नवीन लेखन...

जगातील सर्वात जुनी भाजी – भरल्या वांग्याचा रस्सा

जगातील सर्वात जुनी भाजी ही भरल्या वांग्याचा रस्सा आहे असे पुरावे सापडले आहेत. हडप्पा संस्कृतीत सुमारे चार हजार वर्षांपूर्वीच्या अवशेषांमध्ये भरल्या वांग्याची आणि डाळ वांग्याची रेसीपी मिळाली आहे. त्यामुळेच भारत ही आमटी आणि कढीची जननी आहे असे मानले जाते.

थायलँडची फिश करी जगातील सर्वात टेस्टी करी समजली जाते, पण माझा त्यावर आजिबात विश्वास नाही. आमच्या गोव्यात गेलं तरी नुसती शीत कोडी म्हणजे मच्छीकरी आणि भात, सगळ्या आमट्यांच्यात सर्वात भारी आहे असे माझे प्रामाणिक मत आहे.

याव्यतिरिक्त खसखस आणि भाजलेले खोबरे घालून केलेली गोव्याची शाकुटी, तिरफळ आणि तमालपत्र घातलेलं मच्छीचं कालवण, ओल्या नारळाचं दूध घालून केलेली माशांची आमटी, वर आमसूल आमचूर घालून त्याला दिलेला हलकासा आंबटपणा रसिक खाणाऱ्याला अक्षरशः विरघळवून टाकतो.

मलबारी मठ्ठी करी,भरपूर कढीपत्ता वापरून आणि ओल्या खोबऱ्याची रेलचेल असलेली कारवारी करी, कोंकणातली काळीमिरी तमालपत्र वेलदोडा वगैरे घालून केलेला रस्सा, कदाचित हा पहिला दुसरा नंबर ठरविणाऱ्या मंडळींनी खाल्लेलाच नसावा.
माझ्यामते अमुक एक रेसिपी जास्त चविष्ट किंवा अमुक एक पहिल्या नंबरवर असे ठरविणे चूकच आहे.

बिरबलाला एकदा बादशहाने विचारले, बिरबल जगातले सर्वश्रेष्ठ हत्यार कोणते? वेळेला उपयोगी पडते ते! या बिरबलाच्या उत्तराप्रमाणे सर्वोत्कृष्ट रेसिपी कोणती? असा प्रश्न मला विचारला तर मी सांगेन, माझ्या भुकेच्या वेळेला मिळते आणि माझं उत्कृष्ठ पोषण करते ती सर्वोत्कृष्ट रेसिपी.

ज्यांना पाककला अवगत नाही त्या मंडळीनी आपली हॉटेलं चालविण्यासाठी गावरान जेवण, चुलीवरचं जेवण अशी फालतू फॅडं आणून आपापल्या पोळ्या भाजून घेण्याचे उद्योग चालविलेले आहेत.

आपल्याच कडच्या ट्रॅडिशनल रेसिपीज बघितल्या की आपण बावळट लोक गावरान जेवण करण्याच्या फंदात पडून लबाडांची धन का करून देतो? असा मला मोठ्ठा प्रश्न पडतो.

तुतान खामेन भारतातून मसाले मागवून आपले ताट भारतीय मसालेदार पदार्थांनी सजवत असे, असे उल्लेख इतिहासात आहेत आणि आपण मात्र कोळशाचा दम दिलेलं अर्धवट शिजलेलं, तिखटजाळ, ज्या पाककृती मध्ये कलेचा कोणताही अंश नाही, असे जेवण भरपूर पैसे खर्च करून निव्वळ गावरान या नांवामुळे मूर्खासारखे मस्त मस्त करत फस्त करून ढेकरा देतो.

निर्बुद्धतेची सुद्धा सीमा असायला हवी. भारतीय रेसीपीज जगात सर्वोत्कृष्ट आहेत हे माझे ठाम मत आहे, मूळ अमेरिकन इटालियन आणि मेक्सिकन पदार्थांना भारतीय टच दिल्याशिवाय आपण ते खाऊही शकत नाही, आपणच काय पण त्या त्या देशातले लोक सुद्धा आता भारतीय मसाला रेसिपीजचे मुरीद झालेले आहेत.

चायनीज रेसिपीज हा एक स्वतंत्र विषय आहे, चायनीज पदार्थ खुद्द चायनीज लोकही कसे खाऊ शकतात? याचे मला खूप आश्चर्य वाटते. भारतीय माणसांना आपल्या स्वतःतील गुण माहिती नाहीत असे दुर्दैवाने म्हणावे लागते.

भारतीय रेसीपीज इतर कोणत्याही रेसीपीज पेक्षा कलात्मक आहेत, चविष्ट आहेत आणि आरोग्यदायी सुद्धा आहेत यात शंकाच नाही, फक्त भारतीयांना स्वतःला प्रोजेक्ट करता येत नाही इतकेच.

-विनय भालेराव.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..