नवीन लेखन...

इन्स्पेक्टर सावंत…. क्राईम ब्रॅंच बोलतोय !!!!

 

विष्णूनगर, डोंबिवलीतला एक कनिष्ठ मध्यमवर्गीय वस्तीचा परिसर. सगळी पांढरपेशी वस्ती. बहुतेक नोकरदार. घरात हम दो हमारे दो आणि असलेच तर आजोबा- आजी. अशी छोटी कुटुंबे. पापभीरू. कुणाच्या अध्यात ना मध्यात. टेलिफोन, लाईट, पाणी, सोसायटी वगैरेंची बिले वेळच्या वेळी भरणारी. थोडक्यात साधीसुधी माणसे. पोलीस वगैरेबद्दल जबरदस्त भीती. पोलीस स्टेशनचे नाव घेणे किंवा एखादा पोलीस घरी येणे म्हणजे फारच अवघड वाटणारी मंडळी. शिवाय दूरदर्शनवर दाखविण्यात येणाऱ्या मालिकांमधून एखाद्याला पोलीसांनी आत घेतले म्हणजे त्याचे काय होते हे पाहून मनात भरलेले गैरसमज. आता कित्येक पोलीस चौक्यांची परिस्थिती म्हणजे जिथे पोलीसांनाच आत बसायला जागा मिळायची मारामार अशी असते तिथे आणखी कुणाला आत घेणार? एकूणच पोलीस आणि संबधित खात्याबद्दल जबरदस्त भीती. तर सांगायचा मुद्दा असा की नको रे बाबा ते पोलीस स्टेशन. आपण आपले चार हात दूर आहोत तेच बरे अशी भावना.

याच विष्णूनगरात अपर्णा मानकर राहत होत्या. नवरा एका औषध कंपनीत फिरता विक्रेता. कामानिमित्त बरेच दिवस बाहेर जाणारा. एक लहान मुलगी जवळच शाळेत जाणारी. असे त्रिकोणी कुटुंब. नवरा कामावर गेला, मुलगी शाळेत गेली की अपर्णाबाईंची गडबड कमी व्हायची. मग शांतपणे घरातील उरली सुरली कामे आटोपायची. दुपारी मोलकरीण येऊन धुणीभांडी करून गेली की जेवायचे. थोडा वेळ टीव्ही पाहायचा. काही वाचायचं आणि मग एखादी डुलकी घेऊन संध्याकाळी बाजार, भाजीपाला वगैरे कामे उरकायची. मुलीला शाळेतून घेऊन यायचे असा नित्याचा नेम. नवरा रात्री आठ – नऊपर्यंत यायचा.

अशाच एका दिवशी नवरा फिरतीवर गेला होता. अपर्णाबाई सगळे आवरून जेवण झाल्यावर स्वयंपाकघरातील झाकपाक करून टीव्ही लावून बसल्या. वर्तमानपत्र, मासिके चाळली. डोळ्यांवर झोप येऊ लागली तशा त्या उठल्या आणि आत बेडरुममध्ये जाऊन लवंडल्या. बिछान्यावर पाठ टेकली. डोळे मि;ले. तेवढ्यात हॉलमध्ये टेलिफोन वाजू लागला. उठून फोन घेणे त्यांच्या अगदी जीवावर आले होते. आता यावेळी कोणाचा फोन? त्यांना फारशा मैत्रिणी नव्हत्या. नवरा प्रकाश फिरतीवर असला म्हणजे सहसा फोन करत नसे. फक्त यायच्या दिवशी फोन करुन सांगायचा. हा. कधीतरी मुलीच्या शाळेतून टिचरचा फोन यायचा. काही पेरेंटस मिटिंग वगैरे असली तर. त्यांनी थोडा वेळ वाट पाहिली. वाजून वाजून बंद होईल म्हणून. पण तो वाजतच राहिला तशा त्या नाईलाजाने उठल्या आणि हॉलमध्ये जाऊन त्यांनी फोन उचलला.

“हॅलो? कोण बोलताय?” त्यांनी कंटाळलेल्या आवाजात विचारले.

”विक्रम सावंत, इन्स्पेक्टर क्राईम ब्रॅंच”

”इन्स्पेक्टर क्राईम ब्रँच? ” अपर्णाबाईंची झोप खाडकन उतरली. त्यांना वाटले हा कोणाचा रॉंग कॉल दिसतोय.

“अहो हा रॉंग नंबर दिसतोय. कोण हवंय तुम्हाला?”

”मिस्टर प्रकाश मानकर” अत्यंत करडा आवाज आला. आता त्यांची झोप पार पळाली.

“ हो त्यांचाच आहे हा फोन. पण ते आत्ता घरी नाहीत. बाहेरगावी गेले आहेत. आपण एका आठवड्याने फोन करा. ”

”हे पहा बाई ही फार सीरियस केस आहे. आवाज आता जास्तच राकट झाला होता.

”सीरियस? म्हणजे?” त्यांचे हातपाय थरथरायला लागले. घशाला कोरड पडल्यासारखे झाले.

”तुमच्या फोनवरून खूप अश्लील फोन झाले आहेत. आम्ही आवाज आणि फोन रेकॉर्ड केले आहेत. तुमच्या फोनचे बिल एक लाख सत्तर हजार झाले आहे!”

”काय? एक लाख सत्तर हजार?” अपर्णाबाईंना आता फक्त चक्कर यायचेच बाकी होते. त्या फार घाबरल्या.

“अहो ते आमचे नसेल हो. कुठून तरी आमच्या फोनचे चुकीचे कनेक्शन होत असेल. अहो आमचे बिल तर कधीच सात आठशेच्या वर जात नाही. मग हे एक लाख सत्तर हजार कसे होणार?” एवढे बोलण्यानेच त्यांना धाप लागल्यासारखे झाले. त्यांना आता रडू फुटेल की काय असे वाटू लागले.

“हे बघा बाई, ते मला सांगू नका. प्रकरण फार गंभीर आहे. या गुन्ह्याला जबरदस्त शिक्षा आहे. प्रकरण जाहीर झाले तर तुमच्या अब्रूचे धिंडवडे उडतीलच पण तुमच्या नवऱ्याची नोकरी कायमची जाईल. समजतय का मी काय म्हणतोय ते?” आवाजाची धार वाढली होती

“अहो पण सावंतसाहेब, मानकर बाहेरगावी गेले आहेत आता मी काय करु? ते येईपर्यंत तरी थांबा, प्लीज!”

“हे पाहा त्यांची वाट बघत बसलात तर प्रकरण माझ्या हातात राहणार नाही. वर जाईल. मी आता लगेच मिटवू शकतो मिटवायचे असेल तर बोला, नाही तर तुमच्या नवऱ्याला अटक करू.” त्याने दरडावले.

“अटक? अहो काय बोलताय?” त्यांच्या डोळ्यासमोर प्रकाशला आत टाकलं आहे, लाथाबुक्क्यांनी तुडवताहेत, सिगारेटचे चटके देताहेत वगैरे दृष्ये तरळू लागली.

“नको, नको, तुम्ही सांगा काय करायचे ते । जमण्यासारख असेल तर मी करीन”

“तुम्ही आत्ताच्या आत्ता म्हापा ब्रिज जवळ या. येताना वीस-पंचवीस हजार रुपये घेऊन या. आपण बघू काय करता येत ते”
“वीस -पंचवीस हजार? अहो एवढे पैसे मी आता कुठून आणू? माझ्याकडे आता काही नाहीत हो.”
“जेवढे आहेत तेवढे आणा. बाकी काही दागिने आणा. उशीर करू नका, नाहीतर पस्तावाल.” अपर्णाबाईंची दातखिळीच बसली त्या कशाबशा म्हणाल्या,
“बर बर जेवढे जमेल तेवढे घेऊन येते. पण मी तुम्हाला कशी ओळखणार?”
“हे पाहा, तुम्ही हिरवी साडी नेसून या. म्हापा ब्रिजजवळ या. आम्ही फार तर दोन तास वाट पाहू. तेवढ्यात नाही आलात तर प्रकरण वरच्या साहेबांकडे जाईल. मग वीस -पंचवीस हजारातही काम होणार नाही. आम्ही इंडिका गाडीतून येऊ. आलं ना लक्षात?” असं दरडावून त्यानं फोनच ठेवला. पुढं काही बोलायची अपर्णाबाईंना संधीच ठेवली नाही.

अपर्णाबाईंची झोप पूर्ण उडालीच पण प्रकाशच्या मागे हे काय लफडे लागले या चिंतेने त्या सैरभैर झाल्या. क्षणभर काहीच सुचेना. डोके सुन्न होऊन गेले. पण मग त्या इन्स्पेक्टरला भेटून पुढे काही मार्ग तरी निघतोय का ते पाहावे म्हणून त्यांनी पुढच्या हालचाली त्वरित सुरु केल्या. एक हिरवी साडी कशीबशी गुंडाळली. कपाट उघडले पण आत फक्त चारशे रुपयेच मिळाले. थोडे दागिने होते ते घेतले. वेळ पडलीच तर असावे म्हणून. घराला कुलूप ठोकून त्या धावत पळतच रस्त्यावर आल्या. समोरूनच एक रिकामी रिक्षा जात होती. ती थांबवूनच त्या घाईघाईने आत शिरल्या आणि म्हणाल्या, ”चल, चल लवकर घे रे”.

पण घाई घाईत रिक्षा कुठे घ्यायची ते सांगायचे त्यांच्या ध्यानी आलेच नाही. रिक्षावाला त्यांच्या तोंडाकडे पाहत बसला. ‘ अरे असा पाहत काय बसलास? चल लवकर” त्या त्याच्यावर डाफरल्या. त्यांच्या जागी कुणी पुरुष माणूस असता तर रिक्षावाल्याने त्याला झापले असते पण त्या पडल्या बाई. शिवाय घाईत दिसत होत्या. थोड्या घाबरल्यासारख्याही वाटत होत्या. कुणी तरी आजारी असावे, काहीतरी संकटात असाव्यात असे त्याला वाटले. अशा वेळी माणसे सैरभैर होतात हे त्याने बरेचवेळा पाहिले होते. तो समजून म्हणाला,

”ताई कुठे जायचे? कुठे घेऊ रिक्षा?”
अपर्णाबाईंना आपली चूक ध्यानात आली. त्या म्हणाल्या, ”सॉरी ! चल लवकर घे क्राईम ब्रॅंच म्हापा”

रिक्षावाल्याना पोलीस स्टेशनची चांगली माहिती असते. वेळोवेळी संबंध येतोच ना? पण त्याला आजपर्यंत कधीही क्राईम ब्रॅंच म्हाप्याला जावे लागले नव्हते. क्राईम ब्रॅंच म्हाप्याला आहे हेच मुळी त्याला ठाऊक नव्हते. ठाऊक नव्हते म्हणण्यापेक्षा म्हाप्याला एक छोटी पोलीस चौकी आहे एवढंच त्याला ठाऊक होते. तसे तो बाईंना म्हणाला,

”ताई म्हाप्याला कोणतीही क्राईम ब्रँच नाही. पण आपण असे करू जाताना वाटेतच विष्णूनगर पोलीस चौकी आहे तिथे मी चौकशी करतो.”

”बरं बरं ठीक आहे. पण जरा जलदी कर बाबा! ”
विष्णूनगर पोलीस चौकीवर रिक्षावाल्याने एका ओळखाच्या हवालदाराकडे म्हापा क्राईम ब्रॅंच नेमकी कुठे आहे याची चौकशी केली. त्याला आश्चर्य वाटले.

“क्राईम ब्रँच? म्हापा? कोण विचारतंय?”

रिक्षावाल्याने रिक्षाकडे बोट दाखवलं आणि म्हणाला, ”त्या तिकडे माझ्या रिक्षात ताई बसल्या आहेत ना त्यांना जायचे आहे तिकडे !”

हवालदार म्हणाला, ”जरा थांब, मी साहेबांना विचारून येतो.” तो आत गेला. सब-इन्स्पेक्टर सुर्वेसाहेबांना कडक सॅल्युट ठोकून ही अजब माहिती सांगितली. साहेबांना पण कुतूहल वाटलं. त्यांनी हवालदारांना त्या बाईंना आत घेऊन यायला सांगितलं. अपर्णाबाई घाबरत घाबरत आल्या. सुर्वेसाहेबांसमोर बसल्या. मनात आले या रिक्षावाल्याने भलत्याच ठिकाणी अडकवले. आता यांना काय हवे आहे? काहीतरी वेगळेच लफडे तर नाही ना मागे लागायचे? त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टच दिसत होती. सुर्वेना शंका आली. ते म्हणाले,

“बाई, अशा घाबरू नका. अहो म्हाप्पाला कोणतीही क्राईम ब्रॅंच नाही. म्हणून तुम्हाला बोलावले. तुम्हाला कुणी सांगितले तिथे जा म्हणून? कोणाला भेटायचेय तिथे? तुमचा काहीतरी घोटाळा होतोय असे मला वाटले म्हणून तुम्हाला बोलावले. जरा मला नीट सांगता का? आम्ही काही मदत करता येते का पाहू”

“मनांत त्यांच्या विचार चालू होता की या बाई तर साध्यासुध्या वाटतात मग यांचे क्राईम ब्रँचकडे काय काम असणार? त्या एवढा घाबरल्या का आहेत?”

अपर्णाबाईंना आता प्रश्र पडला. त्यांना काय सांगावं ? नाही म्हणावं तर क्राईम ब्रँचमध्ये तुमचं काय काम या प्रश्राला काय उत्तर देऊ? पण सुर्वेनीच त्यांची या द्विधा मनःस्थितीतून सुटका केली.

”हे पहा बाई, घाबरू नका. जे काय आहे ते न घाबरता सांगा. आम्ही शक्य ती सर्व मदत करू. घ्या पाणी घ्या.” त्यांनी पाण्याचा ग्लास पुढे केला.

अपर्णाबाईंनी घटाघटा पाणी ढोसले. चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि इन्स्पेक्टर सावंत क्राईम ब्रँच यांचा कसा फोन आला, त्याने काय सांगितले, कुठे भेटायला बोलावले वगैरे कथा सांगितली. ती कथा ऐकून सुर्वे उडालेच. ठाणे, वाशी परिसरात गेले काही दिवस अशाच फोनवर धमक्या येतात म्हणून त्यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. काही लोकांची फसवणूकही झाली होती. पोलीस त्या गुन्हेगाराच्या मागावरच होते आणि या बाई त्यालाच भेटायला निघाल्या होत्या. त्यांच्या सर्व प्रकार लक्षात आला. पण वर काही न दाखवता ते म्हणाले,

”बाई, चला आपण आमच्या वरच्या साहेबांना भेटू तेच यातून काही मार्ग काढतील” सुर्वे त्यांना घेऊन वरिष्ठ निरीक्षक श्री. जाधवसाहेब यांच्याकडे गेले. सगळ ऐकल्यावर ते म्हणाले,

”मानकरबाई, बरं झालं, तुम्ही इथे आलात. याच बदमाशाच्या आम्ही गेले काही दिवस मागावर आहोत. तुम्ही जर आम्हाला थोडी मदत केलीत तर आम्ही त्याला नक्कीच पकडू. काय करणार ना मदत आम्हाला?”

आता मानकरबाईचा धीर खूपच चेपला होता. शिवाय इन्स्पेक्टर सावंत असा कोणी नसून तो एक भामटा आहे हे कळल्यावर तर त्यांची सगळी काळजीच मिटली होती. पोलीस स्टेशनच्या आत आल्याबद्दल आता त्यांना फारच आनंद वाटत होता. त्या आनंदाने तयार झाल्या.

”होय साहेब, तुम्ही सांगाल ती मदत करीन.”

जाधवसाहेबांनी मग भराभर सूत्रे हलवली. सहाय्यक आयुक्त बाबासाहेब मोरे यांच्या कानावर ही हकिगत घातली. त्यांचा सल्ला घेतला आणि पुढची योजना आखली. हाताशी वेळ फारच थोडा होता. मानकरबाईंचा पोलीस स्टेशनमध्ये येऊन ह्या सर्व चौकशीच्या सोपस्कारामध्ये तास – दीड तास गेला होता. आता उशीर केला तर सावज हातातून निसटणार होते. त्यांनी झटपट सूचना दिल्या.

”बाई, तुम्ही याच रिक्षावाल्याच्या रिक्षातून म्हाप्याकडे निघा. आम्ही साध्या वेषात एका खाजगी मारूती कारमधून तुमच्या मागे येतो. कोणतीही इंडिका तुमच्या रिक्षाजवळ आली आणि तुमची चौकशी करू लागली की तुम्ही तुमचा रुमाल काढून चेहरा पुसायचा. तोच इशारा समजून आम्ही पुढचं बघून घेऊ. घाबरु नका. जमेल ना?”

”हो जमेल. पण मला इंडिका गाडी कशी असते ते माहीत नाही”
”त्याची काळजी करू नका. हा रिक्षावाला आहेच ना त्याला विचारा”
”तुम्ही फक्त तुमच्याशी कोणी बोलायला लागला तरच इशारा करायचा. एखाद्या वेळी तो माणूस तुम्ही रिक्षातून उतरायची वाट पाहील. पण काही झाले तरी तुमची चौकशी नक्कीच करेल. घाबरू नका. आम्ही तुमच्या मागेच आहोत.”

त्यांनी सब-इन्स्पेक्टर सुर्वे आणि त्यांचे दोन साथीदार घेतले. साधा पेहेराव केला ते लागलीच निघाले. मानकरबाईंची रिक्षा पुढे आणि त्यांच्यामागे थोड्या अंतराने मारूतीचे शेपूट अशी ही वरात निघाली. आता वरातीचे घोडे आणि नवरदेवाचीच कमी होती. नवरदेवाच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. अशा तयारीत जाधव, सुर्वे आणि मंडळी चांगलीच तरबेज होती. अशी कित्येक लग्ने त्यांनी कोणत्याही विघ्नाची पर्वा न करता यथासांग पार पाडली होती. विघ्नहर्तेच होते. तो अनुभव दांडगा होता. फक्त वधू पक्षाला म्हणजे मानकरबाईना काळजी लागली होती. हे लग्न कसे पार पडतेय याची. वधू पक्षच तो. काळजी वाटणारच!

वरात म्हापा ब्रिजजवळ आली तशी इंडिका रिक्षाच्या बरोबरीने धावू लागली. अगदी खेटूनच. जणू नवरदेवाला हिरव्या साडीतल्या वधूचा शोध घ्यायची घाईच झाली होती! सिग्नलला रिक्षा थांबली. बाजूलाच इंडिका थांबली तशी इंडिकातला नवरदेव रिक्षात डोकावून विचारू लागला,

”आप ही मानकर मॅडम?”

“हो. मीच. आपणच का इन्स्पेक्टर सावंत?”
“हो मीच. आता रिक्षा सोडा आणि ब्रिज क्रॉस करून पलीकडे या आपण तिथे भेटू”

मानकरबाई म्हणाल्या, ”हो येते.” आणि त्यांनी रुमाल काढून चेहरा पुसायला सुरुवात केली. त्या घाबरल्या आहेत असे इन्स्पेक्टर सावंतसाहेबांना वाटले. मासा आता पुरता गळाला लागला. आता मसाला लावून तळायचा असे तो मनातले मांडे, नव्हे तुकडे खात बसला. इंडिका चालवणारा त्याचा साथीदारही या तळणाच्या खमंग वासाने सुखावला होता. मेजवानीच्या आठवणीत दोघे दंग असतानाच मागून त्यांच्या इंडिकाला एक धक्का बसला. आपल्या कार्यात हा कोण विघ्न आणतोय म्हणून नवरदेव रागावून खाली उतरला आणि मारूतीच्या मालकाला जाब विचारायला धावला. मारूतीच्या मालकाला फार आनंद झाला. नवरदेव स्वतःच आला म्हणून तो त्याच्या स्वागताला खाली उतरला. दुसऱ्या बाजूने सुर्वे खाली उतरले आणि दोघांनी मिळून नवरदेवाच्या हातात मुंडावळ्या घातल्या. सुर्वेच्या साथीदारांनीही मोठ्या चपळाईने नवरदेवाच्या साथीदाराला चतुर्भुज केले. हे सर्व इतक्या झटपट उरकले की इन्स्पेक्टरसाहेबाना आपण पोलीसांच्या ताब्यात गेलो हे क्षणभर कळलेच नाही. आणि कळले तेव्हा त्याच्या हातातील रिव्हॉल्व्हर पाहून ते गप्प बसले. सगळी वरात पुन्हा लग्नमंडपात म्हणजे पोलीस स्टेशनवर आली. नवरदेवांनी मग सगळी कहाणी न लाजता कथन केली.

सावंत मूळचा मालवणचा. मुंबइत येऊन छोट्या मोठ्या चोऱ्यामाऱ्या करायचा. तुरुंगवासही झाला. तिथेच त्याला काकडे भेटला. राहू-केतूची भेट झाली. दोघांनी मग भागीत हा धंदा सुरु केला. दुपारच्या वेळी घरी फोन करायचे. एकटी दुकटी गृहिणी फोनवर आली की तिला तुझा नवरा किंवा भाऊ गंभीर गुन्ह्यात अडकले आहेत असा दम द्यायचा. त्यांना सोडवतो म्हणून पैशाची मागणी करायची. पंधरा वीस फोननंतर एखादा मासा गळाला लागायचाच. पंधरा वीस हजाराची मागणी तशी फार वाटायची नाही. जमून जायचे असं करून त्यांनी ऐरोली, रबाले, सानपाडा, मुंब्रा, कल्याण. भिवंडी आणि मुख्यतः डोंबिवलीतच या फसवणुकीतून दीड लाख रुपये आणि दहा बारा तोळे सोने जमा केले होते. सुर्वेसाहेबांनी ते सर्व त्यांच्या घरातून परत मिळवले. काकडेच्या घरातूनही पाच हजार रुपयांची रोकड जस वेली. धंदा तसा तेजीत येत असतानाच हा रिक्षावाला शनीसारखा वक्री झाला. त्यांचे ग्रहच फिरले, त्याला ते काय करणार?

यथावकाश पुराव्यासकट गुन्हा दाखल होऊन दोघांची पुन्हा तुरुंगात रवानगी झाली. रिक्षावाल्याच्या चौकसपणामुळे आणि जाधवसाहेबाच्या झटपट कार्यवाहीने विष्णूनगर पोलीसांनी आरोपींना मोठ्या शिताफीने अटक करण्यात यश मिळवले.

— विनायक रा अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 56 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..