नवीन लेखन...

जगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ५

४१.  प्रपद्यन्ते लोकाः कति न भवतीमत्र-भवती

मुपाधिस्तत्रायं स्फुरति यदभीष्टं वितरसि ।

शपे तुभ्यं मातर्मम तु पुनरात्मा सुरधुनि

स्वभावादेव त्वय्यमितमनुरागं विधृतवान् ॥ ४१

मराठी- माते, तुला किती जण शरण येतात याला मर्यादाच नाही, याचे उघड कारण म्हणजे (प्रत्येकाला तू त्याचे) वांछित देतेस. उलटपक्षी, मी (तुला) शपथपूर्वक सांगतो की, माझ्या मनात मात्र तुझ्याबद्दल स्वभावतःच निस्सीम प्रेम साठलेले आहे.

जना ना मर्यादा, जननि तुज येती शरण से

मनी जो जे वांछी, पुरविसि तया कारण असे ।

परी सांगे घेता शपथ, मम चित्ती तुजप्रती

बहुप्रीती आहे करत नित निर्व्याज वसती ॥ ४१

४२.  ललाटे या लोकैरिह खलु सलीलं तिलकिता

तमो हन्तुं धत्ते तरुणतरमार्तण्डतुलनाम् ।

विलुम्पन्ती सद्यो विधिलिखितदुर्वर्णसरणिं

त्वदीया सा मृत्स्ना मम हरतु कृत्स्नामपि शुचम् ॥ ४२

मराठी- तरण्याबांड (प्रखर) सूर्याची अंधाराचा नाश करण्याची जी क्षमता असते, तिची तुलना लोकांनी (तुझी) कपाळी टिळा लावलेली (पापाचा सहज नाश करणारी) माती(च) धारण करते. जी नशिबात लिहिलेली अभद्र रेषाही त्वरित नष्ट करते, ती तुझी ओली माती माझे सर्व दुःख हरण करो.

तमाच्या नाशाची प्रखर रविची दिव्य क्षमता

कपाळी मातीचा तिलक तव तो तुल्यबल त्या ।

तियेची रेषाही अशुभ पुसुनी टाकित बरी

तुझी ओली माती सकल मम दुःखा दुरि करी ॥ ४२

४३.  नरान्मूढांस्तत्तज्जनपदसमासक्तमनसो

हसन्तः सोल्लासं विकचकुसुमव्रातमिषतः ।

पुनानाः सौरभ्यैः सततमलिनो नित्यमलिनान्

सखायो नः सन्तु त्रिदशतटिनीतीरतरवः ॥ ४३

मराठी- त्या त्या (आपल्या) परगण्याशी मनाने आसक्त झालेल्या मूर्ख जनांना जे वृक्ष आपल्या विकसित फुलांच्या गुच्छांच्या मिषाने(रूपाने) खदाखदा हसतात, आणि काळ्या भुंग्यांना आपल्या सुगंधाने नित्य पावन करतात, असे स्वर्गंगेच्या काठावरील वृक्ष आमचे मित्र होवोत.

मनी मूढांच्या जे वसत, वसतीप्रेम, हसती

बहाराच्या रूपे तरु खदखदा त्यास कुमती ।  

बने पुण्यात्माही मधुप सुरभी सेवन रुचे 

तरू ऐसे तीरी तव सुहृद होवोत अमुचे ॥ ४३    

४४.  यजन्त्येके देवान्कठिनतरसेवांस्तदपरे

वितानव्यासक्ता यमनियमरक्ताः कतिपये ।

अहं तु त्वन्नामस्मरणकृतकामस्त्रिपथगे

जगज्जालं जाने जननि तृणजालेन सदृशम् ॥ ४४

मराठी- तिन्ही लोकातून वाहणा-या हे सरिते, कित्येक जन (मुक्तीसाठी) अत्यंत कठीण आराधना असलेल्या देवांची उपासना करतात, तर इतर अनेक यमनियमां(कर्मकांडा)नी मोहित होऊन त्यालाच घट्ट धरून बसतात. आई, मी मात्र तुझ्या नावाचे स्मरण करण्यात कृतकृत्य होऊन या संसाररूपी  जाळ्याला गवताच्या जाळी(प्रमाणे तकलादू) मानतो.

कुणी पूजी देवां कठिण बहु ज्यां खूष करणे

कुणी आहूती दे, यमनियम वा घट्ट धरणे ।

परी माते नामा जपुनि कृतकर्तव्य जगती

जगाचे जाळेही गवतवत वाटे मजप्रती ॥ ४४

४५.  अविश्रान्तं जन्मावधि सुकृतजन्मार्जनकृतां

सतां श्रेयः कर्तुं कति न कृतिनः सन्ति विबुधाः ।

निरस्तालम्बानामकृतसुकृतानां तु भवतीं

विनाऽमुष्मिँल्लोके न परमवलोके हितकरम् ॥ ४५

मराठी- जन्मभर निरलसपणे सत्कर्मांचे महत्कृत्य करीत असतात अशा सज्जनांचा अभ्युदय करण्यासाठी कितीतरी देव कार्यतत्पर आहेत. परंतु या जगात ज्यांनी कोणतीच चांगली गोष्ट केलेली नसल्याने निराधार असलेल्या लोकांना मात्र तुझ्याखेरीज कोणी हित करणारे दिसत नाही.

जगी सत्कृत्यासी सतत करिती सभ्य जन जे

हिता त्यांच्या साधी सुरगण मुदे तत्पर असे ।

जये नाही केले सुकृत जननी जीवनभरी

जना पापी तारी तुजविण जगी कोण दुसरी ॥ ४५

४६.  पयः पीत्वा मातस्तव सपदि यातः सहचरै-

र्विमूढैः संरन्तुं क्वचिदपि न विश्रान्तिमगमम् ।

इदानीमुत्सङ्गे मृदुपवनसंचारशिशिरे

चिरादुन्निद्रं मां सदयहृदये शायय चिरम् ॥ ४६

मराठी- आई, तुझे जल पिऊन घाईघाईने मूर्ख मित्रांबरोबर मौजमजा करण्यासाठी गेलेल्या मला किंचितही विश्रांती मिळाली नाही. हृदयात कणव भरलेल्या माते, (कधीचा) निद्राहीन असलेल्या मला मंद वा-याच्या झुळुकांनी शीतल झालेल्या तुझ्या तीररूपी मांडीवर कायम विश्रांती दे.

जला प्राशूनीया सहित सुहृदा मौज करण्या            

गमे मूर्खांसंगे फुरसत क्षणाची न बसण्या ।

नसे निद्रा माते, पवन मृदु तीरा हिंव करी            (हिंव- थंड)

 दयाळू दे अंकी/तीरी सतत मज निद्रा झडकरी ॥ ४६   

४७.  बधान द्रागेव द्रढिमरमणीयं परिकरं

किरीटे बालेन्दुं नियमय पुनः पन्नगगणैः ।

न कुर्यास्त्वं हेलामितरजनसाधारणतया

जगन्नाथस्यायं सुरधुनि समुद्धारसमयः ॥ ४७

मराठी- हे स्वर्गंगे, तुझा सुंदर कंबरपट्टा (आणि कटीचे वस्त्र) त्वरेने (आवरून) बांध. शशिकलेला आपल्या मुकुटामध्ये नागरूपी रज्जूंनी पुनः जखड. (या वेळी) इतर सर्वसामान्य जनांप्रमाणे तू निष्काळजीपणा, दिरंगाई करू नकोस. (प्रत्यक्ष) जगन्नाथा(जगन्नाथ पंडित / जगाचा स्वामी)च्या उद्धाराची घटका आता येऊन ठेपली आहे.

झणी पट्टा बांधी सुबक, कटिला घट्ट वसनी          

पुन्हा अर्धेंदूला जखड मुकुटी सर्पकसणी ।        (रशना- कसणी- दोर)

नसे ऐरागैरा, समय दवडी आज न फुका  

जगन्नाथाची ये जननि जवळी मोक्षघटिका ॥ ४७

४८.  शरच्चंद्रश्वेतां शशिशकलशुभ्रालमुकुटां

करैः कुम्भाम्भोजे वरभयनिरासौ च दधतीम् ।

सुधाधाराकाराभरणवसनां शुभ्रमकर-

स्थितां त्वां ये ध्यायन्त्युदयति न तेषां परिभवः ॥४८

मराठी- शरद ऋतूतील चंद्रासारखी तेजस्वी कांती, चंद्राच्या कोरीमुळे लखलखणारा अनुपम मुकुट, (दोन) हातात धारण केलेले कुंभ व कमळ, (आणि दुस-या दोन) हातांनी (दिलेले) वरदान व अभय, अमृतधारांप्रमाणे झुळझुळणारे वस्त्र, पांढ-या मगरीच्या पाठीवर आरूढ अशा तुझे जे ध्यान करतात, त्यांची अप्रतिष्ठा होत नाही.

तनू तेजस्वी शारदशशि जणू , कोर शिखरी

झळाळी शोभे, घे कमल घट, दे आशिश करी ।

बसे नक्रपृष्ठी, धवल झुलते वस्त्र खुलते 

तुझ्या रूपा ध्याती, जग न कधि त्या तुच्छ गणते ॥ ४८

४९.  दरस्मितसमुल्लसद्वदनकान्तिपूरामृतै-

र्भवज्वलनमर्जिताननिशमूर्जयन्ती नरान् ।

चिदेकमयचन्द्रिकाचयचमत्कृतिं तन्वती

करोतु मम शं तनोः सपदि शन्तनोरङ्गना ॥ ४९

मराठी- मंद प्रवाही स्मितहास्याने प्रकाशमान वदनाच्या मोहक अमृताच्या प्रवाहाने जी संसाराग्नीने ग्रासलेल्या लोकांना सतत उत्साहित करते, चमचमणा-या चांदण्याच्या राशींचा चमत्कार पसरवणारी अशी शंतनूची भार्या माझ्या देहाचे त्वरित् कल्याण करो.

सुहास्य वदनी प्रभा उजळ अमृताचा झरा

जनास भवतापल्या सतत ओज देई खरा ।

अपूर्व घन चांदणे पसरवी चमत्कार हा

सुखी मम तनू करो त्वरित शंतनूची प्रिया ॥ ४९

५०.  मन्त्रैर्मीलितमौषधैर्मुकुलितं त्रस्तं सुराणां गणैः

स्रस्तं सान्द्रसुधारसैर्विदलितं गारुत्मतैर्ग्रावभिः ।

वीचिक्षालितकालियाहतपदे स्वर्लोककल्लोलिनि

त्वं तापं निरयाधुना मम भवव्यालावलीढात्मनः ॥ ५०

मराठी-  हे स्वर्गातून उचंबळणा-या, कालियाने दुखापत केलेले (श्रीकृष्णाचे) पाय आपल्या लाटांनी धुणा-या (गंगे), आता तू भवभुजंगाने डंख केलेल्या (ज्याचे बाबतीत) मन्त्र(उपचार) मुके झाले, औषधांचा प्रभाव बंद झाला, सर्व देवांचा थरकाप झाला, अमृताचा जीव गळून गेला, (विष उतरवणारा) गारुत्मत दगड (गरुडपाच रत्न) भंगला, (असा) माझा ताप नष्ट कर.

झाले मंत्र मुके, नि औषध फिके, देवां भरे कापरे

गेला अमृतजीवही गळुनिया,गारुत्मही भंगले ।

कालीया करि दंश ज्या हरिपदा, होते तुवा क्षाळिले

ग्रासी हा भवसर्प आज मजला, तापा हरी सत्वरे ॥ ५० 

५१.  द्यूते नागेन्द्रकृत्तिप्रमथगणमणिश्रेणिनन्दीन्दुमुख्यं

सर्वस्वं हारयित्वा स्वमथ पुरभिदि द्राक्पणीकर्तुकामे ।

साकूतं हैमवत्या मृदुलहसितया वीक्षितायास्तवाम्ब

व्यालोलोल्लासिवल्गल्लहरिनटघटीताण्डवं नः पुनातु  ॥ ५१

मराठी- हे आई, द्यूतामध्ये (शंकराला) गजचर्म, दूत (पिशाचगण), रुद्राक्षमाळा, नंदी, चंद्र असे सर्वस्वात हरविल्यानंतर, आता स्वतःलाच पणाला लावण्याची इच्छा त्रिपुरांतकाने व्यक्त केली असता, मंद हास्य करीत पार्वतीने हेतुपुरःसर (‘अजून ही राहिली आहे’ अशा अर्थाने तुझ्यावर) नजर टाकताच तू जे आपल्या लाटा तात्काळ उसळवीत थैमान घातलेस, ते तांडव आम्हाला पवित्र करो.

गौरी जिंके जुगारी प्रमथगण गजाजीन रुद्राक्षमाला       (गजाजिन- हत्तीचे कातडे)

इंदू नंदी गमावी, वदत हर पणा मीच लावी स्वतःला ।

हासूनी गूढ गाली नजर तुजवरी फेकिता होसि क्षुब्ध

लाटा थैमान चाले थयथय, मजसी जी करो आज शुद्ध ॥ ५१

५२.  विभूषितानङ्गरिपूत्तमाङ्गा

सद्यः कृतानेकजनार्तिभङ्गा  ।

मनोहरोत्तुङ्गचलत्तरङ्गा

गङ्गा ममाङ्गान्यमली करोतु  ॥ ५२

मराठी- मदनाचा शत्रू शंकराचे मस्तक शोभिवंत करणारी, अनेकांची पापे क्षणार्धात नष्ट करणारी, चित्तवेधक व उंच उंच लाटा उसळत असलेली गंगा माझी अंगांगे निर्मल करो.

करी शिवाचे शिर शोभिवंत

पापे जनांची कुचली क्षणात ।

उत्तुंग लाटा रमणीय चित्ता

गंगा करो स्वच्छ तनूस आता  ॥ ५२

‘गंगालहरी’चे मराठी स्वैर रूपांतर समाप्त.

—————————–

— धनंजय बोरकर (९८३३०७७०९१)

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

1 Comment on जगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग ५

  1. – ( continued ) –
    – तुम्ही केलेल्या अन्य अनुवादांबद्दलही वाचलें. Kudos!
    -मी स्वत: श्रीगणपतिअथर्वशीर्ष व श्रीरामरक्षा यांचें मराठी पद्यानुवाद केलेलें आहेत, व तें प्रसिद्धही झालेले आहेत. तुमचा पत्ता कळवलात, तर पाठवेन.
    – सुभाष नाईक
    ९०२९०५५६०३, ९८६९००२१२६

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..