नवीन लेखन...

जिम कॉर्बेट – भाग ४

 

युद्धाच्या काळात जिम बराच काळ बाहेर होता. त्याची बहीण मॅगी कालाढूंगीला एकटीच रहात होती. तेव्हा दळणवळणाची साधने पण नव्हती. जवळचे मोठे शहरसुद्धा २० किलोमीटर दूर! पण मॅगीच्या सुरक्षिततेची चिंता जिमला क्षणभरसुद्धा वाटली नाही. कारण ती त्याच्या मित्रांच्या सहवासात पूर्ण सुरक्षित आहे याची त्याला खात्री होती आणि हे मित्र म्हणजे भारतीय लोकच होते. त्यांच्यावर त्याचा पूर्ण विश्वास होता.

जिम कॉर्बेटला आयुष्यात खूप मान-सन्मान प्राप्त झाले. १९४२ साली त्याला ‘ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर’ व पुढे ‘कम्पॅनियन ऑफ द इंडियन एम्पायर’ हा सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला. ‘फ्रिडम ऑफ जंगल’ हा सुद्धा त्याला सन्मान मिळाला होता व त्यामुळे भारतातील कोणत्याही जंगलात फिरण्याची त्याला मुभा होती. हा मान फक्त दोनच लोकांना देण्यात आला होता.

जिम कॉर्बेटने आपल्या आयुष्यात खूप वेळा परदेश दौरे केले पण तो कुठेच रमला नाही कारण भारत हे त्याचे घर होते.

जिम कॉर्बेटचे घर कालाढुंगीला नैनितालच्या वाटेवर होते. येणारे जाणारे तिथे पाय लावून जात. कोणी पैशाच्या मदतीच्या अपेक्षेने तर कुणी एक कप चहाच्या अपेक्षेने तर कुणी आपली गाऱ्हाणी सांगण्यासाठी तर कोणी औषधासाठी सुद्धा! त्याचे घर म्हणजे सर्वांना मुक्तद्वार होते. जिमला सरकारने विशेष दंडाधिकारीचा दर्जा दिला होता. त्याला न्यायनिवाडा करण्याची अनुमती दिली होती. लोकांचे त्याच्यावर प्रेम होते. विश्वास होता. लोक तर त्याची भलावणी ‘गोरा साधू’ म्हणून करीत. सर्वजण त्याला ‘कारपिट साहेब’ म्हणून ओळखत असत.

कालाढुंगीमध्येच त्याने साधारण १ एकर जागा घेऊन एक घर बांधले व त्याचे नाव ठेवले ‘विंटर हाऊस.’ उन्हाळा सोडून त्याचा बराचसा मुक्काम विंटर हाऊसमध्येच असे. या विंटर हाऊसच्या परिसरात १९१५ साली त्याने २१० एकर जागा १५०० रुपयाला खरेदी केली व त्या जागेचे ४० भाग करून एक वसाहत स्थापन केली. पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्याने नाले बांधले त्या जागेत लोकांना वसवले. त्यांना शेती करण्यासाठी प्रद्युक्त केले. त्यासाठी मक्याचे बियाणे त्याने आफ्रिकेतून आणवले. मका, केळी, बटाटा, गहू इ. ची लागवड केली. त्यांच्या शेतीचे जनावराकडून नुकसान होऊ नये म्हणून या परिसराभोवती जवळजवळ ६ फूट उंचीची व ९ कि.मी. लांबीची भिंत बांधली. त्यासाठी त्याने स्वत: चे पैसे खर्च केले. आपल्या मोतीसिंग नावाच्या नोकराला व इतर लोकांना घरे बांधून दिली. लोकांनी एकत्र यावे, विचारांचे आदान-प्रदान व्हावे म्हणून ३ सज्जे बांधले. मोतीसिंगसाठी बांधलेल्या घरात आज त्याची तिसरी पिढी सुखाने रहात आहे. त्याने बांधलेली भिंत आजही उभी आहे. त्याच्या या ‘छोटी हल्दवानी’ वसाहतीत आजही पाणी खळाळत आहे. आजही हा सर्व परिसर हिरवागार आहे. या वसाहतीत १-२ वृद्ध भेटतात, ज्यांनी जिमला पाहिले होते. जिमचे नाव काढताच त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. १९४७ साली जिमने भारत सोडला तेव्हा या सर्व जमिनी त्याने कोणताही मोबदला न घेता त्या गरीब गिरीजनांना देऊन टाकल्या. तरीपण त्याच्या मृत्यूपर्यंत तो त्या जमिनीचा कर भरत होता.

जिम कॉर्बेट श्रद्धाळू ख्रिश्चन होता. तो चर्चमध्ये जात असे. पण प्रत्येक हिंदू सणात त्याचा फार मोठा सहभाग असे. नैनिताल-कालाढुंगी रस्त्यावर त्याने देवीचे देऊळ बांधले होते. त्याने जातिधर्मात कधीच भेदभाव केला नाही.

१९३६ ते १९४३ या काळात मॉरक्विस लिनलिथगो हे भारताचे व्हाईसरॉय होते. त्या काळात भारताचा व्हॉईसरॉय म्हणजे सर्वोच्च पद! एके दिवशी त्यांच्या वाचण्यात जिमचे लेख आले व त्यांना जिमबद्दल कुतूहल निर्माण झाले. पुढे संयुक्त प्रांताच्या गव्हर्नरकडून जिमचे एक पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्यावेळी भारताची उन्हाळी राजधानी सिमला होती. उन्हाळ्यात व्हॉईसरॉयचे कार्यालय सिमल्याला स्थलांतरित करण्याच्या कालावधीत व्हॉईसरॉय दक्षिण भारताचा दौरा करीत. पण लिनलिथगोना इच्छा झाली या काळात एखाद्या जंगलात, शांत ठिकाणी आपण काही काळ वास्तव्य करावे आणि विशेष म्हणजे ते जिमच्या कालाढुंगीला आले व शेवटी जिमचे अतिशय जवळचे मित्र झाले. जिमबरोबर ते स्थानिक लोकांत मिसळत, गोरगरिबांशी, गिरीजनांशी गप्पा मारत. त्यांच्याशी हस्तांदोलन करीत. भारताचा व्हॉईसरॉय आपल्याशी इतका जवळिकीने वागतो हे पाहून लोकांना आकाश ठेंगणे होई पण त्याबरोबर सर्वांना हे माहित होते या सर्वाला जिम कारणीभूत आहे. जिमच्या ‘मॅन इटर्स ऑफ कुमाऊँ’ या पुस्तकाची आशीर्वादपर प्रस्तावना लिनलिथगो यांनी लिहिली होती. लिनलिथगोनी सहकुटुंब बऱ्याचवेळा कालाढुंगीला भेट दिली होती व जिमबरोबर सुखाचे दिवस घालवले होते.

भारतात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. ब्रिटिशांबद्दल चीड जनमानसात पसरू लागली. आज ना उद्या भारत स्वतंत्र होणार हे स्पष्ट दिसू लागले. त्याचे युरोपियन मित्र मायदेशी परतू लागले आणि मग जिम पुढे प्रश्न उभा राहू लागला, स्वातंत्र्यानंतर या भारतात आपले स्थान काय? जरी तो जन्माने भारतीय असला तरी शेवटी तो युरोपियन होता. त्याला वाटू लागले, या पुढे आपले स्थान हे दुय्यम नागरिकाचे! शेवटी जड अंतःकरणाने त्याने भारताचा कायमचा निरोप घेऊन केनियात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. आपले नैनितालमधील घर त्याने वर्मा कुटुंबियांना विकले व कालाढुंगीचे घर पण विकण्याचा प्रस्ताव दिला पण हे घर त्यावेळी विकले गेले नाही. जिम केनियाला गेल्यानंतर ते घर चिरंजी लाल यांनी २००० रुपयांना विकत घेतले. पण काही दिवसांनी ते घर चिरंजी लाल यांच्याकडून परत विकत घेऊन त्याचा कम्युनिटी सेंटरमध्ये बदल करण्याचा जिमचा विचार होता पण तो सफल झाला नाही. ‘छोटा हल्दवानी’ तील तर सर्व जमीन तिथे राहणाऱ्या लोकांना त्याने वाटून टाकली होती. शेवटी एके दिवशी जड अंतःकरणाने त्याच्या आवडत्या लोकांचा, त्याच्या लाडक्या भारताच त्याने निरोप घेतला. पण भारताशी आपला संबंध संपू नये या हेतूने त्याने आपले नैनितालच्या अलाहाबाद बँकेतील खाते बंद केले नाही. आजही या बँकेत जिम कॉर्बेटचे खाते आहे व बँकेच्या सुरक्षा कक्षेत ‘मॅगीचे’, जिमच्या बहिणीचे मृत्युपत्र सुरक्षित आहे. भारत सोडण्यापूर्वी त्याने आपला नोकर रामसिंग याला कालाढुंगीला जमीन दिली व दरमहा १० रुपये रामसिंगला देण्याची सूचना बँकेला दिली. जिमच्या मृत्यूनंतर हीच प्रथा मॅगीने पण पुढे चालू ठेवली.

नोव्हेंबर १९४७ मध्ये लखनौ-मुंबई मार्गे तो केनियाला निघून गेला. त्याने २-३ ठिकाणी स्थायिक होण्याचा प्रयत्न केला व शेवटी तो नेयरी या ठिकाणी स्थायिक झाला. कारण त्या ठिकाणाहून दिसणारी केनिया पर्वतराजीचे अनुपम दृश्य! हे निश्चित, नैनितालहून दिसणाऱ्या हिमालयाच्या पर्वतरांगांची सर त्याला नव्हती. पण आता आहे त्यावर त्याला समाधान मानावे लागत होते. नेयरीला त्याने कॉफीचे मळे घेतले. ‘सफारीलँड’ नावाची कंपनी सुरू केली. ही कंपनी काढण्याचा मूळ हेतू म्हणजे लोकांनी शिकारीपासून दूर जावे व प्राण्यांचे छायाचित्रण करावे.

नेयरीचा सर्व परिसर जंगलांनी वेढलेला. वन्य पशूंचा त्या ठिकाणी वावर. नेयरीजवळ एका मोठ्या झाडाच्या आधाराने झाडावर एक छोटेसे हॉटेल तयार केले होते. ‘ट्री टॉप’ या नावाने ते प्रसिद्ध होते. खूप हौशी प्रवासी त्या हॉटेलच्या व्हरांड्यात बसून वन्य पशूंच्या निरीक्षणाचा आनंद लुटत. फेब्रुवारी १९५२ मध्ये ब्रिटनची राजकन्या एलिझाबेथ व तिचा नवरा प्रिन्स फिलीप यांनी या परिसराला भेट देण्याचे ठरवले. तेव्हा त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी जिमवर सोपवली होती.
एका प्रकारे जिमचा तो सन्मानच होता. आपली बंदूक घेऊन जिम सतत त्यांच्याबरोबर होता. या त्याच्या अनुभवावर त्याने ‘ट्री टॉप’ हे छोटेखानी सुरेख पुस्तक लिहिले आहे.

केनियातसुद्धा पशु-प्राण्यांच्या संरक्षणासाठी खूप प्रयत्न केले. केनिया सरकारनेसुद्धा त्याल ‘वन्यजीव प्रतिपालक’ ही उपाधी देऊन त्याचा सन्मान केला.

नेयरीत जिम रमण्याचा प्रयत्न करीत होता तरी त्याचे व मॅगीचे मन भारताकडे वारंवार ओढ घेत होते. भारताच्या आठवणी तो विसरू शकत नव्हता. मॅगीने जल पण त्याला भारतात परत जाण्याविषयी सुचवले होते. आपल्या भारतातील मित्रांना परत भेटण्याची त्याची खूप इच्छा होती. निदान काही दिवसांसाठी भारत भेटीवर येण्याची त्याची खूप इच्छा होती पण ती शेवटपर्यंत फलद्रूप झाली नाही.

१९५१ व १९५३ साली त्याने ब्रिटनला भेट दिली. त्यावेळी ब्रिटनच्या राणीशी त्याची भेट झाली होती.

भारतात असताना त्याला झालेला मलेरिया, अति धूम्रपानाची सवय व नेयरीमध्ये ज्वालामुखीतून पसरणारी राख याचा विपरीत परिणाम जिमवर तो केनियात गेल्यापासून होऊ लागला होता. १९ एप्रिल १९५५ रोजी त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपचारासाठी त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण सर्व व्यर्थ ठरले. काही वेळातच त्याचे देहावसान झाले. आपल्या मृतदेहावर हिंदू पद्धतीप्रमाणे अग्निसंस्कार व्हावेत अशी त्याची इच्छा होती पण दुसरे दिवशी नेयरीच्या सेंट पीटर चर्चच्या आवारात त्याच्या देहावर ख्रिश्चन रिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले गेले.

जिम कॉर्बेट शेवटपर्यंत अविवाहित होता. त्याला जन्मभर साथ दिली त्याच्या बहिणीने, मॅगीने. ती पण अविवाहित होती.

निसर्गाच्या मोहपाशात गुरफटलेला हा जिम कॉर्बेट पर्यावरण प्रेमींच्या हृदयात कायमचे स्थान प्राप्त करून बसला आहे. त्यांनी वाघाच्या इंडो-चायनीज प्रजातीला ‘कॉर्बेट टायगर’ म्हणून नाव दिले आहे. आज जगभर ही प्रजाती ‘कॉर्बेट टायगर’ म्हणून ओळखली जाते.

‘Always be brave, and try & make the world happier place for others to Live in.’ जिमने मॅगीला उद्देशून उच्चारलेल्या या त्याच्या शेवटच्या शब्दातच त्याच्या जीवनाचे मर्म सामावलेले आहे. अशा या कॉर्बेटला विसरणे केवळ अशक्य आहे.

–प्रकाश लेले

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..