नवीन लेखन...

बेशिस्त मुंबईकरांची एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर आत्महत्या ?

काल परळला २२ मुंबैकरांनी परळ-एलफिन्स्टनच्या रेल्वेपुलावर आत्महत्या केली. म्हणजे असा निश्कर्ष सरकारी वकिलपत्र घेतलेल्या लोकांच्या पोस्टवरून काढावा लागतो. एका विदुषीने, तिने कशी स्वत:ची सुटका करून घेतली आणि मेलेल्या इतरांनी कसा अफवांवर विश्वास ठेवून आत्महत्या केली त्याचं छान वर्णन केलंय, ते इतकं प्रभावी आहे की, मला या लेखाला ‘बेशिस्त २२ मुंबईकरांची आत्महत्या’ असं शिर्षक देण्याशिवाय मला गत्यंतरच नव्हतं.

काल एलफिन्स्टनच्या पुलावरचा अपघात प्रवाशांच्या बेशिस्तीमुळेच झाला असा काहीजणांनी एसीत किंवा सुरक्षित ठिकाणी बसून, टिव्ही पाहात काढलेला निश्कर्ष आहे. दर तिन मिनिटाला, पिक अवर्सच्या वेळी माणसांची जनावरं घेऊन येणाऱ्या लोकलमधून उतरणाऱ्या माणसांची गर्दी या स्टेशनला काही नवी नाही. ब्रिजही जुनाच होता. पावसाचं निमित्त झालं, गर्दी वाढली, गर्दीत पुढे काय चाललंय याचा मागच्याला पत्ता लागत नाही. ज्या पुलाची क्षमता जेमतेम हजारभर माणसांची, त्याही घाईतल्या, तिथं पाचेकहजार किंवा कदाचित जास्तच, गर्दी झाली, तर कोणती शिस्त त्या माणसांनी पाळणं आवश्यक आहे, याचं उत्तर मात्र कोणीच देत नाही. मग वर्षानूवर्ष हिच माणसं आणि हिच बेशिस्त गर्दी शहाणी होती की नव्हती?

अनेकांनी अमेरीकेतल्या ९-११च्या प्रसंगी तेथिल लोक कसे धिरोदात्तपणे आणि शिस्तीने वागले उदाहरण दिलंय. हे शहाणे हे विसरतात, की अमेरीकेत माणसाच्या, नव्हे, त्यांच्या नागरीकांच्या, जीवाला मोठी किंमत आहे. दोन मिनिटांची शिस्त पाळली की किंवा थोडा संयम पाळला की, सरकारी यंत्रणा याऊन त्यांची सुखरूप सुटका करणार हा त्यांचा सरकारवरचा विश्वास आहे आणि त्यांनी तो अनुभवातून प्राप्त केलाय. आपल्याकडे खरंच अशी परिस्थिती आहे काय, हा प्रश्न अमेरीकेचं उदाहरण देऊन मुंबैकरांना बेशिस्त म्हणणाऱ्या प्रत्येक महानुभवाने स्वत:ला विचारावा. आपत्कालीन परिस्थितीत एक मुंबैकरच दुसऱ्या मुंबैकराच्या मदतीला धावतो हे वारंवार दिसतं, अनुभवायला येतं. लोकलला लोंबकळणाऱ्या माणसाच्या कंबरेत हात घालून त्याला आधार देणारा हा बेशिस्त मुंबैकरच असतो. गाडीच्या बाहेर लोंबकळू नये ही शिस्त आणि नियम न पाळण्यासाठी त्याला मजबूर करणाऱ्या सरकारला आणि त्याच्या मुर्दाड यंत्रणांना मात्र हे सुशिक्षित अजीबात दोष देत नाहीत याचं मला सखेद आश्चर्य वाटतं. टक्रेवारीच्या हिशोबात मग्न सरकारी यंत्रणा अपघात झाल्यानंतर मग नाईलाजाने आपलं बुड हलवतात, ते मरणोत्तर पंचनामा करायला आणि स्वत:ला लोकप्रतिनिधी म्हणवणारे लांडगे सांत्वनाला. कालंही कचऱ्यासारखी विखुरलेली प्रेतं उचलायला हा बेशिस्त मुंबैकरच धावला होता, प्रशासन नाही हे २४ तासाच्या आत हे जंतू विसरले की काय? अशी यर्व परिस्थिती असताना काल लोकांनी संयम पाळून शिस्तीने परिस्थिती हाताळायला हवी होती असं हे पांढरपेशे कसं काय म्हणू शकतात.

एलफिन्स्टनची गर्दी काय नवी नव्हे. मुंबईत काल पाऊसही काय प्रथमच पडला नाही. मुंबईत गर्दी आणि पाऊस हे समिकरण कुठेह डेडलीच असतं आणि एसफिन्स्टनसारख्या अवघी एकच चिंचोळी एक्झिट असणाऱ्या पुलावर तर ते दररोजचं मरण असतं. हे प्रशासन आणि सरकारला माहित नव्हतं असं म्हटलं, तर सरकारचा आणि जनतेचा संबंध पार तुटला आहे असाच निश्कर्ष काढावा लागतो. आणि माहित होतं असं म्हटलं, तर मग बेपर्वा आणि मग बघू हीच वृत्ती सरकारात आहे असं म्हणावं लागतं. अशावेळी प्रशासनाने शिस्त दाखवणं आवश्यक असतं, असं मात्र मुंबईतरांना बेशिस्त म्हणणाऱ्या कुठल्याच विचारवंताला वाटत नाही. दर मिनिटाला जाहीरातींची रेकाॅर्ड वाजवणाऱ्या रेल प्रशासनाला, काल त्याच स्पिकरचा उपयोग करून लोकांना सावध करावसं का वाटलं नाही, फेरीवाल्यांच्या भोवती घुटमळणाऱ्या पोलिसांना गर्दी नियंत्रीत करण्यासाठी पाठवण्याची शिस्त प्रशासनाने पाळली नाही, यावर मात्र कुणाचा चकार शब्द नाही. अहो सरकारची भक्ती जरूर करा, पण इतक्या अंधपणाने नको.

परळ, एसफिन्स्टन, लोअर परेल भागातील व्यापारी कार्यालयांची जी बेसुमार वाढ झालीय, त्याला मुंबैकरांची बेशिस्ती कशी काय कारणीभुत? या कार्यालयात काम करण्यासाठी दररोज ५०-१०० किमीचा प्रवास जीव मुठीत घेऊन काय करणाऱे हजारो-लाखो हतबल प्रवासी, इतर दिवशी ही शिस्त कसे पाळतात? ते कालच बेशिस्त होते का? या व अशा प्रश्नांची उत्तरही या हुशार चिकित्सकांनी द्यायला हवीत.

अफवामुळे कालचा अपघात घडला असं आता सरकारी अघोषित प्रवक्त्यांकडून पसरवलं जातंय. पाचेक हजार घाबरलेल्या माणसांच्या गर्दीत कुणीतरी काहीतरी बोललं असणारच. तसं बोललं म्हणजे काय ती अफवा होत नाही. प्रत्येकजण स्वत:च्या जीवावा भितोच व तो स्वत:च वाचवला पाहिजे कारण इथे सरकार आणि प्रशासन निकम्म आहे, हे आणि एवढंच त्याला कळतं. कानावर येणारी बातमी अफवा आहे की खरी, ह्याची खातरी करण्याचा मन:स्थितीत तो घाबरलेला माणूस नसतो आणि असला तरी ती शहानिशा त्याने कुठे करायची बे त्याला कळत नाही. अशा परिस्थितीत तो जीव वाचवायचा प्रयत्न करणारच, मग तो बेशिस्त कसा? आपणही तेच केलं असतं. एकुलती एक एक्झीट असणाऱ्या चिंचोळ्या पुलावर हे कधीही घडू शकतं, याचा अंदाज शिस्तीने वागणाऱ्या सरकारी यंत्रणांना का आला नाही, याचं उत्तरही या दिड शहाण्यांनी आमच्यासारखा मुर्ख आणि बेशिस्त माणसांना दिलं पाहिजे.

आता काही किरकोळ बेशिस्त प्रश्न. स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षात ही बेशिस्त बजबजपूरी वाढू कोणी दिली? वाढत्या गर्दीच्या प्रमाणात सर्वच स्टेशन्सवर सुविधा द्यायच्या शिस्तीची जबाबदारी कोणाची होती? रेल्वे पुलांवर शिस्तीत धंदा करणाऱ्या फेरीवाल्यांना बेशिस्त मुंबैकर जबाबदार कसा? स्टेशनवर शिस्तीने वागणाऱ्या पोलिसांची उपस्थिती का दिसत नाही? परळ भागात बेसुमार व्यापारी कार्यालय उघडण्यास परवानगी कोणी दिली? पूल मंजूर होऊनही बांधला गेला नाही, तो का, हे कोण बघणार? वरील गोष्टी होत नसतील, तर मग लोकं बेशिस्त आहेत असं म्हणण्यात काय हशील? याची उत्तरं मिडियावरील तज्ञ शहाणे देतील का?

आपल्या देशात सरकारला, मग ते कोणत्याही पक्षाचे असो, लोकांशी काही देणं-घेणं नसतं, हे वारंवार सिद्ध होतंय. रेल्वेत सुधारणा व्हायला पाहिजेत, हे काय नविन नाही. मुंबईचं विकेंद्रीकरून उपनगरांत कार्यालयं जावीत असं नियोजन बेशिस्त लोक करणार की सरकार. मेट्रो शहराच्या बाहेर लावून तिथे लोक स्थायीक कसे होतील हे कोण पाहाणार? मुंबईत मेट्रो लावून पुन्हा इथलीच गर्दी वाढवायची, हे नियोजन बेशिस्त लोकांनी करायचं की शासनाने? समुद्रातला शिवपुतळा आवि बुलेट ट्रेन आपली प्राथमिकता आहे का? आहे त्याच गोष्टी सुधारून मग बुलेट ट्रेनच कशाला, राॅकेट ट्रेन आणि पुतळा उभारायला काय हरकत आहे? असे असंख्य प्रश्न, लोकांच्या शिस्तीकडे बोट दाखवलं की कोल्ड स्टोरेजमधे जातात. आपण एकमेंकाकडे बोट दाखवायचं आणि पुन्हा नव्या अपघाताची वाट पाहायची, सरकारं येतात-जातात. ना त्यांना चिंता, ना आपल्याला. देवावर चाललंय सारं..

हे बेशिस्त लोक सर्व अडी अडचणी मुकाट्याने सहन करायची शिस्त अजून बाळगून आहेत हेच मोठं समजा. ते जर खरोखरंच बेशिस्त असते ना, ह्या उद्रेकाने काय काय खाक झालं असतं, याची फक्त कल्पना करून बघा..

बेशिस्त मुंबैकरांनी दररोजच्या कष्टांना, हालअपेष्टांना तोंड देत संयमाची शिस्त अद्यापही पाळली आहे, हे पुरेसं नाही का?

— नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..