवसल्यावाचून राहत नाही, तर मधु मंगेश कर्णिक यांचं साहित्य सतत कोकणी संस्कृतीला गवसणी घालत राहतं. आता हे सगळं साहित्यवैभव वाचणारा या कोकणच्या प्रेमात पडला नाही तरच नवल!

उशाला सह्याद्री आणि पांघरायला समुद्र घेणारं कोकण लाल मातीच्या रांगडेपणानं धो-धो पाऊस अंगावर झेलतो आणि मग हिरवा शालू नेसून लाजणारी डोंगररांग पाहून सुखावतो. हिरवीगार भातखाचरं, नाचणी किंवा नागली, कुळीथ, माडा-पोफळीची वाडी, आंबे, काजू, रातांबे, फणस ही छोटी-मोठी शेतीबागायती, यातूनच बनणारे चविष्ट असे असंख्य पारंपरिक पदार्थ आणि मासे यात समाधानी असणारा साधा कोकणी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी त्याला उकड्या तांदळाच्या पेजेची आठवण आल्याशिवाय मात्र राहू शकत नाही. गौरीगणपतीचा सण आणि शिमगोत्सव म्हणजे कोकणात उत्साहाचं उधाण येतं. घरंदारं मुलामाणसांनी फुलून जातात. चाकरमानी गावी येतात आणि म्हाताऱ्या माणसांच्या अंगी दहा हत्तीचं बळ येतं. जत्रोत्सव, दहीकाला, छबिना, ऊरूस, नाताळ असे सगळे उत्सव आणि दशावतार, बाल्या नृत्य, कळसूत्री, भजन, डबलबारी या लोककलांतून कोकणी माणूस जगण्यातला आनंद शोधतो. कोकणी भाषा तर मधासारखी गोड! संपूर्ण कोकणपट्ट्यात भाषा खूप बदलत जाते, पण कानाला तो खास हेल मात्र जाणवतोच.

वळणावळणाच्या रम्य वाटा आणि त्यावर धावणारी लालपरी हा कोकणी लोकजीवनाचा आत्मा तर कोकण रेल्वे हा चाकरमान्यांचा आधार आहे. जलमार्गे आणि आता हवाईमार्गे होणारी वाहतूक पर्यटन व्यवसायाला चालना देणारा आणि कोकणाला जगाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. निसर्ग, जैवविविधता, पर्यावरण संवर्धन या सगळ्याशी अगदी सहजपणे जोडलेल्या कोकणी माणसाला ‘आणखी हवं’ ही हाव नाही. सत्तेची चटक  नाही, उपभोगाची भूक नाही. अगदी मिठाच्या पाण्यातही भात भिजवून तृप्तीची ढेकर देणारा साधाभोळा कोकणी माणूस कोणत्याही संकटात ताठ कण्याने आणि हिमतीने लढत राहतो. वृत्तीने सुशेगाद असणारा कोकणी ‘बाबल्या’ कष्ट करून पोटापुरता कमावतो आणि बायकोपोरांच्या चेहऱ्यावर आनंद बघत सुखानं निजतो. मूलतः अशा शांत आणि तृप्त असणाऱ्या आपल्या सुंदर कोकणाला स्वर्गापेक्षा कमी कोण म्हणेल?

पर्यटन हा तर कोकणाचा श्वास! ढगांनी गच्च भरून ओथंबून येणारं आकाश आणि सहस्रावधी जलकुंभांनी अभिषेक करावा असा अनिर्बंध कोसळणारा पाऊस कोकणातला पर्यटन हंगाम खऱ्या अर्थानं जिवंत करतो. ओसंडून वाहणारे धबधबे, धडकी भरवणारे पण डोळ्याचं पारणं फेडणारे घाटरस्ते, थंड हवेची ठिकाणं आणि स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांना खुणावतात. उत्तम सोयीसुविधांनी परिपूर्ण आतिथ्यशील रिसोर्टस् आणि होम स्टे, साहसी खेळ, नाविन्यपूर्ण बागा यामुळे स्थानिकांना रोजगार आणि पर्यटकांना सुविधा उपलब्ध होतात. गावाची राखण करणारी शस्त्रायुधांनी सज्ज ग्रामदैवतं आणि कोकणातील इतर प्रसिद्ध पुरातन देवस्थानं भक्ती, श्रद्धा आणि विश्वासाला बळकटी देतात. जागतिक वारसा सांगणाऱ्या ब्रिटिशकालीन भव्य इमारती आणि ऐतिहासिक स्थळं, चकित करणाऱ्या सुंदर लेण्या, इतिहासाची साक्ष देणारे भक्कम जलदुर्ग आणि सह्याद्रीचा वारा अंगावर झेलणारे उंच डोंगरी किल्ले हे तरुणांसाठी व अभ्यासकांसाठी मोठं आकर्षण आहे. निसर्गरम्य कोकण नररत्नांचीही खाण आहे. जगाला सहा भारतरत्न देणाऱ्या कोकणभूमीतील अनेक प्रतिभावंत कलाकार, साहित्यिक, स्वातंत्र्यसेनानी, धुरंधर राजकारणी, समाजसेवक आणि सर्वच क्षेत्रात यशाचं उत्तुंग शिखर गाठणारी कोकणी माणसं ही कोकणची शान आहे.

कोकणाबद्दल किती किती लिहावं? कोकण म्हणजे जणू महाराष्ट्राच्या पैठणीचा हिरवागार पदरच की ज्याच्याशिवाय पैठणीला शोभा नाही! आपलं कोकण जगात भारी आणि प्रत्येकाने त्याची स्वर्गीय अनुभूती प्रत्यक्ष घ्यावी हेच खरं. कारण –

‘आयुष्याचे सार्थक होई असे सुख माझ्या कोकणात,

नको जाया कुठे दूर माझा स्वर्ग माझ्या दारात!’

– लेखा मराठे

(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..