नवीन लेखन...

कावळे (कथा) – भाग 2

मी मुंबईला कॉलेज शिक्षणासाठी आलो. चांगला अभ्यास करून डॉक्टर झालो. म्हणजे एम्.बी.बी.एस्! त्याकाळात डॉक्टर म्हणजे एम्.बी.बी.एस् आणि फारच तर एफ्.आर.सी.एस्. (लंडन). पण फार श्रीमंत बापाची पोरच लंडन, फिंडन् करायची. पण एम.बी.बी.एस. म्हणजे फार मोठा डॉक्टर, त्यावेळी. आता एम.बी.बी.एस.ला डॉक्टरपण विचारत नाहीत. आता लागतो एम्.एस.एम.डी! वगैरे! काही दिवसांनी त्यालाही कोणी विचारणार नाही. मग लागतील एम.डी. म्हणजे मॅड, नाही बरं का- मास्टर ऑफ ऑल डिसिप्लीन!” माझं हे असं होतं बघा. तर काय सांगत होतो- हां, मी डॉक्टर झालो आणि याच परिसरात मी माझी प्रॅक्टिस चालू केली. आमच्या बंगल्या समोरून डावीकडे गेलात ना, तर विवेकानंद चौक लागतो. तिथे ‘निलायम’ ट्विन थिएटर (जुळे सिनेमागृह) आहे. तिथे पूर्वी एक फार जुने नाट्यगृह होते. तिथे फार चांगले चांगले कार्यक्रम, नाटके, संगीत सभा, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे व्हायचे. पण एका बिल्डर डोम कावळ्याने ते पाडून तिथे हे जुळे थिएटर बांधले आहे. तिथे आता थर्डक्लास पिक्चर दाखवतात.

हा- तर मी काय सांगत होतो, हा तर त्या नाट्यगृहासमोर एक जुना बंगला होता, तिथं मी माझा दवाखाना थाटला होता. मी असा काळासावळा असलो ना, तरी नाकीडोळी तरतरीत, नीटस, उंचापुरा आणि भेदक नजर यामुळे माझ्याकडे येणारा पेशंट प्रथमदर्शनीच भारावून जायचा. डॉक्टर औषध देतो पण त्याचं अर्ध काम पेशंटमध्ये मानसिक उभारी निर्माण करण्यावर अवलंबून असतं. मी नुसती पाठीवर थाप मारून, काय कसं वाटतंय, असं विचारताच पेशंटचं अर्ध दुखणं पळून जायचं. माझ्या हाताला यश आहे असं सगळे म्हणायचे. दवाखान्यात ही ऽऽ गर्दी व्हायची. फारच लवकर माझं बस्तान बसलं आणि दवाखाना जोरात सुरू झाला.

घरून आता लग्नाची घाई सुरू झाली. पण मी काही मनावर घेत नव्हतो. माझ्या मनाची तयारी होत नव्हती. ते काय म्हणतात ना, ‘माझ्या मनीचा राजकुमार,” तसं माझ्या मनीची राजकुमारी” काही अजून मला भेटत नव्हती. बघू बघू म्हणून मी ही गोष्ट पुढे ढकलत होतो. पण योगायोगाने तो योगही आला कसा ते सांगतो.

माझ्या दवाखान्यासमोर पूर्वी एक नाट्यगृह होते. हे मी मघाशी सांगितले. तिथे एकदा प्रख्यात गायक, अमजदअली खाँ, ग्वाल्हेर घराण्याचे ख्यातनाम जाणकार, उभ्या भारतात ज्यांना तोड नव्हती. त्यांच्या गायनाचा प्रोग्रॅम, दिवंगत थोर संगीतकार पंडित भानुशंकरजी यांच्या पुण्यतिथी निमित्त होता.

मला खाँसाहेबांचे गायन फार आवडते. त्यांच्या गाण्याच्या ध्वनिमुद्रिका मी त्या काळात घेऊन ठेवल्या होत्या. आणि त्या ऐकणे हा माझा छंद होता. कार्यक्रमाची तिकिटे फार पूर्वीपासूच विकली गेली होती. पुढच्या रांगेतील तिकिटे फारच महाग होती. तरीपण मी घेणार होतो. पण मिळाले नाही. फार मागचे तिकिट घेऊन गाणे ऐकणे मला मुळीच आवडत नाही. त्यापेक्षा घरी निवांतपणे ध्वनिमुद्रिका ऐकणे काय वाईट?

तसा मी खाँसाहेबांचा एक कार्यक्रम फार जवळून ऐकला हेता. आमच्या मेडिकल कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये आमच्या एका फार मोठ्या डॉक्टरांच्या शब्दाखातर, खाँसाहेबांनी प्रोग्रॅम दिला होता. मी गॅदरिंगचा व्यवस्थापक असल्यामुळे मला तो कार्यक्रम जवळून ऐकण्याची सुवर्णसंधी मिळाली होती. तेव्हा खाँसाहेब आणि त्यांचा मुलगा अन्वर (माझ्याच वयाचा) यांची ओळख झाली होती. पण अशा ओळखी कुणी लक्षात ठेवता का?

तर सांगायचा मुद्दा एवढ्या समोर प्रोग्रॅम असूनही मला काही योग नव्हता. पण नशीब बघा कसं असतं. त्या दिवशी दवाखान्यात खच्चून गर्दी होती. व्हिजिटसही खूप होत्या. त्यामुळे रात्री दहा वाजले तरी अर्धी गर्दीपण हटली नव्हती. पेशंट तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून नंबर लावून बसले होते. त्यांना उद्या या असं म्हणणंही अगदी जिवावर आलं होतं. मी भराभर पेशंट तपासत होतो.

रात्रीचे अकरा वाजत आले आणि एकदम चारपाच माणसं घाबऱ्या घाबऱ्या आत घुसली आणि “डॉक्टर! असाल तसे चला – खाँसाहेबांना बरं वाटत नाही. ‘चला लवकर चला म्हणून एका माणसानं तर चक्क माझा हात धरून खेचायलाच सुरुवात केली! मी रागारागाने वर पाहिलं आणि माझा माझ्या डोळ्यांवरच विश्वास बसेना! तो माणूसही माझ्याकडे आश्चर्याने पहात राहिला आणि एकदम ओरडला, “वसंता! तुम? यार चलो जल्दी करो, अब्बाजान बहुत खतरेमे है!” मी चाट पडलो. अमजदअली खाँ साहेबांच्या मुलाने, अन्वरने मला ओळखले याच्याचवर माझा विश्वासच बसेना! मी ताडकन् उठलो, माझी बॅग घेतली, पेशंटना उद्या या म्हणून सांगितलं आणि अन्वरचा हात कडून नाट्यगृहाकडे धूम ठोकली!

तिकडे, हॉलमध्ये मरणकळा पसरली होती. स्टेजवर खाँसाहेब शेवटच्या घटका मोजत होते. येतायेताच मी अन्वरकडे चौकशी केली होती. त्याने यापूर्वी असा प्रसंग कधी आला नव्हता असं सागितले. मी ओळखले हा पहिलाच झटका आहे. यातून वाचले तर नशीब!

आल्या आल्या बघतो तर खाँसाहेबांभोवती ही ऽऽ गर्दी! मग मी माझ्या ठेवणीतला आवाज काढला आणि दोन, तीन माणसं सोडून बाकी सगळ्यांना स्टेजवरून खाली हाकललं. एखादा टेबल फॅन असला तर लगेच आणून लावायची सूचना दिली. बॅग उघडून खाँसाहेबांना एक इंजेक्शन दिलं आणि अन्वरला कृत्रिम श्वासोच्छ्वास कसा करतात ते दाखवून आम्ही दोघांनीही खाँसाहेबांची छाती दाबायला सुरुवात केली!

खाँसाहेबांचा देह प्रचंड! आपल्या शोले फेम अमजदसारखा! पण अन्वरच्या मदतीने मी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होतो. खाँसाहेब घामाने थबथबले होते. त्यांच्या अंगातला शर्ट काढणे शक्य नव्हते. मी तो टराटरा फाडून काढला. दोन लोकांना हात पंख्याने सतत वारा घालायला उभे केले आणि मी आशा सोडली असतानाच खाँसाहेबांनी हळूहळू डोळे उघडले!

डोळे उघडताच त्यांनी विचारले, “बेटा अन्वर मैं कहाँ हूँ?” अन्वरला आणि तिथे जमलेल्या सर्व रसिकांना झालेला आनंद काही आगळाच होता! वातावरणातला प्रचंड ताण क्षणार्धात कमी झाला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट पसरली. अन्वरने मला घट्ट मिठी मारली आणि तो म्हणाला, अब्बाजान, आप अभी खतरेसे खाली हो गये! ये डॉक्टर वसंतासाब अगर सही वक्त पर नहीं आते तो न जाने क्या हो जाता! अल्ला की खैर!!” आश्चर्याची गोष्ट म्हणजे खाँसाहेबांनीही मला ओळखले! माझ्या पाठीवर प्रेमाने हात फिरवून म्हणाले, “बेटे आज तूने मेरी जान बचायी!” आणि आपल्या बोटातील अमूल्य अंगठी काढून माझ्या हातात घालून म्हणाले, “वसंतासाब, मैं तुम्हे कुछ देना चाहता हूँ, बोलो क्या दूँ?” मी म्हणालो, “खाँसाब, फिलहाल आप आराम करो, बादमे देखेंगे! मेरी राय है की आप आजका प्रोग्रॅम यही खत्म करे तो अच्छा होगा.”

पण खाँसाहेबांनी माझे ऐकले नाही आणि पुढचा सगळा प्रोग्रॅम जणू काही झालंच नाही असं समजून उत्साहाने केला. मी रात्री दोन वाजेपर्यंत त्यांच्याजवळच बसून प्रोग्रॅम ऐकला न जाणो मध्येच काही झालं तर? त्या दिवशीचे गाणे अप्रतीम झाले. खऱ्या कलाकाराचे आपल्या कलेवर कसे प्रेम असते ते मी त्या दिवशी अनुभवले!

खाँसाहेबांनी कार्यक्रम संपल्यावर मला मिठी मारली आणि पुन्हा आग्रह सुरू केला. मी म्हणालो, “खाँसाब, मैंने ऐसा कुछ नही किया जो कि कुछ खास बात है। एक डॉक्टर होने के नाते ये तो मेरा फर्ज ही था, बाकी सब भगवानकी कृपा! पण त्यांनी फारच आग्रह धरला तेव्हा मी म्हणालो – “खाँसाहेब मला दुसरे तिसरे काही नको. फक्त तुमचा जिथे कुठे प्रोग्रॅम असेल तिथे मला यायला जमले तर तुमच्याजवळ बसून तुमचे गायन ऐकता येईल असे वचन द्या!”

खाँसाहेबांनी माझी मागणी तत्काळ मान्य केली. ते म्हणाले, “बेटे अन्वर, आजसें ये तेरी जिम्मेदारी. मेरे हर एक प्रोग्रॅमका इन्व्हीटेशन वसंताको जाना चाहिये, और उसके आने जानेकी और बाकी सब खातीर तू उसे अपना भाई जैसे समझके करनी चाहिये!” माझा आनंद तर अगदी गगनात मावेनासा झाला!

त्यानंतर बरेच दिवस गेले. अन्वर मला वेळोवेळी आमंत्रण पाठवत असे. अगदी आग्रहाचे पण मलाच जाणे जमत नसे. आणि शिवाय इतक्या मोठ्या महान व्यक्तीने म्हटले म्हणून आपण आपली पायरी ओळखायला नको का? म्हणूनही मी खरेतर टाळाटाळी करत असे. ऊस गोड लागला म्हणून काय कोणी तो मुळासकट खातं का?

पण एक दिवस मात्र मला एक आमंत्रण आलं आणि त्याबरोबर एक खास पत्र पण! पत्र अन्वरचे होते. ‘पंचरंग’ या प्रख्यात संस्थेने खाँसाहेबांचा “जीवन आदर्श’ पुरस्कार देऊन गौरव करायचे ठरवले होते आणि पुरस्कार प्रदान खुद्द राष्ट्रपतींच्या हस्ते गोव्याला होणार होता. अन्वरने कळवले होते की, खाँसाहेबांनी सांगितले आहे, “अगर वसंता इस वक्त नही आया तो मैं उसे कभी नही मिलूँगा! पत्राबरोबरच त्याने मुंबई गोवा असे माझे विमानाचे तिकिटही येण्याजाण्याचे पाठविले होते! शिवाय संपूर्ण गोवा मुक्कामात माझी व्यवस्था अब्बाजानबरोबर केली आहे असे कळवले होते! हे वाचून मलाच हृदय विकाराचा झटका येतो की काय असे वाटायला लागले! आता एवढे झाल्यावर मग मला नाही म्हणणे शक्यच नव्हते!

-विनायक रा. अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..