नवीन लेखन...

कवडीची किंमत

कवडी (संस्कृत: कपर्दिका; इंग्रजी: Cowry) हे समुद्रात सापडणारे, एका प्रकारच्या गोगलगाईचे कवच आहे. याचा वापर नाण्याचा शोध लागण्यापूर्वी चलन म्हणून होत असे. तसेच सारीपाट, चौसर इत्यादी खेळांमधे याचा वापर डाव टाकण्यास करण्यात येत असे. साधू-बैरागी-वासुदेव कवडीच्या माळा गळ्यात घालतात. गाई, बैल, घोडे, म्हशी इत्यादींच्या सुशोभनासाठी कवडयांचा वापर करण्यात येतो.

जुन्या काळी कवडीचा उपयोग नाणे म्हणून करीत असत.

‘एक फुटकी कवडीपण देणार नाही’ अनेकांना बोलताना ऐकलं असेल यामधील फुटकी कवडीची किंमत किती?

अनेकदा लोक रागाने किंवा तिरस्काराने असं म्हणतात. पण या म्हणीचा खरा अर्थ आहे का? असा तुम्हाला कधी प्रश्न पडलाय? फुटी कवडी म्हणजे नक्की काय किंवा या कवडीची काही किंमत आहे का? असा कधी प्रश्न उपस्थीत झालाय? आज आम्ही तुम्हाला जुन्या काळात विनिमय प्रणालीमध्ये वापरल्या जाणार्‍या चलनांबद्दल सविस्तरपणे सांगणार आहे. यामध्ये एक रुपया कसा तयार होतो किंवा रुपयापेक्षा आणखी कशाची किंमत होती किंवा काय चलनात होतं, याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. वास्तविक, जुन्या काळात फुटी कवडी हा सर्वात लहान चलन होता. आजच्या जगात, सर्वात लहान रक्कम म्हणजे एक रुपयाचे नाणे. त्याचप्रमाणे भारतीय इतिहासातील सर्वात लहान चलन हे कवडी होते. प्राचीन भारतीय चलनांचा इतिहास खूप जुना आहे.

तुम्हाला एका पैशाचा अर्थ माहित आहे का?

प्राचीन इतिहासात, सर्वात लहान चलन म्हणजे फुटी कवडी. तीन फुटी कवडीची मिळून एक कवडी होते. त्यानंतर दहा कवडी मिळून एक दमडी तयार होते. एवढेच नाही तर दमडीवरही मुद्रा होत्या. दोन दमडींची मिळून एक धेला होतो. तुम्ही अनेकवेळा लोकांना हे देखील बोलताना ऐकलं असेल की ‘तुला दमडीचीही किंमत नाही’ किंवा ‘दिड दमडीचा तू’. या शब्दात वापरली जाणारी दमडी ही अशी वरील प्रमाणे तयार होते. या चलनाबद्दल आणखी जाणून घेऊ

3 फूटी कवडी = 1 पूर्ण कवडी, 10 पूर्ण कवडी = 1 दमडी, 10 दमडी = 1 धेला, 1.5 ढेला = 1 पाई, 3 पाई = 1 जुना पैसा, 4 जुने पैसे = 1 आना, 16 आणे = 1 रुपया. या हिशेबानुसार तेव्हा एक रुपयासाठी तब्बल १०,२४० कवड्या मोजाव्या लागत असत, तर ३० हजार ७२० फुटक्या कवड्या मोजून रुपयाच्या मूल्याची प्रतिपूर्ती होत असे.

मात्र, काळानुसार गोष्टीही बदलल्या. आता बाजारात सर्वात कमी किंमत फक्त 1रुपयाची आहे. चलनाचा हा इतिहास सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कौडी, दमडी, धेला अजूनही तुम्हाला काही दुकानात पाहायला मिळतील, ज्याची किंमत आजच्या काळात खूप जास्त आहे. ती ऐतिहासिक वस्तू असल्यामुळे त्याला जास्त मान आणि महत्व आहे.

कवडी म्हणजे काय?

मृदुकाय (मॉलस्का) संघातील उदरपाद (गॅस्ट्रोपोडा) वर्गातील एक सागरी प्राणी. कवडी ही संज्ञा कवच असलेल्या जिवंत प्राण्यास आणि प्राणी मेल्यानंतर त्याचे राहिलेले कवच या दोन्हींसाठी वापरतात. उदरपाद वर्गात शंखाच्या आणि बिनशंखाच्या गोगलगायींचा समावेश होतो. कवडी हा शंखाच्या गोगलगायींचा एक प्रकार आहे. यांच्या सु. २०० जाती आहेत. हिंदी महासागर व पॅसिफिक महासागराच्या उष्ण प्रदेशांत हे प्राणी मुबलक प्रमाणात आढळतात. ते प्रवाळ भित्तीबरोबर राहतात. या क्षेत्रात जास्त आढळणार्‍या कवडी प्रकाराचे शास्त्रीय नाव सायप्रिया मोनेटा असे आहे. सामान्य इंग्रजीत त्याला मनीकौरी म्हणतात. याचे कारण आफ्रिका, भारत इत्यादी देशांत एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत चलन म्हणून या गोगलगायींच्या कवचांचा वापर केला जात असे.

कवचाच्या आत या गोगलगायीचे मऊ, लिबलिबीत शरीर असून त्याचे डोके, पाद, अंतरंग आणि प्रावार (त्वचेसारखे आवरण) असे भाग असतात. प्रावाराची कड झालरीसारखी असून त्यावर संस्पर्शके असतात. कवच प्रावाराने अर्धवट किंवा पूर्णपणे झाकलेले असते. कवचाची वाढ होत असताना दोन्ही कडा आत वळून कवचाचा पीळ जवळजवळ झाकून टाकतात. त्यामुळे इतर गोगलगायींत असलेला कवचाचा पीळ त्यात दिसत नाही. कवचाच्या खालच्या बाजूस एक लांब आणि रुंद फट असून कवचाच्या कडांवर दातांसारखी संरचना दिसते. कवडी प्राणी मुख्यत: शाकाहारी असून शैवाल व स्पंज यांच्यावर रात्रीच्या वेळी उपजीविका करतो.

कवड्यांचे प्रकार किती व कोणते?

तसे पाहता बय्राच रंगाच्या व आकाराच्या कवड्या असतात.परंतु पुजे मधे अथवा देवी शृंगारांमधे काही विषेश कवड्यांचा समावेश होतो.

1)महालक्ष्मी कवडी (कवडीवर तपकिरी रंगाचे ठीपके.)

2)आंबिका बट कवडी (खडबडीत व पिवळसर रंगाची )

3)येडेश्वरी कवडी (राखाडी रंगावर हलकेसर पिवळसर छटा )

4.यल्लम्मा कवडी (शुभ्र व दुधासमान निश्कलंक )

कवडीचे उपाय: पूर्वीच्या काळात पैशे म्हणून वापरली जाणाऱ्या कवडीला आताच्या काळात खूप मोल नसले तरी तुमच्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची ठरते. वास्तुशास्त्रानुसार कवडीचा विशिष्ट पद्धतीने वापर केल्यास आर्थिक समस्या दूर होऊ शकतात.

समुद्रात सापडणारी कवडी ही छोटीशी वस्तू आहे. मात्र ती खूप कामाची असते. पूर्वीच्या काळात कवडीचा वापर पैसे म्हणजेच आर्थिक व्यवहारात केला जात होता. आता कवडीचा उपयोग सजावटीसाठी केला जातो.

कवडीचे धार्मिक महत्व:

मात्र असे असले तरी ज्योतिषशास्त्रात आजही कवडीला मोठी किंमत आहे. विविध धार्मिक कार्यात कवडीचा उपयोग केला जातो.

ज्योतिषशास्त्रानुसार धन प्राप्तीसाठी कवडीचा उपयोग केला जातो. कवडीला माता लक्ष्मीचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळं महालक्ष्मीची पूजा करताना पूजेच्या साहित्यात कवडीचा अवश्य समावेश केला जातो. धार्मिक ग्रंथानुसार देवी महालक्ष्मी आणि कवडीची उत्पत्ती समुद्र मंथनात झाली होती. त्यामुळे कवडी ही धन आपल्याकडे आकर्षित करते असे सांगितले जाते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात कवडीशी संबंधित अनेक उपाय सांगितले जातात.

चला तर मग जाणून घेवूया कवडीचे उपाय…

1. ज्योतिषशास्त्रानुसार, कवडीचा उपाय शुक्रवारी करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. शुक्रवारी पिवळ्या कवड्या महालक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमेसमोर ठेवा. सायंकाळी कवड्यांची पूजा करावी. पूजेनंतर कवड्या दोन भागात विभाजित कराव्या. लाल रंगाच्या कापडात त्या बांधाव्या. एक पोटली कपाटातील तिजोरी कर दुसरी पोटली पर्समध्ये ठेवावी. तुम्हाला आयुष्यात आर्थिक तंगीचा सामना करावा लागणार नाही.

2. नोकरीची शोध घेत आहात? अनेक अडचणी येत असतील तर तुम्ही कवडीचा उपाय करू शकतात. 11 कवड्या घ्या. त्या एखाद्या मंदिरात अर्पण करा. त्यापैकी 7 कवड्या लाल रंगाच्या कापडात बांधा. इंटरव्यूला जाताना कवड्यांची पोटली सोबत ठेवावी.

3. अकरा कवडीचा उपाय तुम्ही घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी देखील करू शकतात. 11 कवड्या घ्या. त्या लाल रंगाच्या कापडात बांधून ती पोटली घराच्या मुख्य दरवाज्यात लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून घराच्या मुख्य दारावर लटकून ठेवा. ह्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते व घरात सुख समृद्धी नांदते अशी धारणा आहे.

4. दृष्ट लागण्यापासून घरातील सदस्यांचे रक्षण करण्यासाठी कवडीचा वापर केला जातो. वास्तुशास्त्रानुसार वाईट नजरेपासून रक्षण करण्यासाठी पिवळ्या रंगाची कवडीचे ताईत बाधूंन हातावर परिधान करा. असे केल्याने वाईट नजरेपासून संरक्षण मिळते असे मानले जाते.

5. आर्थिक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी शुक्रवारी पांढर्‍या रंगाची कवड्या घ्या आणि त्यात पांढरे केशर आणि हळद भिजवा. यानंतर लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात असे मानले जाते.

6. ज्योतिष शास्त्रामधील उपायांनी भाग्य बाधा दूर होऊन प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होऊ शकते. याप्रकारची एक वस्तू आहे पिवळी कवडी. मान्यतेनुसार पिवळी कवडी महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि याच कारणामुळे लक्ष्मी पूजेमध्ये कवडीचे विशेष महत्त्व आहे.

शिव पार्वती सारीपाट खेळत असताना देवर्षी नारद तेथे आले त्यानी जगदंबा मातेच्या हातातील कवडीकडे पाहताच प्रश्न केला की माते या कवडीत असे काय आहे की ही आपणास एवढी प्रिय आहे? जिच्या निर्णयासमक्ष साक्षात महादेव हरवता आहात आपण? त्यावर महादेवीनी सारीपाटावरील एक कवडी नारदमुनींच्या हाती देऊन या कवडीच्या तुलनेत मावेल एवढे धन आणून देण्यास सांगितले. नारद मुनी मातेच्या आज्ञेचे पालन करत कवडी घेऊन इंद्र देवांच्या दरबारी पोहोचले. तिथे कवडीतूल्य धन मागताच सर्वप्रथम चंद्र देवांनी व देवेंद्राने विनोदमय हास्य केले. कुबेराने छोटा तराजू घेऊन एका पारड्यात कवडी व दुसर्‍या पारड्यात द्रव्य टाकले. पारडे समतोल होईना. तराजु विशाल झाला कुबेर भांडार खाली झाले. पण कवडीतूल्य धन होईना देवता गणांनी मनोमन क्षमा मागून देवराज इंद्राने स्वत:चा मुकुट देखील पारड्यात टाकला किंतु जगदंबेच्या एका कवडीला तोलेल एवढे धन पर्याप्त नाही झाले. देवराज इंद्रासह सर्व देव शिव-शक्ती समीप आले. अपराध क्षमापन केले. या अपराधाच्या क्षमापने प्रित्यर्थ इंद्र व चंद्र देवांनी कल्होळ तिर्थाची निर्मिती केली. हेच तुळजापुरातील कल्होळ तिर्थ जे इंद्र व चंद्र देवानी बांधले असुन ब्रम्हदेवांनी पृथ्वीवरील सर्व जलतिर्थांना येथे येण्यास सांगितले या तिर्थांचा एकत्र कल्लोळ झाला तेच हे पवित्र कल्होळ तीर्थ होय. तेव्हापासून कवडीला अपार महत्त्व प्राप्त झाले.

राजे महाराजे कवड्यांच्या माळा परीधान करत असत. कारण कवडी ही सागरातून निघालेली असल्याने रत्नासमान मोत्यासमान मानली जाते. पेशवाई काळातही या कवड्यांच्या माळा विशिष्ट घराण्यातील लोक घालत असत.

लक्ष्मीपूजन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी पूजन केले जाते आणि तिला महानिषाची रात्र देखील म्हणतात. तांत्रिक पद्धतीनुसार दिवाळीच्या पूजेमध्ये कवडी पूजेसोबत काही उपाय केल्यास धनसंपत्ती वाढते आणि जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. हे उपाय केल्याने लक्ष्मी मातेचा आशीर्वादही कायम राहतो. चला जाणून घेऊया या दिवाळीत करावयाच्या उपाययोजना.

या उपायाने लक्ष्मी मातेची कृपा होईल

दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या वेळी ५ पिवळ्या कवड्या आणि ९ गोमती चक्रे देवीकडे ठेवा. त्यानंतर पूर्ण विधीपूर्वक लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करावी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लाल कपड्यात कवड्या आणि गोमती चक्र बांधून तिजोरीत किंवा कपाटात ठेवा. असे केल्याने घरात सुख-समृद्धी राहते. तसेच लक्ष्मी मातेच्या कृपेने कधीही आर्थिकसंबंधी कोणतीही अडचण येत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू ‘पार्थ पवार यांना आपण कवडीचीही किंमत देत नाही’ असे म्हटल्यानंतर जवळजवळ विस्मरणात गेलेली कवडी पुन्हा चर्चेत आली आहे. एकेकाळी चलनवलनासह दागिने, देव्हाऱ्यातही आवर्जून असणारी ही कवडी सध्या दुर्मिळ झाली असून, तिला आता मूल्यही प्राप्त झाले आहे, हे विशेष.

मोगल काळापासून म्हणजे इ. स. १५२६ ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजे १९४७-४८पर्यंत कवडीचा चलनात उपयोग होत होता. आता कवडीला होलसेलमध्ये दोन रुपये तर किरकोळ बाजारात पाच रुपये किंमत आहे. यानुसार कवडीने २० हजार ते ५० हजार पट जास्त वाढ नोंदवली असून, तिचे मूल्य आता रुपयाच्या पुढे गेले आहे. यानुसार कवडीला किती महत्त्व आहे, हे अधोरेखित व्हावे.

कवडी येते कुठून?

कवडी ही शंख शिंपल्याबरोबरच समुद्रातून शोधली जाते. गुजरात, गोवा, कोकण आदी समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागातून कवडी मुख्यत: धार्मिक स्थळांवर विकायला येते. साधारण चारशे रुपये किलोप्रमाणे ती सध्या मिळते. एका किलोत आकारानुसार दोनशे ते अडीचशे कवड्या बसतात. रामकुंड, त्र्यंबकेश्वर आदी धार्मिक स्थळी शंख-शिंपल्यांबरोबरच कवड्याच्या माळा विकणारे पथारीवाले असतात. व्यक्तीच्या गरजेनुसार व त्याच्या आर्थिक कुवतीनुसार पाच रुपये ते अगदी काळी कवडी असेल तर ५० रुपयांपर्यंतही ती विकली जाते.

शास्त्रीय महत्त्व

शास्त्रीय दृष्ट्या सायप्रिइडी कुलातील सायप्रिया वंशाच्या सागरी गोगलगाईंच्या शंखांना कवडी म्हणतात. कवड्या विविध रंगांच्या, चकचकीत व सुंदर असल्यामुळे शंख-शिंपल्यांचे संग्राहक त्या मौल्यवान मानतात. सारीपाट, चौसर आदी खेळांमध्ये कवड्यांचे महत्त्व होते. म्हणूनच आजही या खेळातील सोंगट्यांना ‘कवड्या’ असेच म्हटले जाते. सोन्याला ज्याप्रमाणे गंज लागत नाही, अगदी तसेच कवडीही कायमस्वरुपी गुळगुळीत, चकचकीत आणि एका आकाराची असल्याने तिचा पूर्वापार दागिन्यांमध्ये वापर केला गेला आहे.

धार्मिक क्षेत्रातही आहे कवडीला महत्त्व

मराठी विश्वकोषातील माहितीनुसार दक्षिण भारतात रेणुका, एल्लम्मा, मातंगी, मरीआई, भवानी, महालक्ष्मी इ. नावांनी गाजलेल्या देवींच्या उपासनाक्षेत्रात कवडीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गोंधळी, भुत्ये, पोतराज, मातंगी, जोगती, जोगतिणी हे देवीचे उपासकवर्ग आपल्या अंगाखांद्यांवर कवड्यांचे अलंकार परिधान करतात.

गोंधळ्यांच्या, भुत्यांच्या, मातंगी- जोगतिणींच्या गळ्यांत कवड्यांच्या माळा असतात; भुत्यांचा शंकाकार टोप बाहेरून कवड्यांनी मढविलेला असतो. ते गळ्यातही कवड्यांच्या माळा घालतात. जोगतिणींच्या ‘जगां’ ना कवड्या गुंफलेल्या असतात. काखेत अडकविलेल्या भंडाराच्या पिशव्यांनाही कवड्या लावलेल्या असतात. मातंगींच्या परड्या कवड्यांनी सजविलेल्या असतात आणि या सर्व उपासकवर्गांच्या कंठातून गळ्यात असलेली देवीप्रतिमा ज्या जाड वस्त्रपटावर जडवलेली असते, तो पटही कवड्या गुंफून शोभिवंत केलेला असतो. प्रत्यक्ष देवालाही कवड्यांचा श्रृंगार प्रिय असल्याची धारणा देवीविषयक लोकगीतांत वारंवार व्यक्त झालेली आहे. तंत्रविद्येतही कवडीला प्रचंड महत्त्व आहे. वास्तुशास्त्रातही कवडीला महत्त्वाचे स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा कवड्यांची माळ परिधान करीत असत.

विवाहामध्ये कवडीचे स्थान

-आंध्र प्रदेशात विवाहानंतर वधूपित्याला कवडी भेट दिली जाते.

-ओरिसातही रूखवतात कवड्या दिल्या जातात.

-राजस्थानात विवाहप्रसंगी वधू-वराच्या मस्तकी लोंबतील अशा पद्धतीने कवड्या बांधल्या जातात.

-आसाममध्ये वडिलधारी मंडळी नवदाम्पत्यासमोर कवड्यांचा खुळखुळ आवाज करतात.

कवड्यांची माळ तुळजापुरात नवरात्रात आवर्जून घेतली जाते.

(टीप: येथे दिलेली सर्व माहिती सामाजिक मान्यतेवर आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी.
मोबा. ९८८१२०४९०४
इ मेल : dkkul@yahoo.com
२६/०७/२०२४

 

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 72 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

1 Comment on कवडीची किंमत

  1. कवडीचा इतिहास लेखकांनी उलगडून दाखवला आहे. लेख जरूर वाचा.सुंदर लेखाबद्दल डॉ. कुळकर्णी यांना धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..