नवीन लेखन...

इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग एकवीस

गॅसनामा

गॅस झालाय. आता काय करावे ? अनेक जणांनी हाच प्रश्न विचारलाय. आधीच्या सर्व टीप नीट वाचल्या असतील तर याचा खुलासा सहज होतोय. तरी सुद्धा परत सांगतो.

गॅस होण्यासाठी काही तरी कुजणे आवश्यक आहे. काही तरी कुजल्याशिवाय गॅस तयारच होणार नाही. पोटात गॅस होतोय म्हणजे या ब्रह्मांडात कुठेतरी घोटाळा नक्कीच असणार. ( आमच्या वैद्य नानांचा हा आवडता शब्द, ब्रह्मांड ! )

या आतड्याच्या आत काय कुजणार ? आपण जे काही खातो पितो तेच ना ! जर ते पुढे सरकले नाही, जिथे आहे तिथेच साठून राहिले की गॅस बनायला सुरवात होते. अन्न पुढे पुढे सरकत असले की गडबड नसते. पाणी पुढे सरकत असले की शेवाळ धरत नाही. अडकले की शेवाळ धरायला, बुळबुळीतपणा वाढायला सुरवात होते.

लोकलच्या तिकिटाची रांग ( मराठीत लाईन लाईन ! ) व्यवस्थित पुढे जात असेल तर आरडाओरडा नसतो. जरा कोणाकडे सुटे पैसे नसले, आणि रांगेची हालचाल जरा थांबली की बोंबाबोंब सुरू झालीच म्हणून समजा !

जीवनाला गती हवी, थांबला तो संपला…..
याच न्यायाने खाल्लेल्या अन्नाला पण गती हवीच. अन्नाचा रस जिथे थांबेल तिथे अन्न चिकटून बसते. तिथेच जास्ती वेळ अडकले की कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. पहिले चिकटलेले असेल त्याला मागून येणारे अन्न चिकटते, आणि मागे रांग वाढत जाते. थरावर थर वाढतो. गॅस होत रहातो.

चिकटवण्याची प्रक्रिया पाणी करते आणि तेल या चिकटवण्याच्या बरोब्बर विरोधी गुणाचे आहे.
कणिक मळल्यानंतर हाताला चिकटते, कशाने काढली जाते ? तेलाने.
फणसाचा डिंक हाताला चिकटला तर तो सोडवण्यासाठी फक्त तेलाचा एक थेंब पुरतो.
ग्रीस डांबरासारखे चिक्कट पदार्थ हाताला चिकटले तरीसुद्धा खनिजतेल म्हणजे राॅकेलच मदतीला येते. याचा अर्थ चिकटपणा सोडवण्यासाठी तेल मदत करते.

जसं बाहेर तसंच आतमधे देखील! पोटाला आतड्यांना चिकटून बसलेला चिकट आम सोडवून बाहेर काढण्यासाठी तेलच मदत करते. म्हणून जेवणात तेल वापरावे. वरून कच्चे वापरले तर अधिक फायदेशीर. म्हणजे तयार झालेला आम चिकटत नाही. आणि वायुची निर्मिती अगदी “न” के बराबर !

गॅस वाढवायला पाणी पण मदत करते. म्हणून पाणी देखील गरजेनुसारच प्यावे. नियम करून अमुक लीटर पिऊ नये. पाणी जेवता जेवता प्यावे. अगोदर किंवा नंतर शक्यतो नको.

तहान लागेल तेव्हाच पाणी पिणे, जेव्हा एक नंबर दोन नंबर काॅल येईल तेव्हा, टाळाटाळ न करता, लगेचच जाऊन येणे, भूक असेल तेव्हा जेवणे, जेवणात सहा चवींचा वापर करणे या छोट्या छोट्या गोष्टी दररोज केल्या तर गॅस होणारच नाही.

गॅस होऊ नये म्हणून जेवणाची वेळ बदलावीच लागेल. सूर्यास्त होईपर्यंत खावे. त्यानंतर लगेचच आपली सायंपूजा आणि नैवेद्य! रात्रीचा नैवेद्य हा अगदी अल्प असतो, हे ध्यानात ठेवावे.

गॅस होऊ नये यासाठी म्हणजे अन्नपचन नीट व्हावे यासाठी जे करायचे तेच गॅस झाल्यानंतर देखील करायचे असते.

( या विषयावर गेल्या वर्षी याच दिवसात सविस्तर लेखमाला आलेली होती. )

हे करायचे नसेल तर नियमितपणे व्यायाम करावा. व्यायाम पोट हलेल, चिरडेल, असा असावा. उगाच चालण्याचा देखावा नसावा. यासाठी सूर्यनमस्कार आठवावा. नाहीतर देह जमिनीवर गडाबडा फिरवावा. लोटांगणे घालावीत. आतमधे चिकटलेले आम आदि सोडवून घ्यावे.

“हे काही आम्हाला जमणारच नाही”, अशी मनोभूमिका असणाऱ्या मंडळींनी, गॅस होऊ नये याकरीता जवळपास असणाऱ्या वैद्यांचे पत्ते शोधून ठेवावेत. ते वैद्य पंचकर्म आदि उपचार, जे जे सांगतील ते अगदी मनोभावे करावेत.

अन्यथा नंतर कधीतरी जिथे जावे लागणारच आहे, अशा आपल्याला आवडेल तशा, मल्टी सुपर स्पेशालीटी हाॅस्पीटल मधली एखादी रूम आधीच बुक करून ठेवावी. पै पै मिळवलेली सर्व स्वकष्टार्जित मिळकत, दहा पंधरा दिवसात त्यांच्या खात्यात खात्यान्तरीत करावी. हल्ली मोबाईल वर सुद्धा अॅप आहेतच. बॅकेत जायचे सुद्धा कष्ट नाहीत.

कष्टाविना काही नाही,
आमाविना गॅस नाही,
केल्याविना साध्य नाही,
आधी केलेची पाहिजे ।।

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
05.04.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..