नवीन लेखन...

कहाणी साता देवांची

ऐका साती देवांनो तुमची कहाणी.

एके दिवशी दिवशी शंकर पार्वती पृथ्वीप्रदक्षिणा करण्यास निघाले. एका आटपाट नगरात मुक्कामी उतरले. पार्वती शंकराची पादसेवा करू लागली. तिचे हात कठीण लागले. शंकराने तिला एका गरिबाच्या बायकोचे बाळंतपण करायला सांगितले. तुझे हाथ कमळासारखे मऊ होतील, असे सांगितले. पार्वती एका गरिबाकडे गेली. त्याच्या बायकोचे बाळंतपण केले. ती फार उतराई झाली. पार्वतीला म्हणाली, ‘तू माझी मायबहीण आहेस. मला काही वाज वसा सांग.’ पार्वतीने तिला वसा सांगितला. तो काय सांगितला… आठवड्याच्या सोमवारी श्री शंकराची पूजा करावी. शंकराची मनोभावे प्रार्थना करावी व घरातील रोजचा कचरा योग्य पद्धतीने वेगळा ठेवून त्याची विल्हेवाट लावण्याचा वसा घ्यावा आणि त्यानुसार दररोज वागावे. सोमवारनंतर येतो मंगळवार. त्यादिवशी श्री गणेशाचे स्मरण करावे. या दिवशी निश्चय करायचा की प्रदूषण करणाऱ्या कुठल्याही वस्तू मी वापरणार नाही व त्याप्रमाणे वागायचे. बुधवारी विठ्ठल रखुमाईचे भजन करावे.  विठ्ठलाच्या पंढरीला चंद्रभागा नदी वाहते. तिचे स्मरण करावे. गंगेचे स्मरण करावे व नदीच्या पाण्यात कचरा, सांडपाणी टाकून नदीला अस्वच्छ न करण्याची व कोणालाही तसे न करू देण्याची प्रतिज्ञा करावी. गुरुवार दत्तमहाराजांचा…. दिवसभर दत्ताचे नामस्मरण करावे. पान, तंबाखू खाऊन कुठेही कोणाला थुंकू देणार नाही असा वसा घ्यावा व त्यानुसार आचरण करावे. शुक्रवार हा देवीचा वार. या दिवशी अनेक घरामध्ये लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही स्वच्छ घरातच वास करते हे लक्षात ठेवावे. संपूर्ण घर स्वच्छ करावे. घरातील जाळेजळमटे काढावी, लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी, लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी पाठीशी राहावा अशी प्रार्थना करावी. शनिवार हनुमंताचा… हनुमंताला नमस्कार करावा, हनुमान शक्तीचा देवता आहे व पवनपुत्र आहे. पवन म्हणजे वारा. त्यामुळे या दिवशी घरात धूर, धूळ, विषारी वायू या कशामुळेही हवा म्हणजेच आजूबाजूचे वातावरण प्रदूषित होणार नाही, यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवावे व त्याप्रमाणे वागावे.

रविवार हा दिवस रवी म्हणजे सूर्याचा. सूर्यदेव म्हणजे प्रकाश. सूर्यदेवाच्या या वारी सकाळी सूर्याला नमस्कार करून घराच्या बाहेर पडावे. मित्रमैत्रिणींना एकत्र करावे. आजूबाजूचा एखादा भाग संपूर्ण स्वच्छ करावा. स्वच्छतेबद्दल समाजात जागृती करावी. स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगावे, हा वसा कधी घ्यावा. तातडीने घ्यावा व देश स्वच्छ होत नाही तोपर्यंत हा वाजवसा सोडू नये, असे पार्वतीने सांगितले व ती अदृश्य झाली.

बरेच दिवस झाले. इकडे पार्वतीने काय केले. भिकारणीचा वेष घेतला व त्या बाईस पुन्हा भेटावयास गेली. बाईने पार्वतीला ओळखले नाही. पार्वतीला राग आला. ती शंकराकडे गेली. सगळी हकीगत सांगितली. ‘ती उतली आहे, मातली आहे. तिचे वैभव काढून घे. ‘ शंकर म्हणाले, ‘ही गोष्ट माझ्याकडून घडावयाची नाही. ती काही उतायची नाही, ती काही मातायची नाही. घरातला कचरा योग्य पद्धतीने वेगळा ठेवून त्याची विल्हेवाट लावायचा वसा तिने घेतला आहे आणि त्यानुसार ती वागते आहे. ओल्या कचऱ्यापासून ती खत बनविते. शेताला खत मिळते, शेत धनधान्याने बहरते. त्यामुळे तिच्याकडे वैभव आले. ते वैभव मी काही काढून घेणार नाही.’ असे शंकराने म्हटल्यावर ती गेली गणपतीकडे… गणपतीला सर्व हकीगत सांगितली. ‘ती उतली आहे, मातली आहे. तिचे वैभव काढून घे.’ गणपती म्हणाला, ‘ही गोष्ट मजकडून घडावयाची नाही. ती काही उतायची नाही, मातायची नाही. ती माझे नित्य स्मरण करते. प्रदूषण करणाऱ्या कुठल्याही वस्तू न वापरण्याचा तिने निश्चय केला आहे. या वर्षी माझी आरास करताना तिने प्रदूषण निर्माण करणाऱ्या कुठल्याही वस्तू न वापरता सुंदर सजावट केली. मी कसे काय तिचे वैभव काढून घेऊ.’ मग पार्वती गेली पंढरपूरला विठ्ठलाकडे… सगळी कीगत सांगितली. ‘ती उतली आहे, मातली आहे. तिचे वैभव काढून घे. ‘ पांडुरंग म्हणाला, ‘ती तायची नाही, ती मातायची नाही. ती नियमित माझे भजन करते. तिने नदीला प्रदूषणापासून वाचविण्याचा वसा घेतला. तो तिने अनेकांना सांगितला. त्यामुळे नदीचे पाणी स्वच्छ राहायला मदत झाली. चंद्रभागा नदी स्वच्छ झाली. मग कसे काय तिचे वैभव काढून घेणार. हे मजकडून होणार नाही.’ पार्वती तेथून उठली व गेली दत्तात्रेयांकडे. दत्तगुरूंना सर्व हकीगत सांगितली. ‘ती उतली आहे, मातली आहे. तिचे वैभव काढून घे.’

दत्तगुरू म्हणाले, उतायची नाही, ती मातायची नाही. ती नामस्मरण करते, पान, तंबाखू खाऊन लोक पचापचा थुंकायचे, पण लोकांना या अस्वच्छ सवयीपासून परावृत्त करायचे तिने ठरविले. त्यानुसार तिने प्रचार, प्रसार केला. त्यामुळे अस्वच्छता कमी झाली. मग कसे काय तिचे वैभव काढून घ्यायचे. मजकडून हे होणार नाही.’

दत्तगुरूंनी नकार दिल्याने पार्वती गेली लक्ष्मीकडे, लक्ष्मीला सगळी हकीगत सांगितली. ‘ती उतली आहे, मातली आहे. तिचे वैभव काढून घे.’

लक्ष्मी म्हणाली, उतायची नाही, ती मातायची नाही. ती माझी मनोभावे पूजा करते. संपूर्ण घर, अंगण स्वच्छ ठेवते. स्वच्छता असते तिथे मी असतेच. त्यामुळे माझ्याकडून हे काही होणार नाही.’

लक्ष्मीचे म्हणणे ऐकल्यावर ती गेली हनुमंताकडे, हनुमंताला सगळी हकीगत सांगितली. ‘ती उतली आहे, मातली आहे. तिचे वैभव काढून घे.’

मारुतीराव म्हणाले, ‘ती उतायची नाही, ती मातायची नाही. ती मला नियमित नमस्कार करते. तिने आजूबाजूचे वातावरण प्रदूषित न करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले आणि अनेकांचा विरोध सहन करूनही तिने हे प्रयत्न चालूच ठेवले. त्यामुळे वातावरण प्रदूषित होण्यापासून वाचले. मग मी कसे तिचे वैभव काढून घेऊ?’ शेवटी पार्वती गेली सूर्यदेवाकडे, सर्व हकीगत सूर्यदेवाला कथन केली. ‘ती उतली आहे, मातली आहे. तिचे वैभव काढून घे.’ सूर्यदेव म्हणाले, ‘ती काही उतायची नाही, ती काही मातायची नाही. ती मला सकाळी नियमित नमस्कार करते. तिने तिचे गाव स्वच्छ केले. लोकांना स्वच्छतेच्या सवयी लावल्या. इतके चांगले काम तिने केले. त्यामुळे मजकडून काही तिचे वैभव काढून घेणे जमणार नाही.’

सूर्यदेव पार्वतीला म्हणाले, ‘तू गरीबाच्या वेषात गेलीस म्हणून तिने तुला ओळखलं नाही.’ पार्वतीला खूप आनंद झाला की आपण त्या गरीब स्त्रीला जो वाजवसा दिला त्याचे तिने निग्रहाने पालन केले. त्यामुळे त्या स्त्रीवर सगळेच देव प्रसन्न आहेत. पार्वती मूळ वेषात तिच्याकडे गेली. ती स्त्री खूप आनंदित झाली. तिने पार्वतीला बसायला पाट दिला. तिला साष्टांग नमस्कार केला. तिने सांगितलेल्या वाजवशाबद्दल तिचे आभार मानले. तिला पार्वती प्रसन्न झाली व उत्तम आशीर्वाद दिला.

जशी त्या स्त्रीला पार्वती प्रसन्न झाली व सातही देव प्रसन्न झाले तसे तुम्हा आम्हास होवो, ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण…

– महेश नाईक

व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..