नवीन लेखन...

जोशी काकांची छत्री

बँकेने मला नुकतीच बदली दिली होती. बँक व्यवसाय म्हणजे थेट जनसंपर्क, रोज विविध लोकांशी इंटरअ‍ॅक्शन. त्यात मला बँकेने प्रबंधकाची धुरा सांभाळायला दिली होती, काटेरी खुर्ची. मी ज्या शाखेत प्रबंधक म्हणून काम करीत होते. तेथील वस्ती मध्यम, उच्च मध्यम लोकांची होती. जास्त प्रमाणात सारस्वत लोकांची कॉलनी. माझ्या केबिनमधे विविध प्रकारच्या ग्राहकांची ये-जा असे. आता थोडी पार्श्वभूमी. त्यावेळी तिथे दोन जोरदार चालणाऱ्या सहकारी बँका बंद पडल्या होत्या. लोकांचे बऱ्यापैकी पैसे अडकलेले. आमची शाखा अत्याधुनिक तंत्रज्ञानासह उघडण्यात आली होती. सरकारी बँक असल्यामुळे आमची शाखा जोरदार व्यवसाय करीत होती.

असेच पावसाळ्याचे दिवस होते. शाखा स्वच्छ राहावी म्हणून आणि ग्राहकांची सोय व्हावी, म्हणून आम्ही छत्री ठेवण्यासाठी दोन तीन बादल्या ठेवल्या होत्या. एके दिवशी एक साधारण सत्तरीचे गृहस्थ काठी टेकत टेकत दुसऱ्या हाताने चष्मा सावरत माझ्या केबिनमध्ये आले. त्यांना बसायला सांगून पाणी दिले. ‘माझं नांव जोशी, मी तुमचा सगळ्यात जुना ग्राहक आहे. माझा तुमच्या बँकेवर जबरदस्त विश्वास आहे. पण आज तरी तो विश्वास डळमळताना दिसतोय.’ हे त्यांचे खडे बोल ऐकून मी जरा चरकलेच. कितीही केलं तरी आमच्याकडूनही चुका होतच असतात. दीर्घ सुस्कारा टाकीत ते बोलू लागले,

‘माझी काल घेतलेली नवीन कोरी काळी छत्री हरवली.’

मी, ‘अहो काय करायचं? आम्हीतरी कुठे कुठे लक्ष देणार? होतं असं कधी कधी.’

‘अहो तुम्ही असं बोलूच कसे शकता. ज्या बँकेवर मी एवढ्या विश्वासाने आयुष्याची पुंजी ठेवली. त्या बँकेत माझी नवीन, कोरी, कालच घेतलेली काळी छत्री हरवली?’

‘अहो काका आम्ही शोधून ठेवतो, नाहीतर ज्याने नेलीय तो ती आणून देतो का बघू.’ मी आपलं त्यांना कटवायला बोलले.

‘अहो पण माझी नवीन छत्री चोरताना त्या गृहस्थाला काहीच कसं वाटलं नाही. असो मी उद्या परत येतो, तोपर्यंत माझी छत्री शोधून ठेवा.’

कामाच्या रगाड्यात घडलेला प्रसंग मी साफ विसरून गेले. दुसऱ्या दिवशी तशीच व्यस्त होते. दुपारच्या सुमाराला परत केबीनच्या दारावर ठुक ठुक. कालचेच काका आत आले.

‘माझी काल हरवलेली नवी कोरी छत्री मिळाली का हो?’

‘काका, नाही मिळाली. काळजी करू नका मी तुम्हाला दुसरी देते.’ बेल वाजवून शिपायाला बोलवले.

बेंचमध्ये रोज चारदोन छत्र्या हरवायच्या आणि चार दोन छत्र्या लोक विसरून जात. संध्याकाळी त्या सगळ्या छत्र्यांची रवानगी गोडाऊनमध्ये केली जात असे.

कधीमधी पावसाळ्यात, आम्ही छत्री आणायची विसरलो, तर त्यातलीच एखादी छत्री उचलायची आणि घरी नेऊन दुस़ऱ्या दिवशी परत आणायची. लोकांच्या विसरलेल्या छत्र्यांचा आम्ही पुरेपूर सदुपयोग करून घेत असू. आमचा बाळा शिपाई तर छत्री कधी विकत आणायचाच नाही. अख्खा पावसाळा तो विविध प्रकारच्या विसरलेल्या छत्र्यांचा स्वैर वापर करीत असे. असो. मुद्दा असा की, बेल ऐकून शिपाई आला. मी ऐेटीत फर्मावलं, ‘अरे लक्ष्मण काकांना गोडाऊनमध्ये घेऊन जा. एखादी छत्री, त्यातल्यात्यात नवीन छत्री काकांना दे बरं.’ प्रॉब्लेम सॉलविंग मेथडमध्ये निष्णात असल्यासारखी मी बोलले.

माझं वाक्य ऐकताच काका जोरात ओरडले, ‘अहो हे काय करताय? 100 रुपयाची छत्री मी विकत घेऊ शकत नाही काय? तुम्ही माझा अपमान करताय. कोणीतरी अनवधानाने विसरलेली छत्री, तुम्ही परस्पर माझ्या हातात देताय? मी आलोय माझी, तुमच्या बँकेत विसरलेली, छत्री न्यायला. मला माझी स्वतःची नवीन कोरी कालच विकत घेतलेली काळी छत्री पाहिजे.’

‘अहो काका, कशाला परत 100 रुपये खर्च करताय? ज्याने ती छत्री चोरली, त्याला ती त्याला द्यावीशी नाही वाटत. जो ही छत्री विसरून गेला, त्याला इथे येऊन ती शोधाविशी नाही वाटत. काही हरकत नाही, तुम्ही न्या एखादी छत्री.’

जोशीकाकांच्या चेहऱ्यावरचे भाव पटापट बदलत होते,

‘मॅडम, तुम्ही जे सांगत आहात, ते माझ्या सदसद्विवेकबुद्धीला मुळीच पटत नाही. अहो, माझा या परिसरात मान आहे. मला लोक ओळखतात. आय एम अ रिस्पेक्टेबल पर्सन इन धीस एरिया, डू यू अंडरस्टैंड?’

मला तर हा प्रोब्लेम कसा सोडवायचा कळेनासं झालं.

काकांनी दीर्घ श्वास घेतला व ते बोलू लागले, ‘अहो मला प्लीज समजून घ्या, माझ्या सदसद्विवेकबुद्धीला खरंच पटत नाही. बरे चला, तुम्ही म्हणताय तसं, मी एक छत्री घेऊन गेलो. ती उघडून रस्त्यावर चालू लागलो आणि अचानक, ज्या माणसाची ती छत्री आहे त्याने मला हटकलं तर? अहो काय तोंड दाखवू मी जगाला? एवढ्या वर्षाची माझी इज्जत, माझा मानमरातब धुळीलाच मिळणार ना?’

त्यांचा कसनुसा चेहरा पाहून हसावं का रडावं कळेचना. आता मात्र पावसाळ्यात आपण छत्री आणायला विसरलो म्हणून बँचमधे विसरलेल्या छत्र्या नेताना काकांचा चेहरा डोळ्यापुढे उभा राहतो. शेवटी एका छत्रीने माझा जगाकडे पहाण्याचा द़ृष्टिकोन मात्र खरंच बदलला होता.

–सुजाता तांडेल

(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे  दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..