नवीन लेखन...

कशासाठी पोटासाठी!

‘अहो, तुम्हाला पोहता येतं का हो?’ माझ्या या प्रश्नाने संगणकात बुडालेले हे व दूरदर्शनवरच्या सी.आय.डी.मालिकेतून यशोधन खाडकन जागे झाले व ‘ऑ’ करून जोरात ओरडले. कारण मी, ह्यांच्या बायकोनेच ह्यांच्या उत्तम पोहण्यावर अविश्वास दाखवला होता ना.

“अहो, त्या बोटीला खालून तळच नसावा अशी शंका आली ना. म्हणून म्हटले जरा पाण्याखाली जाऊन बघता का? ” प्रश्नापेक्षाही ह्या माझ्या उत्तरानेच दचकून गेल्या एक-दीड तासाच्या माझ्या ‘उठा, आवरा, काही दूसरी कामे करा ‘ या ओरडण्याकडे दुर्लक्ष करणारे दोघेजण झटकन जागा सोडून उठले आणि खिडकीतून बाहेर पाहू लागले.

खरंच! समोर उभ्या असलेल्या एका मालवाहू बोटीत गेले कितीतरी दिवस सामान भरणे चालू होते. १५-२० कार झाल्या, ५-७ मोठे ट्रक झाले,खंडीभर बोचकी,पुष्कळसे ड्रम, लाकडी पेटारे, खोकी कितीतरी सामान त्या बोटीच्या उदरात गडप होत होते.सारखे वाटत होते, आता संपेल मग संपेल .पण रस्त्यावरच्या क्रेनची अजस्त्र सोंड खालीवर होतच होती आणि सामान बोटीच्या पोटात भरतच होती. अशा बऱ्याच बोटी समोर दिसत होत्या. हे दृश्य शारजाहला आल्यापासून रोज पहात होते, तरी रोज त्यातले वेगळेपण जाणवायचे, दिवसेंदिवस कुतूहल वाढतच होते.

‘कॉर्निश ‘ हा शब्द इथे येईपर्यंत माझ्या शब्दकोषात आलाच नव्हता. इंग्रजी/फ्रेंच भाषेतला ‘डोंगराच्या जवळून जाणारा रस्ता ‘ हा अर्थ इथे अजिबात लागू होत नाही, पण अरबी भाषेप्रमाणे जमिनीत आतपर्यंत घुसलेला समुद्राचा भाग हाच अर्थ इथेतरी जास्त योग्य वाटतो. विमानातून खाली दुबईकडे झेप घेतानाच दिव्यांच्या रेखीव चमकणाऱ्या रेघेच्या रूपात ह्या कॉर्निशची पहिली सलामी मिळते. ह्याची बरीच रूपे खाली शहरात उतरल्यावर पहायला मिळतात.केवळ शोभा वाढवण्यासाठीच कॉर्निशचा वापर केला गेलाय असे इथे दिसत नाही तर ‘पोटासाठी ‘ व ‘पोटामुळे’ही याचा खूप वापर होताना दिसतो.

आमच्या घरातून ‘पोटासाठी’ वापरात येणारा कॉर्निश चा भाग दिसतो. सामानाची देवाणघेवाण करणारा धक्काच म्हणाना. या भागात समुद्राच्या किनाऱ्याने जो रस्ता आहे त्याचा उपयोग माल उतरवण्यासाठी, बोटीत चढवण्यासाठी लागणारी अजस्त्र आयुधे ने आण करण्यासाठी मुख्यत:होतो. तसा हा समुद्रचा कदाचित एकच पट्टा जमिनीत घुसलेला असेल पण गरजेनुसार त्या पाण्यात २-३ आणखी कृत्रिम कॉर्निश तयार केले गेले. त्यावर अर्थातच पक्के रस्ते, झाडे, होड्या, बोटी उभे रहाण्यासाठी धक्के, आवश्यक तश्या इमारती आहेत. मूळच्या कॉर्निशवर छोट्या मोठ्या होड्या, बोटी मधल्या कॉर्निशवर त्यापेक्षा मोठ्या व ज्या फक्त खोल समुद्रातच विसाव्याला येतात त्या अगदी दूरच्या पट्ट्यावर उभ्या रहातात. त्यानंतर पुढे नजर पोहोचेल तिथपर्यंत पाणीच पाणी.

अगदी भल्यापहाटे प्रथम जाग येते ती मशिदीतल्या प्रार्थनेच्या सुरांनी. लगेचच समुद्र पक्षांचा कलकलाट पहाटेचा राग आळवायाला सुरुवात करतो. जांभई दिल्याप्रमाणे दूरवरून भोंग्याचा आवाज ऐकू येतो आणि कॉर्निशवर हालचाल दिसू लागते. समोरच्या संथ चित्रावर माणसांचे ठिपके दिसू लागतात. बोटींवरची, रस्त्यावरची, वाहनांची गडबड वाढते.भल्यामोठ्या अवाढव्य क्रेन्सना लीलया अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या गाड्यांची ये-जा सुरू होते.

आमच्या सर्वात जवळच्या भागात धक्कयाला म्हणजे रस्त्यालगतच नेहमी छोट्या छोट्या व कधी कधी मोठ्यासुध्दा बोटी लागतात. होड्याही भरपूर असतात. त्याहीपेक्षा लहान नावाही येतात. कंटेनरमध्ये न पाठवता नुसते सुटे सुटे पाठवायचे सामान भरायचे काम इथे प्रामुख्याने चालते. त्यात कधी ट्रक, कार, बाइक असतात तर कधी मोठे मोठे प्लॅस्टिक/ लोखंडी बॅरल, खोकी, ओंडके अगदी गाठोडीही असतात. परवा तर पत्र्याच्या भंगाराचा डोंगरच एका ट्रकमधून उतरला. तोही बोटीच्या पोटात गडप झाला.

खरंतर बोटीच्या आणि सामानाच्या आकाराचा अंदाजच आपल्याला करता येत नाही. लक्षपूर्वकपाहिले तर बोट कुठे येऊन लागणार आहे हे आपल्या लक्ष्यात येतं. तिचा दोर धरणारी माणसे रस्त्यावर किंवा दुसऱ्या रस्त्याकडेच्या बोटीत दिसू लागतात. वरच्या माणसांची खाली उतरण्याची व खालच्यांची सामान वर चढवण्यासाठी धावपळ सुरू होते. सामान हलवाहलवी क्रेनने असेल तर एक दोन माणसे पुरतात, पण खांद्यावरून असेल तर बरीच माणसे लागतात.समुद्राच्या लाटांच्या लहरींवर, हिंदकळणाऱ्या बोटींना लावलेल्या लपलपत्या शिडीवरून अगदी मुंग्यांप्रमाणे रांगेने कामगारांची कामे सुरु होतात.आपण घरात रचणार नाही एवढ्या शिस्तीत जागेचा जास्तीत जास्त वापर करून सामान रचले जाते. हे काम एका दिवसात पुरे होईलच असे नाही. त्यामुळे रोज रात्री त्यावर मेणकापड पांघरून त्यावरून दोरखंडाची चौकट बोटीच्या बाहेरच्या बाजूने खेचून घेतली जाते. ही काळजी बोटीवरच्या अन रस्त्यावरच्या सामानासाठीही घेतली जाते. एकाशेजारी एक अशा कधी कधी २ किंवा ३ बोटी उभ्या रहातात व ज्याप्रमाणे सामानाची हाताळणी असेल त्याप्रमाणे पुढे मागे करतात. सगळे पहायला खूप मजा वाटते. हा उद्योग दिवसभर चालतो. जेवणासाठी सर्वजण एकावेळी काम थांबवून जातील असे नाही पण प्रार्थनेची वेळ झाली की मात्र बोटीवर एकदम सामसूम.

बोट भरून झाली की माणसांची अदलाबदली होते. जाणारे डेकवर अन सामानावर दिसायला लागतात. हात हलतात. पुन: नवीन किनारा लागेपर्यंत जमीन दिसणार नसते. कधीकधी या बोटी गुपचुपपणे पाण्यावर ओरखडाही उठणार नाही याची काळजी घेत जातात. (या भाऊच्या तर नसतील?) तर काही अगदी छोट्याशा बोटीही आपल्या भोंग्याच्या आवाजाने आसमंत दणाणून टाकत पाण्यात आपल्या शेपटाचा पिसारा फुलवत मोठ्या डौलात जातात. या खेरीज गस्त घालणाऱ्या नौका वेगळ्याच ! त्यांचा रुबाब बघण्यासारखा असतो. आकाराने चिंचोळ्या, छोट्या, पण जातात कशा… फर्रर्र आवाज करत, अशा वेगात की त्या कशावर नजर ठेवतात याचाच प्रश्न पडावा. म्हणावसं वाटतं, ‘अगं हळू, जरा इकडे तिकडे बघा तरी!’ किनाऱ्यावरच्या बोटींच्याही मनात हेच विचार येत असणार. पण कानात वारं शिरलेली वासरंच जणू ती! धुमाट धावत सुटतात. शेवटी मोठ्या बोटीच आपला पसारा आवरून त्यांच्या खेळाकडे कौतुकाने बघतात.

याखेरीज ऑइल रिग्जची दुरुस्ती, इन्स्पेक्शन, स्वच्छता हीही कामे इथे रात्रंदिवस चालतात. हेलिपॅड असणारे हे फलाट तीन लोखंडी पिंजरेवजा खांबावर वरखाली होतात. रात्रीच्या अंधारात त्यांच्यावरचे दिवे अप्रतिम दिसतात. अगदी झगमगती दुनियाच! दूरवरून टॉवरचा भास होतो. आपल्याला ते मनोहारी दृश्य बघण्याची चटक लावून अचानक एक दिवस पाण्यावर तरंगत दूर देशी निघुन जातात. मागे रहातात फक्त कामगार ….दुसऱ्या दिवशीचे आव्हान स्वीकारायला !

कधी कधी शेवटच्या म्हणजे मोकळ्या समुद्राच्या बाजूला खूप प्रचंड मोठ्या बोटी लागतात-शेकडो भले मोठे कंटेनर पोटात घेऊन सामानाची देवाणघेवाण होऊन पुढच्या मार्गाला लागतात. काही काही बोटी इतक्या भरलेल्या असतात की, जणू सामानाचे कंटेनरच पाण्यावर तरंगत जात आहेत असे दिसते. बोटींचे असंख्य प्रकार इथे पहायला मिळतात.

बोटींच्या येण्याजाण्यावर माणसांची गडबड तर दिसतेच, शिवाय समुद्रपक्षांचीही मोठी मस्त मजा बघायला मिळते. बोटींमुळे पाण्यात जी खळखळ माजते त्यावर बिचाऱ्यांचे पोट अवलंबून असते. बऱ्याच बोटी शांतपणे, खळबळ न माजवता जातात, पण त्यांना रस्ता दाखवणाऱ्या टग बोटींचा बॅकवॉटरचा पसारा मोठा.त्यामुळे त्यांच्यामागे थोड्या अंतरावर हे पक्षी कलकल करत उतरतात व झटकन मासे पकडून उडून जातात. पुन: थोड्या वेळाने त्यांच्या घिरट्या चालू होतात. समुद्राच्या पृष्ठभागावर या पक्ष्यांची पांढऱ्या ठिपक्यांची रांगोळी मोठी सुरेख दिसते. असे चालते ‘पोटासाठी ‘ कॉर्निशचा वापर करणाऱ्यांचे जग. रात्रीपर्यंत-कमरेचा काटा ढिला होईपर्यंत काम करून थकून भागून बिचाऱ्यांचे घोळके चहा-कॉफी घेत जागोजागी बसलेले दिसतात. सूर्याच्या अंधुक होत जाणाऱ्या प्रकाशाबरोबर इथली गडबड मंदावत जाते. प्लॅस्टिकचे पांघरूण डोक्यावर घेऊन झोपीही जाते. त्याचबरोबर कॉर्निशच्या दुसऱ्या भागाला ‘पोटा’मुळे जाग येते.

या भागामध्ये समुद्रकिनाऱ्यापासून थोड्या अंतरावर मशिदी, बागा,झाडांच्या रांगा, खानपान सेवेची व्यवस्था करणारी छोटी छोटी दुकाने, हौशी पर्यटकांना सैर करवणाऱ्या छोट्या मोटरबोटींची गर्दी असते. रस्त्यापलिकडे ऑफिसच्या उंच उंच इमारती, उच्चभ्रू रहिवाशांची वसाहत माना उंच करून सूर्योदय किंवा सूर्यास्त पहात असते.वाढलेली पोटे कमी करण्यासाठी इथे संध्याकाळी गजबज वाढते.समुद्रकिनाऱ्याने आल्हाददायक वाऱ्याच्या झुळुकेचा आनंद घेत त्यांचा व्यायाम सुखावह ठरतो. चालणाऱ्यांचे घोळके,मुक्तपणे दौडणारे सायकलस्वार, रंगीबेरंगी वेषातली खेळणारी गोंडस, गोरी गोबरी अरबी मुले व आपआपसात मश्गुल तरुणाई….. वाह क्या बात है’ शब्द अभावितपणे तोंडातून निघतात. कठड्यापासून थोड्या अंतरावर कुटुंबवत्सल अरब आपल्या कुटुंबकबिल्याला इतरांपासून अलिप्त ठेवण्याच्या विवंचनेत असतो. मुले सैरावैरा धावत असतात अन त्यांचे बाबा पायघोळ अंगरखे सावरत त्यांना आवरण्याचा प्रयत्न करीत असतात. बसायला चटया, फोल्डिंग खुर्च्या, मुलांची खेळणी.खाद्यपदार्थांचा पसारा असा भरपूर सरंजाम घेऊन मंडळी येतात.नवरोजी अन मुलांच्या गरजा पुरवता पुरवता नि आपला बुरखा सांभाळण्यात त्यांच्या बायका मग्न असतात. उघड्या छताखाली स्वतः पुरता तात्पुरता महाल उभारणाऱ्या तरुण-तरुणींची कमतरता नसते. नवीन लग्न झालेली जोडपी गप्पा मारण्यात मश्गुल असली तरी त्यापुढचं स्वातंत्र्य घेण्याचे स्वातंत्र्य इथे नाही.संध्याकाळ संपून अंधार व्हायला लागतो तसतशी गर्दी वाढायला लागते. जेवणखाण आटोपून गाडीला शतपावली करवण्यासाठी मंडळी मोकळ्या हवेवर जमतात. आसपासच्या दुकानांचे मालक,त्यांचे मित्र कॉफी (बाकी पेयपानाला इथे बंदी आहे ) पिण्याच्या निमित्ताने तब्येतीत खुर्च्या,कॉफीचा बंपर, तोंडात टाकायला काहीबाही घेऊन येतात व पाण्यामधल्या कारंज्याशी स्पर्धा करणारी हास्य कारंजी उडवतात. अरबी आखात असले तरी अंधाऱ्या आडोशाला मुले मुली एकमेकांची थट्टामस्करी करतानाही कधीमधी दिसतात. क्वचित गाण्यांचे सूरही ऐकू येतात. तरूण घोळक्यांचे ते हास्य संपूर्ण कॉर्निशभर उत्साहाचे वातावरण पसरवते. अरबांची अत्तराची आवड काय वर्णावी? त्याचे मिश्र सुवास मन अगदी प्रसन्न करतात. सगळं, सगळं, छान, शीण घालवणार असतं. आखीव रेखीव बांधून काढलेला फरसबंद जॉगिंग ट्रॅक, एका बाजूला भक्कम कठडा, तर दुसरीकडे मुद्दाम वाढवलेल्या अन छान कापलेल्या गवताची बाग.प्रचंड उन्हाच्या झळा सोसूनही रंगीबेरंगी फुले वर्षभर आपल्या दृष्टीला सुख देतात.

फक्त उणीव जाणवते ती परिचित भेळेच्या वासाची. तेवढी पुरी झाली तर …. शारजाह जरी ‘कल्चरल कॅपिटल व म्युझियमसाठी जाहिरात केलेला देश असला तरी मला मात्र माणसांचं म्युझियम असणारं कॉर्निशच फार आवडत!!!!

-अनामिका बोरकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..