नवीन लेखन...

भारताच्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी

कमला सोहोनी यांचा जन्म १९१२ साली इंदोर येथे झाला. त्यांचे वडील नारायणराव भागवत यांनी १९११ मध्येच पहिल्या तुकडीत इथे प्रवेश घेऊन ‘ऑरगॅनिक केमिस्ट्रीत’ पदव्युत्तर संशोधन केलं होतं. ह्याचप्रमाणे नारायणराव भागवत आणि यांच्या भावाने संशोधन करून मुंबई विद्यापीठाकडे एम.एस्सी.साठी प्रबंध देऊन ‘मूस गोल्ड मेडल ’ मिळवलं होतं. नारायणराव भागवत यांच्या दुसऱ्या मुलीचे नांव दुर्गा भागवत होते. दुर्गा भागवत या मराठीमधील विचारवंत, लेखिका होत्या. कमला सोहोनी यांनी केमिस्ट्री-फिजिक्स घेऊन बी.एस्सी. केलं होतं आणि त्या मुंबई विद्यापीठात पहिल्या आल्या होत्या.

२ जुलै १९३३ साली कमला सोहोनी रेल्वेने बंगलोरला तेथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेण्यासाठी आपल्या वडिलांबरोबर आल्या होत्या. कमला सोहोनी यांना शास्त्रज्ञ व्हायचं होतं . त्यावेळी इन्स्टिटय़ूटचे संचालक होते जगप्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते सर चंद्रशेखर व्यंकट रमन उर्फ सी. रामन. मुलगी आणि वडील त्यांना भेटायला गेले. कारण संस्थेने प्रवेशासाठी पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीत पास झालेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले होते. परंतु संस्थेकडून तिला पत्र आलं होतं, ‘अर्ज नामंजूर’. कारण होतं, ‘ स्त्रियांना प्रवेश देण्याची आमच्याकडे प्रथा नाही.’ हे उत्तर वाचून वडील , मुलगी मुंबईहून रामन यांना भेटायला आले. सर व्यकटेश रमन यांच्याशी त्यांची बातचीत इंग्रजी मधून झाली. सर रमन मुलींना घेण्यास अनुकूल नव्हते. संशोधन हा स्त्रियांचा प्रांत नाही असे त्यांचे म्हणणे होते. तेव्हा कमला सोहोनी गप्प बसायला तयार नव्हत्या त्यांनी सर व्यकटेश रमन यांना इंग्रजी मधून विचारले .’‘ माझ्यात काय कमी आहे म्हणून प्रवेश नाकारता ? मुंबई विद्यापीठाने मुलींना उत्तेजन देण्याकरिता, इन्टर सायन्सच्या परीक्षेत प्रथम येणारीला शिष्यवृत्ती ठेवली आहे. ती ‘ सत्यवती लल्लुभाई शामळदास ’ शिष्यवृत्ती मी मिळवली आहे. मला पुढील शिक्षणाची संधी नाकारून माझ्यानंतर येणाऱ्या मुलींवर अन्याय करता आहात. पण आम्ही गांधीजींच्या तत्त्वावर निष्ठा बाळगणारी माणसं आहोत. सत्याग्रहावर विश्वास ठेवणारी आहोत. मी मुंबईला परत जाणार नाही. इथेच राहणार आणि तुमच्या दारापुढे सत्याग्रह करीन.’’

आता मात्र हे उत्कृष्ट इंग्रजीतलं बोलणं ऐकून सर रामन चमकले. ते थोडय़ा मवाळ स्वरात म्हणाले, ‘‘ ठीक आहे, तुझा एवढा हट्टच असेल तर देईन मी तुला इथे प्रवेश, पण एका अटीवर. एक वर्ष तुला इथे प्रोबेशनवर काम करावं लागेल. तुझ्या कामाची पद्धत पसंत पडली तर तुला रीतसर प्रवेश मिळेल.” सर रामनबरोबरच्या शाब्दिक चकमकीनंतर त्या जीवरसायनशास्त्र शाखेत, त्या शास्त्राचे प्राध्यापक डॉ. सुब्रह्मण्यम यांना भेटल्या . त्या शाखेचे व्याख्याते बॅनर्जी, श्रीनिवासय्या या तिघांनाही सी. रामन यांची प्रोबेशनची विचित्र अट ऐकून आश्चर्य वाटलं. कमलाची लहानखुरी मूर्ती, तिचं अभ्यासातलं प्राविण्य पाहून श्रीनिवासय्या म्हणाले, ‘‘ ठीक आहे, माझ्या हाताखाली काम कर. पण मला आळस, अळंटळं केलेलं मुळीच खपणार नाही. ” श्रीनिवासय्या कमला सोहोनी यांच्यावर खुश झाले कारण ते त्यांची काम करण्याची चिकाटी , धडपड पाहूनच . कमला सोहोनी म्हणाल्या मला फक्त ४ ते ६ दोन तास सुट्टी द्या त्या वेळेत मी टेनिस खेळेन . टेनिस खेळल्यामुळे माझं शारीरिक , मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.

एक वर्ष संपल्यावर कमला सोहोनी सी.व्ही. रामन यांना भेटल्या आणि म्हणाल्या ‘‘ सर, वर्ष पूर्ण झालं. माझ्या प्रवेशाचं काय? ’’ रामन म्हणाले, ‘‘ अर्थात तू इथे राहून संशोधन पुरं कर. तुझी ज्ञानलालसा, तळमळ, जिद्द पाहून मला इतका आनंद झालाय की मी आणखी दोन मुलींना या वर्षी प्रवेश देऊन माझी चूक सुधारणार आहे.’’ पुढे म्हणाले, ‘‘तू टेनिस चांगलं खेळतेस म्हणे. मी पाहिलं आणि ऐकलंही. मीही तुझ्याबरोबर एक दोन सेट्स खेळेन. चालेल ना?’’ कमला सोहोनी यांना आनंद झाला त्यांच्या मनात विचार आला हेच का सर जे मला म्हणत होते संसोधन हे मुलींचे क्षेत्र नाही. जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ, जीवरसायन संशोधक डॉ. डेरिक रिक्टर यांच्यामुळे कमलाला पीएच.डी.साठी १८ डिसेंबर १९३७ साली केंब्रिजमधे प्रवेश मिळाला. मुंबईत असताना १९३६ मध्ये त्यांनी अमेरिकेच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता. पण वेळ टळून गेली होती. पुढच्या वर्षी अर्ज करा, असं त्या विमेन विद्यापीठानं कळवलं होतं. पण कमला सोहोनी यांनी केंब्रिजला प्रवेश मिळताच त्या विद्यापीठाला कळवून टाकलं. ‘ मी यंदा अर्ज करणार नाही. मला दोन शिष्यवृत्त्या मिळाल्या आहेत. माझं संशोधन चालू आहे,’ असं पत्र एका स्त्रीकडून तेही एक मागास देशातल्या स्त्रीकडून, पाहून तिथल्या उच्चपदस्थांनी जीवरसायनशास्त्राचे जनक आणि नोबेल पुरस्कार विजेते सर गॉलंड हॉपकिन्स यांना पत्र पाठवून विचारलं, ‘ही मुलगी कोण? तिची माहिती कळवा.’ हॉपकिन्सनी कळवलं, ‘ही अत्यंत बुद्धिमान, कठोर परिश्रम करणारी मुलगी आहे.’ हॉपकिन्सचं हे प्रशंसापत्र पाहून ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ युनिव्हर्सटिी, विमेन’ फार प्रभावित झाली. त्यांनी कमला सोहोनी यांना ताबडतोब पत्र लिहिलं, ‘‘आम्ही तुला प्रवासी शिष्यवृत्ती देत आहोत. तिच्या आधारे तू अमेरिकेत ये.’’ ‘काही तरी घोटाळा आहे. ही शिष्यवृत्ती तर प्रोफेसरना देतात, मला कशी?’ असा प्रश्न कमला सोहोनी यांना पडला. त्यांनी हॉपकिन्सना विचारलं. त्यांनी सगळी हकिगत सांगून म्हटलं, ‘ यात काही घोटाळा नाही.’ अर्थात कमला सोहनी यांना अत्यंत आनंद झाला.

मार्च १९३८मध्ये युरोपात लीग ऑफ नेशन्सची बैठक होती. तेथील विद्यार्थी परिषदेला हजर राहा, असं त्यांना सांगण्यात आलं. तेही भारत, इंग्लड, अमेरिका या तीन देशांतील विद्यार्थ्यांची प्रतिनिधी म्हणून. कारण काय तर त्या भारतीय, शिकत होत्या केंब्रिजमध्ये आणि अमेरिकन फेडरेशनने त्यांना फेलोशिप दिली म्हणून त्या अमेरिकन विद्यार्थिनीपण होती. लक्झेंबर्गला त्या गेल्या . त्यांना तेथे ठरावीक प्रश्न विचारण्यात आले. आपल्या भाषणात त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरं देऊन आपल्या संशोधनाच्या आवडीबद्दल सांगताना वडिलांबद्दलही सांगितले . घरातलं मोकळं वातावरण आणि वडिलांनी मुलगी म्हणून कधीच अडवले नाही. मला ज्यात रस होता ते शिकण्यासाठी मदत केली. त्यांच्या या भाषणाचं कौतुक झालं. केंब्रिजला परतल्यावर त्यांचं संशोधनाचं काम सुरू झालं. आता त्यांनी आणि डॉ. डेरिक यांनी वनस्पतींवर काम सुरू केलं. प्रचंड आणि सातत्याने काम करत असताना अचानक कमला सोहोनी यांना एक महत्त्वाचा शोध लागला , बटाटय़ातील प्रेसिपिटेट हँड-स्पेक्ट्रोस्कोपमधून पाहताना त्यांना एक निराळ्याच रंगाची रेष दिसली. त्याचं नाव सायट्रोक्रोम ‘सी’. वनस्पतींच्या श्वसनक्रियेत महत्त्वाच्या ठरणाऱ्या या सायट्रोक्रोम घटकाचा शोध होता तो. त्यांनी आणि मार्गदर्शक रॉबिन यांनी अधिक अभ्यास करून त्यावर लेख लिहिला. आजही जगात वनस्पतींच्या श्वसनाचा विषय चर्चेला येतो तेव्हा कमला सोहोनी यांचा आणि ‘ नेचर ’मधील त्यांच्या लेखाचा उल्लेख असतोच.

४ जून १९३९ रोजी तिला पीएच.डी. मिळाली. केंब्रिज विद्यापीठाकडून पीएच.डी. मिळवणारी त्या पहिल्या भारतीय स्त्री आणि मराठी भाषिक. १४ महिन्यांत प्रबंध हा एक वेगळा विक्रमच होता. अनेकांनी आग्रह करूनही परदेशात मिळालेलं शिक्षण, ज्ञान आपल्या देशासाठी उपयोगात आणायचं या विचाराने त्या भारतात परतल्या . महाराष्ट्र सरकारने मुंबईतील विज्ञानसंस्थेत जीवरसायनशास्त्राचा विभाग नव्याने उघडला. तिथे कमलाबाई १९ जून १९४९ ला विज्ञान संस्थेत रुजू झाल्या. म्युझियमसमोर या विभागाला स्वतंत्र जागा मिळाली आणि कमलाबाईंनी सुसज्ज प्रयोगशाळा उभारली. आपल्या विद्यार्थ्यांना त्या सहा-आठ महिने शिक्षण देऊन नंतर संशोधन करायला सांगत. दुसरे प्रो. डॉ. एन. पी. मगर होते. दोघांकडे दहा-दहा असे वीस विद्यार्थी होते. संशोधनाचे विषय होते. नीरा पेयाची पौष्टिक उपयुक्तता आणि कडधान्ये आणि त्यातील ट्रिप्सीन इन्हिबिटर्स. हाफकिन्स इन्स्टिटय़ूटची पुनर्रचना समितीतही डॉ. कमलाबाईंना घेतलं गेलं. बडोद्याच्या महाराज सयाजीराव विद्यापीठाने जीवरसायन विषयाचा नवा स्वतंत्र विभाग उभारला. त्यासाठी कमलाबाईंना बोलावण्यात आले. आपली दोन लहान मुलं सांभाळून त्या मुबई -बडोदा सारी धावपळ करीत. विज्ञानसंस्थेत असतानाच राट्रपती राजेंद्र प्रसाद आणि होमी भाभा यांनी संस्थेला भेट दिली. तेव्हा त्यांना नीरा या पेयावर संशोधन करायला सुचवलं गेलं. आणि काम सुरू झालं. खादी ग्रामोद्योग मंडळ पहाटे तीन वाजता नीरा पाठवत. ती घ्यायला प्रयोगशाळेत स्वत: बाई जात. विद्यार्थ्यांना सांगत नसत. हे संशोधन १०-१२ वर्षे चालले . त्याचे चांगले फायदे हाती लागले. त्याबद्दल डॉ. कमलाबाईंना सर्वोकृष्ट संशोधनाचं पदक राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते २९ एप्रिल १९६० साली मिळालं. कमला सोहोनी ह्या भारतील पहिल्या विज्ञानातील पी.एच . डी . झालेल्या आहेत असे असे मानले जाते ?

कमला सोहोनी यांचा विवाह माधवराव सोहोनी यांच्याशी झाला होता त्याची त्यांना उत्तम साथ लाभली. एम.एस्सी. झालेले माधवराव ऑक्चुअरी म्हणजे विमातज्ज्ञ म्हणून काम करीत. पुढे ते खूप मोठय़ा पदावर राहिले. विमाकंपनीने अधिक उच्च शिक्षणासाठी त्यांना लंडनला पाठवलं. आयुर्वम्यिाचे मॅनेजिंग डायरेक्टर झाले. १९७२ ला ते निवृत्त झाले. कमलाबाईंबरोबर घरातली कामं ते करीत. शिस्त, टापटीप, प्रामाणिकपणा हे त्यांचे गुण आणि प्रखर बुद्धिमत्ता त्यामुळे दोघांनीही आपआपले व्यवसाय उत्तम सांभाळले. कमलाबाईंचे दोन्ही मुलगे उत्तम शिकले आणि आपापल्या व्यवसायात उच्च पदावर पोहोचले. सुना-नातवंड यांनी त्यांचं घर भरून गेलं. २२ सप्टेंबर १९९५ ला माधवराव नागिणीच्या आजाराने वारले.

कमला सोहोनीना त्या स्त्री म्ह्णून त्यांचा अनेक वेळा अपमान केला गेला , पुरुषी अहंकाराचा वाईट अनुभवही त्यांना आला. पण त्या सर्वाना त्या पुरून उरल्या आणि त्यांनी आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले . तर त्यांच्या दुसऱ्या दोन बहिणी दुर्गाबाई आणि विमलाबाई खूप शिकून त्यांनीही आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. मला आठवतंय मुबंईला कीर्ती कॉलेजमध्ये ग्रंथालीचा कार्यक्रम झाला होता त्यावेळी दुर्गाबाई भागवत आणि कमला सोहोनी दोघीही तेथे आल्या होत्या तेव्हा त्यांची स्वाक्षरी मला तेथे मिळाली.

१९९७ मध्ये आयुष्याच्या अखेरीस कमला सोहोनी यांना विज्ञान क्षेत्रामध्ये उत्कृष्टता आणि त्यांच्या योगदानासाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. भारतीय वैद्यकीय संशोधन खात्याने त्यांना सन्मानित करण्यासाठी एक खास कार्यक्रम दिल्ली इथे आयोजित केला. कमलाबाई सोहोनी यांच्या सन्मानार्थ खूप प्रेक्षक सभागृहात जमले होते. सर्वानी उभं राहून टाळ्यांचा कडकडाटात त्यांच्या कार्याला मानवंदना दिली. आणि डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच हातात पुरस्कार घेऊन उभ्या असलेल्या कमलाबाई व्यासपीठावर कोसळल्या. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केलं गेले परंतु तेथे १९९८ साली वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले .

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

1 Comment on भारताच्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..