नवीन लेखन...

कढीपत्ता

विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघात रोज संध्याकाळी पेन्शनर मंडळी जमायची. त्यातील आठ दहाजणं नियमित यायची. त्या ग्रुपमध्ये नाना न चुकता हजेरी लावायचे…
रोज तास, दोन तास गप्पा मारुन सर्वजण आपापल्या घरी जात असत. कुणी आपल्या उमेदीतल्या आठवणी सांगत, तर कुणी आपल्या बाॅसला कसं ‘उल्लू’ बनवलं, ते तिखट मीठ लावून ऐकवत. अंधार पडायला लागला की, प्रत्येकाला घरची ओढ वाटू लागे..
एका संध्याकाळी, नाना कुणाशीही न बोलता शांतपणे बसलेले होते. जोशींनी त्यांना कारण विचारलं तर ‘काही नाही’ म्हणून ते पुन्हा शांतच राहिले. सर्वांनीच कारण विचारल्यावर ते बोलू लागले…
‘मित्रांनो, नोकरीतून निवृत्त झाल्यापासून आपण अनेक वर्षे एकत्र भेटलो, बोललो.. मात्र मी माझ्याबद्दल तुम्हाला कधीच काही सांगितलं नाही.. ते आज सांगणार आहे..
‘जेवणाच्या ताटातले, तुम्ही कुणीही व्हा… म्हणजे चपाती, सुकी भाजी, रस्साभाजी, खिर, कोशिंबीर, पापड, लोणचं अगदी वाट्टेल ते.. मात्र स्वतःचा, कढीपत्ता कधीही होऊ देऊ नका.. की ज्याला सहजपणे उचलून, बाजूला काढलं जातं…
मी खेड्यातून शहरात आलो. गावाकडून येणाऱ्या तुटपुंज्या पैशावर शिकलो. कमवा आणि शिका योजनेतून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं.. मला सरकारी नोकरी मिळाली. महिन्यातील पंधरा दिवस फिरतीवर असायचो..
दोन वर्षांनी आई वडिलांनी खेड्यातील एका मुलीशी लग्न लावून दिलं. आमचा संसार सुरु झाला. गावी वरचेवर जाणं होत असे. कधी आई वडील माझ्याकडे यायचे.
यथावकाश मला मोठी मुलगी व धाकटा मुलगा अशी दोन मुलं झाली. त्यांच्या शाळांना दिवाळी, मे महिन्याची सुट्टी लागली की मी सर्वांना घेऊन गावी जात असे. मुलं मोठी झाल्यावर गावी जाणं त्यांना नकोसं वाटू लागलं. दोघांच्या शाळेच्या पालकसभेला, वार्षिक स्नेहसंमेलनाला मला कधी जाता आलं नाही. ती भूमिका त्यांच्या आईनेच बजावली. नोकरीच्या निमित्ताने मी बाहेर असायचो, सहाजिकच मुलांना आईचाच सहवास अधिक मिळायचा. दोघेही आई सांगेल तशीच वागत असत. आईच्या लाडामुळे, त्यांना माझा धाक वाटेनासा झाला, आपुलकीही राहिली नाही..
मुलांचं माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. ते काॅलेजला जाऊ लागले. माझीही चाळीशी उलटून गेली होती. त्यांना हवं नको ते माझ्या पगारातूनच होतं होतं.. मात्र त्यात मध्यस्थी त्यांच्या आईची होती..
मुलं मोठी झाल्यावर पत्नीनं स्वतःला घरगुती व्यवसायात वाहून घेतलं. त्यामुळे तिचा माझ्याशी संपर्क पहिल्यासारखा काही राहिला नाही..
पदवीनंतर मुलीचं लग्न लावून दिलं. ती पूर्ण जबाबदारी पत्नीनं पार पाडली. माझं नोकरीमुळे गावी जाण्याचं प्रमाण कमी झाल्याने नातेवाईकांशी संबंध दुरावले. घरचेही गावी जायला कधीही उत्सुक नसतं.
मुलाला नोकरी लागल्यावर त्याचंही लग्न लावून दिलं. आता माझ्याही नोकरीची चारच वर्षे राहिली होती.. घराची सर्व सूत्रं पत्नीच्या हाती होती. तिचा व्यवसायही उत्तम चालला होता.
मी निवृत्त झालो. निरोप समारंभाला जवळच्या सहकाऱ्यांनी माझा सत्कार केला. कौतुकाची भाषणं केली. मात्र ती ऐकायला घरचं कुणीही आलेलं नव्हतं..
आता माझं घरातील अस्तित्व त्यांना रूचत नाही. मी माझा वेळ फिरणं, वाचन व आपल्यासोबत घालवतो.. माझं कुणी घरी आलेलं त्यांना पटत नाही..
वादापेक्षा, सुसंवाद महत्त्वाचा! मात्र तो काही होत नाही.. आनंदाने रहाण्यासाठी, प्रत्येकानेच पुढाकार घ्यायला हवा, परंतु सुरुवात कुणी करायची हाच मोठा प्रश्न आहे..’
एवढं बोलून नानांनी उसासा टाकला.. ऐकणारे सर्वजण निशब्द झाले होते..
जोशी म्हणाले, ‘नाना, जे झालं ते झालं.. आता यापुढे स्वतः आनंदात रहा आणि उर्वरित आयुष्य मजेत जगा! कढीपत्ता देखील किती महत्त्वाचा असतो, ते येणारा काळच त्यांना दाखवून देईल.. स्वतःला कधीही कमी समजू नका!!’
(काल्पनिक कथा)
— सुरेश नावडकर. 
मोबाईल: ९७३००३४२८४
२५-११-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..