नवीन लेखन...

काळाच्या पडद्याआड जाणारी सिनेमाघरं..

परवा मी ऑफिसमध्ये बसलेलो असताना मोहन कुलकर्णी डोकावला. ‘काय रे सुरेश, एकटाच बसला आहेस की काय?’ मी त्याला होकार दिला व बसायला सांगितले. मोहन सांगू लागला, ‘अरे, विजय टाॅकीज आता पाडणार आहेत, आमच्या ऑफिससाठी कुठे जागा असेल तर सांगशील का?’ मला काय बोलावे हेच कळेना. गेली पंचावन्न वर्षे मी विजय टाॅकीजला पहात आलोय आणि आता काही दिवसांतच ती जमीनदोस्त होणार…
भावे प्राथमिक शाळेत मी इयत्ता तिसरीत असताना आयुष्यातील पहिला चित्रपट ‘देवबाप्पा’ इथंच पाहिला होता. तेव्हापासून ही भव्य टाॅकीज माझ्या स्मरणात राहिली. त्यानंतर इथेच चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांचे अनेक ऐतिहासिक चित्रपट पाहिले. ‘आम्ही जातो अमुच्या गावा’ या कौटुंबिक चित्रपटाच्या रौप्यमहोत्सवाचा मी साक्षीदार आहे. तारुण्यात पदार्पण करताना राजेश खन्नाचा ‘दुश्मन’, धर्मेंद्र, विनोद खन्नाचा ‘मेरा गाव मेरा देश’ पाहण्यासाठी इथेच तिकीटासाठी रांगेत ताटकळत उभा राहिलो होतो. संध्याकाळी रमेश बरोबर फिरायला बाहेर पडल्यावर वाटेत येणाऱ्या सर्व टाॅकीजच्या शोकेस मधील फोटो न्याहाळत रहायचो. त्यात पहिली ‘विजय’च असायची. पायऱ्या चढून वरती गेलं की, शोकेसमध्ये लावलेले ‘संगम’, ‘ज्युवेल थीफ’, ‘आरजू’चे फोटो पहायचे. प्रोजेक्टर मशीनवर रिळं लावताना व ती उतरवताना एकटक पहात रहायचं. तिथं चित्रपट सुरु होण्याआधी रेकाॅर्डवर गाणी लावली जात असत. ‘अनारकली’ चित्रपटातील लताच्या आवाजातील ‘ये जिंदगी उसी की है, जो किसी का हो गया…’ हेच गाणं तिथं वर्षानुवर्षे लागलेलं मी ऐकलंय.
काॅलेजला असताना दांडी मारुन मित्रांबरोबर अनेक ‘मॅटिनी’ इथेच टाकलेत. गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी रात्री नऊ ते बाराचा असेल तो ‘पिक्चर’ टाकून नंतर पहाटेपर्यंत मिरवणूक पहात जागायचं हे माझं ठरलेलंच असायचं.
काॅलेज संपल्यावर जाहिरातींच्या व्यवसायाची सुरुवात केली. चित्रपटाच्या जाहिराती करताना केलेल्या पब्लिसिटीबद्दल याच टाॅकीजच्या पडद्यावर ‘पैंजण’च्या श्रेयनामावलीत झळकलेले स्वतःचे नाव पाहून मी सुखावलो आहे. मराठी चित्रपटांची केलेली बॅनर्स, पोस्टर्स विजय टाॅकीजच्या बाहेर व आतमध्येही लागलेली दिसल्यावर झालेला आनंद अविस्मरणीयच होता.
महेश कोठारेच्या ‘धुमधडाका’चा सुवर्ण महोत्सव इथेच झाला. महेशला ही टाॅकीज नेहमीच ‘लकी’ ठरली. त्याचे सर्व चित्रपट तुफान गाजले. त्यावेळी मराठी चित्रपटांसाठी विजय, भानुविलास, प्रभात व अलका अशा मोजक्याच टाॅकीज होत्या. नंतर हिंदी चित्रपटांच्या भडीमारामुळे मराठी चित्रपटांना डेक्कन, लक्ष्मी नारायण, अपोलो टाॅकीजकडे वळावे लागले.
विजय टाॅकीजची आसनक्षमता मोठी असल्याने ती ‘हाऊसफुल्ल’ होणे काही काळानंतर कमी कमी होत गेले. फिल्मच्या रिळांची मशिनरी जाऊन अत्याधुनिक सॅटेलाईट यंत्रणा आली. मोबाईलवर देखील चित्रपट पाहता येऊ लागल्यापासून टाॅकीजवर होणारी गर्दी कमी झाली. मोजून दहा प्रेक्षक बसले तरी चित्रपट दाखवला जाऊ लागला. त्यातून टाॅकीजचा दैनंदिन खर्चही निघेनासा झाला.
मार्च महिन्यापासून ‘कोरोना’मुळे लाॅकडाऊन सुरु झालं आणि सर्व टाॅकीज ‘व्हेंटिलेटर’वर गेल्या. आज महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील सिनेमाघरं बंद आहेत. सहा महिने होत आले, टाॅकीजमध्ये जळमटं वाढलीत. खुर्च्यांवरती धुळीची पुटं चढलीत. टाॅकीजच्या बाहेर भेळ, पाणीपुरी, वडापाव, सरबताच्या हातगाड्यावाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. पुणे शहरातील व उपनगरातील सिनेमाघरं कोरोनाचं सावट गेल्यानंतरही सुरु होण्याची शक्यता फारच कमी आहे. माणसांना सतत वाटणारी संसर्गाची, गर्दीची भिती जाता जाणार नाही. मनोरंजनाच्या क्षेत्रावर झालेला हा दुष्परिणाम जागतिक चित्रपटसृष्टीचं सर्वात मोठं नुकसान आहे.
दोन वर्षांनी विजय टाॅकीजच्या जागेवर टोलेजंग अनेक मजली इमारत उभी झालेली दिसेल. जर बिल्डरने केलेच तर दोनशे प्रेक्षक बसतील असं मिनी थिएटर होईलही मात्र भविष्यातील त्या वर्तमानाला एकेकाळ गाजवलेल्या ‘विजय’च्या ‘इतिहासाची’ काडीचीही सर येणार नाही…
— सुरेश नावडकर. 
मोबाईल: ९७३००३४२८४
११-९-२०.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 241 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..